शॉर्ट टर्म मेमरी लॉस - कम - धांदरटपणा - कम - वेंधळेपणा - प्लस तंद्रीवर उपाय काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2017 - 18:49

मोबाईलची बॅटरी शून्य होते. मी तो चार्जरला जोडतो. तासा दोन तासाने फोनची आठवण होते. पाहतो तर मोबाईल अजूनही झोपलेलाच. काय तर चार्जर नुसताच लावलेला असतो. बटण चालूच केले नसते. त्यासोबत बटणही चालू करावे लागते हा बालिश कॉमनसेन्स माझ्याकडे असूनही मी दहा पैकी तब्बल सहा वेळा हे विसरतोच.

अगदी घाईघाईत ऑफिसला निघालो असतो. लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरला असते. आम्ही टॉप फ्लोअरला राहतो. बटण दाबल्यावर लिफ्ट वेगाने वर येऊ लागते. पण मी एका हाताने शूज घालत, दुसर्‍या हाताने शर्टाची ईन करत, नाकाने कसाबसा पुन्हा पुन्हा बटण दाबत राहतो. खरे तर दहा वेळा बटण दाबल्याने लिफ्टचा वर येण्याचा वेग वाढवणार नसतो. पण तरीही ते एक असते ना, मनाचे समाधान. ते मिळवत असतो. मग लिफ्ट येताच घाईघाईत आत शिरतो. आता मात्र जरा विसावतो. कारण मी कितीही घाई केली तरी लिफ्ट आपल्याच वेगाने खाली जाणार याची अक्कल आता मला आली असते. खिश्यातून मोबाईल काढून सवयीनेच टाईम चेक करतो, ट्रेनला अजून किती वेळ आहे आणि त्या वेळेत पोहोचायला किती पावले प्रति मिनिटे टाकायला हवीत याचा मनोमन हिशोब मांडला जातो. बस्स आता लिफ्टचा दरवाजा उघडताच सुसाट पळत सुटायचे या निष्कर्शापर्यंत येतो. ईतक्यात लिफ्टची घरघर थांबते. मी दरवाजा उघडायची वाट बघतो. पण तो काही उघडत नाही. मी वैतागतच ईंडिकेटरवर नजर टाकतो. लिफ्ट अजूनही टॉप फ्लोअरलाच थांबली असते. मी ग्राऊंडफ्लोअरचे बटण दाबलेच नसते. डोक्यावरचा पंखा तेवढा माझी बटण दाबायची वाट बघून थंडावला असतो. हे देखील चांगलेच म्हणा, कारण त्याची घरघर थांबल्यानेच मी भानावर आलो असतो. अन्यथा संध्याकाळपर्यंत लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरला पोहोचायची वाट बघत तसाच उभा राहिलो असतो. आतिशयोक्ती वाटेल, पण माझ्या बाबतीत काहीही शक्य आहे.

पण धांदरटपणा ईथेच संपत नाही. आता चालत स्टेशनला गेलो तर ट्रेन चुकेल म्हणून मी घाईघाईत टॅक्सी पकडतो. किती भाडे होणार याची कल्पना असते. मी पाकिटातून पैसे काढून सिग्नललाच त्याच्या हातात कोंबतो आणि टॅक्सी स्टेशनला पोहोचताच टुनकण उडी मारून फलाटाच्या दिशेने धाव घेतो. ट्रेन अजून आली की गेली काही कल्पना येत नाही. ईंडिकेटर ब्लॅंक झाले असते. वेळ काय झाली हे चेक करायला मी खिश्यातून मोबाईल काढायला जातो. पण हातात काहीच येत नाही. मोबाईल गेला की काय? त्या टॅक्सीतच? मी मागे वळून पाहतो, टॅक्सी केव्हाच नजरेआड झाली असते. मोबाईल हरवल्याच्या धक्क्याने छातीतून कळ जाते. हार्ट अ‍ॅटेक असाच असतो का? भितीने मी छातीवर हात ठेवतो. आणि अचानक जीव भांड्यात पडतो. कारण टॅक्सीतून उतरताना पटकन मी हातातला फोन नेहमीसारखे खालच्या खिश्यात न ठेवता वरच्या खिशात ठेवलेला असतो.

पण हे ईथेच संपत नाही. पुढे ट्रेनमध्ये याच मोबाईलच्या नादात मी कित्येकदा माझे स्टेशन आलेले लक्षात न आल्याने पुढच्या स्टेशनला गेलो आहे याची गिणती नाही.

घरी आल्यावर मला खिश्यातला रुमाल बाथरूममध्ये आणि मोबाईल जवळच्याच बेडवर फेकायची सवय आहे. कित्येकदा याच्या उलट करत मी मोबाईल बादलीत आदळला आहे याचे दुख त्या मोबाईललाच ठाऊक.

घरी टीव्ही बघता बघता चहा बिस्कीट खात असताना बिस्कीटाला चिकटवलेला मनुका किंवा काजू खाली पडतो. मी समोरच्या टीव्हीवरून नजर न हटवता अंदाजानेच मनुका समजून खाली पडलेला कचरा उचलतो. तोंडात टाकणार ईतक्यात आई किंचाळते. मी घाबरतो. आणि वेंधळ्यासारखा घाईघाईत तो चहात टाकतो.

ऑफिसमध्ये सुकत घातलेली छत्री परत आणायची मला तेव्हाच आठवण राहते जेव्हा निघताना पाऊस पडत असतो.
शाळेत दरवर्षी जून महिन्यातच मी छत्री हरवायचो आणि उरलेला महिना भिजत भिजतच काढायचो.
माणसाने विसरायचे ठरवले तर तो काहीही विसरू शकतो. छत्री विसरणे खूप कॉमन आहे. माझे शाळेत दप्तर विसरून झालेय. एकदा तर पायातून काढलेली चप्पलच घालायचे विसरलो आणि अनवाणीच घरी परतलोय.
पहिल्या हाकेला मी ओ कधीच देत नाही. सतत कसल्याश्या तंद्रीत असतो. आई जेव्हा रुनम्या न पुकारता बहिर्‍या म्हणून हाक मारते, तेव्हा मात्र पहिल्याच फटक्यात ऐकतो..

एक ना दोन हजार लाखो किस्से, माझ्या रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारे, असे थोडक्यात ईथे लिहून संपणार नाहीत.....
प्रश्न असाय की यावर ऊपाय काय?
हे असेच आयुष्यभर जगावे लागणार का?

वरवर साधीसुधी गंमतीशीर वाटणारी ही समस्या रोजच्या जीवनात कित्येक नवीन समस्या निर्माण करते त्याची गिणती नाही. अगदी रोज ईथे येऊन लिहू शकतो ईतके किस्से आहेत. बरेच भुर्दंडही सोसावे लागले आहेत. प्रतिसादांत शेअर करेनच, पण तोपर्यंत हे सारे टाळता येण्यासाठी, वा अश्या चुकांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील हे सुचवाल का ..

धन्यवाद,
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटण दाबल्यावर लिफ्ट वेगाने वर येऊ लागते. पण मी एका हाताने शूज घालत, दुसर्‍या हाताने शर्टाची ईन करत, नाकाने कसाबसा पुन्हा पुन्हा बटण दाबत राहतो. >>> हे कसे शक्य आहे
बरेच फेकुचंद पाहीलेत आत्तापर्यंत पण तुम्हाला कोणी बिट करेल असे वाटत नाही
याला कोतबो तुन विनोदी लेखनमध्ये टाकता येते का बघा

रिव्हर्स स्वीप, तुम्ही कधी कोणाला श्वास घ्यायचे विसरताना पाहिले आहे?

वीबी, खरंय तुमचे, बाता मारण्यात मला बीट करणारा अजून जन्माला यायचा आहे. निदान माझ्या पाहण्यात तरी दुसरा कोणी आजवर आला नाही.
पण ते एक असो, वरचे जे वर्णन आहे त्यात नेमके काय अशक्य वाटतेय?? कोणताही नॉर्मल माणूस हे सहज करू शकतो.

लिफ्टचे बटन दाबायला लागणारा वेळ: १ सेकंद
तुम्ही एका हाताने घालता म्हणजे तुम्हाला शु-लेस बांधाव्या लागत नसणार. एक बूट घालायला लागणार वेळ: १-२ सेकंद
शर्ट इन करायला लागणारा वेळ: १०-२० सेकंद

नॉर्मल माणसे ही कामे एकदम न करता एकामागोमाग एक क्रमाने करणार कारण एकदम केल्यामुळे काहीच वेळ वाचणार नाही पण शर्ट विचित्र पद्धतीने इन होण्याची शक्यता खूप वाढते. याउलट सर्वात वरच्या मजल्यावरून खाली जाताना लिफ्ट मध्ये जो वेळ मिळतो तेव्हा शर्ट इन करणे जास्त सोयीस्कर आहे. शिवाय पहिल्या ४ सेकंदात शूज घालून झाल्यावर नाकाने लिफ्टचे बटन दाबण्यापेक्षा बोटाने दाबाने केव्हाही चांगले.

छ्या, जुना ऋन्मेष राहिला नाही आता. मला आवडणाऱ्या ऋन्मेषने चटकन सांगून टाकले असते की लेख थोडा विनोदी/इंटरेस्टिंग बनवायला थोडीशी अतिशयोक्ती केली म्हणून. शेवटी कित्ती घाई होत असते ही भावना पोचणे महत्वाचे.

छ्या, जुना ऋन्मेष राहिला नाही आता. मला आवडणाऱ्या ऋन्मेषने चटकन सांगून टाकले असते की लेख थोडा विनोदी/इंटरेस्टिंग बनवायला थोडीशी अतिशयोक्ती केली म्हणून. शेवटी कित्ती घाई होत असते ही भावना पोचणे महत्वाचे.
नवीन Submitted by व्यत्यय on 6 August, 2017 - 07:15
+10000000

व्यत्यय, पण मी खरेच एकाच वेळी दोन तीन काम करायला बघतो, भले ती फसतात आणि नंतर मला जाणवते की कदाचित क्रमाक्रमाने केल्यास वेळ वाचला असता किंवा ती किमान व्यवस्थित झाली असती. पण घाईत असताना आपला मल्टीटास्किंगचा किडा बाहेर पडतो ते असा. माझ्यामते पुरुषांपेक्षा स्त्रियांना मल्टीटास्किंग छान जमते. पण तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. सुचवल्याबद्दल धन्यवाद. नंतर काढूया.

@ लिफ्टमध्ये ईन करने. धोकादायक आहे. खालच्या फ्लोअरवरची मुलगी अचानक आत शिरली तर... दिसायला ते फार घाण दिसेल.
आणि तसेही काही महिन्यांपूर्वी आमच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यापासून अशक्यच झालेय. आपण ईथे कपडे ईन करत असू आणि ग्राऊंडफ्लोअरवर जमा लोकं आपला शो बघत असतील Happy
जर असे काही नसते तर मी बाथरूममधून टॉवेल गुण्डाळून शूज कपडे सोबत घेऊन तसाच लिफ्ट मध्ये नसतो का शिरलो..

यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला आहे तो असा, ऑफिस आणि घर जिथे मी शक्यतो बरेचदा चार्जिंगला लावतो अश्या दोन पॉईण्टना माझा चार्जर लाऊनच ठेवला आहे आणि ते बटण कायम ऑनच असते. आता यामुळे चार्जर लवकर खराब होतो वगैरे कल्पना नाही >>
वीज वाया जाते अशा लोकांमुळे..

कशी? आणि नेमकी कुठे जाते?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 8 August, 2017 - 00:44
बा इंजिनिअरा चार्जर गरम होऊन हिट लाॅस होतो.

चार्जर गरम का होतो? मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरने गरम होत त्याला हिट पुरवणे अपेक्षित असते का?

कोण ईलेक्ट्रीक ईंजिनीअर?
मी सिरीअसली विचारत आहे. चार्जर गरम होऊन विद्युत उर्जेचे रुपांतर हिट एनर्जीमध्ये करून मग ती हिट मोबाईलला पुरवतो का?
चार्जर गरम का होतो? मोबाईल चार्ज होताना मग जास्तच गरम होत असेल.. ती उर्जा सारी फुकटच जाते का? ज्याचा मोबाईलचा वापर जास्त त्याचा चार्जरचा वापर जास्त आणि त्याची उर्जेची नासाडी जास्त समजायची का?

असले कंमेंट्स फार दिसतात... आमच्यासारख्या नवीन लोकांना जुने धागे माहीत नसतात.. काय फरक पडतो नवीन धागा आला तर.<<+११

ज्याचा मोबाईलचा वापर जास्त त्याचा चार्जरचा वापर जास्त आणि त्याची उर्जेची नासाडी जास्त समजायची का?

>> ho

तुमची मीन रास आहे का हो? अगदी असच घडतं माझ्यासोबत सुद्धा... असं वाटलं कि तुम्ही माझीच कथा लिहिताय ... गैरादी म्हणतात बाबा मला आणि आता नवरासुद्धा तेच म्हणतो...

गैरादी ??
पहिल्याण्दाच ऐकला हा शब्द
बाकी माझी रास कर्क द कॅन्सर आहे !

Pages