STY - तीन देवीयां...

Submitted by संयोजक on 27 August, 2017 - 23:59

आज त्या तिघीही प्रचंड खुष होत्या. बाटलीचा कॉर्क टप्पं आवाज करून ऊघडताच ऊडणार्‍या फेसाळ शँपेन सारखा पूर्ण बंगल्यात तिघींचा युफोरिआ ओसंडून वहात होता. मोकळे सोडलेल्या लांब सिल्की केसांसहित माना गरागरा फिरवत बेडवर ऊड्या मारणे, ऊश्या फाडून त्यातली पिसे खोलीभर ऊडवणे, आवाज चिरकेपर्यंत वरच्या पट्टीत ओरडणे असे अविरत पणे चालू होते. मग्रुरी, गर्व, अभिमान त्यांच्या आखीव रेखीव आणि गोर्‍या मुलायम चेहर्‍यावरच्या रंध्रारंध्रातून ठिबकत होता. दि मोस्ट ईलिजिबल बॅचलर, विराट कोहलीने ने एका गुडघ्यावर बसत, चार्मिंग चेहर्‍याने जगातली सर्वात महागड्या हिर्‍याच्या अंगठीची डबी त्यांच्यासमोर ऊघडत 'Darling, will you please marry me?' विचारले असते तरी कदाचित त्या तिघीही त्याला 'You should have bought a better ring, baby' म्हणत कुत्सितपणे हसल्या असत्या. चॉकलेट बॉय रणवीर कपूरने हात हातात घेवून त्यावर हकलेच किस करत, त्याच्या मोठ्या पाणीदार डोळ्यांतून प्रेमाची श्यपथ देत अतिशय रोमँटिक आवाजात हलकेच 'Sweetheart, will you be mine forever' विचारले असते तरी त्या तिघीही अतिशय मग्रुरीने 'please try some other time, pretty boy' म्हणत त्याच्या गालावर हकलीशी चापटी मारत फिस्कन हसल्या असत्या.
आणि का नाही त्यांनी असे करावे? त्यांचा हक्कंच होता तो, शेवटी मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड आणि मिस अर्थ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्वं करण्यासाठी निघालेल्या आजच्या घडीला भारतातल्या सर्वात सुंदर स्त्रिया होत्या त्या तिघीजणी. त्यांच्यापेक्षा कांकणभर कमीच सुंदर, अश्या माजी सुंदर्‍यांनी करोडो प्रेक्षकांसमोर मानाचे मुकूट त्यांच्या डोक्यावर चढवले होते. आज भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात त्यांच्याशी सलगी करण्याची सुप्तं ईच्छा भरून राहिली होती. जॉन हॅम, बेनेडिक्ट कंबरबॅच, फवाद खान सारख्या जगातल्या सर्वात हँडसम, चार्मिंग आणि सक्सेसफुल जजेस समोर त्यांच्या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेची चुणूक दाखवण्यासाठी त्या ऊत्सुक होत्या. मग का असू नये त्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व?

प्रिया सेन, सना मिर्झा आणि डायना जेकब तिघिंनीही आपापल्या स्पर्धांसाठी वेगवेगळ्या देशात प्रयाण करण्याआधी एकदा भेटून आपले आजवरचे अद्वितीय यश साजरे करण्याचा बेत आखला. प्रियाच्या मढ आयलंडच्या बंगल्यात त्या तिघी भेटल्या तेव्हा काही मिनिटातंच तिथे दोन गोष्टींचा पूर आला - हेवी मेटल संगीताचा छप्परतोड आवाज आणि शँपेन. दोन तास हेवी मेटलवर अंगातला प्रत्येक स्नायू दुखेपर्यंत घरभर नाचून, शँपेन ऊडवत एकमेकांना भिजवून झाल्यानंतर आणि ऊरलेली शँपेन रिचवल्यानंतर त्यांना भूक अनावर झाली. तिघींनाही बाहेर जाऊन चायनीज खाण्याची जबरदस्तं हुक्की आली. पुढच्याच क्षणाला मढ आयलंडच्या त्या बंगल्यातून एक मर्सिडीझ लफ्फेदार वळण घेत बाहेर पडली आणि मार्वे रोडवरून टँजेरिन कॅफेच्या दिशेने भरधाव निघाली. गाडीच्या ऊघड्या काचांतून समुद्रावरून भणाणा येणारा चेहर्‍यावर आदळताच, शँपेन आपले खरे रूप दाखवायला लागली. तिघीही गाडीतून डोके बाहेर काढत, ओरडत, गाणी म्हणत जात असतांना वेटोळे मारत सावजाला आपल्या कवेत घेणार्‍या अजगरासारखी शँपेन त्यांना आपल्या कह्यात घेत आपल्याच तालावर नाचवू लागली.

*------------------------

पाशाच्या हातभट्टीवर पहिल्याच धारेची नारिंगी ढोसून, चमेलीच्या फडावर गाणे बजावणे ऐकून, मोगर्‍याची माळ घातलेल्या हाताने बीडी पीत हलत डुलत, बाबल्याच्या गळ्यात गळा घालून निघालेला मक्या म्हणाला, 'तुला सांगतो बाबल्या खाज असते ना खाज लई अतरंगी असते राव... जेवढी अवघड जागा ना तिथंच जास्तं येते बघ.'

'खरं बोलला तू मक्या, आता मलाच बघ ना निकाह करायची किती खाज होती. एक नाही दोन नाही चांगल्या तीन तीन शाद्या बनवल्या पण काय बी ऊतार नाही पडला' एक हात मक्याच्या खांद्यावर आणि दुसर्‍याने बाटली तोंडाला लावत बाबल्या बडबडला.

'बाबल्या, तू लकी हायेस बेट्या. पण माझं काय? एकदा बी लगीन नाही झालं राव माझं' असे म्हणतांना मक्याचे डोळे खरंच पाणावले होते आणि तो बाबल्याचा हात सोडून दु:खावेगाने थिजून रस्त्यातंच ऊभा राहिला.

तोवर पुढे गेलेला बाबल्या मागे वळत हसत ओरडत म्हणाला, 'हे हे मक्या तू रडतोय काय यड्या, अरे ज्यानं खाज दिली तो खाजवायला हात बी देतो होतील की तुझे बी तीन लगीन. हॅ हॅ हॅ असं रडतात व्हय रे... थांब मी मी तुझा व्हेडोच काढून पाठवतो तुझ्या आईला.'

तेवढ्यात करकचून मारलेल्या ब्रेकचा कर्कश्य आवाज करत एक मर्सिडीझ मक्याच्या दिशेने आली. कानांचे पडदे चिरत जाणार्‍या कर्कश्य आवाजाने आणि चेहर्‍यावर पडलेल्या हायबीमने मक्या जागीच थिजला. तोंडातल्या बीडीकडे नेलेला त्याचा हात बीडीपर्यंत पोचण्याआधीच मर्सिडीझ त्याच्या पर्यंत पोचली सुद्धा. मक्याच्या कंबरेवर एक नाजूकशी चापटी मारण्याआधीच थिजल्यासारखी ती जागेवर थांबली. मक्या मात्रं
घाबरल्याने तोल जाऊन मटकन खालीच बसला. बसतांना त्याच्या कोपराला थोडे खरचटले आणि तोंडातली बीडी बाजूला फेकली गेली, ह्याऊपर मक्याच्या पोटातली दारूसुद्धां कणभरही हिंदकळली नसेल.
त्याला पडतांना बघून आपल्या हातून हे काय होऊन बसले अश्या विचाराने प्रचंड घाबरलेल्या त्या तिघीही जणींची शँपेन खाडकन ऊतरली.
लगोलग गाडीतून ऊतरत त्या मक्याच्या दिशने धावल्या. त्याला ऊठवत, 'सॉरी सॉरी, माफ करा चूक झाली' म्हणत त्याचे कपडे झटकू लागल्या.

आपल्या अंगावर ह्या पोरींनी गाडी घातली पाहून मक्याचा पाराच चढला, 'श्रीमंतांच्या माजलेल्या पोरींनो तुम्हाला गरिबाच्या जीवाची किंमतच नाही. चला पोलिस टेशनात सटवीच्यांनो, तुम्हाला धडाच शिकवतो आता' म्हणत तो ओरडू, भेकू लागला.

'नाही नाही, आम्ही तुमची पुन्हा माफी मागतो, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हवे तर पैसेही देतो पण पोलिस स्टेशन नको! प्लीज पोलिस स्टेशन नको' म्हणत त्या केविलवाण्या चेहर्‍याने मक्याची विनवणी करू लागल्या.

तसा मक्याला अजून चेव चढला 'मला नको तुमचे पैशे, आता आपण पोलिस टेशनात जाणार, मग मी सायबाला सांगून जेल मधीच टाकणार हाय तुम्हाला' तो त्यांच्यासमोर बोट नाचवत म्हणाला.

'तुम्ही सांगाल ते आम्ही करू, पण पोलिस स्टेशन नको, आमचं करियर खराब होईल हो' त्या अजूनच दीनवाण्या होत म्हणाल्या.

'त्ये कॅरियर फिरियरचं मला सांगू नका, तुम्हाला पोलिस टेशनात जायचं नसण तर तुम्हा तिघिलाबी आत्ता हिथल्या हिथं माझ्यासंग लगीन लावावं लागन, मगंच मी तुम्हाला हिथनं जाऊ देईल, त्याबिगर मी ह्या गाडीवरून ऊतरणार नाय म्हणजे नाय' म्हणत मक्या गाडीच्या बॉनेटवरंच ठाण मांडून बसला.

'काय लग्नं, अहो काय डोकं बिकं..' असे सना रागानं म्हणतं असतांनाच डायना अणि प्रिया ने तिचा हात जोरात दाबला.

डोळे मोठ्ठे करत तिने त्यां दोघींकडे बघत 'क्काय ए' असे दबक्या आवाजात विचारले.

तेव्हा तिच्याही पेक्षा दबक्या आवाजात त्या दोघी तिच्या कानात म्हणाल्या 'अगं तुला कळंत नाही का तो पिलेला आहे.. त्याच्याशी काय डोकं लावत बसलीयेस... तो म्हणतो तसं करूया आणि सटकू ईथून पटकन'
बॉनेटवर बसलेल्या मक्याची अजूनही गरीबी, श्रीमंती, माज, पोलिस टेशन अशी निरंतर बडबड चालूच होती.

सना परत मक्याकडे वळून म्हणाली, 'अहो पण मी मुस्लिम आहे. मग कसे करणार मी लग्नं तुमच्याशी?'

'त्यात काय मग सोप्पंय की. मी तीन वेळा कबूल, कबूल, कबूल म्हण्तो तुम्ही बी तीन वेळा म्हणा, झालाच मंग निकाह.
म्हणा की आता माझं झालंय कवच म्हणून'.. मक्या डोळे मोठ्ठे करत मोठ्याने खेकसला.

तसे सना दचकली आणि पटकन डोळे गच्चं बंद करत तिने तीन वेळा 'कबूल, कबूल कबूल' म्हणून टाकले.

'हां हे बेस झालं. आता व्हा बाजूला. ओ गळ्यात क्रॉस वाल्या मॅडम आता तुमची बारी ह्या की फुडं अशा. तुमच्यात काय म्हणत्यात कबूल ला?' सनाला बाजूला सारत मक्या डायनाकडे बघत म्हणाला.

'आय डू!' , डायना रागाने दुसरीकडे बघत म्हणाली.

'काय? आईडू?', मक्याच्या भुवया थेट कपाळभर पसरल्या.

'हो आय डू!' डायना दात ओठ खात म्हणाली.

'हॅ हॅ हे बरंय लग्नालाच आई आणि डू हॅ हॅ हॅ.. बरं ते किती येळा म्हणायचं असतंय?' , मक्या आतून गुदगुल्या झाल्यासारखं अंग घुसळत म्हणाला.

'एकदाच!' डायनाच्या हाताच्या मुठीही एव्हाना आवळल्या गेल्या होत्या.

'एकदाच? मग तर आपलं दोनदा म्हणून झालं की, हे सुद्धा बेस्टंच झालं.
ओ स्लीवलेस वाल्या मॅडम आता तुमचा नंबर, या की जरा फुडं आन जरा अंगभर कपडे घालंत जावा की.
बोला तुमचं काय करायचं?' मक्या एकदम अधिकारवाणीने बोलला.

'माझं काय? मी तर हिंदू आहे. ईथे सात फेरे घ्यायला अग्नी नाही, सिंदूर नाही, गळ्यात घालायला हार नाही. आपले लग्नं नाही होऊ शकत, दोन झाली ना तुमची ती पुरे झाली.' प्रिया ओवरस्मार्ट बनत म्हणाली.

'ओ, मला काय पिलेला समजता काय? आँ? असंच बरं सोडीन तुम्हाला. लगीन व्हणार म्हणजे व्हणारंच त्ये बी आत्ता हिथंच.
हे पहा माझ्या फुटलेल्या कोपराचं रगात, त्येच सिंदूर हाये आणि मी तुमच्या भांगेत भरणार... हा अस्सां
माझ्या हातातला मोगर्‍याचा गजरा हाये ना त्योच घालतो तुम्हाला हार म्हणून... हा अस्सा
आणि माझी पेटलेली बीडी पडलीये ना त्योच हाये अग्नी आपण तिलाच सात फेरे मारू .... धरा माझा हात... हांग आश्शी.
लई ब्येस वाटतंय बघा.. शेवटी ह्या मक्याचं लगीन झालंच आणि त्ये बी तीन तीन...येय येय येय', मक्या एकदम रंगात येऊन स्वतःभोवतीच गिरक्या घेत नाचू लागला.

'अहो झाले ना आता आपले लग्नं जाऊ द्या ना आम्हाला', सना काकुळतीला येऊन म्हणाली.

'होय होय, जावा जावा! मक्या त्याचा शबुद कधी फिरवत नाही. पण आपलं लगीन झाल्याचं ध्यानात ठिवा बरंका....' मक्या एकदम जंटलमन सारखा बोलला.

मक्या बोनेट वरून ऊतरताच मर्सिडीझ सूळ्ळंकन गेली आणि मक्या रस्त्यावरच गिरक्या घेत नाचत राहिला. एवढ्या वेळ रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला हे सगळं नाट्यं आ वासून बघणारा बाबल्या त्याचा फोन नाचवत धावतंच मक्याकडे आला. 'ए मक्या मी तुझ्या लग्नांची व्हेडो कॅसेट बनवली, ए मक्या मी तुझ्या लग्नाची व्हेडो कॅसेट बनवली.'

नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सॉल्ल्लीड्ड लिहिलीय STY Lol
आणि माझी पेटलेली बीडी पडलीये ना त्योच हाये अग्नी आपण तिलाच सात फेरे मारू .... धरा माझा हात... हांग आश्शी. >> ये अरे बीडीला सात फेरे मारतात का Proud

'ए मक्या मी तुझ्या लग्नांची व्हेडो कॅसेट बनवली, ए मक्या मी तुझ्या लग्नाची व्हेडो कॅसेट बनवली.'

*** तीन महिन्यांनंतर ***

प्रिया , सना आणि डायना या भारतातल्या सगळ्यांत यशस्वी सुंदर्‍या होत्या. त्यांनी आपापल्या स्पर्धा जिंकल्या होत्या आणि आता त्या आपले विजयी वर्ष गाजवत होत्या. अल्पावधीतच त्यांना वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधन कंपन्या प्रायोजक म्हणून लाभल्या होत्या आणि त्यांच्या जाहिरातीही टिव्हीवर प्रस्तिद्ध झाल्या होत्या. या सर्व यशाला एक काळी किनार मात्र होती. ती रात्र त्या तिघीही विसरू शकत नव्हत्या. कधिही एकमेकींना भेटल्या तर त्यांच्यात एकदा तरी त्या रात्रीची आठवण निघतच होती. अशातच एके दिवशी प्रियाने सना आणि डायना ला फोन करून संध्याकाळी एकट्याने आपल्या बंगल्यावर बोलावले. काय झाले असेल असा विचार करत त्या दोघीही प्रियाच्या बंगल्यावर पोहोचल्या. प्रियाने आपल्या सर्व नोकरांना सुटी दिलेली होती आणि बंगल्यात आता फक्त त्या तिघीच उरल्या होत्या. त्यांनी आपापले पेले भरून घेत बोलायला सुरूवात केली. सुरूवातीच्या अळमटळम नंतर प्रियाने खर्‍या विषयाला हात घातला. तिने टेबलावर एक लिफाफा टाकला. तो लिफाफा प्रियाच्या नावाने होता पण कोणी पाठवला होता त्याचे नाव नव्हते. त्यात फक्त एक फोटो होता ज्यात मक्या प्रियाच्या मांग मध्ये सिंदूर भरतो आहे हे दिसत होते. तो फोटो पाहून बाकीच्या दोघीही हादरल्या. पण हे काय असेल आणि आता काय करता येइल याचा विचार करत आपापल्या घरी गेल्या.

दुसर्‍या दिवशी त्यांनाही त्यांचे फोटो मिळाले. आणि मग मात्र हे काही तरी मोठे प्रकरण झाले आहे असे त्यांच्या लक्षात आले. ही गोष्ट जर बाहेर आली तर आपण स्पर्धेतून डिसक्वालिफाय होऊच वर बाकी नाचक्की होऊन सगळ्या कंपन्याही हातातून जातील हे त्यांना समजले. शेवटी आपण आता पुढे काय करावे याचा विचार करण्याकरता त्यांनी लोणावळ्याच्या बंगल्यावर विकांताला भेटायचे ठरवले. तो लोणावळ्याचा बंगला अगदी निर्जन ठिकाणी होता. डायना च्या आजोबांनी बांधलेला बंगला त्यावेळपासून निर्मनुष्य जागी होता. तिथे कोणी जातही नसे. फक्त आठवड्यातून एक दिवस एक नोकर येऊन साफसफाई करून जायचा त्यामुळे अशा जागी नीट विचार करता येईल असे त्यांना वाटले.

Lol

विचार हा मेटॅफोर नाही ना? त्या निर्जन ठिकाणच्या निर्मनुष्य बंगल्यात तीन सुंदर्‍या येउन काय करणार, तर "विचार"! Happy

मग एक दिवस डायनाला सनाचा रात्री फोन आला आणि ती म्ह्ण्टली की प्रियाने एका अर्जण्ट कामाकरता लोणावळ्याच्या बंगल्यावर आत्ताच्या आत्ता बोलावले आहे, हातातली कामे टाकून ये असेही सांगितले आहे. दोघी स्पर्धांमधे आफ्रिकेतील दुष्काळाबद्दल प्रश्न आला तर करायच्या चिंताग्रस्त चेहर्‍याने तेथून घाईघाईत निघाल्या. २-३ तास ड्राइव्ह करून पळत पळत बंगल्यात पोहोचल्या. खाली तसबिरी पुसत असलेल्या नोकराने वळूनही न पाहता फक्त वरच्या मजल्याकडे बोट दाखवले, मग त्या जिन्यावरून पळत सुटल्या. एका खोलीचे दार उघडे पाहून आत घुसल्या....

तर तेथे एक पेण्टिंग होते ऑल्मोस्ट पूर्ण होत आलेले, आणि प्रिया त्यावर रंगकाम करत होती. तिने वळून विचारले "कसे झाले आहे?" यावर कसाबसा दम खात सना ओरडली की तू इतक्याशा प्रश्नाकरता आम्हाला इतके लांब इतक्या रात्री बोलावले? त्यावर प्रिया फक्त हसली. डायना मात्र मराठी सिरीयल मधल्या मॉड मुलीसारखी काही वाक्ये मिंग्लिश मधून बोलली. तेवढ्यात तेथे एक डेअरी फ्री डाएट केक दिसला. तो पाहून सनाही विरघळली. "डेअरी फ्री डाएट केक के लिए हम कही भी जा सकते है" असे ती म्हंटली. यावर सगळ्या हसल्या.

मग आता जमलोच आहोत तर ते लग्नाचे काय करायचे ते ठरवून टाकू असे सना म्ह्ण्टली. लग्ने झाली आहेत हे सिद्ध झाले तर सगळ्यांची करीयर्स धोक्यात येतील, त्यामुळे कोणाची तरी मदत घेउन मक्या ला डरा-धमकाके गप्प करायचे ठरले. किंवा पैसे देउन. इथे सना ने अमरीश पुरीचा आवाज काढायचा प्रयत्न करत "हर आदमी की एक कीमत होती है" म्हंटले. मग प्रिया च्या ओळखीत एकाला पकडून त्याला मक्याबद्दल काहीतरी खोटेनाटे सांगून त्याला गप्प करायला लावायचे असे ठरले. "एकदम सडक छाप होता. ५-१० हजारांत काम होईल" असे प्रिया म्ह्ण्टली.

मग केक चा एक एक बाइट घेउन तिघी तेथून बाहेर पडल्या आणि परत मुंबईला गेल्या.

पण कॅमेरा परत बंगल्याच्या आत त्या रूमवर. नोकर बाजूच्या रूम मधून आला आणि शेल्फवरच्या टेडी बेअर ला उचलून त्यातला कॅमेरा बंद केला. मग स्वतःच्या मोबाईल मधे या तिघींचे थोड्या वेळापूर्वीचे संभाषण व्यवस्थित रेकॉर्ड झाले आहे ना याची खात्री केली, आणि मग तो मागे वळला.....

तो नोकर दुसरातिसरा कोणी नसून मक्याच होता.

भारी आहे pilot आणि पोस्टस् Happy

>>आफ्रिकेतील दुष्काळाबद्दल प्रश्न आला तर करायच्या चिंताग्रस्त चेहर्‍याने
Lol

मक्याने तिघींना त्याच्या क्लिप ची झलक पाठवली . जे मला हवे ते दिले नाही तर हे सर्व पेप्रात छापले जाण्याची धमकी पण दिली. त्याला नक्की हवे तरी काय हे जरी कळले नसले तरी तिघीजणी आता चांगलेच हादरल्या. तरी पण मामला सोडवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा लोणावळ्याला भेटायचे ठरवले.
एकापाठोपाठ एक तिघी सुंदर्‍या पुन्हा लोणावळ्याच्या बंगल्यावर दाखल झाल्या.
सिरियस मूड असला तरी नेहमीची पिलो फाइट , पिया पिया ओ पिया वर टॉवेल नृत्य वगैरे रिचुअल्स झाल्यानंतर मगच त्यांनी विचार करायला घेतला.
प्रियाने सगळ्यांना पर्समधून एक लहानशी बाटली काढून दाखवली. ती त्या दोघींच्या जरा एक पाऊल पुढे होती.
त्या चित्कारल्याच " हे काय आहे प्रिया!! आणि त्याचा त्या माणसाशी काय संबंध"
प्रिया ने उत्तर दिले " गर्ल्स! इट्स टू मच. आता हा किस्सा आपल्याला कायमचा खतम करायलाच हवा ! हे एक जालिम विष आहे.कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस. आपण आता इथे त्या माणसाला म्हणजेच ब्लॅकमेलर ला बोलावून त्याचा कायमचा काटा काढणार आहोत " तिने मेसेज करून ब्लॅकमेलर ला म्हणजे मक्या ला इथला पत्ता दिलाही होता! " तुला पाहिजे तेच होईल. आज रात्री!!" असा सूचक इशाराही दिला होता.
"काय ! खून करायचा !! ओ ओ मग' वर्ल्ड पीस' च्या आपल्या मिशन चे काय? " डायना उद्गारली.
"अग ए डम्बो. गप ना. आपणच बरबाद झालो तर वर्ल्ड पीस काय चाटायचाय?! "
शेवटी या प्लॅन वर त्यांचे एकमत झाले.

९ वाजून गेले तरी अजून मक्या आला कसा नाही म्हणून तिघी बेचैन झाल्या.
इकडे मक्याने येता येता एक डीटूर घेतला होता. नेहमीच्या कबिल्यावर त्याला त्याचा नेहमीचा "फिक्स" हवा होता.
कबिलेवाल्याला गुलाबी नोट देऊन त्याने आत जाऊ न टोपली उघडली जिभ बाहेर काढून झाकण उघडून पुढे केली. त्यासरशी आतल्या विषारी सापाने जिभेवर डंख मारला. एक मिनिट मक्या तसाच बसून राहिला. मग एका वेगळ्याच आनंदात गुणगुणत बाहेर आला. तिकडे टोपलीतला साप तडफडून मरून पडला होता हे कुणाला कळलेच नाही असे त्याला वाटले..
सरदाराने त्याला टोकले " साब , अगली बार पैसा डबल करना पडेगा नही तो कोई और कबिला ढूंढ लिजिएगा! आज कल धंदा कुछ ठीक नही है उपर से पुलिस का डर. आउर आप को तो मामुली चीज से किक नही मिलता. हर बार पहलेसे जालीम चीजे लाना बहुत मुष्किल हो गया है"
मक्या त्याला अजून एक नोट देऊन बाहेर पडला. अजून १० च मिनिटात तो तिन्ही सुंदर्‍यांच्या समोर असणार होता.
त्या तिकडे काय चीज घेऊन त्याची वाट पहात होत्या ते त्याला कळलं असतं तर तो खदाखदा हसला असता!

तिकडे या तिघींनी रस्त्यावर केलेल्या कारनाम्याचा मिस युनिव्हर्स व इतर ऑर्गनायझेशन करणार्‍या कंपन्यांमधे सुगावा लागला. तेथील मार्केटिंग वाले भडकले. सगळी गुंतवणूक फुकट जाते की काय अशी भीती वाटू लागली. तेव्हा सर्वांची एकत्रित मीटिंग झाली. आफ्रिकेतील कुपोषणापासून ते मध्यपूर्वेतील टेररिझम पर्यंत सगळे प्रश्न कसे प्रेमाने जग सोडवणार आता असे सर्वांनी डोळे मिचकावत एकमेकांना सांगितले. अनेक सौंदर्य साबण, दागिने वगैरे एकवेळ नाही विकले गेले तरी चालतील पण जागतिक समस्या सोडवण्याकरता तरी यातून यांना सोडवले पाहिजे असे ठरले. पण त्याआधी "या तिघींना एकदा कानभर दिले पाहिजे, की त्यांच्या खाण्यामधे शिस्तबद्धता आली पाहिजे" असे त्यांच्या कंपन्यांमधल्या जाहिरातींच्या स्लोगन्स चे मराठीत भाषांतर करण्यार्‍या टीमच्या लीड ने सांगितले. या तिघी मैत्रिणी असल्याने त्यांचा एजण्ट/मॅनेजरही एकच होता. त्याला बोलावून यातील धोका समजावण्यात आला व या तिघींना वठणीवर आणायला सांगितले.

मग त्या एजण्टने आपल्या ऑफिसमधे तिघींना बोलावून घेतले व समोर उभे केले. तिकडे वरच्या मजल्यावर त्याचा सहाय्यक तिघींची रद्द केलेली कॉण्ट्रॅक्ट्स समोर नाचवत उभा केला धमकी करता. इकडे समोर एजण्ट स्वतःचा तोंडपट्टा चालवत येरझारा घालत विचारू लागला, त्या रात्रीच्या सीन बद्द्लः
एजण्टः "किती लोक होते?"
प्रिया: "दोन, सर"
एजण्टः: "हम्म्म. दोन". मग गर्रकन मागे वळून... "मूर्ख मुलींनो!!! ते दोघे होते, आणि तुम्ही तिघी! तरीही परत आलात! लग्न करून आलात! काय समजत आलात? इथे तुमचे केळवण असेल? ......"

यापुढचा सीन तर लीक झाल्याने सर्वांनाच माहीत आहे.

इथे तुमचे केळवण असेल? >>> Lol
लय लवकर मक्याचा पत्ता कट केलात राव, मला वाटलं थोडा रोमांच असेल थोडा रोमांस असेल . Proud

अरे "२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा." ह्याकडे पण लक्ष ठेवा रे.

किती स्कोप आहे खरंतर . एखादी आधी मक्याच्या प्रेमात पडते. मक्याला ती आवडत नसून दुसरीच एक आवडत असते. मक्याला दुसरी आवडते कळल्यावर तिसरीला मक्या आवडतो.

त्यातली ए खादी मक्याची बचपन में बिछडी बहन असते. अजून एकटीचं ती ५-६ वर्षांची असताना लग्न झालेलं असतं.

अगदीच मॉडर्न दाखवायचं असेल तर कुठल्यातरी दोघी एकमेकींच्याच प्रेमात असतात

त्यातली ए खादी मक्याची बचपन में बिछडी बहन असते. अजून एकटीचं ती ५-६ वर्षांची असताना लग्न झालेलं असतं. >>> अर्रर्रर्र , प्लीज प्लीज तो अँगल आणु नका.
मक्याची , ' किस किस को प्यार करूं ' लव स्टोरी फुलु द्या . Proud

आपल्या एजन्टने शोले सारखा सीन रचून आपला एव्हढा अपमान केला हे त्या तिघींनां फारच बोचले होते. मक्या बरोबरच ह्या एजन्टलाही चांगला धडा शिकवायचं तिघींनीं आपांपसांत नक्की केलं.
पुढच्या आठवड्यात पुढची लोणावळा ट्रिप ठरवली आणि ह्यावेळी एजन्ट आणि मक्या दोघांनांही आमंत्रणं धाडली.
बंगल्यावर जायची वेळ होत आली तशी मक्याला साक्षात्कार झाला की आपल्या जवळ नोटा शिल्लक नाहीत. फिक्स मिळणार्‍या सरदार कडे अक्षरशः गयावया करून त्याने त्यादिवशी ची सोय केली. सरदार ही मोगॅम्बो सारखे बोटातल्या अंगठ्या बडवत आता हा मक्या उधारीमुळे आपल्या आधीन होणार आणि आपण त्याला हवं तसं ब्लॅकमेल करू ह्या विचाराने "सरदार खुश हुआ" असं उद्गारला.
नेहेमीइतकी कडक नसली तरी तात्पुरती वेळ मारून नेण्याएव्हढी किक मिळाल्याने मक्या आपल्याच तोर्‍यात लोणावळ्याच्या बंगल्यात आपल्या सर्वधर्मसमभाव अर्धांगिनींनां भेटायला मोठ्या तोर्‍यात निघाला.

किसको प्यार करू कैसे प्यार करू
प्रिया भी है, सना भी है, डायना भी है हाय हाय

पण ह्या तोर्‍यात त्याला कळतच नव्हतं की सरदार चा एक माणूस त्याच्या मागावर होता.

इकडे ह्या तिघींनीं आपल्या एजन्ट लाही बंगल्यावर साधारण मक्या यायच्या वेळेलाच बोलावलं होतं. काट्याने काटा निघेल असा साधा सोपा विचार होता त्यांचा.

ठरल्या वेळी आधी तिघी पोचल्या आणि त्यांच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे त्यांनीं एका पार्टीची तयारी चालू केली. अतिशय एलिगन्ट पण सेक्सी असा पेहेराव आणि मेक-अप करून तिघी तयार झाल्या. त्यांनीं आधीच सूचना देऊन ठेवल्याप्रमाणे नोकराने सर्व प्रकारच्या रंगीत पाण्याची आणि बरोबर खाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. तंदूरी चिकन, फिश फ्राय, खारवलेले नट्स, तिघींकरता स्पेशल म्हणून हेल्दी व्हेज्जीज् आणि योगर्ट डिप आणि हमस, मटण बिर्याणी, तिघींकरता सॅलॅड्स , गज्जर का हलवा आणि ह्या तिघींचा लाडका डेअरी फ्री डाएट चॉकोलेट केक.

सगळ्यात आधी एजन्ट आला. पार्टीची तयारी बघून तो थोड्या वेळाकरता काँट्रॅक्ट्स, पी आर, पैसे वगैरे सर्व विसरून सगळ्या चविष्ट पदार्थांचा आणि उत्तमोत्तम दारूचा अस्वाद घेण्यात मग्न झाला. लगेच मागाहून मक्या आला. येता क्षणीच ह्या तिघींनां बघून बाकी सगळं विसरला. थोडी खान-पान सेवा झाल्यावर बॅकग्राउन्ड ला सुरू झालेल्या गाण्यांवर बॉलीवूडी डान्स सुरू झाला.

कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
चिकनी चमेली छुपके अकेली पौव्वा चढाके आयी

हा सगळा धांगडधिंगा चालू असताना मध्येच त्यांच्या एजन्ट ला आठवण झाली, की इकडे आपण ह्या तिघींनां वठणीवर आणण्यासाठी आलो आहोत. त्याने एकदम स्वतःचा नाच थांबवत तिघींकडे हिंदी सिरीयल्स प्रमाणे तीनदा बघत म्युझिक सिस्टीम कडे एकेक पाऊल जोरात टाकत चालायला लागला.

ये ब्बात सशल ! खाण्याचा मेनू , मेकप चे वर्णन आणि पात्रांनी तीन तीन्दा रिएक्शन देणे !! याला म्हणतात एन्टरटेनमेन्ट Lol

मला अरेबियन नाइट्स ची आठवण झाली ज्यात नवाबांच्या आणि अमीर उमरावांच्या मेजवान्यांचे वर्णन पानेच्या पाने भरून असायचे . वारुणीचे चषक आणि सोन्या चांदीचे थाळे वगैरे

Pages