प्रेमाची गोष्टं

Submitted by कविन on 8 September, 2017 - 06:02

आज अभी येणार आहे भेटायला. काल फोनवर महत्वाचं काहीतरी बोलायचय म्हणाला. कॉलेज, इंटर्नशीप बुडवून येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. आज मुद्दाम मी त्याच्या आधीच तिथे जा‌ऊन पोहोचलेय. इथे उभं राहिलं की कॉलेजच्या गेट बाहेरचा रस्ता अगदी लांबपर्यंत दिसतो.

ह्या सगळ्याला सुरुवात झाली ते कॉलेज जॉ‌ईन केल्याच्याच वर्षी. त्याच्यावर क्रश होता म्हणा ना. पण तेव्हा हे फक्त माझ्या आणि संयुक्ता मधेच होतं. सुरूवातीला त्याचं नावही धड माहीत नव्हतं आम्हाला.

तेव्हाचा नाव जाणून घेण्याचा प्रकार आठवून सुद्धा आता हसायला येतं.

तर अशी ही आमच्या प्रेमाची गोष्ट .. जशी घडली तशी.. अगदी सुरुवातीपासून

----

कॉलेज मधे ये‌ऊन तेव्हा तीन महिने होत आले होते पण अजूनही त्याचं खरं नाव कळलच नव्हतं. नुसतच "मेरावाला" नाव ठेवलेलं त्याला. ते ही संयु आणि माझ्यापुरतच. बाकी गृपला माहितच नव्हतं काही ह्यातलं.

एक दिवस अकरावीच्या मुला-मुलींची गर्दी कॉलेजच्या ऑफ़िससमोर दिसली मला. त्याच रांगेत "मेरावाला" उभा होता. मी पळत जाऊन संयुला गाठलं. तिला म्हंटलं, "प्लीज, तिथे जाऊन मला त्याचे डिटेल्स आणून दे"

"जो हुकूम मेरी आका", असं म्हणत आमची नौटंकी क्वीन निघाली माझं काम करायला आणि मी तिथेच त्या रांगेत थोडी मागे उभी राहून आमच्या प्लॅनचा फ़्लॉप शो होत नाही ना, बघत उभी राहिले. एकीकडे खूपच भीती वाटत होती.

"हाय रिया, आज अकेली?" मागून आवाज आला तसे माझे विचार थांबले. वर बघीतलं तर राहुल.

त्याला म्हंटलं, "अभी येणार आहे नाशिकहून. त्याचीच वाट बघतेय."

"आए तो बताना, हम भी मिलने आएंगे", असं म्हणून तो ‘बाय’ करुन गेला निघून आणि मला त्यादिवशीच्या मजनूच्या प्रश्नाची आठवण झाली

तेव्हा त्या रांगेत उभी असताना हाच प्रश्न मजनूने विचारला होता

"हो, संयुक्तालाच शोधतेय" म्हणत वेळ मारुन नेली होती.

त्याने इकडे तिकडे बघत "वो देख तेरी संयुक्ता अभी के साथ बाते कर रही है", असं जेव्हा म्हंटलं होतं, तेव्हा मला पहिल्यांदा "मेरावाला"चं नाव अभी आहे हे समजलं होतं.

मजनूला कटवून पुन्हा त्यांच्या दिशेने बघीतलं, तेव्हा संयुक्ता बोलणं संपवून परत येतं होती. मला जवळजवळ ढकलतच तिने लेडीजरुमकडे मोर्चा वळवला. आम्ही रुममधे ये‌ऊन बसल्यावर अत्यंत नाटकी स्वरात ती म्हणे "मलीका-‌ए-हुस्न आपके शहजादे का नाम अभिमान है | और वो डोंबिवली वेस्ट मे सखाराम कॉम्प्लेक्स मे रेहता है |.बार्थडेट आहे १४-१०-९५. चल अब दे मुझे पार्टी तू |". तिच्या आवाजाने चमकून चार नजरा काही क्षणांसाठी आमच्याकडे वळून परत आपापल्या कामाला लागल्या होत्या.

“पुढे काय करणार आहेस ह्या माहितीचं तू?” तिने समोरची खुर्ची ओढून घेत त्यावर पाय ठेवत विचारलं होतं, तेव्हा मला तरी कुठे माहीत होतं, मी काय करणार होते त्या माहितीचं ते?

“काही नाही, म्हणजे बघू. भीति वाटते यार त्याच्याशी जा‌ऊन बोलायची. एकदा साधं तो माझ्या मागे उभा होता. नोटीस बोर्डवर मी काहीतरी वाचत होते. त्याने विचारलं "कसली नोटीस लागलेय?" तर मला आधी सांगताच ये‌ईना.“

“श्शी! एक साधं उत्तर देता नव्हतं आलं मला, मी काय करणार होते पुढे? “"आणि बघितलस ना, तो बघत पण नाही मुलींकडे"

"अशीच मुलं फ़ार हीऽऽ असतात हां रिया, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. आणि आता नाटक बास. मला कॅन्टीन मधे काहीतरी खायला घालून दे पार्टी. स्वस्तात पटणारी अशी माझ्यासारखी मैत्रिण मिळायची नाही तुला.", असं म्हणत तिने मला लेडीजरुमच्या बाहेर काढलं आणि आम्ही तळमजल्यावर असलेल्या कॅन्टीनमध्ये गेलो.

आमचं खाणं सुरू नाही होत तोच समोरून मजनू आत येताना दिसला आणि माझ्या कपाळावर एक आठी उमटली. आला तर आला, डायरेक्ट आमच्या टेबलपाशी येऊन पिनाकिनच्या बाजूलाच बसला. सगळा पचका पार्टीचा ! संयुला व्हॉटसअ‍ॅपवर एक मेसेज केला आणि एक तोंड वेडवाकडं केलेली स्मायली दिली.

तिने पण दात विचकणारी स्मायली टाकली.

"एऽऽ हॅल्लोऽऽ बाजूबाजूला बसून कसलं व्हॉटसअ‍ॅप व्हॉटसअ‍ॅप खेळताय?" मजनूने आम्हालाच झापलं.

तो आला होता आमच्यासाठी ठेवलेल्या वेलकम पार्टीबद्दल सांगायला. त्याचा मित्र सॅन्डी हा संयुच्या ’दी’चा ’बि‌एफ़’ होता, म्हणून खरतर आम्हाला आधीच कळलं होतं या पार्टीबद्दल. तोपर्यंत आमची बाकीची गॅंगपण कॅन्टीनमध्ये दाखल झाली. आम्ही सगळे मिळून या वेलकम पार्टीबद्दल डिस्कस करत बसलो होतो. मधेच संयुने मला व्हॉटसअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला –’खाली मुंडी आणि पाताळ धुंडी’ वर एक डोळा मारलेली स्मायली पण टाकली. मी चमकून दरवाजाकडे बघीतलं, तर अभी आत येत होता, बरोबर सपना आणि सुहानी पण होत्या. कालपर्यंत मुलींकडे न बघणारा आज चक्क दोन-दोन मुलींसोबत कॅन्टीनमध्ये? हायला! ये बात कुछ जादाही थी |

मी आश्चर्य, राग, टूटा हुवा दिल आणि रडणारी अशा चार स्मायली संयुला पोस्ट केल्या रिप्लायमध्ये.

पिनाकीनने तेव्हढ्यात सुहानीला हाक मारली आणि त्या तिघांचा मोर्चा आमच्या टेबलाकडे वळला.

मग सुहानीनेच त्यांची आमच्याशी ओळख करुन दिली. यावेळी तर अभी नुसतच ‘हाय’ पुटपुटला. तिघांसाठी जास्तीच्या खुर्च्या फिरवून घेतल्या आणि आमच्याच टेबलभोवती मग एक महाचर्चा रंगली, अर्थातच होणार्‍या वेलकम पार्टीची.

कार्यक्रम काय करायचे? ड्रेसकोड काय? अशा सगळ्या गप्पा सुरू असताना मी मात्रं रुमालाची गुंडाळी करण्यात आणि डोळ्याच्या एका कोपऱ्यानं अभीचा अंदाज घेण्यात व्यग्र होते.

“रिया, तू गाणं बोलशील ना?” मधेच राहूलने माझ्या कोर्टात चेंडू सरकवून मलाही संभाषणात खेचलं.

“अऽ?”

"दोस्तलोग, ही रिया आमच्या शाळेची सिंगर होती. ए, पण शाळेच्या सेन्डॉफवालं गाणं नको म्हणूस हा.”

"अरे! नको, इतक्या कमी वेळात नवीन गाणं कसं बसेल.” मी आपली नकारघंटा हलवत म्हणत राहिले.

“ए रिया, जास्त भाव नको खा‌ऊस तू. ए, ती गा‌ईल रे” म्हणत संयुने मला पुढे काही बोलूच दिलं नव्हतं.

माझा गाण्याचा क्लास असल्याने मी आणि संयु घरी जायला निघालो.

गेटमधून बाहेर पडल्या पडल्या मी तिच्या पाठीत एक गुद्दा घालत म्हंटलं, "काय उगाच माझं नाव दे‌ऊन मोकळी झालीस? नाही जमलं, हसं झालं तर?"

त्यावर ती म्हणे, "तुझ्या राजकुमाराला इम्प्रेस करायची मस्तं संधी आहे. तुझ्या क्लासच्या ताईंना एक छानसं रोमॅन्टीक गाणं शिकवायला सांग."

"काय शिकवायला सांग? सोप्पं आहे का असं? आणि तो बोलतही नाही धड, बघितलस ना?" मी तिला असं ऐकवल्यावर मला टपली मारत ती म्हणाली होती, "रियुडे, तो बोल नव्हता, कारण तो फ़क्तं तुझ्याकडेच बघत होता. तुमचं ते रुमालाची गुंडाळी घालणं-उलगडणं सुरू होतं, तेव्हा तो तुलाच बघत होता, मी बघत होते ना."

"चल, काहीतरीच तुझं" मी असं म्हंटलं खरं, पण मनातून खूप आनंद झाला होता.

"संयु, नक्की यालाच प्रेम म्हणायचं का गं?" मला आत्ताही तो त्यावेळचा प्रश्नं ऐकू आला.

"तुला त्याने तुझ्याकडे बघावसं वाटतं ना? तो जवळून गेला, तरी धडधड वाढते ना?

"हुं!"

"मग नक्की प्रेमच.. ‘दी’ ला मी एकदा विचारलं होतं. तिनंच सांगितलं मला, हे असच वाटायचं तिला सॅन्डीबद्दल"

"ए, ‘दी’नं प्रपोज केलं की सॅन्डीनं?"

"सॅन्डीनं"

"तसही ते आधीपासून मित्र तर होतेच"

"पण तिला कसं कळलं, तिला त्याच्याविषयी मैत्रीपेक्षा जास्त काही वाटतंय?"

"बाई, आता तू हे तिलाच विचार"

"मला जे वाटतंय ते नक्की तसंच आहे का चेक करत होते गं मी. चिडत्येस काय माझ्यावर?"\

"बरं एक काम कर, त्याचे आवडणारे आणि न आवडणारे पॉईन्टस लिहून +/- मार्क्स दे त्याला. दीदीज फ़ॉर्म्युला."

"खरंच?"

"करुन तर बघ."

संयुनं एकदम सोप्पा करुन टाकला होता माझा प्रश्न. त्यादिवशी घरी आल्यावर दार उघडल्या उघडल्या आजीने डिक्ले‌अर केलं "हात पाय धुवून घे. जेवायलाच बसू."

मग काय? मिसळ खाल्लीय हे सांगण्याची सोय राहिली नव्हती. आजी म्हणे "काय गं, आज काय विशेष घडलं कॉलेजात? नाही एकटीच हसत्येस स्वत:शी मघाचपासून"

‘आत्ता पकडले गेले असते. वाचले. नंतर सांगते’ असा एक व्हॉटसअ‍ॅप मेसेज संयुला पोस्ट करुन, “काही नाही ग आज्जी” म्हणत गुपचूप जेवायला लागले होते मी.

एरव्ही हात धुतल्या धुतल्या झोप अनावर होणारी मी, त्यादिवशी झोपच लागत नव्हती मला. मोबा‌ईलमधली सगळी गाणी चेक करून सुद्धा ‘हवं तस्सं’ गाणंच मिळत नव्हतं.

’चांगलसं गाणं सुचव प्लीज’ असा मेसेज व्हॉट्सॅपवर संयुला टाकून मी आज्जी शेजारी झोपाळ्यावर उशी घे‌ऊन नुसतीच पडून राहीले.

‘पल पल पल पल हर पल, तेरी ओर ....हाय रब्बा!’ देख इनमे से कुछ जमता है तो |’ संयुने रिप्लायमध्ये लिहीलं होतं.

क्लासच्या ता‌ईंनी पण काही गाणी सुचवली, पण काही मला जमतील असं वाटत नव्हतं, काही खूपच पुढची वाटत होती. एकही गाणं पसंत पडत नव्हतं.

आम्ही सगळे लेक्चर संपल्यावर रिकाम्या क्लासरूममध्ये कार्यक्रमाचंच ठरवत बसलो होतो. अभी पण बाजूलाच बसला होता.

सगळे मला ‘हे गाणं म्हण, ते गाणं म्हण’ असं सुचवत होते.

"मराठी गाणं सुचवू का?" अभीनं विचारलं.

"सुचव यार पटकन, ह्या बयेला पटल्याशी कारण. काय रिया?" राहुलने असं विचारायला आणि संयुनं क्लासमध्ये प्रवेश करायला नेमकी वेळ साधली.

मी काही उत्तर द्यायच्या आधीच ती म्हणे, "राहुल, कुणाची पटवापटवी चाल्लेय इथे?"

राहुल म्हणे, "रियाची." आणि दात विचकून वर “किडींग” म्हणत टाळी देत झाली भंकस सुरू

"चालेल की मराठी गाणं. खरतर मी ही तोच विचार करत होते." मी कसंबसं बोलून घेतलं मधेच वेळ मिळताच.

"का कळेना...मस्त गाणं आहे" त्यानं सुचवलं.

"तुझी रिंगटोन पण तीच आहे ना?" त्यानं असं विचारताच मी बघतच राहिले.

"आ‌ऊऽऽच!" संयुने चिमटा काढला आणि मी तंद्रीतून बाहेर आले. अभीने गालातल्या गालात हसत दुसरीकडे बघीतलं. मी इकडे तिकडे बघून घेतलं, पण नशीब आमचं, कुणाचच लक्ष नव्हतं आमच्याकडे.

घरी आल्यावर ते गाणं बसवायचा प्रयत्न करत होते, तर बाहेरच्या खोलीत बाबांचा एकदम वेगळाच चिडका आवाज कानांवर पडला. डिकलेकाकांच्या समीरचं पर्सेंटेज एकदम घसरलं होतं आणि त्याला आर्किटेक्चरलाच जायचं होतं. बाबांना वाटत होतं, की समीर प्रेमात पडला होता म्हणून त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं.

मला म्हणे, "हे काय वय आहे प्रेमात पडायचं? चार दिवस नाही घालवले एकत्र तर प्रेमात पडून मोकळे. अभ्यासाच्या वयात अभ्यास करायचा सोडून प्रेमं कसली करता? करीअरवर लक्ष द्या. प्रेम कसलं? टीनेज आकर्षण हे नुसतं. बिट्‍टू, अभ्यास महत्वाचा हा आत्ता. चांगले मार्कं मिळणं हेच आत्ता महत्वाचं, तरच करीअर होईल. प्रेमंबिमं करायला आयुष्य पडलय अख्खं."

आता असं ठरवून कुणी कधी प्रेमात पडतं का? की बॉ! आता करीअर सेट झालंय, आता पडूया प्रेमात. काहीही असतं बाबांचं.

अर्थात, आमच्यात अजून ’तसं’ काही नव्हतं. अजूनही मला जे अभीविषयी वाटतंय ते बाबा म्हणतात तसं टीन-एज आकर्षण आहे की प्रे,म, हे माझं मलाही कळलं नव्हतं. एक मात्रं पक्कं केलं मी मनाशी, की आमचं असं काही झालंच, तरी अभ्यासात मागे पडून बाबांना बोलायचा चान्स द्यायचा नाही.

बराच वेळ झाला तरी हे सगळे विचार बाजूला सारून झोप काही येत नव्हती. उगाचच चाळा म्हणून व्हॉटसअ‍ॅप चेक करत बसले होते. कॉलेज गृप वर ५००+ मेसेजेस ये‌ऊन पडलेले. वाचायचेही कष्ट न घेता क्ली‌अर-ऑल करणार होते, पण म्हंटलं अभीचा काही मेसेज आहे का बघावं. तो ही नव्हता दिवसभर बहुदा इथे. त्याचं ‘लास्ट सीन’ स्टेटस चेक केलं, तर एका तासापुर्वीची वेळ दाखवत होतं. एकदा वाटलं त्याला मेसेज करावा. लिहायलाही घेणार होते, पण थांबले तशीच.

तेव्हढ्यात त्याचं स्टेटस ‘ऑनला‌ईन’ दिसलं.

‘तू होतास कुठे दिवसभर? एकही पोस्ट नाही गृपवर?’ असं टा‌ईप करायला गेले, तेव्हढ्यात दिसलं ‘अभी टायपिंग’ मग थांबले थोडावेळ. पण काहीच पोस्ट नाही आली त्याची. बहुदा काहीतरी लिहीता लिहीता थांबला असावा. काय लिहायचं असावं त्याला? छे! आता उगाच हाच विचार छळणार रात्रभर मला. मग मी आधी टा‌ईप करायला घेतलेलं वाक्य खोडलं आणि लिहीलं ‘काय लिहीणार होतास आत्ता?’

त्यावर तो म्हणे, ‘काही नाही, तू दिसली नाहीस आज दिवसभर गृपवर. काय झालं? हेच विचारणार होतो. पण तू टा‌ईप करत होतीस काहीतरी म्हणून थांबलो. तू काय टा‌ईप करत होतीस?’

मग मात्र मला हसू आलं. मी फक्त ‘जुडवा’ अशी स्मायली टाकली आणि उत्तरादाखल त्याची पण एक स्मायली आली.

त्यानंतर उगाचच ‘आहेस का?’ ‘ह्म्म आहे’ ‘बोल न’ ‘सांग ना’ अशा गप्पा सुरू ठेवण्यासाठीच्या वाक्यांची देवाण-घेवाण झाली त्यापाठोपाठ स्मायलींची देवाण-घेवाण करत राहिलो.

शेवटी मोबा‌ईलने लो-बॅटरीचा इशारा दिला, तेव्हा ‘गुडना‌ईट’ म्हणून फ़ोन चार्जींगला ला‌ऊन मी पांघरुण घे‌ऊन झोपले.

सकाळी भेटल्या भेटल्या सगळ्यांत पहिलं हे संयुला सांगितलं, तर ती म्हणे, "बघ, म्हणजे त्यालाही काहीतरी स्पेशल वाटतंय तुझ्याबद्दल."

"काय माहीत? त्या रवीननं येऊन परवा मला रेड रिबीन बांधली ’फ़्रेन्डशिप-डे’ला. यानं काय केलं?"

"या असल्या सोपस्कारांवर त्याचा विश्वास नाही म्हणाला ना तो परवा?"

"होक्का? मग कळणार कसं त्याच्या मनात काय आहे ते?"

"मग तू जाऊन विचार की सरळ, उस में क्या?" तिनं मलाच उलट प्रश्नं केला होता.

"आणि तो ’नाही’ म्हणाला तर?"

"नाही म्हंटलं तर नाही. आपण नाही का मुलांना ’नाही’ म्हणत?"

"ते वगळं गं"

"काही वेगळंबिगळं नाही"

"बरं हा कार्यक्रम होऊन जाऊदे, मग बघू"

’कार्यक्रम झाल्यावर बघू’ म्हणता म्हणता कार्यक्रम झालादेखील. अभी पहिल्या रांगेत डावीकडून दुसरा बसला होता. त्याला पाहून, ’दे ना तू साथ दे...हातात हात दे’ गाताना उगाचच धडधड वाढली. त्याचेही डोळे काहीतरी बोलत होते, असं वाटलं. आता हा भास होता, की मी प्रेमात पडल्याचा परिणाम, की खरच तसं काही त्याच्या बाजुनंही तितकंच स्ट्रॉंग होतं कोण जाणे पण मी पूर्णं गाणं फ़क्त आणि फ़क्तं त्याच्यासाठीच गात होते.

कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी गाणं आवडल्याचं आवर्जून सांगितलं. अभी मात्रं काहीच बोलला नाही पुढे येऊन. तो मला स्पेशल असा वेगळा वेळ देत नव्हता, पण निदान आता तो गृपमध्ये कायम असायचा आणि गृपच्या प्रत्येक गोष्टीत त्याचाही सहभाग असायचा. सध्यापुरतं मी त्यावरच समाधान मानत होते. तसंही परीक्षेची तारीख लागल्यावर मला मार्क्स कमी आणून बाबांना ओरडायची संधीही द्यायची नव्हती. परीक्षा संपल्यावर सगळ्या गृपचं ट्रेकला जायचं ठरत होतं. एकीकडे अभीबरोबर ट्रेक करायची इच्छा तर होती, पण दुसरीकडे ओव्हरनाईट ट्रेकला आई परवानगी देईल का, याबाबत मी साशंक होते. पण संयुक्तानं आईला पटवून हा प्रश्नं सोडवला आणि मी आमच्या एकत्रं ट्रेकची स्वप्नं बघायला लागले.

प्रत्यक्ष ट्रेक दरम्यान फारसं बोलणं काही झालच नव्हतं आमचं. एकतर इतकं चालण्याची सवय नव्हती मला. माझा स्टॅमिना खूपच कमी पडत होता बाकिच्यांच्या मानाने, म्हणून राहूल आणि पिनाकीन मला लिंबूटिंबू म्हणून चिडवून घेत होते. त्यात एकदा अभीही त्यांच्या मस्करीत सामील झाला म्हणून माझं तर डोकच फिरलेलं. मी घुश्शातच ट्रेक पूर्ण केला. बेसकॅम्पला आल्यावर पण मी त्याच्याशी बोलणं टाळतच होते, इतका मला राग आलेला त्याचा. मनातल्य मनात ते ‘+/ -’ वालं वहीचं पान डोळ्यासमोर आलं आणि या त्याच्या मस्करी करण्याबद्दल मोठ्ठं ‘-१०’ दे‌ऊन मोकळी झाले होते मी.

पाय तर इतके दुखत होते, फ़िरायला जाऊया म्हणाल्यावर मी त्यांच्यासोबत न जाता तिथेच बसून राहिले. मला वाटलेलं तो मनवेल मला चल म्हणून, नाहीतर स्वत: काहीतरी कारण काढून जायचं टाळेल. पण यातलं काहीच झालं नव्हतं. दिवसभराची दगदग आणि त्याच्या या अशा मला सोडून निघून जाण्याचं निमित्त हो‌ऊन मी पार रडकुंडीला आले होते. पायाला वॉलीनी चोळावं असा विचार करून मी तिथून उठणार तेव्हढ्यात समोर कुणाची तरी चाहूल लागली. बघीतलं तर ’तो’ वॉलीनी घे‌ऊन उभा होता.

"घे, लाव हे. पहिल्या ट्रेकला सगळ्यांचीच अशी हालत होते." तो म्हणाला होता.

"तू गेला नाहीस?" मी असं विचारल्यावर म्हणे, "गेलो होतो, पण आलो परत. तुला कंपनी द्यायला. बसली असतीस नाहीतर रडत, त्यादिवशी कॉलेजमधे आयकार्ड हरवल्यावर रडत बसली होतीस तशी! नाहीतर भांडली असतीस माझ्याशी, रवीनशी भांडलीस तशी!"

"मिस्टर अभी, धन्यवाद मदतीकरता! पण या भांडकुदळ आणि रडक्या मुलीला एकटं ठेवून गेलात तरी चालेल." मीही घुश्शातच म्हंटलं त्याला.

"तुला चालेल गं, पण मला नाही ना चालणार. मला ही भांडकुदळ रडणारी मुलगीच आवडलेय. त्याचं काय?"

मी एकदम अवाक झाले होते. हा प्रपोज करतोय का मस्करी करतोय माझी?

“खरच आवडतेस तू मला. तू येणार म्हणून तर मी आलो ट्रेकला. मैत्रीच्या पुढे जायला आवडेल तुला?" त्याने हात पुढे करत विचारलं, तेव्हा मला उत्तरच देता नव्हतं आलं धड इतकी मी गांगरले होते.

ट्रेकहून परत आलो त्याच्या दुसर्‍या दिवशीची गोष्ट. मी कॉलेजमधे येतच होते तर त्याचा फोन, हे सांगायला, की ‘आजच्या पिंक ड्रेस मधे मी खूप छान दिसतेय.’ फोनवर बोलता बोलता मी आजूबाजूला बघीतलं तर मला कुठेच दिसला नाही तो. त्याला म्हंटलं, “काय दुर्बिण लावलीयस का माझ्यावर? आहेस तरी कुठे?” तर म्हणे, “इकडे वर ये तिसर्‍या मजल्यावर”

तिथे गेले धापा टाकत, तर तो समोरच बाल्कनीला रेलून उभा. हातात गुलाबाचं फुल घेऊन. इथूनच तो मला अगदी लांबून येताना बघायचा म्हणे तेव्हा. त्याने मला पहिल्यांदा बघीतलं होतं तेही इथूनच. त्याने दिलेलं गुलाबाचं फुल घेताना माझे आणि ते देताना त्याचे हात चक्क थरथरत होते. एकमेकांच्या हाताचा कमीत कमी स्पर्श होईल असं बघत ही देवाण-घेवाण झाली होती, तरीही पुसटसा स्पर्श झालाच होता. त्या तेव्हढ्या स्पर्शानेही अंगावर शहारे आले होते.

असच एकदा आम्ही तिथे उभे होतो, एकमेकांचा हात हातात घेऊन नुसतेच लांबपर्यंत वळत गेलेल्या रस्त्याकडे बघत. दीदी आणि सॅन्डी गेटमधून बाहेर पडताना दिसले, तेव्हा म्हणे, "एक गंमत ऐक ना! आपण आत्ता उभे आहोत ना? इथेच सॅन्डीनं दीदीला प्रपोज केलं होतं"

"काय सांगतोस?" मी उडालेच होते ते ऐकून

कसलं भारी वाटलं होतं तेव्हा. आत्ताही त्या जागेवर उभं राहून कठड्यावरुन हात फिरवताना त्यावेळचं ते थ्रील जाणवलं हाताला.

त्याकाळात आम्ही एकत्र असे भरपूर ट्रेक्स केले. अशाच एका ट्रेकनंतर संयु मला म्हणाली होती, "‘दी’चं काहीतरी बिनसलय. ती फार विचारात असते आजकाल. मी परवा ते आपल्या ट्रेक विषयी सांगायला गेले, तर नेहमीसारखा इंटरेस्ट दाखवून ऐकलच नाही तिने."

मी तिला म्हंटलही ,"तू उगाच विचार करतेस नको तेवढा."

"नाही रिया, मी आधी पण एकदा बोलले होते ना तुला? तेव्हा माझा तो फ़क्तं एक अंदाज होता. पण आता खात्री पटलीय, की या सगळ्याला सॅन्डीच जबाबदार आहे."

"रियु, ती काल त्याला भेटायला गेली होती आणि त्याला भेटून आल्यापासूनच तिचा मूड असा झालाय. नक्कीच त्यांच्यात भांडण झालं असणार कशावरुन तरी. याआधीही असं घडलंय. तुम्ही पण भांडलात, की असंच वागता का गं?"

आम्ही आत्ता तर कुठे मैत्रीच्या पुढे जा‌ऊन एकमेकांबद्दल असलेली ओढ व्यक्त केलेय. मी काय सांगणार संयुला यावर? मी नुसतच तिच्या खांद्यावर थोपटून म्हंटलं, "हो‌ईल ग सगळं ठीक.”

तिला समजावून वेळ मारुन नेली तेव्हा कुठे माहीत होतं, की दुसरा दिवस काही वेगळाच उगवणार होता.

तो उजाडलाच एक हादरवणारी बातमी घे‌ऊन. ‘संयुच्या दीदीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि तिला ऍडमीट केलय"

मला बातमी ऐकून रडूच कोसळलं होतं. संयु, दीदी, काकाकाकू, सॅन्डी सगळ्यांचे चेहरे डोळ्यसमोर येऊन गेले होते. माझा चेहरा बघून आ‌ईने काम थांबवून विचारलं तसं मी तिच्या कुशीत शिरून दीदीच्या आत्महत्येविषयी सगळं सांगून मोकळी झाले होते. माझ्यासोबत तीही हॉस्पीटलमधे आली होती. तिथे गेल्यावर दीदीच्या जीवाला आता धोका नसल्याचं कळलं, पण मला पाहून गळ्यात पडून रडत असलेल्या संयुला काय शब्दात समजावू तेच कळलं नव्हतं.

तिथून परत आल्यावरही मी दीदीच्याच विचारांमधे हरवले होते. इतकं काय घडलं टोकाचं, की त्यांना नातं तोडावं वाटलं? बरं काही घडलच असेल, तरी तिला एकदम आयुष्यच संपवावसं का वाटलं? त्यांचं ब्रेक-अप पण नक्कीच स्विकारलं गेलं असतं घरी जसं त्यांचं नातं स्विकारलं गेलं होतं.

विचार करुन करुन माझं डोकं दुखायला लागलं होतं. आ‌ई जेवायला बोलवायला आली तरी मी याच विचारात गढलेले होते. आ‌ईकडून बाबांना दीदीबद्दल कळल्यावर तर पुन्हा एकदा त्यांची गाडी डिकलेकाकांच्या समीरपासून ते दीदीपर्यंत सगळ्यांची तासंपट्‍टी काढून, ’ही असली थेरं करावीतच का आधी? अभ्यास करायच्या वयात अभ्यासच करावा’, या नेहमीच्या पालुपदावर आली.

आ‌ईचा पवित्रा यावेळी थोडा वेगळा वाटला. प्रेम, या वयातलं आकर्षण, ब्रेक-अप वगैरे बद्दल ती लेक्चर न देता नुसतंच बरंच काही बोलली. तिने दीदीला नावंही नाही ठेवली आणि बाबासारखे ’प्रेमा’च्या नावाने खडेही नाही फोडले.

शेवटी जवळ घे‌ऊन म्हणाली, “कोणत्याही कारणासाठी आत्महत्या हा उपाय नाही, सगळ्यातून बाहेर पडता येतं."

आ‌ईची काळजी मला समजत होती. माझी स्वत:ची मनस्थिती खूप विवित्र झाली होती. भांडणं, रुसवे-फुगवे हे नात्यात होतात, पण तरी नातं हे अभंग असतं, असं मी समजायचे. जे दीदी आणि सॅन्डीच्या बाबतीत झालं ते आमच्याही बाबतीत झालं तर? हा विचार मला जास्त त्रास देत होता.

आज दिवसभरात फोनवर मेसेजस पण बघावेसे वाटलं नव्हते. फोन चार्जींगला लावण्यापुर्वी सवयीने अभीचा मेसेज आहे का बघीतलं गेलं आणि झपाझपा दहा-बारा मेसेजेस आलेले दिसले. ‘हाय!, आहेस का?’ ‘कशी आहेस?’ ‘जेवलीस का?’, ‘प्लीज, आन्सर द कॉल’, ‘मिस्ड यु‌अर बकबक’ ‘टेक रेस्ट’ आणि सगळ्यात शेवटी ‘टेक के‌अर, हो‌ईल सगळं नीट. जीएन’ असे त्याचे मेसेजेस वाचून त्याही मनस्थितीत थोडं बरं वाटलं. मोबा‌ईल चेक केल्यावर कळलं हॉस्पीटलमधे सायलेंटवर ठेवला होता फोन, तो तसाच राहिलेला. म्हणून दिवसभरात आलेले फोन कळलेच नाहीत. आता कळतय त्याचे सात-आठ मिस्ड कॉल्स होते, काही दिपेशचे आणि राहूलचेही होते.

काही दिवस संयु कॉलेजला आलीच नव्हती. पण तेव्हाही सगळ्या गृपमधे दीदीचीच चर्चा होती. ‘आंधळ्या प्रेमाचे परिणाम हे’ अशा टा‌ईपचं वाक्य कानावर आलं कुणाकडून की एकदम आक्रसून घ्यावसं वाटायचं.

त्यादिवशी मधली दोन लेक्चर्स फ़्री होती म्हणून आम्ही दोघे तिथे बाल्कनीत उभे होतो. त्या कठड्यावरुन हात फिरवत त्याचं पहिलं वाक्य आलं ते हे, की "काल सॅन्डी इथे भेटला मला. गेल्या आठवड्यात इथेच ब्रेक-अप झालं म्हणाला. पण तो त्या दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता, ती असं काही करेल असं नव्हतं वाटलं म्हणाला. सगळे त्याच्याकडेच गुन्हेगार असल्या सारखं बघतायत ते सहन होत नाही म्हणाला’

मला मग तिथेही उभं रहावेना. आम्ही दोघेच कॉलेजमधून बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या बागेत जा‌ऊन बसलो. दुपारची वेळ असल्याने आमच्या सारखे चुकार लोकं वगळता तिथे कोणीही नव्हतं. तिथे तसच त्याचा हात हातात घे‌ऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसून रहावसं वाटत होतं. जगातला सगळ्यात हवासा स्पर्श तो हाच असं वाटायला लावणारा तो क्षण मिटूच नये असं वाटत होतं

"अभी, काल संयुचा फोन आलेला. फोनवर बोलताना पण अस्वस्थं होती खूप. मला म्हणे ‘प्रेमबीम सगळं फसवं असतं. हे कसलं प्रेम म्हणे जे आयुष्यातून उठवतं?’ मी तिला समजवायचा प्रयत्न केला, पण मग तिने मला विचारलं , "तसं नव्हतं मग का केलं तिने असं?"

माझा हात हातात घेत तो म्हणाला, “काल दिपेशने त्याला असं सांगितलं, की ती दोघं फ़िजीकली पण गुंतली होती. मे बी, ते कारण असेल दीदीने आत्महत्या करण्यामागचं"

मी झटका लागल्यासारखी बाजूला सरकले. तो ही एकदम आक्रसून बसला.

“अभी, संयुपण फोनवर असच काही सांगत होती मला.दीदी आज सकाळी तिच्या मैत्रिणीशी बोलत होती, की त्यांच्या नात्याला ती शेवटपर्यंत टिकून राहील असं मानून चालली होती आणि भावनेच्या भरात अशा काही गोष्टी करून बसली होती, की आता त्या चुका पुसूनही टाकता येत नव्हत्या. कदाचित दिपेश जे म्हणाला तेच असेल हे.”

“मला तरी नाही पटलं दीपेशचं म्हणणं. शारीरिक गुंतवणूक होती म्हणून हे असं? पण ती नसती तरी मानसिक गुंतवणूकीचं काय?”. अभीचं म्हणणं पटत होतं आणि तरीही माझं मन हात धरतानाही दहावेळा विचार करत होतं.

“खरंच का झालं असेल असं? किती छान वाटायचे ना एकत्रं?”
“काय बोलू तेच कळत नाही रियु, मुळात त्यांच्यात ब्रेक-अप होण्याइतकं काय घडलं असेल तेच कळत नाहीये मला. त्यातूनही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याइतकं काय घडलं, तेच शोधतोय मी.”

“टोकाचं पाऊल? ब्रेक-अप झालाय त्यांचा. पुरेसं नाहीये का हे हर्ट व्हायला?”

“आहे की!, पण त्याकरता आत्महत्या? तुला नाही का हा आततायीपणा वाटत?”

“आततायीपणा असेल रे, पण तो त्याच्यावरच्या प्रेमातून आलाय ना मुळात? उद्या आपल्यात ब्रेक-अप झालं तर? सांग ना अभी?”

"काय सांगू? माझ्यापाशीही उत्तर कुठे आहे याचं? खरतर मलाही वाटते अधूनमधून भीती. इथूनतिथून सगळे सांगत असतात की हे वय नव्हे कमिटमेंटचं. पण असं ठरवून नाही ना गोष्टी होत. तुला आठवतं, तू पहिल्यांदा कॉलेजला आली होतीस तेव्हा निळी जीन्स आणि त्यावर ऑफ व्हा‌ईट रंगाचा टॉप घातला होतास. तेव्हाच तुझं हसणं आवडलं होतं. पण तेव्हा इतका पुढचा विचार नव्हता केला. तुझं नावही नव्हतं ठावूक तेव्हा. त्या वेलकम पार्टीच्या तयारीच्या निमित्ताने आपली चांगली मैत्री झाली. तू गाणं म्हंटलस ना, तेव्हा वाटलं तू फक्त माझ्यासाठी गात आहेस. शप्पथ! तेव्हाच खरतर प्रपोज करणार होतो तुला. पण घाबरत होतो की ’नाही’ म्हंटलस आणि मैत्री पण तोडून टाकलीस तर? त्यावेळी संयु,’दी’ आणि सॅन्डीचीच मदत झाली होती मला. आधी वाटायचं, ते लोकं मुद्दाम चढवतायत की काय मला? पण ते मनापसून मदत करत होते.

“आपला पहिला एकत्र ट्रेक आठवतोय? तोही त्यांनीच प्लॅन केला होता. पण संधी दे‌ऊन पण मला ट्रेकभर तुला प्रपोज करायची हिंमतच होत नव्हती. त्यात नेमकी मी तुझी मस्करी केली इतरांसोबत आणि तू चिडलीस माझ्यावर. त्यामुळे तर माझा आत्मविश्वास पार डळमळायला लागला होता. पण सॅन्डीनेच मला धीर दिला, म्हणाला की ’त्याचीही अशीच अवस्था झालेली प्रपोज करताना. पर है ना आज हमलोग एकसाथ तो हम लोगो को देख और बढ आगे ।’. त्यानेच पुढे ढकललं होतं म्हणुनच कशीबशी केली हिंमत आणि.. "

"आणि काय?" मी विचारलं

“आणि काय, आज आपण एकत्र आहोत. बास. या सगळ्यात ज्यांच्याकडे बघून ही हिंमत केली त्यांचीच रिलेशनशीप तुटावी? त्रास होतो गं या गोष्टीचा"

माझं तर या सगळ्या विचारांनीच डोकं दुखायला लागलं होतं. अभी भेटल्यावर त्याचा हात हातात घे‌ऊन बसतानाही कुठेतरी मनातल्या मनात संघर्ष चालायचा, कुणी मला ’चीप’ मुलगी तर म्हणणार नाही ना? मी बोलून दाखवलं नाही तरी माझ्या देहबोलीवरुन अभीलाही हे टेन्शन जाणवायचं. माझी भीती, चिंता, संयुचं सांगणं, आ‌ईचा सल्ला सगळं माझ्याभोवती फेर धरायचं आणि मग मला काही सुचेनासच व्हायचं. या सगळ्याचा त्यालाही त्रास व्हायचा. आ‌ईला कशी कोण जाणे शंका यायला लागली होती, पण तरी मला इतक्यात काही सांगायचं नव्हतं घरी. दीदीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तर आत्ताच काही सांगणं नकोच वाटत होतं.

मी काहीही सांगितलं नव्हतं, तरी आजुबाजूचे सगळीकडचे संदर्भ देत ती अधूनमधून माझं बौधिक घ्यायची संधी सोडत नव्हती. शारिरीक गुंतवणूकीचे तोटे तर ’य’ वेळा ऐकलेले, मनात तरीही गोंधळ होता. गंमत याची वाटायची की मानसिक गुंतवणूक ही त्यामानाने सर्वांना सेफ वाटायची.

आमच्या ‘प्रपोजवाल्या ट्रेकला’ एक वर्ष झालं, तेव्हा मी म्हंटलं होतं, की आमच्या प्रेमाच्या गोष्टीत वादांना अजूनही स्थान नाहीये, हीच अचिव्हमेंट आहे म्हणून. खरतर जगात कोणत्याही दोन व्यक्तींचं १००% सगळ्या बाबतीत एकमत असणं अशक्यच, हे कळण्याची वेळ नात्यात येतेच कधी ना कधी. लाईक्सपेक्षाही तुमच्यातले डिसलाईक्स तुम्ही कसे हाताळता, यावर तुमच्या नात्याचा पोत ठरतो, असं म्हणतात.

तर आमच्यातल्या ‘डिसलाईक्सना’ हॅन्डल करायची वेळ अशीच अचानकपणे आमच्यावर आली. त्याची सुरूवात एका बेसावध क्षणी निरर्थक म्हणावं अशा गप्पांमधूनच झाली. झालं असं की गृपमधे गप्पा रंगलेल्या असताना एखाद्या कल्पनेला, कवितेला किंवा एखाद्या विचाराला मी पटकन ‘सहीच’ अशी प्रतिक्रीया द्यावी, तर त्याचवेळी त्याने "बकवास है सब" असा एक तुच्छ कटाक्ष टाकावा. एकदा राहूलने व्हॉटस अ‍ॅप गृपवर एक छानसा मेसेज टाकलेला ’देव सर्वत्र असतो’ आशयाचा. बाकी सगळ्यांनी ’ला‌ईक’ केलं पण अभी? त्याने मस्त चिरफाड केली त्या सुंदर मेसेजची. वर म्हणे, “तू तरी इतरांसारखी अंधविश्वास नको ठेवूस”

“अरे! यात काय आलाय अंधविश्वास? निदान एक शक्ती म्हणून तरी नक्कीच आहे माझा देवावर विश्वास. मला श्लोक म्हंटले की शांत वाटतं. तो त्याची मतं आम्हालाही पटावीत, असा आग्रह धरायचा आणि इथेच आमचा वाद व्हायचा.

आम्ही सगळे ‘क्वीन’ मुव्ही बघून परत येत होतो. तेव्हातर कळसच झाला. मला प्रचंड आवडला होता सिनेमा आणि अभीला सिनेमाचा बेसच हायपोथेटीकल वाटला होता. राहुलनं, मला सगळ्याच गोष्टी पटकन आवडून जातात आणि मी व्यवहारी कमी आणि इमोशनल जास्तं आहे, असं म्हणताच त्याला झापायचं सोडून, ’खरय’ म्हणत अभीनं त्याचीच साथ दिली.

“डोक्यानं विचार करायचा सोडून मुली नेहमी हृदयानंच का विचार करतात!, म्हणत राहुलनं गाडी एकदम ’गर्ल्स व्हर्सेस बॉईज’ या नेहमीच्या ट्रॅकवर नेली. त्या कशा इमोशनल फ़ूल बनतात यावरून सुरू होऊन ’गर्ल्स ओन्ली कॅन चॅट अबाऊट मेक-अप, ऍन्ड गॉसिप’ यावर त्यांचं मनसोक्तं खिदळून झालं.

“ओह! स्टॉप धिस नॉनसेन्स गाईज. अर्थशास्त्र आणि राजकारणातलं मला तुमच्यापेक्षा नक्कीच जास्तं कळतं. अशा किती मुलींना गॉसिप करताना बघितल आहे तुम्ही, की इतकं जनरल विधान करताय रे? मी करते कधी गॉसिप? मला अशी जनरलायझेशन्स अजिबात आवडत नाहीत.”

“तुझ्याविषयी नाही गं” म्हणत पिनाकिननं मला शांत करायचा प्रयत्न केला.

“तुम्ही इन जनरल मुलींविषयी बोलताय आणि मीही एक मुलगीच आहे”

बापरे! बघता बघता वातावरण चांगलच तापलं. माझं डोकं सटकलेलं या सगळ्यांनी पहील्यांदाच अनुभवलं असेल बहुतेक. अभी पण एकदम गंभीर झाला. मला सॉरी-वॉरी म्हणून मामला शांत करायचा प्रयत्न करत होता. खरतर हे सगळं मस्करीतच चालू होतं सुरुवातीला. कुणाचाही हेतू दुखावण्याचा नव्हता पण याबाबतीत मी कडवी फेमिनिस्ट आहे आणि कोणत्याही प्रकारच्या पुर्वापार साचेबंद विचारसरणीतनं आलेले जोक्स एका मर्यादेनंतर माझा मेंदू स्विकारुच शकत नाही. बाकी सगळ्या बाबतीत माझं नमतं धोरण असलं तरी का कोण जाणे या एका बाबतीत माझा ना‌ईलाज होतो.

त्याच्या ’सॉरी-वॉरी’ नंतर सगळ्यांनी पांगायचाच निर्णय घेतला आणि अभीने मला आमच्या नेहमीच्या स्पॉटपर्यंत कंपनी दिली. कंपनी दिली म्हणजे नुसतीच सोबत चालण्याची कंपनी दिली. बोलणं काहीच झालं नाही. निघताना परत एकदा तो सॉरी म्हणाला आणि ’बाय’ म्हणून निघून गेला. असे काही वाद झाले, की माझं डोकं एकदम जड झाल्यासारख होतं आणि दुखायला लागतं. घरी आल्यावर पण थोडावेळ काहीही न करता तशीच बसून राहिले. आजीचा नुकताच पाठ वाचून झाला होता, आ‌ई पण ऑफीसमधून आली होती आणि जेवणाच्या बाबतीतल्या सुचना स्वयंपाकाच्या मावशींना देत होती.

“कसा होता सिनेमा?” म्हणत आ‌ईने चौकशी केली आणि मी भडाभडा सिनेमाबद्दल, अभी, राहूलच्या प्रतिक्रियांबद्दल आणि आमच्यात झालेल्या मतभेदांबद्दल बोलून मोकळी झाले.

आ‌ईने शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्या डोक्याला तेलाने मॉलीश करुन देत मला म्हणाली, “अशी जनरलायझेशन्स आपल्या वागण्यानं बदलायची असतात, वादानं नाही. असे बदलही कासवाच्या गतीनं होतात. तसही प्रत्येकवेळी आपली मतं ही जुळतीलच असं नाही ना? ऍग्री टू डिसऍग्री इज इंपॉर्टंट इन एव्हरी रिलेशनशीप.”

त्यावेळी तिचं वाक्य नुसतच रजिस्टर झालं मनात, पण नंतर जेव्हा डोकं थंड झाल्यावर विचार केला, तेव्हा थोडंसं पटलंच ते. आय मस्ट लर्न धीस. बराच वेळ फोन पिंग करत होता म्हणून बघीतलं तर सगळ्यांचेच मेसेजेस होते ’सॉरी’ असं लिहीलेले. मग मी पण ’सॉरी’ म्हणून हे नव्याने उमजलेलं वाक्य त्यांना पास-ऑन केलं.

छोट्या-छोट्या वादांना थोपवायची किमया नक्कीच होती ह्या ’ऍग्री टू डिस‌ऍग्री’ वाक्यामधे.

आमचं नातं ह्या अशा छोट्या-छोट्या वादांपायी तुटलं नव्हतं हीच एक अचिव्हमेंट होती त्या वेळी.

नातं जसं जुनं होत चाललं होतं, तसं तसं ते टिकेल ना शेवटपर्यंत, या टेंशनपेक्षाही ह्या छोट्या-छोट्या अचीव्हमेंटस वरच लक्ष जास्त केंद्रीत व्हायला लागल होतं . आमच्या स्टेडी रिलेशनशीपचं तिसरं वर्ष सुरू झालं. एकमेकांच्या स्वभावाची आत्ता कुठे खरी ओळख हो‌ऊन कुणाला कुठे नमतं घ्यावं लागणार आहे, हे समजतय असं वाटेपर्यंत अभीच्या बाबांची बदली नाशीकला झाली.

बातमी ऐकल्याबरोबर मी अभीला म्हंटलं, "कसं होणार माझं इथे? तू दिसणार नाहीस, भेटणार नाहीस?”

त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तरी बिचारा मला चिअर-अप करत होता.

तो तिथे जा‌ऊन सेटल झाल्यानंतरची गोष्ट. अभीचा सकाळी-सकाळी ’हाय स्विटी! जी.एम.’ मेसेज आला आणि दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली.

’मिस यू सो मच. कम सून’, असा त्याला रिप्लाय करुन मी आवरायला घेतलं. तितक्यात राहुल आणि संयुचा गृपवर मेसेज आला. ’दस मिनीट मे तय्यार रेहना ।. हम आ रहे है तुझे पिक अप करने । मिलके कॉलेज जा‌एंगे ।’

इतके दिवस आम्ही चौघे एकत्र जायचो कॉलेजला. अभी स्टेशनला आमची वाट पहात उभा असायचा, आम्ही तिघे तिथे पोहोचलो की चौघे मिळून कॉलेजला जायचो.

सुरूवातीला कॉलेजमध्ये जायचीच इच्छा व्हायची नाही. आमच्या गृपमधून दीदीशी ब्रेक-अप झाल्यापासून सॅन्डी बाजुला झाला. आता अभी नाशीकला गेल्यामुळे अजून एकजण कमी झाला. त्यात पिनाकीन-सुहानी या नव्याने जमलेल्या जोडीमुळे ती दोघेही आमच्यातून तसे वेगळीच झाली होती. पिनाकीनला म्हंटलं एकदा तसं तर म्हणे, "अभी असताना तुम्ही काय करायचात ग वेगळं?"

मी खूप म्हणजे खूपच मिस करत होते त्याला, स्पेशली कॉलेज डेज, ट्रेक या ठिकाणी. सगळ्यांनी मागे लागून मला ’अ‍ॅन्यु‌अल-डे’मध्ये मला भाग घ्यायला लावला. माझी फार इच्छा होती, अभीने या कार्यक्रमाला यावं म्हणून. मी ’ओल्या सांजवेळी’ गाणं बसवावं, असं त्यानेच सुचवलेलं. कितीतरी वेळा मी फोनवर त्याला गाणं ऐकवलं होतं आणि प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या वेळी तो समोर असावा, मी त्याच्यासाठी गावं असं फार वाटायचं. पण ते तर अशक्यच होतं. त्यानं एकीकडे ’सी‌ए’चे क्लासेस लावले होते आणि नुकताच ’रोज-डे’ला तो कॉलेज बुडवून काहीतरी कारणं काढून धावती भेट दे‌ऊन गेला होता.

तोही मिस करतोय खूप आणि जमेल तेव्हा धावती भेटही देतोय पण असं दरवेळी अभ्यास, कॉलेज, क्लासेस बंक करुन भेटणंही परवडण्यासारखं नाही ना? शेवटी मीच त्याला समजावलं करि‌अर फ़्रंटवर घरच्यांना बोलायची संधी द्यायचीच नाही. सगळं थोडीच होणार मनासारखं दरवेळी? लांब असलो तरी आपण आहोतच सोबत. इथे असताना तो फार प्रॅक्टीकल विचार करायचा आणि मी इमोशनल फ़ूल होते पण आता या एका वर्षाने आमच्या भूमिकेतच बदल करुन टाकले.

त्याचं इथे नसणही अंगवळणी पडत गेलं. आपल्या मनाची मजा असते नाही, त्याला थोडं कंडीशनींग करायची खोटी असते फक्त. ते बिचारं जमवून घेतं, आहे त्या परिस्थीतीशी.

’ऍग्री टू डिस‌ऍग्री’ म्हणत डिफ़रन्स ऍक्सेप्ट केले मनानी, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप पण निभावून नेतय ते! जे जे म्हणून अशक्य वाटत होतं ते ते वेळ येताच शक्य करुन दाखवलं या मनानं.

उद्या ब्रेक-अप झालं, तरी जा‌ईल का हे तरुन त्यातूनही? या विचारासरशी दचकायला झालं एकदम. काय विचार करतोय आपण इथे बसून? आजही त्याच्या फोनकॉलची वाट बघतेय मी, त्याचा मेसेज अधाश्यासारखा वाचते पुन्हा पुन्हा आणि तरी मनाच्या कोपर्‍यात आहेच का पुन्हा ते ब्रेक-अप झालं, तर काय वालं खूळ?

प्रेमात पडल्याच्या पहिल्याच वर्षी दीदीच्या ब्रेक-अप आणि आत्महत्येच्या प्रयत्नानंतर आमच्या नात्याचा असा काही शेवट झाला, तर मी दीदीच्या वाटेने जाणारच नाही याची शाश्वती नव्हती.

आणि आता? त्याच्या आसपास नसण्याचीही सवय झाली आहे मनाला.

आज अभी येणार आहे भेटायला. काल फोनवर महत्वाचं काहीतरी बोलायच आहे म्हणाला. कॉलेज, इंटर्नशीप बुडवून येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. आज मुद्दाम मी त्याच्या आधीच तिथे जा‌ऊन पोहोचले आहे. इथे उभं राहिलं, की कॉलेजच्या गेट बाहेरचा रस्ता अगदी त्याच्या त्या वळणांसकट दिसातो.

सुरुवात झाली ते कॉलेज जॉ‌ईन केल्याच्याच वर्षी. त्याच्यावर क्रश होता म्हणा ना. पण तेव्हा हे फक्त माझ्या आणि संयुक्तामध्येच होतं. सुरूवातीला त्याचं नावही धड माहीत नव्हतं आम्हाला.

तेव्हाचा नाव जाणून घेण्याचा प्रकार आठवून आता हसायला येतं. तेच काय, आज त्या प्रत्येक वेड्या गोष्टी आठवून हसू येतय.

आत्ता इथूनही तो दिसतोय, लांबवरुन इकडे येताना. आमच्या सुरवातीच्या कोर्टशीपच्या काळात, असा तो उभा असायचा मला त्याच्यापर्यंत येताना बघत. आज मी उभी आहे तिथे.

आज काहीतरी महत्वाचं बोलायच आहे म्हणाला. काय असेल? खाली उतरुन कट्टयापाशी येताना मनात आलं, आता शेवटच्या वळणापाशी पोहोचला असेल ’तो’ की मग दिसेलच गेटमधून आत शिरताना, कदाचित एखादं नवीन वळण घे‌ऊन.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माहेर दिवाळी अंक २०१४ मधे पुर्वप्रकाशीत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खरतर जगात कोणत्याही दोन व्यक्तींचं १००% सगळ्या बाबतीत एकमत असणं अशक्यच, हे कळण्याची वेळ नात्यात येतेच कधी ना कधी. लाईक्सपेक्षाही तुमच्यातले डिसलाईक्स तुम्ही कसे हाताळता, यावर तुमच्या नात्याचा पोत ठरतो, >>>> + ११११११११११११११

मस्त

खरतर जगात कोणत्याही दोन व्यक्तींचं १००% सगळ्या बाबतीत एकमत असणं अशक्यच, हे कळण्याची वेळ नात्यात येतेच कधी ना कधी. लाईक्सपेक्षाही तुमच्यातले डिसलाईक्स तुम्ही कसे हाताळता, यावर तुमच्या नात्याचा पोत ठरतो, >>>> + ११११११११११११११

आवडली.

खरं तर इतकी मोठी कथा वाचूनही शेवट लिहिलाच नाही असं कस? हे हि वाटलं. सगळंच कसं प्रेडिक्ट करायचं वाचकाने? हे पहिल्या क्षणाला वाटलं...

पण...

दुसऱ्याच क्षणी वाटलं ... कशाला हवाय शेवट..? हे इतकंही छानच आहे कि... कॉलेजच्या विश्वातील एक पर्व. ज्याला गोड हवा त्याने गोड ठरवावा शेवट...( कित्येकांनी आपल्या आयुष्यातल्या कथेचा शेवट दिला असेल .. बहुतेक... तीही शक्यता आहेच की).....................

धन्यवाद मनापासून Happy

मयुरी, परफेक्ट ओळखलत शेवटाबद्दल Happy

हाच या कथेचा शेवट आहे. हुरहूर लागावी हा ही हेतू आहे आणि ही कथा प्रत्येकाने मनात पुढे नेऊन आपापला शेवट आपल्यापुरता हवा तसा करावा हाच विचार होता हा शेवट लिहीताना.
कदाचित रुढ लिखाण पद्धतीत हा शेवट बसत नसेल, पण इथेच थांबाव अस वाटल खरं

काय छान आहे ही गोष्ट! कॉलेजच्या दिवसांमध्ये फुलपाखरी दिवस. मन फ्लॅशबॅक मध्ये गेलं. आम्ही आमच्या एका मैत्रिणीला खुपच चिडवायचा एका मुला वरून. त्याचं नाव अनंत होतं. तर तिला अनंताचं फूल द्यायचो. Happy
तुझ्या गोष्टीचा शेवट मी माझ्या मनात गोडच केलाय. Happy