शॉर्ट टर्म मेमरी लॉस - कम - धांदरटपणा - कम - वेंधळेपणा - प्लस तंद्रीवर उपाय काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2017 - 18:49

मोबाईलची बॅटरी शून्य होते. मी तो चार्जरला जोडतो. तासा दोन तासाने फोनची आठवण होते. पाहतो तर मोबाईल अजूनही झोपलेलाच. काय तर चार्जर नुसताच लावलेला असतो. बटण चालूच केले नसते. त्यासोबत बटणही चालू करावे लागते हा बालिश कॉमनसेन्स माझ्याकडे असूनही मी दहा पैकी तब्बल सहा वेळा हे विसरतोच.

अगदी घाईघाईत ऑफिसला निघालो असतो. लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरला असते. आम्ही टॉप फ्लोअरला राहतो. बटण दाबल्यावर लिफ्ट वेगाने वर येऊ लागते. पण मी एका हाताने शूज घालत, दुसर्‍या हाताने शर्टाची ईन करत, नाकाने कसाबसा पुन्हा पुन्हा बटण दाबत राहतो. खरे तर दहा वेळा बटण दाबल्याने लिफ्टचा वर येण्याचा वेग वाढवणार नसतो. पण तरीही ते एक असते ना, मनाचे समाधान. ते मिळवत असतो. मग लिफ्ट येताच घाईघाईत आत शिरतो. आता मात्र जरा विसावतो. कारण मी कितीही घाई केली तरी लिफ्ट आपल्याच वेगाने खाली जाणार याची अक्कल आता मला आली असते. खिश्यातून मोबाईल काढून सवयीनेच टाईम चेक करतो, ट्रेनला अजून किती वेळ आहे आणि त्या वेळेत पोहोचायला किती पावले प्रति मिनिटे टाकायला हवीत याचा मनोमन हिशोब मांडला जातो. बस्स आता लिफ्टचा दरवाजा उघडताच सुसाट पळत सुटायचे या निष्कर्शापर्यंत येतो. ईतक्यात लिफ्टची घरघर थांबते. मी दरवाजा उघडायची वाट बघतो. पण तो काही उघडत नाही. मी वैतागतच ईंडिकेटरवर नजर टाकतो. लिफ्ट अजूनही टॉप फ्लोअरलाच थांबली असते. मी ग्राऊंडफ्लोअरचे बटण दाबलेच नसते. डोक्यावरचा पंखा तेवढा माझी बटण दाबायची वाट बघून थंडावला असतो. हे देखील चांगलेच म्हणा, कारण त्याची घरघर थांबल्यानेच मी भानावर आलो असतो. अन्यथा संध्याकाळपर्यंत लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरला पोहोचायची वाट बघत तसाच उभा राहिलो असतो. आतिशयोक्ती वाटेल, पण माझ्या बाबतीत काहीही शक्य आहे.

पण धांदरटपणा ईथेच संपत नाही. आता चालत स्टेशनला गेलो तर ट्रेन चुकेल म्हणून मी घाईघाईत टॅक्सी पकडतो. किती भाडे होणार याची कल्पना असते. मी पाकिटातून पैसे काढून सिग्नललाच त्याच्या हातात कोंबतो आणि टॅक्सी स्टेशनला पोहोचताच टुनकण उडी मारून फलाटाच्या दिशेने धाव घेतो. ट्रेन अजून आली की गेली काही कल्पना येत नाही. ईंडिकेटर ब्लॅंक झाले असते. वेळ काय झाली हे चेक करायला मी खिश्यातून मोबाईल काढायला जातो. पण हातात काहीच येत नाही. मोबाईल गेला की काय? त्या टॅक्सीतच? मी मागे वळून पाहतो, टॅक्सी केव्हाच नजरेआड झाली असते. मोबाईल हरवल्याच्या धक्क्याने छातीतून कळ जाते. हार्ट अ‍ॅटेक असाच असतो का? भितीने मी छातीवर हात ठेवतो. आणि अचानक जीव भांड्यात पडतो. कारण टॅक्सीतून उतरताना पटकन मी हातातला फोन नेहमीसारखे खालच्या खिश्यात न ठेवता वरच्या खिशात ठेवलेला असतो.

पण हे ईथेच संपत नाही. पुढे ट्रेनमध्ये याच मोबाईलच्या नादात मी कित्येकदा माझे स्टेशन आलेले लक्षात न आल्याने पुढच्या स्टेशनला गेलो आहे याची गिणती नाही.

घरी आल्यावर मला खिश्यातला रुमाल बाथरूममध्ये आणि मोबाईल जवळच्याच बेडवर फेकायची सवय आहे. कित्येकदा याच्या उलट करत मी मोबाईल बादलीत आदळला आहे याचे दुख त्या मोबाईललाच ठाऊक.

घरी टीव्ही बघता बघता चहा बिस्कीट खात असताना बिस्कीटाला चिकटवलेला मनुका किंवा काजू खाली पडतो. मी समोरच्या टीव्हीवरून नजर न हटवता अंदाजानेच मनुका समजून खाली पडलेला कचरा उचलतो. तोंडात टाकणार ईतक्यात आई किंचाळते. मी घाबरतो. आणि वेंधळ्यासारखा घाईघाईत तो चहात टाकतो.

ऑफिसमध्ये सुकत घातलेली छत्री परत आणायची मला तेव्हाच आठवण राहते जेव्हा निघताना पाऊस पडत असतो.
शाळेत दरवर्षी जून महिन्यातच मी छत्री हरवायचो आणि उरलेला महिना भिजत भिजतच काढायचो.
माणसाने विसरायचे ठरवले तर तो काहीही विसरू शकतो. छत्री विसरणे खूप कॉमन आहे. माझे शाळेत दप्तर विसरून झालेय. एकदा तर पायातून काढलेली चप्पलच घालायचे विसरलो आणि अनवाणीच घरी परतलोय.
पहिल्या हाकेला मी ओ कधीच देत नाही. सतत कसल्याश्या तंद्रीत असतो. आई जेव्हा रुनम्या न पुकारता बहिर्‍या म्हणून हाक मारते, तेव्हा मात्र पहिल्याच फटक्यात ऐकतो..

एक ना दोन हजार लाखो किस्से, माझ्या रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारे, असे थोडक्यात ईथे लिहून संपणार नाहीत.....
प्रश्न असाय की यावर ऊपाय काय?
हे असेच आयुष्यभर जगावे लागणार का?

वरवर साधीसुधी गंमतीशीर वाटणारी ही समस्या रोजच्या जीवनात कित्येक नवीन समस्या निर्माण करते त्याची गिणती नाही. अगदी रोज ईथे येऊन लिहू शकतो ईतके किस्से आहेत. बरेच भुर्दंडही सोसावे लागले आहेत. प्रतिसादांत शेअर करेनच, पण तोपर्यंत हे सारे टाळता येण्यासाठी, वा अश्या चुकांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील हे सुचवाल का ..

धन्यवाद,
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ भाऊ थायराॅईड चेक करून घ्या. त्यामुळे होतो असा त्रास. आता मी कितीवेळा सांगीतले एकदा कधीतरी स्वजो आणि सईला आणा इथे धाग्यावर. पण विसरता ना.

वरील उपायाने फायदा न झाल्यास तुम्ही शाखा सोडून अमिरला फाॅलो करा. आपला गजनी कट करा. तसेही तुम्ही म्हणता तुमच्या डोक्यावर घनदाट जंगल आहे आहे आणि प्रत्येक वेळी नवीन स्टाईल करता. (पहा तुमचा सिंजि च्या मेन्स फॅशन धाग्यावरील प्रतिसाद )
गजनी कट करून फिरलात तर लोक सहानुभूतीने मदत करतील Lol

पहिल्या हाकेला मी ओ कधीच देत नाही. सतत कसल्याश्या तंद्रीत असतो.
>>>>
ट्रस्ट मी... हा इससू नाही आहे खरच... लॅटरल थिंकिंग वाल्या लोकांचे असे होते. इट्स या गिफ्ट... एकाच वेळी तुम्ही parallel गोष्टी डोक्यात चालू देऊ शकता... अभिनंदन...

खरेखुरे शाहरुख फॅन आहात. तो शाहरुखही असाच प्रत्येक चित्रपटात काहीतरी विसरतो. माधुरीसोबतच्या कुठल्याशा सिनेमात पँट घालायचे विसरुन तसाच पूर्ण मॉलभर फिरत असतो. शाहरुख भक्ती सोडून आमिरला फॉलो करणे हा वर पाथफाईंडर यांनी सुचविलेला मार्ग (पाथफाईंडर यांनीच मार्ग सुचविणे हा किती समर्पक योगायोग आहे ना?) बरोबर आहे असे वाटते.

मोबाईलची बॅटरी शून्य होते. मी तो चार्जरला जोडतो. तासा दोन तासाने फोनची आठवण होते. पाहतो तर मोबाईल अजूनही झोपलेलाच. काय तर चार्जर नुसताच लावलेला असतो. बटण चालूच केले नसते >>>>> कायम होत हे अस माझ

पहिल्या हाकेला मी ओ कधीच देत नाही. सतत कसल्याश्या तंद्रीत असतो.>>>>

मी तर एकदा बायकोचं आणि माझं "अरे मी बोलत असते तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं" या विषयावर खूप प्रेम पूर्वक संभाषण झाल्यावर तिला सांगितलं होतं की " मला आधी माझ्या नावाने हाक मारायची, आणि मग मी तुझ्या कडे मान वळवून पाहिले की मग पुढचे वाक्य बोलायचे, बाकी कोणतीही वाक्ये मी तुला सांगितले होते या हेडिंगच्या अंडर चालणार नाहीत. "

कायम मी माझ्या तंद्रीत असतो आणि ही काहीतरी बोलून रिकामी होणार आणि नंतर म्हणणार मी तुला सांगितलं होतं.
आता ती मुलाला, मावशींना, सासूबाईंना, सासर्यांना, दिराला, बोलत आहे की फोनवर बोलत आहे की मला बोलत आहे हे मला कसे कळणार ???? माझा मेंदू माझं नाव ऐकल्याशिवाय कोणाचे आवाज नोटीस करत नाही हा काय माझा प्रॉब्लेम आहे का ?

बायकांना लग्नानंतर पुरुषांशी काय, कधी आणि कसे बोलायचे याचे क्लासेस द्यायला हवेत कोणीतरी !!!!

अरे मस्तच.
मोबाईल चार्जिंगला लावुन बटण चालु न करणे, मधेच मोबाईल हरवला की काय अशी शंका येणे पण तो आपल्याच बॅगेच्या दुसर्‍या कप्प्यात असणे, ऑफिसातुन निघताना पाउस नसेल तर छत्री विसरणे ह्या गोष्टी मी पण बरेचदा करते.
ते मनुका सम्जुन कचरा उचलल्यावर आई किंचाळली आणि घाबरुन कचरा चहाच्या कपात टाकला ते विज्युलाइज करुन खुप हसले.

@बिपीन धन्यवाद Lol
अतरंगी तुम्हालाही धन्यवाद. तुमच्या प्रतिसादातुन मला मार्ग दाखविल्याबद्दल. Lol

{{{ वेंधळेपणावर अलरेडी धागा आहे की. भाग १ आणि २ निघाले एवढे किस्से टाकले होते लोकांनी. }}}

आधी ह्या विषयावर धागा आहे की नाही हे चेक न करता नवा धागा काढणे म्हणजे स्वतःच्या वेंधळेपणाची कबूलीच की.

तसाही त्यांचा स्वतःचा धागा त्यांना प्रत्येक विषयावर हवा असतो. धागा मिलेनियर बनल्यावर अ‍ॅडमिन त्यांना बक्षीस म्हणून स्वप्नातले घर देतील असा त्यांचा समज दिसतोय.

शरिराची हालचाल आणि डोक्यातले विचार हे ओउट अव फेज आहेत हे निरीक्षण.
उपाय: वरच्या मजल्यावर जिन्याने चढायचे असेल तेव्हा फक्त पुढच्या पायरीकडेच लक्ष ठेवा.

मनिमाऊ, हा धागा वेंधळेपणा आणि बरंच काही आहे. जसे की आपल्याच तंद्रीत असणे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. आता तुला सांगितले आणि आत्ता कसा विसरलास रे..
बाकी ईथे वेंधळेपणाचे किस्से सांगितल्यास तशी हरकत नाही. पण ईथे उपाय अपेक्षित आहे. या वेंधळेपणावर मात करायला काय करायचे त्याची चर्चा अपेक्षित आहे..
जसे वरची अतरंगी यांची पोस्ट..

अतरंगी मला तुमची पोस्ट वाचताना वाटले की माझीच आधी कुठे लिहिलेली पोस्ट तर नाही ना कोट करत आहात.. फक्त बायकोच्या जागी गर्लफ्रेंड आणि आई, पुढे सेम टू सेम संभाषण.. मी देखील त्यांना हेच सांगतो, आधी मला हाक मारा. पहिल्या हाकेत तण्द्री नाही तुटली तर दुसरी मारा, तिसरी मारा. जेव्हा मी तुम्हाला रिस्पॉन्स देईन तेव्हा पुढे काय ते बोला. या काय करतात, धडाधड बोलत सुटतात. असे सतत काही शब्द आपल्याच कानाच्या दिशेने आदळत आहेत हे जाणवल्यावर मल समजते की अरे काहीतरी मला बोलत आहेत. अर्थात, डोक्यात तर काही शिरले नसते. मग पुन्हा त्यांना सारे बोलावे लागते. आता ही काय ऑफिसची मीटींग आहे का? जे कोणीही कोणाशीही बोलत असले तरी कामाशी संबंधित असल्याने सारे ऐकायलाच हवे. पुरुषांनी आपले सतत ऐकत राहावे या अपेक्षेला बायकांनी जरा मुरड घातली तरी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असे मला वाटते. फक्त प्रश्न हा आहे की हे त्यांना समजावणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी माझ्या गर्लफ्रेण्डला तर थेट समजवू शकत नाही. निदान ईतरांच्या बायको / गर्लफ्रेण्डने हे समजून घ्यावे म्हणून हा धागा..

मोबाईल चार्जिंगला लावुन बटण चालु न करणे..
>>>>
यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला आहे तो असा, ऑफिस आणि घर जिथे मी शक्यतो बरेचदा चार्जिंगला लावतो अश्या दोन पॉईण्टना माझा चार्जर लाऊनच ठेवला आहे आणि ते बटण कायम ऑनच असते. आता यामुळे चार्जर लवकर खराब होतो वगैरे कल्पना नाही पण निदान असा वेंधळेपणा बराच कमी झाला आहे.

वय कीती रुन्मेष तुझे?
माझा असा अंदाज आहे की तीशीकडे झुकल्यावर मेंदू स्वतःला ऑप्टीमाईज करतो,ती प्रोसेस काही वर्ष चालू राहते त्या काळात विस्मरण होत असावे ,हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे.
मला सिगारेटचे व्यसन आहे त्याने थोडं हुकल्यासारखं वाटतं,खरतर स्मोकर्सना अल्झामर्स होत नाही असे म्हणतात पण सिगरेटमुळेच मला विस्मरण होते आहे असे वाटते.

घरी टीव्ही बघता बघता चहा बिस्कीट खात असताना बिस्कीटाला चिकटवलेला मनुका किंवा काजू खाली पडतो. मी समोरच्या टीव्हीवरून नजर न हटवता अंदाजानेच मनुका समजून खाली पडलेला कचरा उचलतो. तोंडात टाकणार ईतक्यात आई किंचाळते. मी घाबरतो. आणि वेंधळ्यासारखा घाईघाईत तो चहात टाकतो.>> हे क ह र आहे हं ऋ.
Rofl Rofl मी वाचल्यापासून वेड्यासारखी हसतेय.

वेंधळेपणा आणि शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस च्या बाबतीत मी तुझी सख्खी बहिण शोभेन. Happy
गजनी आल्यापासून नवरा मला गजनी / शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस या नावांनीच हाक मारतो.
सतत विसरणे आणि त्यातच पुन्हा वेंधळेपणा.. कधीकधी लाज वाटते स्वतःचीच पण उपाय सापडला नाही. Uhoh

मी तर अनेकदा पाण्याचा पंप लावल्यावर विसरून जाते. टाकी भरून वाहून घरामागच्या अंगणात पण पाणीच पाणी होतं. पंप बिचारा बोअरिंगमधलं पाणी संपल्याने बंद पडलेला असतो. मग कुठल्यातरी कामासाठी मागच्या दारी गेल्यावर आठवण होते. मग सगळी कामं सोडून ते पाणी उपसत बसते. Uhoh अलार्म लावून ठेवला तर तो कशासाठी हे पण विसरायला होतं.

बायकांना कोणी तरी बुलेट पॉईंट्स मध्ये बोलायला शिकवावे हा एक पुरुषांकडून होणाऱ्या वेंधळेपणावर उपाय होऊ शकतो.

कोणतीही गोष्ट सांगताना उगाच लांबड न लावता मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगितलं की ते काम लगेच होऊ शकते.

उदा.

येताना आपल्या घराच्या दोन लेन पलीकडे ते किराणा मालाचे दुकान आहे ना, तो कोपऱ्यावर भाजीवाला पण बसतो बघ, आपण मागच्या आठवड्यात त्याच्या कडे गेलो होतो, ते दुकान. तिथून येताना थोडे छोले आणि गरम मसाला घेऊन ये. आई बाबा आले आहेत दुपारी. एवढ्या लांबून बसने आले भर दुपारी त्यात बस स्टँड पासून रिक्षा पण मिळत नाही. एवढ्या अंतराचे तीस रुपये घेतले त्याने. एक काम कर ना येताना कोकम सरबत नाहीतर लिंबू आण मस्त सरबत करू या. आणि लिंबू आणताना जरा रेट विचार आणि मग घे नाही तर मागच्या वेळ सारखे 20 रुपयाला 3 सुकलेले लिंबू आणलेस तसं काही तरी करशील. "

आता या मध्ये चुका होण्याचे किती चान्सेस आहेत....
त्यापेक्षा
1. आई बाबा आलेत.
२. दिवाळीत ऋता भेटली होती त्या दुकानात जा. 250 ग्राम छोले आणि एव्हरेस्ट चा 100 ग्राम मसाला आण.
3. कोकम सरबत ची बाटली आण. कोणताही ब्रँड चालेल.
4. ते नसेल तर चार लिंबू घेऊन ये 5 रुपयाला 2 मिळतील.

इतक्या स्वच्छ सुंदर साध्या स्टेप्स मध्ये सांगितल्यावर कसा काय वेंधळेपणा होईल ??? पण हे बायकांना कधी कळणार ???

अतरंगी, बुलेट पॉईंटस्ची आयड्या भारी Proud

हिम्सकूल, पासवर्ड विसरणे कॉमन आहे. त्यावर माझ्यापुरते करत असलेले उपाय.
1) ब्राऊसरलाच सेव्ह करायला सांगतो.
2) सगळ्या महत्वाच्या ठिकाणी एकच पासवर्ड वापरतो. सगळ्या बिनकामाच्या ठिकाणी दुसरा पासवर्ड वापरतो. त्यामुळे आयुष्यात दोनच पासवर्ड लक्षात ठेवायचे आहेत.
3) एके ठिकाणी पासवर्ड रिकवर करायचा क्वेश्चन बनवून ठेवला आहे.
4) पासवर्डचा अर्धा भाग गर्लफ्रेंडला सांगितला आहे. अर्धा भाग आईला सांगितला आहे.

अलार्म लावून ठेवला तर तो कशासाठी हे पण विसरायला होतं.
>>>>
अलार्मच्या ईथे काही नोट लिहायची सुविधा आहे का चेक करा.. मी बरेचदा ते करतो.

मी तर अनेकदा पाण्याचा पंप लावल्यावर विसरून जाते.
>>>>>
हे माझ्याशी उकळत्या दूधाबाबत होते. आई सक्त ताकीद देते की समोरून हलायचेच नाही. मी सुद्धा मग माझे आयुष्य तेवढ्यावेळासाठी थांबवतो आणि दूधाकडेच लक्ष देतो. मोबाईल तर चुकूनही हातात घेत नाही. अन्यथा समोर उभे राहून मोबाईलवर व्हॉटसप मायबोली सुरू केले आणि कोणाशी वाद घालायला पोस्ट टाईप करत असलो की विसरलो जग. समोर उभा असूनही दूध उतू जाते.

बाकी सगळं लक्षात ठेव, फक्त मायबोलीचा युसर नेम पासवर्ड तेव्हढा कायमचा विसर.
Submitted by हिम्सकूल on 5 August, 2017 - 04:40>>>>>>हे असले मानभावी सल्ले द्यायला येता का मायबोलीवर,नीट लिहीता येत नसेल तर लिहू नका.आणि ऋन्मेषचे धागे वाचायची सक्ती केलेली नाही तुम्हाला.

कूकीज नानखटाई मध्ये असतात मनुके ड्रायफ्रूटस वगैरे. पुढच्यावेळी खाण्याआधी फोटो काढून टाकेन.

फोनचे बिल भरायला विसरणे याची आमच्या घरात पिढ्यांपिढ्यांची परंपरा आहे. आई, बाबा मी भाऊ सगळे एक सारखेच.

त्यामुळे मी सगळ्या रिमाईंडर सेट केल्या आहेत. त्यात पण फोन चे बिल भरायची शेवटची तारीख 6 आहे त्यामुळे 3 तारखेला एक, 5 तारखेला एक आणि 6 तारखेला एक अशा तीन रिमाईंडर सेट केल्या आहेत. Lol त्यातली एक कोणतीतरी बरोबर वेळ असताना वाजते आणि बिल भरले जाते.

यावर बिल डायरेक्ट अकाउंट मधून कट व्हायचे उपाय कोणी सांगू नका लगेच, माहीत आहे तरी आम्ही वापरत नाही.

रिमाईंडर रिपीट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय देऊन मोबाईल कॅलेंडर वाल्यानी भलतीच सोय केली आहे.

बिल डायरेक्ट अकाउंट मधून कट व्हायची सुविधा वापरायला मलाही भिती वाटते. असे वाटते की आपण घर बदलले किंवा कोणत्या कारणाने वापर बंद केला तरी ती सुविधा बंद करायचे राहिल्यास अकाऊण्टमधून पैसे कटतच राहतील.

वेंधळेपणावर अलरेडी धागा आहे की. भाग १ आणि २ निघाले एवढे किस्से टाकले होते लोकांनी.
>>> असले कंमेंट्स फार दिसतात... आमच्यासारख्या नवीन लोकांना जुने धागे माहीत नसतात.. काय फरक पडतो नवीन धागा आला तर.

Pages