अळू खिचडी

Submitted by राहुल बावणकुळे on 18 August, 2017 - 12:35

लागणारा वेळ:
३० मिनिट

साहित्य:
५-६ बा. चि. अळूची पाने व देठ
१/२ वाटी स्व. धु. मुगाची डाळ
१/२ वाटी स्व. धु. तांदूळ
५-६ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या
१ मध्यम आकाराचा बा. चि. कांदा
१ मध्यम आकाराचा बा. चि. टोमॅटो
७-८ कढी पत्ता पान
मूठ भर बा. चि. कोथिंबीर
१/२ चमचा जिरे पूड
१ चमचा धणे पूड
२ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
चवीप्रमाणे मीठ
२ चमचे साजूक तूप
३ वाट्या पाणी
फोडणीचे साहित्य: ३ मोठे चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग

कृती:
१. मध्यम आकाराच्या कुकर मध्ये ३ मोठे चमचे तेल घेऊन ते तापल्यावर त्यात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या सोनेरी रंग येईस्तोवर परतून घ्या, आता त्यात नेहमीप्रमाणे मोहरी, जिरे व हिंगाची फोडणी करा
२. फोडणी झाल्यावर कांदा, कढी पत्ता व कोथिंबीर घालून, कांदा गुलाबी होईपर्यंत परता
३. ह्यानंतर १/२ चमचा जिरे पूड, १ चमचा धणे पूड, २ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घाला
४. आता लगेच टोमॅटो व अळू घाला आणि टोमॅटो ला तेल सुटेपर्यंत २-३ मिनिट नीट परतून घ्या
५. टोमॅटोला तेल सुटल्यावर ३ वाट्या पाणी घालून एकदा ढवळून घ्या. आता त्यात मुगाची डाळ व तांदूळ घालून पुन्हा चांगले ढवळून घ्या
६. ह्यानंतर कुकरला झाकण लावून ४ शिट्या काढा
७. शिट्या काढून कुकर जरा थंड होईपर्यंत १० मिनिट थांबा. आता झाकण उघडून ३-४ वेळा चांगले ढवळून २ चमचे साजूक तूप घाला आणि वाढायला घ्या

प्रमाण:
२-३ जण

टीप:
१. स्व. धु.: स्वच्छ धुतलेले/ली; बा. चि.: बारीक चिरलेला/ली
२. शक्यतोवर ३ ते ५ लीटरचा मध्यम आकाराचा कुकर घ्या
३. मुगा ऐवजी तूर डाळ सुद्धा घेऊ शकता, मात्र पाण्याचे प्रमाण जरा वाढवावे लागेल
४. तेल व लाल तिखटाचे प्रमाण जरा जास्त असले तरी, ही खिचडी चमचमीत छान वाटते. शिवाय सोबतीला काहीही नसले तरी चालते
५. कोथिंबीर फोडणीत घातल्याने तिचा रंग टिकून राहतो
६. लसूण ठेचण्याऐवजी बा. चि. ही घालू शकता
७. वन डिश मील ला चांगला पर्याय आहे
८. नेहमीची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल; बॅचलर किंवा घरी एकटे असल्यास झटपट होणारी ही चविष्ठ खिचडी नक्कीच आवडेल
९. ही खिचडी पातळच चांगली वाटते

माहितीचा स्त्रोत:
मीच. खरतर अळूची पातळ भाजी व वाफाळलेला भात करावा असा बेत ठरवला होता. पण ऐन वेळी खिचडीची कल्पना सुचली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users