दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2017 - 01:42

दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते
प्राणपणाने चालवलेली चळवळ म्हणजे नाते

नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नाते

हयातभर आतील रेशमाला जपतो शर्थीने
अश्या न ढळणार्‍या पदराची सळसळ म्हणजे नाते

काळ उमेदीचा घालवणे गांभीर्याने सोबत
म्हातारे झाल्यावर होणे अवखळ म्हणजे नाते

शुष्क मनांना चिंबवायला नियम मोडतो सारे
डोळ्यांशी फितुरी करणारा ओघळ म्हणजे नाते

गर्दी असताना असते ते एकाकीपण असते
कुणीच नसताना असते ती वर्दळ म्हणजे नाते

जिच्याविना येऊ ना शकते अस्तित्वात कुणीही
नव्या अंकुरासाठीची ती भेसळ म्हणजे नाते

सरळ चालणे मख्खपणे ही अफरातफरी समजा
राग लोभ मत्सर त्यागाचा गोंधळ म्हणजे नाते

कालौघाच्या रुक्ष थरांच्या आत गाडल्या गेल्या
'बेफिकीर' त्या आठवणींची हिरवळ म्हणजे नाते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नातेगर्दी

असताना असते ते एकाकीपण असते
कुणीच नसताना असते ती वर्दळ म्हणजे नाते
>>>>>>>>>>>>>
अप्रतिम खुप् सुंदर

खुप छान.!
नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नाते

काळ उमेदीचा घालवणे गांभीर्याने सोबत
म्हातारे झाल्यावर होणे अवखळ म्हणजे नाते... मस्तच!

नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नाते

काळ उमेदीचा घालवणे गांभीर्याने सोबत
म्हातारे झाल्यावर होणे अवखळ म्हणजे नाते
>> वाह!!

निव्वळ अप्रतिम बेफी.
तसे सर्वच शेर अतिशय उत्तम आहेत, पण
>>नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नाते
हयातभर आतील रेशमाला जपतो शर्थीने
अश्या न ढळणार्‍या पदराची सळसळ म्हणजे नाते>>
हे दोन विशेष आवडले. Happy

सुरेख,सुरेख!
>>>शुष्क मनांना चिंबवायला नियम मोडतो सारे
डोळ्यांशी फितुरी करणारा ओघळ म्हणजे नाते>>>क्या बात है!
दरवळ,अवखळ फार आवडले!
>>>सरळ चालणे मख्खपणे ही अफरातफरी समजा
राग लोभ मत्सर त्यागाचा गोंधळ म्हणजे नाते>>>बहोत खूब,अतिशय सच्चा शेर!