दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते
Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2017 - 01:42
दोन इगोंच्या भेटीमधील वादळ म्हणजे नाते
प्राणपणाने चालवलेली चळवळ म्हणजे नाते
नवीन अत्तर भरणे म्हणजे फसगत करणे अपुली
रित्या कुपीला येतो जो.... तो दरवळ म्हणजे नाते
हयातभर आतील रेशमाला जपतो शर्थीने
अश्या न ढळणार्या पदराची सळसळ म्हणजे नाते
काळ उमेदीचा घालवणे गांभीर्याने सोबत
म्हातारे झाल्यावर होणे अवखळ म्हणजे नाते
शुष्क मनांना चिंबवायला नियम मोडतो सारे
डोळ्यांशी फितुरी करणारा ओघळ म्हणजे नाते
गर्दी असताना असते ते एकाकीपण असते
कुणीच नसताना असते ती वर्दळ म्हणजे नाते
विषय:
शब्दखुणा: