उरले जगणे, मरणासाठी !...

Submitted by झुलेलाल on 20 September, 2017 - 08:52

परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो.
बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले.
तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर...
मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं.
हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले.
तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती.
मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
परवाच्या भेटीमुळे तो लेख पुन्हा आठवला

उरले जगणे, मरणासाठी...

‘‘नमस्कार. मी लवाटे. काल आपलं फोनवर बोलणं झालं होतं. आज चार वाजता भेटायचं ठरलं होतं. मी आत येऊ?’’.. दरवाजा किंचित किलकिला करून एक वृद्ध गृहस्थ खणखणीत आवाजात बोलत होते. मी तर त्यांचीच वाट पाहात होतो. मी उभा राहिलो, त्यांना आत बोलावलं. ते समोरच्या खुर्चीत बसले. खांद्याची लांब बंदांची कापडी पिशवी काढून भराभरा कागदाची काही भेंडोळी त्यांनी बाहेर काढली. सारे कागद नीट एकत्र केले, आणि मान वर करून माझ्याकडे पाहात ते प्रसन्न हसले..
आदल्याच दिवशी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. भेटायचं ठरलं, पण वेळ जमत नव्हती. गिरगावात झावबावाडीत लक्ष्मीबाई चाळीत ८४ वर्षांचे नारायण कृष्णाजी लवाटे आणि त्यांच्या पत्नी, इरावती लवाटे (वय वर्षे ७६) राहातात. ते मूळचे वसईचे. पण गेली ७२ वर्षे मुंबईतच, याच चाळीत राहातात. लवाटे एसटीत अकाऊंटस खात्यातून निवृत्त झाले. इरावतीबाई गिरगावातल्याच आर्यन शाळेत मुख्याध्यापिका होत्या..
गेल्या आठवडय़ात कधीतरी त्यांनी पाठविलेलं एक पत्र हातात पडलं आणि या जोडप्याला भेटलंच पाहिजे, असं वाटू लागलं.वयोमानानुसार आयुष्याचा उत्तररंग सुरू झालेला असतानाही जगण्याची आस बाळगून अंथरुणावर पडलेले अनेक जीव आसपास दिसतात. पण हे जोडपं वेगळं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षीदेखील, धडधाकट आहोत तोवरच मरण मिळावं, यासाठी पत्रव्यवहार करणारे, लोकप्रतिनिधींचे आणि मंत्रालयाचे उंबरठे झिजविणारे, इतरांच्या अडचणींसाठी वाट्टेल तिथे जाऊन, भेटीगाठी घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे लवाटे माझ्यासमोर, अगदी ठरलेल्या वेळी येऊन दाखल झाले होते.
‘‘मी पाच मिनिटं अगोदरच आलो होतो, पण आपली भेटायची वेळ चारची ठरली होती. म्हणून बाहेर थांबलो होतो..’’ हातातले उलगडलेले कागद समोर धरून लवाटे म्हणाले. त्यांच्या डोळ्यांत एक आनंदी छटा स्पष्ट दिसत होती. म्हातारपणाचे उद्योग म्हणून काहीतरी वेड डोक्यात घेतलं असावं, हा माझा समज त्या छटेनं पुसून टाकला.
आणि लवाटेंना बोलतं करण्यासाठी काहीतरी विचारायचं, म्हणून मी तोंड उघडलं. पण तेच बोलू लागले. अगदी मुद्दय़ावरच आले.
एक एक कागद माझ्यासमोर ठेवून त्याची माहिती देऊ लागले. इच्छामरणाचा कायदा अमलात यावा म्हणून ते गेली पंचवीस र्वष पत्रव्यवहार करतायत. या कायद्याचा मसुदा तयार करून संसदेच्या सदस्यांनाही त्यांनी पाठवलाय. मुख्य न्यायमूर्तीपासून खासदारांपर्यंत पाठविलेली पत्रं, इच्छामरणाच्या मुद्दय़ावर वर्तमानपत्रांतून झालेल्या चर्चेची कात्रणं, बातम्या सारे कागद माझ्यासमोर ठेवून कोणत्या दिवशी आपण कोणाला भेटलो, त्याची जंत्रीच लवाटे सांगू लागले.
‘‘आम्हाला दोघांनाही एकदमच मरण पाहिजे. मागे कुणी राहता कामा नये. आम्हाला मूलबाळ कुणी नाही’’.. लवाटे बोलू लागले. मला उगीचच अस्वस्थ वाटू लागलं होतं.
‘‘असं का वाटायला लागलंय तुम्हाला?’’.. मी.
‘‘जगण्याला अर्थ आहे का काही? आम्ही काय करणार आहोत आणखी जगून आता या वयात?’’ .. माझा प्रश्न संपायच्या आतच लवाटेंनी उत्तरही देऊन टाकलं होतं.
‘‘पण असं असतं, आपला जन्म आपल्या हातात नसतो. तसं मरण पण आपल्या हातात नसतं. आपण केव्हा मरायचं, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही’’.. त्यांनी बोलत राहावं, म्हणून मी खडा टाकत होतो, आणि माझं बोलणं संपायच्या आधीच त्यांच्याकडे प्रतिवादही तयार होता..
‘‘तो नव्हता म्हणूनच तर हा प्रश्न आलाय. पण मरण हातात आहे. परदेशात अशी सोय आहे. दुसरी गोष्ट अशी की, अशा लोकांना जगवत ठेवून आपण राष्ट्रीय संसाधनांवर अनावश्यक ताण आणतोय. गर्भपाताचा कायदा करून नवीन प्रजेचे जन्म रोखलेत, ते तुम्हाला चालतात. त्यांना जन्म घेण्यापासून परावृत्त केलंत. त्यांना जन्म मिळाला नाही, तर वर तळतळणारे आत्मे मुक्त कसे होणार?.. त्यांना ‘एन्ट्री’ बंद केलीत ना? मग आमच्यासारख्यांच्या ‘एक्झिट’चा मार्ग तरी मोकळा करा.. दुसरं म्हणजे, अशा विकलांग अवस्थेत जगणाऱ्या लोकांना सांभाळण्यासाठी वृद्धाश्रम सुरू करा, त्यांचा वेळ जात नसेल तर काहीतरी उपाययोजना करा, हे कायदे करून आणि म्हाताऱ्या लोकांना जगवण्यापेक्षा हाती असलेला तुटपुंजा पैसा तरुण पिढीच्या उत्कर्षांसाठी मार्गी लावावा. म्हाताऱ्यांवर पैसे खर्च करून फायदा काय? आं?’’.. लवाटेंनी माझ्याकडे रोखून पाहात थेट मुद्दा मांडला.
‘‘आज ना उद्या आपण मरणारच आहोत. मग वेदनारहित मरण मिळावं, अशी इच्छा असलेल्यांना तसं मरू का दिलं जात नाही?.. तशी सोय नसल्यामुळे जगत राहण्याला अर्थ काय?.. हे सर्व बदललं पाहिजे. आता विचार करायची वेळ आली आहे, कारण लोकसंख्येचाही विस्फोट होऊ लागलाय. वेळीच विचार केला नाही, तर एक वेळ अशी येईल की म्हाताऱ्या, निरुपयोगी माणसांना गॅस चेंबरमध्ये टाकून मारावं लागेल’’.. लवाटे फारच थेट आणि भेदक बोलत होते. इच्छामरणाच्या कायद्यासाठी काम करणारे ते केवळ कार्यकर्ते नाहीत, त्याची सुरुवातच स्वत:पासून करावी यासाठी तळमळणारा माणूस माझ्यासमोर आपलं म्हणणं ठासून मांडत होता.
‘‘हे असं का झालं? मरणाचे विचार कधीपासून तुमच्या डोक्यात सुरू झाले?’’.. मी आणखी एक खडा टाकला.
‘‘सांगतो. १९८७ पासून मी या मुद्दय़ावर वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. पत्रव्यवहार करतोय. तुमच्या वर्तमानपत्रातही मी अनेकदा या प्रश्नावर पत्रे पाठवलीत. मी स्वत: मृत्यूनंतर देहदान, नेत्रदान करणार आहे. माझ्या दृष्टीनं मी पूर्णपणे या संकल्पनेशी एकनिष्ठ आहे. आणि ते आज अचानक नव्हे, १९८७ पासून.. आता मात्र, ही गरज अधिक जाणवायला लागलीये. आज माझं वय ८४ आहे. सुदैवाने आज मला कोणताही आजार नाही. पण उद्या होऊ शकतात. आम्ही दोघंच नवरा-बायको आहोत. आम्हाला मूलबाळ नाही. म्हणजे आम्ही विचारपूर्वकच मुलं नकोत हा निर्णय घेतला होता. कारण आपली इच्छा म्हणून मुलांना जन्माला घालणं आम्हाला मान्य नाही. आपण जन्माला आलो ते आपल्या इच्छेनं नाही. मग दुसरा जीव आपण का जन्माला घालायचा?’’..
‘‘तुम्ही काय करत होतात?’’.. त्यांचं बोलणं थांबवण्यासाठी मी विचारलं..
‘‘मी एसटीमध्ये होतो. पत्नी गिरगावच्या आर्यन हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होती. तिला निवृत्त होऊन पंधरा र्वष झाली. २००६ साली अपघात होऊन तिच्या गुडघ्याचं हाड मोडलं, गेल्या वर्षी दुसऱ्या गुडघ्याचं हाड मोडलं. आता ती बरी आहे. पण पुढे माझं काय होणार, अशी तिला काळजी वाटतेय. माझं तर वय झालंय.. जगण्याचा परवाना संपलाय. मरण येत नाही म्हणून मी जगतोय, ही स्थिती काही स्पृहणीय नाही. असे कितीतरी लोक असतील, पण त्यांना हे व्यक्त करता येत नसेल. कुणाकडे जायचं हे माहीत नसेल. आज लोकसंख्येची अशी स्थिती आहे, की ती कायम राहिली तर काही वर्षांनी जगातल्या काही लोकसंख्येला गॅस चेंबरमध्ये घालून मारायची वेळ येईल. जसं तुम्ही ‘टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी’ केलीत ना, तसं हे का नाही करत? निदान इच्छा आहे त्यांना तरी मरण्याची परवानगी द्या’’..
‘‘आम्ही आत्महत्या करू शकतो. नाही असं नाही. लोक म्हणतील, तुम्हाला मरायचंच आहे, तर इमारतीवरून उडी मारून, पाण्यात बुडी मारून जीवन संपवत का नाही?.. पण तसं मरण आम्हाला नकोय. तसं करून मरण येईलच याची खात्री काय? वैद्यकीय निरीक्षणाखाली मरण आलं, तर ते जास्त चांगलं की नाही?’’.. लवाटेंनी मलाच प्रश्न केला.
मी सुन्न..
‘‘.. उगीच आत्महत्येचा प्रयत्न करायचा, आणि तो फसला तर हातपाय मोडून अंथरुणावर खितपत पडायचं, त्यापेक्षा आहे ते बरंय म्हणायची पाळी येईल ना.. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ यायची’’.. ते हसत म्हणाले खरे पण मी विचारात पडलो होतो..
‘‘हे मरण सरकारी देखरेखीखाली व्हायला हवं. मेल्यानंतर तो देह सरकारच्या ताब्यात घेतला जावा, त्याचे अवयव गरजूंसाठी वापरले जावेत. आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला फायदा होत असेल, ज्याला जगायची इच्छा आहे, त्याला ते मिळत असतील, तर माझे निरुपयोगी अवयव कामाला तरी येतील.. मला याचा उपयोग तरी काय?’’..
बोलता बोलताच लवाटेंनी आणखी काही कागद पिशवीतून बाहेर काढले. आमदार, खासदारांना पाठविलेली पत्रं समोर ठेवली.
‘‘त्यांच्याकडून तुम्हाला काही प्रतिसाद आला?’’.. मी विचारलं
‘‘नाही. पण काहींनी कळवलं तरी मिळाल्याचं. असं आहे, लोकप्रतिनिधींना खूप कामं असतात. त्यापुढे हा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही. जगणाऱ्यांची चिंता करणंच मुश्कील झालंय, तर मरणाऱ्यांसाठी विचार करायला कुणाला वेळ आहे हो?.. आणि त्यांची राजकीय गणितं वेगळी असतात. त्यांना असल्या गोष्टीत पडणं शक्य नाही हे मला माहीतेय.. तुमचं काय मत?’’.. पुन्हा हसत हसत लवाटेंनी मलाच प्रश्न केला.
‘‘आता माझ्या पुढच्या हालचाली तुम्हाला सांगतो..’’ कागदाचा एक चिटोरा हाती घेऊन लवाटे म्हणाले, आणि ते वाचू लागले..
‘‘राज्यातील सर्व लोकसभा, राज्यसभा सदस्यांनी या प्रश्नी पुढाकार घ्यावा यासाठी पत्रं पाठविणं.. निवडक तज्ज्ञ वैद्यकीय व्यक्ती व कायदेतज्ज्ञांना पत्रं पाठवून या प्रश्नावरील कायदेशीर, वैद्यकीय बाबतीतील त्यांची मते जाहीर करण्याचे आवाहन करणं.
अण्णा हजारेंशी पत्रव्यवहार करून विनंती करणं’’.. बोलता बोलता लवाटे पहिल्यांदाच काही क्षण स्तब्ध झाले.
‘‘तुम्ही तर नवी चळवळच उभी करायला निघाला आहात’’.. मी म्हणालो.
‘‘मग? करायलाच पाहिजे.. हात-पाय चालतायत तोवर केलंच पाहिजे. नाही केलं तर माझंच पुढचं आयुष्य खडतर होईल,’’ असं म्हणत लवाटेंनी पुन्हा तो कागद वाचण्यास सुरुवात केली. ‘‘आता माझा पुढचा कार्यक्रम ऐका.. येत्या १५ ऑगस्टला मंत्रालयासमोर सांकेतिक धरणे. आम्ही दोघंही बसणार. आमची मागणी एकच.. आम्हाला एकत्र मरण द्या. आम्हाला निवृत्तिवेतन नको, पगारवाढ नको, काही नको. या धरण्यातून काही झालं नाही, तर गांधी जयंतीला, २ ऑक्टोबरला राजघाटावर लाक्षणिक उपोषण’’..
‘‘खरं म्हणजे, हा विषय लोकांच्या इंटरेस्टचा नाही. मरणाबद्दल बोलणाऱ्याचं काय ऐकायचं?.. जगण्याबद्दल काय ते बोला.. पण पुढची परिस्थिती टाळायची असेल, तर मरणाबद्दलच विचार केला पाहिजे.’’ लवाटे ठामपणे म्हणाले.
माझ्या मनात वेगळेच विचार येत होते. यांना कुठल्या नैराश्यानं तर ग्रासलं नसेल?.. त्यातून या जोडप्याला मरण प्रिय वाटू लागलं असेल का?..
‘‘तुमचा दोघांचा संसार कसा झाला?’’ पुन्हा त्यांना थांबवून मी विचारलं, आणि क्षणाचाही विलंब न लावता ते संसाराविषयी सांगू लागले.
‘‘उत्तम होता. मूलबाळ होऊ द्यायचं नाही हे आम्ही दोघांनीही संमतीनं ठरवलं आणि एकत्र मरायचं हाही आमचा दोघांचाही निर्णय आहे. कुठलेच खाचखळगे आमच्या आयुष्यात नव्हते. समाजाने तर माझ्या लायकीहून अधिक प्रेम दिलं. कधीच मला कसली अडचण आली नाही. मग तुम्हीच ठरवा आमचा संसार कसा असेल ते.. आता मात्र, पुढच्या आयुष्याला काही अर्थ नाही असं वाटू लागलं. आपण आता काय कुणाचं भलं करू शकतो? उलट काही झालं, तर समाजावरच भार!’’ लवाटे मिश्किल हसत म्हणाले.
‘‘आता माझ्या उरलेल्या आयुष्याची रूपरेषा सांगतो. आमचं आयुष्य सुरळीत होतं. कुठलेच खाचखळगे नव्हते. मुलं नसल्याने कुणाचा भारही नाही. उरलेल्या आयुष्यात लोकांसाठी काही करावं असं मी ठरवलंय. ते तुम्हाला सांगतो.’’..
लवाटेंनी आणखी एक कागद बाहेर काढला. ‘‘केंद्र सरकारने ‘उपदान’ (ग्रॅच्युएटी) कायदा ३ एप्रिल ९७ पासून देशभर लागू केला. त्याचा फायदा सर्वाना मिळावा म्हणून मी भांडतोय. सरकारी कार्यालयांत खेटे मारतोय. मला ते सांगतात, ज्यांना फायदा हवा त्यांनी अर्ज करावेत. माझं म्हणणं, प्रत्येकानं अर्ज करून फायदा काय?.. वकिलांचे खिसे भरतील एवढंच ना?.. गिरगावातील सहा शाळांच्या व्यवस्थापनांवर मी केस करायला लावल्यात. लोकांचे पैसे देणे आहेत, ते दहा टक्के व्याजानं मिळतील. हे करण्यासाठी मी पहिल्यांदा बायकोचीच केस हाती घेतली. तिला पैसे मिळाल्यावर आणखी कुणीतरी म्हणालं, तुमचं काम झालं, आमचं काय?.. मग केस करून त्यांनाही पैसै मिळवून दिले. प्रत्येकासाठी स्वतंत्र केसेस करणं शक्य नसल्यानं मी आता एकत्र केस करतोय. ती जिंकलो, तर राज्यातील शेकडो शिक्षकांना करोडो रुपये मिळतील’’.. हातातल्या कागदाची घडी करून तो पिशवीत ठेवत लवाटे हसत म्हणाले.
‘‘सरकारने स्वत: कायदे बदललेत, मग त्याप्रमाणे वागायला हवे. राज्यातील शिक्षकांसाठी हा ज्वलंत प्रश्न आहे. तो मी हाती घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मी हाती घेतो. मंत्रालयात मांडतो. माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन त्यांची तड लावण्याचा प्रयत्न करतो. निवृत्त झाल्यानंतर परवा ऑगस्टपर्यंत मी एसटी युनियनच्या ऑफिसात बसत होतो. आता दररोज जात नाही, पण काही काम असेल तर स्वत:हून त्यांच्यासोबत जातो.’’
..आता लवाटेंच्या डोळ्यातलं समाधान त्यांच्या आवाजातही दिसू लागलं होतं. त्यांना खूप बोलायचं होतं. बोलता बोलता त्यांनी ते पत्र माझ्या हातात दिलं. इच्छामरणासाठी उभयतांना परवानगी मिळावी यासाठी केलेली विनंती त्या पत्रात होती..
‘‘काका, मरणाच्या मागे लागणं चांगलं वाटत नाही’’.. मी म्हणालो.
‘‘अहो, म्हातारपणाचा उद्योग म्हणून नाही मी हे करत. १९८७ पासून मी झगडतोय. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून. आम्हाला खात्रीशीर मरण हवंय. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली, विषाचं इजेक्शन द्यावं आणि आमचं आयुष्य संपवावं.. मेल्यानंतर आमचा देह सरकारने ताब्यात घ्यावा, कारण जिवंतपणी नोकरीच्या काळात सरकारच्या अनेक योजनांचा फायदा आम्ही घेतला आहे’’.. बोलता बोलता लवाटे थांबले, आणि त्यांनी माझे हात पकडले.
‘‘माझं ऐकून घेतलंत, हेच खूप झालं. लोकांना वाटेल, मला म्हातारचळ लागलंय.. पण मी हे काम विचारपूर्वकच करतोय’’.. माझ्या डोळ्यांत थेट पाहात लवाटे ठामपणे म्हणाले..
‘‘काका, चला आपण चहा घेऊ या’’.. मी उठलो. लवाटेही उठले आणि आम्ही कॅन्टीनमध्ये बसून चहा घेतला. चहा संपला आणि लवाटेंनी निरोप घेतला.
‘‘तुम्ही मला एक मदत कराल?’’ बाहेर पडताना लवाटेंनी मला विचारलं.
मी डोळ्यांनीच ‘काय’ म्हणून विचारलं.
‘‘मला राज्यातल्या सगळ्या खासदारांचे पत्ते, ई-मेल आयडी पाहिजेत. त्यांच्याकडे पत्रव्यवहार करायचाय.’’
मी त्यांचा हात थोपटत मानेनंच ‘हो’ म्हणालो आणि लवाटे बाहेर पडले..

http://www.loksatta.com/chaturang-news/narayan-krishnaji-lavate-seeks-eu...

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख आहे, लवाटेंचे सारे मुद्देही पटलेच.

खरेच हा कायदा झाला तर बरे होईल. मी सुद्धा याचा वापर करेन. मोक्ष मोक्ष म्हणतात ते आणखी काय असते.
काही अटी ठेवून व्हायला हरकत नाही. म्हणजे जे आयुष्याला वैतागले आहेत त्यांना नका देऊ सुटका, पण जे शारीरीक दृष्ट्या खचले आहे, बिछान्यावर पडले आहेत, जगण्याचा आनंद लुटणे ज्यांना आता शक्यच नाही, त्यांना स्वमर्जीने मृत्युला कवटाळू द्यायला काय हरकत आहे.
पण बहुधा याचा गैरवापर केला जाईल अशी भिती असल्याने होणे कठीण वाटते.
अन्यथा मी त्या दिवसाची कल्पनाही करू शकत नाही की मी नुसता बेडवर आडवा झालोय. जवळच माझा मोबाईल वा लॅपटॉप आहे, पण तो हाताळावा ईतकीही ताकद माझ्या हातांत बोटांत नाहीये.. Sad

छान लिहिलंय. लवाटेंच्या मनासारखं होण्याची शक्यता कमीच आहे पण.

लवाटेंचे सारे मुद्देही पटलेच.
>>>
+१

खरेच हा कायदा झाला तर बरे होईल. मी सुद्धा याचा वापर करेन
>>>
मी सुद्धा .. बहुदा!

माझ्या माहिती प्रमाणे असिस्टेड डाईंगचे नियम बर्‍याचश्या ठिकाणी युथनेशिआ... वेदनातून मुक्ती टाईप आहेत. बेल्जिअम आणि ल्क्झेनबर्गला खूप लिबरल आहेत मला वाटतं.
मला लवाटेंचे मुद्दे बिलकुल पटले नाहीत. युथनेशिआ नक्कीच असावा, पण धडधाकट माणसाला इच्छामरण असू नये.
भारतात युथनेशिया नियम केले तरी त्याच्या गैरवापराच्या भितीने असे नियम करुच नये असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. दुर्दैवी आहे हे. पण कायदा आणि सुव्यवस्था नसलेल्या ठिकाणी हे नियम म्हणजे कत्तल करायचा परवाना म्हणून वापरले जातील.

मला मुद्दे पटतात पण आणि नाही पण.
'ईच्छामरण' कायदा आणला तर त्याचं वय काय ठरवणार?
जी माणसं असाध्य वेदनेत नाहीत पण तरी त्यांना आयुष्य बास झालं वाटतंय त्यांचं काय?
जी माणसं १००-११५ जगू इच्छितात पण त्यांच्या आजूबाजूचे सिक्स्टिज मधले थकलेले मुलं सुना त्यांची काळजी घेऊण थकलेत त्यांचं काय?त्यांच्यावर इच्छामरण मागण्याचा दबाव आणला गेला तर?
जगासाठी खूप उपयोगी असलेला कोणी वृद्ध उद्योगपती, विचारवंत, शास्त्रज्ञ समाजकंटकांकडून इच्छा मरण दाखवून संपवला गेला तर काय?
केरळ्/तामिलनाडू मध्ये वृद्धाना भरपूर मालिश देऊन नंतर भरपूर नारळ पाणी पाजून अक्यूट रेनल फेल्युअर ने संपवण्याचा प्रघात आहेच ना? बरेच वृद्ध वय झालं, आर्थिक परिस्थिती नाही म्हणून स्वत्: हे करायला सांगतात, काहींची जगायची इच्छा असून घरच्या गरिबीमुळे तयंना संपवलं जातं.
जर नवरा बायको पैकी एकाची इच्छामरणाची इच्छा असली आणी त्याने/तिने दुसर्‍या पार्टनर वर दबाव आणला तर?
मुलासुनांशी क्षणिक भांडण झाल्याने तिरिमिरीत इच्छामरणाचा फॉर्म भरुन अंमलात आणायला सांगितलं आणि प्रोसेस सुरु झाल्यावर जगावं वाटलं तर?

याच्या खूप मॉरल साईड आहेत.

अमितव आणि मी_अनुशी सहमत.

पण कायदा आणि सुव्यवस्था नसलेल्या ठिकाणी हे नियम म्हणजे कत्तल करायचा परवाना म्हणून वापरले जातील.
याच्या खूप मॉरल साईड आहेत.>>> +१

पण धडधाकट माणसाला इच्छामरण असू नये.
>>>>>

का असू नये?

एखाद्याला मायबोली सोडून जावेसे वाटले तर त्याला बिनधास्त जाता येते. एखाद्याला देश सोडून जावेसे वाटले तर त्यालाही जाता येते. एखाद्याला जवळच्या माणसांना सोडून देशसेवा किंवा देवभक्ती करायला जावेसे वाटले तर त्यालाही जाता येते..
मग एखाद्याला जगदुनिया सोडून जावेसे वाटले तर त्याला अटकाव करणारे आपण कोण? ज्याची त्याची लाईफ आणि ज्याची त्याची मर्जी.

ईथे कायद्याचा गैरवापर होईल वगैरे हे मी माझ्या पोस्ट मध्येही म्हटले आहे आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात हा नियम होणे कठीण आहे आणि होणे योग्यही नाही.

पण तात्विकदृष्ट्या एखाद्याला आपले आयुष्य संपवावेसे वाटले, आता बस्स झाले जगणे असे वाटले तर समाजाला वा सरकारला त्यात हस्तक्षेप करायचा अधिकार नेमका कसा येतो?

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे असे ऐकून आहे. माणूस मेल्यावर नक्की शिक्षा कोणाला देतात हा प्रश्न नेहमी पडतो. कोणाला काही कल्पना? हे खरे आहे की अफवा?

एखाद्या कायद्याचा गैरवापर होईल म्हणून कायदाच करू नये ? हे तर अ‍ॅबॉर्शन च्या वेळीही म्हणले गेले होते. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होउ शकतो.

हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होणार आहे. आपण एक समाज म्हणून डिनायल मध्ये आहोत. घरात कचरा झाला तर तो साफ करण्यापेक्षा त्यावर एखादे टेबल वगैरे ठेवून झाकण्यासारखा. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे ते निदान चार पैसे खर्च करून म्हातारपण सुसह्य करू शकतात. इतरांची अवस्था आई जेवू देत नाही व बाप भीक मागू देत नाही. सरकार कडे तरुणांना नोकर्‍या द्यायलाच पैसे नाहीत. नव्वदीतले जोडपे असेल व त्यांना मूल बाळ नसेल तर एकाच्या आजारपणात सर्व पैसे खर्च करून त्याच्या माघारी दुसर्‍याने भीक मागावी काय ?

पुरेसे चेक्स अँड बॅलंसेस ठेवून हा कायदा जरून आणावा. निदान लवाटेंसरख्या लोकांसाठी तरी. आयुष्यभर ताठ मानेने जगलेल्या या माणसाला डिग्निफाईड मरण देणे आपल्याला जमू नये?

जी माणसं १००-११५ जगू इच्छितात पण त्यांच्या आजूबाजूचे सिक्स्टिज मधले थकलेले मुलं सुना त्यांची काळजी घेऊण थकलेत त्यांचं काय?त्यांच्यावर इच्छामरण मागण्याचा दबाव आणला गेला तर?

का दबाव आणू नये ? मी एकशे दहा वर्षे अंथरुणात पडून का होईना जगणार, माझ्या मुला सुनेंचे करीयर, सेव्हिंग, व जीवन बरबाद झाले तरी बेहत्तर हा कसला हट्ट ? ययाती?

जगासाठी खूप उपयोगी असलेला कोणी वृद्ध उद्योगपती, विचारवंत, शास्त्रज्ञ समाजकंटकांकडून इच्छा मरण दाखवून संपवला गेला तर काय?

असे काही होणार नाही.

१) परमसखा मृत्यू : किती आळवावा....
http://www.mr.upakram.org/node/1386

http://www.misalpav.com/node/3015

२) सुखांत
http://www.mr.upakram.org/node/2168

३) पुन्हा एकदा सुखांत!
http://www.mr.upakram.org/node/2491

४) सन्मानाने मरण्याचा हक्क
http://www.aisiakshare.com/node/3317

अवयव दाना संबंधी - काही माहिती
http://www.maayboli.com/node/38727

फिरुनी नवी जन्मेन मी!!! (अर्थात महत्व अवयव प्रत्यारोपणाचे!)
http://www.maayboli.com/node/23686

इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
http://www.maayboli.com/node/48623

लवाटे ना समर्थन आहे.

Submitted by vijaykulkarni on 22 September, 2017 - 06:41 >> पूर्ण प्रतिसादाला +1.

अशा धाग्यांवर स्वित्झर्लंडमधील Dignitasबद्दल मी नेहमीच लिहित असते
http://www.dignitas.ch/?lang=en

आता वेळ झाली हा नुकताच रिलीज झालेला चित्रपट तुमच्या याच लेखावर आधारलेला आहे.
लवाटे दांपत्यांचा हा लढा त्यात दाखवला आहे.