कविकल्पना -६- नशीब एकेकाचं!

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 13:02

कविकल्पना - ६ - नशीब एकेकाचं!
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'
सहावे शीर्षक :
"नशीब एकेकाचं"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशीब शब्द म्हणाल तर मोठा
अणि म्हणाला तर खुप लहान
कुठे खाल्लेलं पचवायला चालतो
तर कुठे खायला भेटावं यासाठी चालतो

नशिबाची गोष्ट आहे बॉस
तिकडे अमिरांची जनावरं बिझनेस क्लास मधून जातात
इकडे गरिबांची जनावरे त्यांना दुसरीकडे घेऊन जातात

तिकडे ९०० करोड बुडवणारा देशाबाहेर सुरक्षित फिरतोय
इकडे देशासाठी राबणारा फाशीच्या फंद्यात अडकलेला..
नशीब एकेकाचं

उमलती सारी एकसारखी, सृजनाचे ते एकच तत्व
इथवर आहे नियम सृष्टीचा, नसतं कुणीच अपवादाचं

मावळती कुणी कलेवराशी, कुणा ईशाचे चरणममत्व
इत:पर आहे नियम कुणाचा, असतं नशिब एकेकाचं

नशिबाच काय घेऊन बसलात हो
ते कधी साथ देत तर कधी नाही
मनगटात ताकद हवी खर तर
नाहितर् राजयोग पण कामाचा नाही

परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो
कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो
कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता
नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता

हिच सवय मग अंगवळणी पडत जाते
अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते
थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही
प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी?

आता आळस झटका आणि लागा कामाला
आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला
परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही
नशिब अस सहजासहजी बदलायच नाही.

नाहीच टाळता येत मला नशिब एकेकाचं बोलून
होतो दु:खी मनांत मी भोग एकेकाचे बघुन

मनांत आळवितो त्या सर्वशक्तिमान नियंत्याला
बदलव रे नशिब त्यांचे, दे थोडे तरी भोग मला

भोगूनी भोग मीही तावूनसुलाखून निघेल
खडतर मार्गावर चालण्यास मीही थोडा घडेल

गुलमोहर ===

तो उभा एकाकी गुलमोहर
असा कसा गुल झाला मोहर
तो,तो,आणि ते सारे झाले लाल बुंद
पण!हाअसा हा कोणत्या धुंदीत झाला धुंद

शेजारील घरात एकाकी एक म्हातारा
अशी कशी एकाला सोडून गेली दारा
ते,ते आणि ते सारे विसरले लागा बांधा
पण!असा कसा त्यासही न राहिला धरबंध

होते ते एक झाड
फुलांसाठी नाही फुटला पान्हा
होते ते एक घर
कुळासाठी नाही उठला कान्हा
असे कां ? असे कां ? असे का ?
एक एक फांदी हालत विचारते
आवेगाने हात कपाळी मारते
असते नशीब एकेकाचे ….
म्हातारे शरीर त्यास बिलगते
विजया केळकर ____

सौ उवाच :
अहोss, कुठे गेलात? बोलावतेय कधीची
ना जेवायची शुद्ध, ना विश्रांतीची
कितीदा तो कच्चा माल आवरून ठेवलाय,
पुन्हा सगळी बोचकी खाली, पुन्हा माझा पसार्‍यात पाय
चार पाच वस्तूत तुमचं कधी भागतच नाही
शंभर गोष्टी मिसळायची हौस काही फिटत नाही

त्या दोघींचं बरंय, जरा निवांत बसता तरी येतं
एसीची हवा, सागरलाटा, अनुभवत 'ह्यांच्याशी' बोलता तरी येतं
इथे ? फक्त कमरेचे टाके ढिले !!
देवा, कुठून यांच्याच पदरात पडले?

श्रीयुत उवाच :
काय झालं, मला काही म्हणालात?
वाढायला घ्या तुम्ही, आलोच मी इतक्यात
जायच्या आधी अंगणातलं बाजलं सरकवा
हा लॉट आजच सुकायला हवा

सत्तावन, दोनशे वीस देता का जरा
म्हणजे हा पुतळा करता येईल पुरा
अशा का बघताय, चुकलं का काही ?
मला बुवा तुमचं काही कळतच नाही

बसा बरं दोन मिनीटं, सावकाश जेवू
परकर्‍या पोरीसारखे गाल नका फुगवू
जबाबदारी मोठी आपली, काम चोख हवं
काटेकोर पाहिजे सगळं, नको फक्त नवं

आधीचं बघायचं, पुढच ठरवायचं
त्यानुसार काय काय हवं ते घ्यायचं
मळायचं, मुरवायचं, आकार द्यायचा
उण्या-अधिकाचा तोल राखायचा
घडवणं, सुधारणं इथेच पाहिजे साधलं
डिस्पॅच झालं की हातातून गेलं

ही, परवाची माती, कालवून ठेवलीय
ही, उद्याची लिस्ट, बनवून ठेवलीय
हे सगळे ओले, उद्या सुकवायचे
ते अंगणातले सुकले, की खाली धाडायचे
आहे का मोकळा वेळ, सांगा बरं मला
मी जर चुकलो तर भारी पडेल 'त्याला'

तुमचा त्रागा समजतोय, पण एक बघा
'विधाता चुकला' ऐकायला, रूचेल का सांगा
पसारा तर होणारच, कामच माझं असं
जमेल तितका आवरू, बाकी ठेवा तसं

आता असं करू, जेवण आवरू, वामकुक्षी घेऊ
आलं घालून चहा करतो, सोबतच पिऊ
मग तुम्ही फिरून या, खरेदी करा
हंस देतो दिमतीला, जाऊन या माहेरा
शहाणी माझी बायको ती, नको म्हणू, ‘जाऊ सोबतच'
मला अगं लिहायला बसायचं आहे, नशीब एकेकाचं...