विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-१

Submitted by अतरंगी on 23 September, 2017 - 03:08

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised. Happy

"ए माठ्या, अरे चल की पुढे " इति आमचे इनमीन साडेतीन वर्षांचे चिरंजीव, आमच्या पुढे थांबलेल्या एका कारला....

त्याच्या नंतरचे बायकोचे तीक्ष्ण कटाक्ष आणि मुलांच्या समोर काय बोलावे आणि काय नाही हे उपदेश ऐकून त्यादिवशी आम्हाला धड चार पेग पण नीट पिता नाही आले.... त्यानंतर तीन चार दिवस बायकोने अबोला धरल्याने आम्ही तसे मनातून खुश होतो. पण अबोल्यामुळे ती आम्हाला कामे सांगत नसल्याने आणि आम्ही कोणी शंभरदा कानी कपाळी ओरडल्याशिवाय कोणतेही काम करत नसल्याने, आम्हाला भरपूर म्हणजे अगदी भरपूर वेळ होता. त्याच रिकाम्या वेळात आमच्या मनात एक अतिशय महत्वाचे सामाजिक कार्य घोळू लागले.... आमच्या सर्व विवाहोत्सुक ज्युनिअर्स साठी एक गाईड लिहिण्याचे !!!!

विद्यार्थीदशेत हॉस्टेलवर, कामासाठी बॅचलर म्हणून घराबाहेर राहिलेल्या मुलांची लग्न झाल्यावर फार पंचाईत होते. घराच्या चार भिंतीत राहिलेल्या मुली जेव्हा माप ओलांडून आपल्या घरात येतात, तेव्हा आपल्या सवयींमुळे क्षणोक्षणी आपले माप काढले जाते. अशा आमच्यासारख्या सर्व सुजाण बालकांना समाज आणि घर यांच्या साचेबद्ध निरस जीवनपद्धतीत आणण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. ते लिहिण्यास आम्ही जातीने पुढाकार घेत आहोत. सर्व होतकरू लग्नाळू तरुणांसाठी लग्न करताना काय काय तयारी करावी लागते याचे हे रेडिमेड गाईड आम्ही मायबोलीच्या माध्यमातून जनतेस अर्पण करत आहोत.....

प्रथमतः आपल्याला आपल्या अंगात मुरलेल्या खूप बेसिक सवयींपासून सुरुवात करावी लागणार आहे...

१. बाथरूमला गेल्यावर, अंघोळ करताना दरवाजा लॉक करायचा असतो !!!!

२. आंघोळ झाल्यावर टॉवेल बेड वर किंवा खुर्चीवर न फेकता स्टँडवर वाळत घालायचा असतो.

३. बाथरूम मध्ये ड्रेनच्या डायगोनली विरुद्ध बाजूने पाणी ओतून सगळा कचरा ड्रेनवर आणण्याला बायका बाथरूम स्वच्छ करणे असे म्हणत नाहीत. बॅचलर मुलांच्या या स्किलला बायकांच्या लेखी काही महत्व नसते.

४. नुसता अंतर्वस्त्रे घालून घरात लोळायची, फिरायची हॉस्टेल ची सवय बंद करावी. हे खरे खूप अवघड आहे पण प्रयत्न करून जमू शकते.
वि.सू.१:- अंतर्वस्त्र हे एकदाच वापरून धुवायला टाकायचे असते हे अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका.
वि.सू.२:- एकच वस्त्र तीन चार दिवस वापरू नये, किंवा विकांताला धुवू या म्हणून साठवून ठेऊ नये.

५. घरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेचा OCD असतो हे सदासर्वकाळ ध्यानांत असू द्या. ते लोक खाली जमिनीवर पडलेली गोष्ट उचलून नुसता झटकून तोंडात टाकत नाहीत. धुवून खातात किंवा फेकून देतात.

६. जेवायच्या आधी बाकी सगळे लोक हात धुतात. आणि तुम्ही पण धुवावा अशी त्यांची (अवाजवी) अपेक्षा असते. हात धुणे म्हणजे भिजवणे नाही. साबण लावून स्वच्छ धुणे.

७. सिंक मधली भांडी नुसता पाण्याने विसळून न वापरता साबणाने धुवून मग स्वच्छ कापडाने पुसून मग वापरावी. इथे स्वच्छ कापड ही सापेक्ष टर्म आहे. अंगातला बनियन, बरमुडा वगैरे स्वच्छ कापड या त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्याचे कापड ते वेगळे विकत आणतात. आणि हो महत्वाचे म्हणजे फरशी पुसण्याचे आणि भांडी पुसण्याचे कापड वेगवेगळे असते.
(वि.सू.१.:- भांडे धुताना त्याचे झाकण पण धुवायचे असते.
वि.सू.२.:- भांडे धुताना आतून व बाहेरून दोन्ही बाजूने धुवायाचे असते)

८. स्वच्छतेचा OCD असलेले लोक भाज्या, फळे धुवून खातात. धुणे म्हणजे फक्त नळाखाली धरून भिजवणे असे अपेक्षित नसून आपण GF ला फर्स्ट डेट वर नेताना जशी खसखसून आंघोळ करतो तशी ती भाजीला आणि फळांना घालायची असते.

९. मॅगी बनवणे, कांदा परतून त्यात चटणी आणि कोणतीही भाजी/अंडे घालून पावासोबत खाणे याला स्वयंपाक करणे म्हणत नाहीत. इथे आम्ही स्वतः अजून स्वयंपाक शिकत असल्याने जास्त लिहू शकत नाही.

१०. कधी काळी कोणी बायकोसमोर तिच्या नातेवाईकांनी, तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याने, तुमच्या एखाद्या मित्राने एखादा पेग ऑफर केला तर 60 किंवा 90 ml कोरा पेग एका दमात पिऊन खाली ठेवायचा नसतो. 30 ml पेग मध्ये खंडीभर पाणी, कोल्ड्रिंक्स, बर्फ घालून तोंड वाकडे तिकडे करत तो भरपूर वेळ प्यायचा असतो किंवा अर्धवट सोडायचा असतो.

इतके सर्व नियम वाचून दमला असाल. बॅचलर मुलांना इतकं वाचायची सवय नसते. त्यामुळे भाग 1 इथेच संपवत आहोत. अजून आशा खूप गोष्टी लग्न करायच्या आधी कराव्या लागतात. त्याची यादी पुढील काही भागांमध्ये येईलच. तोपर्यंत वरील यादीतील काही गोष्टी अंगवळणी पडायला सुरुवात करता आली तर पहा.

क्रमशः......

भाग २ :- https://www.maayboli.com/node/64003

Group content visibility: 
Public - accessible to all site users

: काय लिव्हल य भावा. डोल्यात पाणी आलं
आमच्यासारख्यांची सोय झाली. लग्न करावं की नाही यावर पुनर्विचार करायला हवा आता Lol

नुसते अंतर्वस्त्र घालून फिरायची सवय बंद करावी
>> Biggrin खरंय खरंय

त्यातही टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच अर्धा तास रूमभर फिरणे होत असल्याने अंग पुसायची गरज पडायची नाही.
>> बरय टॉवेल तरी गुंडाळायचास Lol

गफ्रे हाॅस्टेल रूमवर रहायला येऊ शकते?
>> होस्टेल च्या रूमवर नसेल.

बरय टॉवेल तरी गुंडाळायचास
>>>>>
मला असले तसले शौक नव्हते ओ.... चेहरयावरून वाटत असलो तरी...
बाकी कधीतरी अनवधानाने केस पुसायला तोच गुंडाळलेला पटकन सोडून वापरायचो तेवढेच ..
गंमत केली हं, एकदाच एका मित्रासमोर चुकून तसे झालेले. तेव्हापासून आठवडाभर आमच्या रूमवर कोणी आले नव्हते Wink

गफ्रे हाॅस्टेल रूमवर रहायला येऊ शकते?
>> होस्टेल च्या रूमवर नसेल.
>>>>>
मलाही तसेच वाटते. हॉस्टेल अशी परवानगी चुकूनही देणार नाही.
पण आम्ही पेईंग गेस्ट म्हणून बाहेर राहायचो तिथे मैत्रीणी यायच्या. घरमालकाने कधी ऑब्जेक्शन नव्हते घेतले. एक्झामच्या वेळी ज्या हॉस्टेलच्या होत्या त्या स्टडी नाईटसला रात्रभरही असायच्या, रूमवरच झोपायच्या. पण आमचा काही त्रासदायक दंगा नसायचा आणि आमची रूम सर्व्हंट कॉटरसारखी दूरवर असल्याने, घातलाच कधी थोडाफार दंगा तरी आवाज पोहोचायचा नाही. तर केवळ मुली आहेत म्हणून परवानगी नाकारावे अश्या छोट्या विचारांचे आमचे घरमालक नव्हते. ईथे विषय निघाला म्हणून लिहिले, फार लिहिल्यास अवांतर होईल. पण कधीतरी त्यांच्याबद्दल सविस्तर नक्की लिहेन.

टॉवेल कश्याला धुवायचा असतो रोज?>>>>

आमच्या घरी अगदी रोजच्या रोज सर्वांची टॉवेल्स धुतली जातात. (धुणे म्हणजे साबण घालून धुणे, नुसते पाण्यातून काढणे नाही.)
आता याला तुम्ही पाण्याचा, विजेचा अपव्यय म्हणत असाल तर कठीण आहे!

रच्याकने, सध्या मी गच्चीवर ११० वाॅटचे सोलर पॅनेल लावलेले आहे, तसेच अजून एक लावले की वॉशिंग मशीन सोलारवर चालू शकेल म्हणजे विजेची बचत! (without Heater, कारण हीटर चालू केला तर मशीनचे power consumption 2200W होते, ज्यासाठी grid power वापरावी लागेल.)
भविष्यात जेव्हा सध्याच्या इमारतीचा पुनर्विकास (Re-development) होईल तेव्हा आमच्या Front Load Washing Machine साठी जमिनीपासून १.५-२ फूट उंच platform बनवून त्यावर मशीन ठेवून खालील जागेत १००-१२५ लिटरची टाकी बसवण्याचा विचार आहे, जेणेकरून मशीनचे drain झालेले पाणी त्यात जमा करून ते toilet flushing साठी वापरता येईल. म्हणजे पाण्याचीही बचत!
शिवाय यामुळे मशीनची उंची वाढून कपडे आत घालताना / काढताना वाकावे लागणार नाही! (सध्या मशीन सर्वसामान्य पद्धतीप्रमाणे जमिनीवर असल्याने मला कपडे घालताना वाकायचा खूप कंटाळा येतो, म्हणून मी मशीनपासून सुमारे २ फूट अंतरावर उभा राहून कपडे आत 'फेकतो'!!! Proud )

गफ्रे हाॅस्टेल रूमवर रहायला येऊ शकते?>>>>

किती भाबडा प्रश्न आहे हा.... तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे हॉस्टेल वर बऱ्याच गोष्टी करायच्या नसतात पण अशाच गोष्टी आवर्जून केल्या जातात. Wink

आता याला तुम्ही पाण्याचा, विजेचा अपव्यय म्हणत असाल तर कठीण आहे!
>>>>>>
मला हा साबणाचा अपव्यय वाटतो.
जर कपडे धुवून झाल्यावर उरलेले साबणाचे पाणी तुम्ही मला कुरीअर कराल तर मी त्यात तुरटी फिरवून त्यात मिसळलेला तुमच्या अंगाचा सर्व मळ तळाला बसवून ते पाणी गाळून घेऊन त्याचे सुर्यप्रकाशात नैसर्गिक पद्धतीने बाष्पीभवन करून शिल्लक राहिलेले साबणाचे क्षार चमचाभर तेल घालून पुन्हा कडक प्रकाशात सुकवत त्याची भुकटी बनवत आमच्या घरची बारदाणे आणि पायपुसणी धुवायला वापरू शकतो. कारण टॉवेल कधीतरी वर्ष सहा महिन्यातून एकदा धुवत असलो तरी पायपुसणी आमच्याकडे रोजच धुतली जाते Happy

कृपया विषयांतर टाळा.

इथे मार्गदर्शिका लिहिण्याचे महत्वाचे कार्य चालू आहे. Proud

टोटल ळॉल लिहिलंय. Happy
अंतर्वस्त्रे आणि त्याच्या विसु भयंकर Lol
नं ७ टोटल अ‍ॅग्री.
ह्या अशा हॉस्टेलायटांबरोबर ज्या मुलींची लग्न झालीयेत त्यांची दु:खं त्यांनाच ठाउक. (म्हणजे मुलींची Happy )

सस्मित, किती ते स्रीदाक्षिणत्य !!!!

तारे जमीन पर मोड ऑन....
एका वेगळ्या वातावरणात वाढलेल्या निरागस आणि निष्पाप मुलांची दया न येता तुम्हाला त्या उलट्या काळजाच्या, उठसुठ नवऱ्याला घालून पाडून बोलणाऱ्या निष्ठुर आणि निर्दयी स्त्रियांची कणव येते !!!!!

अहो त्या हॉस्टेलच्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या कोवळ्या मनावर किती आघात होत असतील या बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना. तुम्हाला त्याच्या ऐवजी त्या मुलींची काळजी वाटावी? काय म्हणावे याला ????

अतरंगी, Rofl
खरंतर आता प्रत्युत्तरादाखल अशीच आणखी एक धागामालिका मुलींसाठीही कुणीतरी काढावी. त्यांनाही (विवाहोत्सुक मुलींना) मार्गदर्शनाची तेवढीच आवश्यकता आहे.. Proud

अतरंगी Lol
घालुन पाडुन बोलत नाहीत बायका. तुम्ही तर त्यांना निष्ठुर आणि निर्दयी ठरवुन टाकलंत.
हॉस्टेलच्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या कोवळ्या मनावर योग्य ते (त्यांच्यादृष्टीने) संस्कार होणं जास्त गरजेचं असतं म्हणुन बोलतात.

Pages