ये जो थोडे से हें पैसे

Submitted by स्वप्नील on 9 September, 2017 - 16:14

ये जो थोडे से हें पैसे

"अरे वाक अजून. जरा जोर लाव. किती वेळा सांगायचं व्यायामाकडे लक्ष देत जा. फक्त दोन सूर्यनमस्कारांमध्ये तुझी हवा टाईट होतेय. उद्या चार पोरं मारायला आली तर ताकत कुठून आणणार".

जगदाळे सरांचे हे शब्द नीलच्या कानी पडत होते खरे पण पाच सूर्यनमस्कार मारून कधी एकदाची 'काले पानी कि सजा खत्म होगी' याकडेच त्याचं लक्ष लागून होतं. ऊसाच्या गाडीवर रस निघालेला असतानाही 'भैय्या' कसा तोच ऊस सतत मशीन मध्ये टाकतो. त्या उसाची जिकाही अवस्था होत असेल तसंच नीलचं झालं होतं. पण नशिबाने साथ दिली. घंटा वाजली. पिटीचा तास संपला. व्यायामाचं काबारकष्ट करून पोरं पटापट आपल्या ढिल्या झालेल्या पँटा टाईट करून वर घेऊ लागले. त्यांचा हा असफल प्रयत्न बघून मुली मनसोक्त हसत होत्या.

शाळा सुटली. भविष्यात काहीतरी करायच्या धेय्याने शाळेत आलेली पिढी घंटा वाजताच 'उद्याचं उद्या बघू' असं म्हणत धूम पळत सुटली.

बंडू, पप्पू, भाबल्या आणि नील घरच्या वाटेकडे निघाले - तेही लांबचा रस्ता घेत. बंडू खांदे, पप्पू मान, भाबल्या कंबर आणि नील मनगट असे काही दाबत होते जणू दारा सिंगनेच त्यांची चंपी केलीये. "च्यायला हा जगदाळ्या स्वतः साला एकही सूर्यनमस्कार मारून दाखवत नाही आणि आपली चड्डी फाटेपर्यंत मारायला सांगतो". नीलचे हे उदगार ऐकताच बंडू, पप्पू, आणि भाबल्या चालायचं थांबले आणि नीलच्या चड्डी कडे पाहू लागले. "साला पिटी पण काय तास आहे का? एकतर सगळा दिवस गणित भूगोलात बुडवा आणि नंतर पिटीला 'बूड' झिजवा". नील सॉलिडच पेटला होता. त्यात पप्पू म्हणाला "च्यायला पोरींकडून मारून घ्यायला हवेत सूर्यनमस्कार. सॉलिड मज्जा येईल". बंडू म्हणाला 'नील जाऊ दे रे. अजून असे किती दिवस राहिलेत शाळेला. उद्या बॉडी बनवशिल तेव्हा तूच जगदाळेचे आभार मानशील'.

गंमती-जमतीतला हा प्रवास चालत असताना गाडीला अचानक मारलेल्या ब्रेकसारखा नील थांबला. रस्त्याच्या कडेला एक गडद हिरव्या रंगाचा कागद पक्षाच्या पंखासारखा फडफडताना त्याला दिसला. नीलने दुखत असलेल्या शरीरातून उरली सुरलेली ताकत एकवटून त्या कागदावर झडप मारली. शंभर रुपयांची नोट होती ती!!! ज्या काळात वडिलांकडून 2 रुपये पॉकेटमनी मिळावा यासाठी गृहपाठ, घरातली बाहेरची कामं करावी लागायची त्या काळात त्याच्या हाती चक्क शंभर रुपयांची नोट लागली. नीलची ती स्पायडरमॅन जम्प बघून "खुदा मेहेरबान तो गधा भी पहेलवान' हि म्हण खरी असल्याचं प्रात्यक्षिक बंडू, पप्पू आणि भाबल्याला मिळालं.

"च्यायला शंभर रुपये" पप्पू जोरात ओरडला. बंड्याने त्याच्या तोंडावर पटकन हात ठेवला. "साल्या कोणी ऐकून घेईल ना' असं म्हणत हळूच हात काढला. "नील साल्या तू सॉलिड लकी आहे यार". "अरे ती नवा व्यापार मधली खोटी नोट तर नाही ना" असं भाबल्या पचकला. बंडू आणि पप्पूने त्यांच्यावर टपल्याचा वर्षाव केला. "अरे नाही रे खरी आहे. वडिलांनी एकदा वर्गणीच्या डब्यातून १०० चे सुट्टे घेऊन ये जाधवांकडून म्हणून पाठवलं होतं मला. त्यावेळी दिलेल्या नोटेसारखीच नोट आहे हि". चौघांनी शंभरच्या नोटेकडून नजर वळवत एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि जोर जोरात उड्या मारू लागले. येणारे जाणारे लोक "शाळेत बरा गेलेला दिसतोय दिवस यांचा" हा अर्थ लावून आपल्या कामाला लागले..

पण आता मोठा प्रश्न समोर होता - हे पैसे खर्च करायचे कसे? चौघेही स्वप्नरांगोळ्या सजवू लागले. पिक्चरला जाऊया? नाहीतर चौकातल्या टीमसाठी क्रिकेट बॅट घेऊया? आपल्या साठी घड्याळ का नवीन कपडे घेऊया? अशा नानाविध कल्पनांनी या चारही मित्रांनी बुद्धीला नको तितका जोर दिला. एकतर हे पैसे कसे आले हे घरी सांगायची बोंब. त्यात काही वस्तू विकत घेतली आणि ती कुणाला दिसली तर ती घेण्यासाठी पैसे कुठून आले हे सांगता सांगता नाकी नऊ येतील. त्यापेक्षा असं काहीतरी करूया जे कुणाच्या डोळ्याला दिसणार नाही. अतिगहन विचारविमश केल्यानंतर अजय देवगणचा 'विजयपथ' आणि पुष्पराजमध्ये मस्त जेवण असा जंगी बेत ठरला. संध्याकाळी पाचला चौकाच्या बाहेर भेटायची जागा ठरली.

नील जरा जास्तच आनंदात होता आज. आरश्यात केस विंचरत "ये जो थोडे से हें पैसे, खर्च तुमपे करू कैसे" त्याच्या ओठांवर चांगलंच रंगलं होतं. आईने विचारलं "काय रे नील, काय झालं? एरवी शाळेची गाऱ्हाणी गात असतोस आज अचानक गाणं?" नीलने एक्ससाईटमेन्ट जरा सावरली आणि म्हणाला "अगं, आज मी शाळेत पिटीला चक्क पाच सूर्यनमस्कार मारले. ते पाहून जगदाळे सरानी शाबासकी दिली. म्हणून आज शाळेची कंप्लेंट नाही". आईने 'हं' म्हणून नीलने मारलेली थाप ओळखली आणि पुढे काही न बोलण्याचा निश्चय करत विषय संपवला आणि कामाला लागली. नीलने केस विंचरत गाणं मनातच चालू ठेवलं.

ठरल्याप्रमाणे पाचला भेट झाली. रिक्षा करून चौघेही हातात क्लासची बॅग घेऊन ऐटीत निघाले. थिएटरच्या गेटपाशी पोहचले तर हि भली मोठी रांग. 'विजयपथ' बरा चाललेला दिसतोय याचं प्रत्यक्ष दर्शनच होतं ते. चौघेही मुंग्यांसारखे त्या रांगेत जाऊन उभे राहिले. त्यांचा नंबर जवळ येत होता. नीलने शंभरची नोट गुपचूप बाहेर काढली. बंडू, पप्पू आणि भाबल्या त्याला घेरी करून जवळ जवळ उभे होते. अचानक नीलच्या खांद्यावर एक जोरदार हात पडला. तो इतका दमदार होता कि त्याच्या आवाजाने बंडू, पप्पू आणि भाबल्याही घाबरले. त्यांनी मागे वळून पाहिलं तर तीन मुशतंडे मुलं त्यांच्या धारधार नजरा नीलकडे लावून होते. त्यातल्या एकाने विचारलं "काय रे, कुठून आले हे पैसे"? नील घाबरून म्हणाला "आईने दिलेत". मुलगा म्हणाला "येड्यात काढतोस काय? साल्या चल आई कडे. मीच विचारतो तिला". खांद्यावरच्या तो भारदस्त हात, आवाजातला धीटपणा पाहून नील पुरता नमला. डोळ्यातून अश्रुधारा वाट शोधत बाहेर यायच्या तयारीला लागल्या. "अरे दादा खरंच त्याच्या आईने दिलेत पैसे आम्हाला पिक्चर बघायला" बंडू बोलला. दुसऱ्या मुलाने बंड्याला धरलं आणि म्हणाला "चोरी केली ना साल्यानो तुम्ही? आम्ही खूप बघितलेत तुमच्यासारखे. थांब आताच पोलिसांना बोलावतो". नीलच्या अश्रुधारा सुरु झाल्या. पप्पू आणि भाबल्यानेही साथसंगत सुरु केली. "दादा, नको रे बोलवू पोलीस. आम्ही चोरी नाही केली" नील रडक्या आवाजात म्हणाला. "चोरी नाही केलीस तर एवढे पैसे कुठून आले. चल दे ते पैसे इकडे आणि निघा इथनं". नीलने मित्रांकडे पाहिलं. सगळ्यांनी काही न बोलताच रडक्या डोळ्यांनी "आपण काय यांच्याशी हातापाई करू शकणार नाही. तू गुपचूप पैसे दे" असं स्पष्ट म्हंटलं. नीलने मुकाट्याने त्यांना पैसे दिले. "चल निघा आता इथून" असं म्हणत त्या तिघांनी नील आणि गॅंग ला हाकलून लावलं.

स्वप्नरांगोळ्या विस्कटल्या, "ये जो थोडे से हें पैसे" गात आलेला नील रिकाम्या हाती पाणावलेले डोळे घेऊन पाय फरफटत चालू लागला. बंड्या, पप्पू आणि भाबल्या हताश होऊन नीलच्या मागे चालू लागले.

नीलला जाता जाता जगदाळे सरांचे ते शब्द आठवले "उद्या चार पोरं मारायला आले तर ताकत कुठून आणणार". डोक्यात अगदी प्रकाश पडल्यासारखं झालं. पण घाईघाईत व्यायामाचा निश्चय घेण्याचं त्याने टाळलं. शेवटी उद्याचं भविष्य घडवणारी पिढी होती ती - "उद्याचं उद्या बघू" म्हणणारी.

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults