डॉ.नरेन्द्र दाभोळकरांची निर्घृण हत्या

Submitted by pkarandikar50 on 21 August, 2013 - 04:12

डॉ.नरेन्द्र दाभोळलरांची निर्घृण हत्या
रक्षाबंधनाचा दिवस उजाडला तोच एका अतिशय दु:ख्खद आणि धक्कादायक बातमीने. [ विचित्र योगायोग म्हणजे हाच दिवस राष्ट्रीय स्तरावर 'सदभावना-दिन म्हणूनही पाळला जातो!] डॉ. दाभोळकरांसारख्या एका सत्प्रवृत्त आणि तळमळीच्या समाजधुरीणाची हत्या करून कुणाला काय मिळालं असेल हा विषण्ण करणारा प्रश्न मनात आला. या हत्येचा थेट संबंध अंधश्रद्धा निर्मूलन समिती [अंनिस] च्या कार्याशी जोडला जाणं जितकं स्वाभाविक तितकंच खेदजनक होतं. ब्रिटीशांच्या राजवटीतही सतीबंदी, बालविवाहबंदी असे काही समाज सुधारक कायदे झाले. त्याला सनातनी वर्गाकडून विरोध नक्कीच झाला, नव्हे ते अपेक्षितच होतं परंतु त्या विरोधाचं पर्यवसान हिंसाचारात किंवा कोण्या समाज सुधरकांच्या हत्येत झालं नव्हतं. मग जादूटोणा इ. भंपक, आणि अन्यायमूलक भोंदू कृतींच्या विरोधी कायद्याला होणार्‍या विरोधाने असं क्रूर वळण का घेतलं असाही प्रश्न उभा राहतो.

मला वाटतं की ब्रिटीश सरकारच्या 'कायदा आणि सुव्यवस्था' यंत्रणेचा लक्षणीय दरारा होता हे एक कारण असू शकेल. स्वातंत्र्यानंतरच्या काळांत आपल्या सरकारच्या पोलिस यंत्रणेचं रुपांतर कायद्याच्या कडक अंमलबजावणीपेक्षाही सत्ताधार्‍यांच्या तालावर नाचणार्‍या आणि त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात धन्यता मानणार्‍या एका बोटचेप्या आणि भ्रष्ट यंत्रणेत झालं आहे आणि या यंत्रणेचा गुन्हेगारांना धाक वाटेनासा झाला आहे हे स्पष्ट आहे.

वरून लोकशाही आणि आतून निवडणूकशाही अशी आपल्या राज्यव्यवस्थेची अधोगती होत आली आहे.
आजकालच्या सत्ताधार्‍यांना सामाजिक विकास आणि समतोल आर्थिक विकास किंवा विवेकवादी मूल्य व्यवस्था यांच्याशी काही देणं-घेणं उरलेलं नाही. वैयक्तिक आणि राजकिय हितसंबंध जपणं आणि सदैव मतपेटीवर डोळा ठेवून आपली खुर्ची सांभाळणं यातच ते गुंतले आहेत. आपली उद्दिष्टं साध्य करण्याकरिता शासकीय यंत्रणेचा कुशलपणे भला-बुरा वापर करणं हाच राजकारणाचा स्थायीभाव होऊन बसला आहे. येता-जाता शाहू- फुले- आंबेडकरांच्या नावाने जपमाळा ओढणारे आणि महाराष्ट्राच्या कथित पुरोगामी परंपरेचे मानभावी गोडवे गाणारे हे राजकीय पक्षनेते आतून मात्र बुरसटलेल्या, जातीयवादी आणि अंधश्रद्ध विचारांचे खंदे पुरस्कर्ते आहेत. अन्यथा, डॉ. दाभोळकरांनी ज्या कायद्याचा हिरिरीने प्रचार आणि पुरस्कार केला ते बिल गेली १४ वर्षे लोंबकळत राहिलं नसतं.

एक पुरोगामी राज्य अशी आम्ही आमची कितीही पाठ थोपटून घेतली तरी महाराष्ट्रात जातीयवादी आणि फॅसिस्ट प्रवृत्तींचा जोर वाढतच गेल्याचं वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. अर्थकारण आणि समाजकारण यांवर राजकारणाने सतत कुरघोडी केल्याचं चित्र दिसतं. कुठल्याच लोकशाही-वादी मूल्यांचा विधिनिषेध न बाळगता, आक्रमकपणे भावना प्रक्षुब्ध करणारं आततायी राजकारण ह़ळू हळू यशस्वी होत गेलं. 'ठोकशाही'. 'राडा-संस्कृती' किंवा 'टगेगिरी' असं या राजकारणाचं नुसतं वर्णनच नव्हे तर समर्थनही केलं जाऊ लागलं. तोच युगधर्म ठरत गेला आणि तो स्वीकारण्यात एकही पक्ष मागे राहिला नाही. [जे भाबडेपणाने साधन-शुचितेचे आणि विवेकवादाचे गोडवे गात राहिले ते नामशेष झाले!] ही भारतीय लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

या प्रकारच्या विधीनिषेधशून्य राजकारणाने आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर आपली पीछेहाट होते आहे. 'कायदा आणि सुव्यवस्था' यांचा बळी या सर्पयज्ञांत सर्वप्रथम जावा याचं आश्चर्य करण्याचे किंवा खेद वाटून घेण्याचे दिवस केंव्हाच निघून गेलेत.

'ज्या प्रवृत्तींनी महत्मा गांधींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी डॉ. दाभोळकरांनाही संपवले' असं विधान करून आपले मुख्यमंत्री मोकळे झाले. वर वर पहाता हे विधान फॅसिस्ट प्रवृत्तींच्या विरोधात आहे असं दिसलं तरी या दोन हत्या एकाच मापानं मोजण्यात एक मोठी गल्लत होते आहे असं मला वाटतं. भारताच्या फाळणीच्या स्फोटक आणि विदारक घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींची हत्या घडली. मारेकर्‍याने पळ काढण्याचा कोणताही प्रयत्न न करता स्वतःला तत्परतेनं पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबूलीही त्याने दिली होती. कोणत्याच युक्तिवादाने त्या हत्येचं यत्किंचितही समर्थन होऊ शकत नसलं तरी अशी कोणतीच पार्श्वभूमी डॉ. दाभोळकरांच्या हत्येला नाही हेही लक्षात घ्यावं लागेल. स्वातंत्र्यानंतरच्या ६६ वर्षांच्या वाटचालीनंतरही आपण फॅसिस्ट प्रवृत्तींवर अंकुश आणू शकलेलो नाही या अपयशाची अप्रत्यक्ष कबूलीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दिवसाढवळ्या, हमरस्त्यावर खून करून पसार होण्याएव्हढं धाडस मारेकरी दाखवू शकतात हे कशाचं लक्षण म्हणायचं? अंधश्रद्ध आणि मूलतत्ववादी प्रवृत्ती या कृत्यामागे दडलेल्या आहेत असं सामान्यतः मानलं जातं. या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे येणार नसलं तरी सत्तांध राजकारणामुळेच अशा समाज-विघातक प्रवृत्ती पोसल्या जात आहेत हे नाकारून चालणार नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना पकडून फासावर लटकावण्याने मूलभूत प्रश्न सुटणार आहे का? याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची ही वेळ आहे.

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वरून लोकशाही आणि आतून निवडणूकशाही अशी आपल्या राज्यव्यवस्थेची अधोगती होत आली आहे.>> मलाही वाटतं कीं सध्यां बोकाळलेल्या असहिष्णूतेंच मूळ इथंच दडलेलं असावं. गेले दोन दिवस ज्या अनेक अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती ऐकायला मिळाल्या, त्यांत कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक तयार करण्यावर डॉक्टरांचा खूपच भर असे हें स्पष्ट झालं. कार्यकर्त्याना चर्चेत, सभांमधें सहभागी व्हायला लावून स्वतःच्या भूमिकेबद्दल वैचारिक ठामपणा आणण्याला डॉक्टर प्राधान्य देत. या उलट, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याना फक्त निवडणूकीच्या डावपेंचांचच बाळकडू पाजलं जातं आणि अशा कार्यकर्त्यांच्या फळीतून वर येणार्‍या नेतृत्वासाठी एकच निकष लावला जातो असं तीव्रतेने जाणवतं व तो म्हणजे - निवडणूक जिंकण्याची कुवत , ती पैशांच्या, जातीच्या , दादागिरीच्या कशाच्याही आधारावर असो ! असे कार्यकर्ते व नेते वैचारिक पातळीवर स्पर्धा करायला कुचकामीच ठरणं व त्यानी अशा वेळीं हिंसेचा आधार घेणं, हें क्रमप्राप्तच होत असावं.

हत्या करुन विचार सम्पवता येत नाही हे आजही समजले नाही हेच साम्य महत्वाचे आहे. हत्या झाली असली तरी कार्य जिवन्त आहे, आणि त्यान्चे कार्य अनेक भावी दाभोलकर तयार करतील...

माझ्यासाठी हत्या होणे चिन्ताजनक आहेच पण आज ४ वर्षा नन्तरही तपास हा अतिशय मन्द आहे... हे पण तेव्हढेच चिन्ताजनक आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर ४८ तासात सम्पुर्ण हत्येचा छडा लावणे शक्य आहे...

सत्तरीच्या दशकात डॉक्टर होणे हि छोटी अचिव्हमेंट नव्हती. इतकी वर्षे प्रॅक्टीस करून डॉक्टरकीच्या व्यवसायातून गडगंज पैसा मिळत असताना त्याचा त्याग करून डॉक्टरांनी समाजसेवेचं व्रत घेतलं ते अंधश्रद्धेपोटी खेडेगावातल्या काही रुग्णांचा बळी गेलेला पाहून. त्यांच्यातला "माणूस" अस्वस्थ झाला. हजारो वर्षापूर्वी राजवाड्यात सुखाने राहणाऱ्या सिद्धार्थ राजकुमाराची राज्यातली गरीब व भुकेली जनता पाहून जशी हालत झाली होती तेच डॉक्टरांनी अनुभवले. म्हणून ते आजच्या काळातले भगवान बुद्धच म्हणावे लागतील. इतर डॉक्टरांप्रमाणे स्वत:च्या अलिशान कार मधून फिरायची कुवत असलेल्या ह्या लोकोत्तर महापुरुषाने आयुष्यातला शेवटचा प्रवास सुद्धा एसटीने केला होता.

नरेंद्रसर आमच्या सातारचेच ,अनेकदा त्यांच्याशी संवाद साधायला मिळाला.त्यांनी एकदा मला प्रश्न विचारला होता त्याला मी उत्तर दिल्यावर 'खूप छान' अशी पोचपावती दिली.

हिंदु धर्मातील देवदासी ह्या अमानुष प्रथेविरूध्द त्यांनी जे प्रबोधनाचे क्रुतिशील कार्यक्रम राबवले ते अतुलनिय होते. दाभोळकरांसारखा विवेकी, नम्र समाजसुधारक महाराष्ट्राला पचला नाही. जर येथे पेरियारांसारखे आक्रमक समाजसुधारक नेत्रुत्व असते तर काय घडले असते.

गांधीजी व दाभोलकर यांच्या खुनातील साम्य . दोन्ही खून फॅसिस्ट प्रवृत्तीनी केले व दोन्ही खुन विचारांचा मुकाबला विचारांनी न करता आल्याने केले.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना पकडून फासावर लटकावण्याने मूलभूत प्रश्न सुटणार आहे का?>>> प्रश्न सुटणार नाही पण या प्रवृत्तींना काहीतरी पायबंद लागेल. अन्यथा हे मोकाट सुटतील.

{{{ गांधीजी व दाभोलकर यांच्या खुनातील साम्य . दोन्ही खून फॅसिस्ट प्रवृत्तीनी केले व दोन्ही खुन विचारांचा मुकाबला विचारांनी न करता आल्याने केले.
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 21 August, 2017 - 19:08 }}}

हे इतके खात्रीशीर विधान आहे का? माझ्या माहितीनुसार तर हा खून प्रॉपर्टीकरिता झालेला आहे. ग. प्र. प्रधान यांनी त्यांची प्रॉपर्टी साधना ट्रस्टच्या नावे केली. दाभोलकर साधनाचे संपादक झाले आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी अंनिसची झाली असा सगळा गोंधळ आहे. अंनिसच्या हिशेबातही काही तफावत आहे. तेव्हा खूनी कोणीतरी वैचारिक मतभेद असणारी व्यक्ती आहे असे लेबल लावून त्या खुन्याला ग्लोरिफाय करण्यात अर्थ नाही. पैशाकरता खून करणारी ती एक क्षुद्र व्यक्तिदेखील असण्याची शक्यता आहे.

माझ्या माहितीनुसार तर हा खून प्रॉपर्टीकरिता झालेला आहे.

...
अरे वा ! मग तुम्ही पोलिसाना तशी माहिती देवून खुनी पकड्ऊन का देत नाही ?

हे इतके खात्रीशीर विधान आहे का? माझ्या माहितीनुसार तर हा खून प्रॉपर्टीकरिता झालेला आहे

>>> रेब्ब्बाब्बा! "तुमच्या माहितीनुसार".... कोण तुम्ही?

बिकांनी दिलेली माहिती २१.८.२०१७ सनातन मधुनच प्रसिद्ध झालेली आहे.
पूर्वी एक गामा पैलवान होते ते देखिल सनातन च्या बातम्यांवर आधारीत पोस्टी ठोकुन द्यायचे!

माझ्या माहितीनुसार तर हा खून प्रॉपर्टीकरिता झालेला आहे.>>> आपली माहिती बहुधा सनातन वगैरे मंड्ळींच्या आधारे दिसतीय. पोलिस आपल्या तपासात या गोष्टी पहातात. उदा. स्त्री प्रॉपटी पूर्ववैमनस्य अशा गोष्टी. त्यात काही आढळले नाहीये.

माझ्या माहितीनुसार तर हा खून प्रॉपर्टीकरिता झालेला आहे.>>> आपली माहिती बहुधा सनातन वगैरे मंड्ळींच्या आधारे दिसतीय

--

गांधीजी व दाभोलकर यांच्या खुनातील साम्य . दोन्ही खून फॅसिस्ट प्रवृत्तीनी केले व दोन्ही खुन विचारांचा मुकाबला विचारांनी न करता आल्याने केले.

@प्रकाश घाटपांडे
बिकांचा माहिती सोर्स हा सनातन वगैरे मंड्ळीं आहेत तर मग वरिल विधान तुम्ही छातीठोकपणे करताय, त्या माहितीचा सोर्स काय आहे ?

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्यांत साम्य असल्याचं पोलिस तपासात समोर आलंय. तसंच या प्रकरणी ज्यांना ताब्यात घेतलं गेलंय ते संशयित विशिष्ट संस्थेशी संबंधित आहेत. या संस्थेच्या संकेतस्थळावर दाभोलकर हत्येनंतर त्यांच्या छायाचित्रावर फुली मारल्याचं दाखवलं गेलं होतं.

>> दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी हत्यांत साम्य असल्याचं पोलिस तपासात समोर आलंय.
याशिवाय सनातन कडून दाभोळकरांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या पण आलेल्या होत्या. सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ आहेत. पण तरीही पुरावे दाखवा म्हणून वाकुल्या दाखवणाऱ्यांचे काही विशेष वाटत नाही. कारण खुनाचे मुख्य सूत्रधार राहून खून करणाऱ्याला "यशस्वी व्हा" म्हणून आशीर्वाद देऊन नंतर "पुराव्याअभावी निर्दोष" सुटून नंतर समाजात उजळ माथ्याने फिरण्याची यांची परंपरा जुनीच आहे.

त्या माहितीचा सोर्स काय आहे ?>> मी दाभोलकरांसोबत काही वर्षे काम केल आहे. त्यांना ओळखणारे लोक प्रॉपर्टीसाठी खून झाला आहे असे कधी म्हणणार नाहीत. अहो झोळी घेउन एसटी तून महाराष्ट्र फिरणारा तो माणूस होता. साधी रहाणी व उच्च विचारश्रेणी प्रकारातील तो मनुष्य होता.

कुणाचा खून ५५ कोटींसाठी , कुणाचा प्रॉपर्टीसाठी ... पोलिस , कोर्ट यांचे निकाल यायच्या आधी यांची उत्तरे तयार असतात

प्रत्येकाने आपापल्या धाग्याजवळ बसूनच रहायचे असते का? चित्रप्रदर्शनातील चित्रकाराप्रमाणे?

सनातन वगैरे मंड्ळींच्या आधारे दिसतीय
<<

दिसतीय नव्हे, आहेच.

सनातनवालेच आरोपी आहेत. ते असल्या बातम्या पसरवणारच.

>>
याशिवाय सनातन कडून दाभोळकरांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या पण आलेल्या होत्या. सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ आहेत. पण तरीही पुरावे दाखवा म्हणून वाकुल्या दाखवणाऱ्यांचे काही विशेष वाटत नाही. कारण खुनाचे मुख्य सूत्रधार राहून खून करणाऱ्याला "यशस्वी व्हा" म्हणून आशीर्वाद देऊन नंतर "पुराव्याअभावी निर्दोष" सुटून नंतर समाजात उजळ माथ्याने फिरण्याची यांची परंपरा जुनीच आहे.
Submitted by इनामदार on 22 August, 2017 - 12:12
<<
हा प्रतिसाद अगदीच चपखल आहे. ↑

बाबू:
कुणाचा खून ५५ कोटींसाठी , कुणाचा प्रॉपर्टीसाठी ... पोलिस , कोर्ट यांचे निकाल यायच्या आधी यांची उत्तरे तयार असतात
>>

आ.रा.रा.
दिसतीय नव्हे, आहेच.
सनातनवालेच आरोपी आहेत. ते असल्या बातम्या पसरवणारच.
>>

हे वरचे दोन प्रतिसाद परस्परविरोधी नाहीत का?

संशयाची सुई, लोकांना वाटणारे संशयित जरी दाभोलकरांच्या कार्याला विरोध करणार्‍या संस्था असल्या तरी 'त्या संस्था गुन्हेगार आहेत' हे ठामपणे म्हणणे आणि दाभोलकरांचा खून मालमत्तेच्या वादातून झाला वगैरे मुद्दामून दिशाभूल करणार्‍या वावड्या पसरवणे यात फरक तो काय राहिला?

त्यानीही सनातनवाले आरोपी आहेत असेच म्हटले आहे ना ?
आरोपी म्हणजे ज्याच्यावर आरोप् झालेत असा संशयित
>>>
ओके, चूक झाली. आ.रा.रा. प्रतिसादाबद्दल काही आक्षेप नाही.

<<अहो झोळी घेउन एसटी तून महाराष्ट्र फिरणारा तो माणूस होता. साधी रहाणी व उच्च विचारश्रेणी प्रकारातील तो मनुष्य होता.>>
---- सहमत...

खून कशासाठी झालाय याबद्दलही वाद? कोणी केला याबद्दलही वाद? अरे चाल्लय काय या प्रतिगामी महाराष्ट्रात.

खून कशासाठी झालाय याबद्दलही वाद? कोणी केला याबद्दलही वाद?
>>>>
घाटपांडे, तुमचा प्रश्न कळला नाही. खून कोणी केला व कशासाठी केला हे तुमच्या मनात तुमच्यापुरते सिद्ध झाले असेल तर मग पोलिस, न्यायालय यांची गरजच नाही का? मला स्वतःला कितीही वाटत असले की खून अमूक एका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे वा ज्यांवर आरोप ठेवलाय त्या सनातनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे तरी ते सिद्ध होइपर्यंत विषय 'वादग्रस्त'च राहणार ना?
जेव्हा बॉम्बस्फोट होतात व सामान्य माणसे लगेच पाकिस्तान/मुसलमानांना दोषी ठरवून 'निकाल' देऊन टाकतात तसेच झाले की हे पण.

तिकडे दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही विवेकवाद्यांना पार दुढ्ढाचार्य केले आणि इथे एकदम 'हम करे सो कायदा'?

Pages