शिऱ्याचा बायकोशोध

Submitted by mi_anu on 2 August, 2017 - 11:57

"म्हणजे काय?गाडीची किंमत जितके लाख तितके तरी लोक बसायला नको का त्यात?१२ लाखाची गाडी आणि पाच लोक बसणार याला काय अर्थ आहे?"
"शिऱ्या, रिक्षाच घेऊ का सरळ?दोन अडीच लाखात चार लोक बसतील.ड्रायव्हर ला घट्ट मिठीत घेऊन बसण्याची तयारी असेल तर सहा पण बसतील."
मी वैतागून म्हणालो.एक तर हा पैश्यात खेळणारा माणूस, याला यातलं कळतं म्हणून विचारायला आलो होतो आणि याचं वेगळंच चालू होतं.शिऱ्याची स्वतः ची कार त्याने बऱ्याच ऑफर्स, बँकेचा टाय अप वगैरे भानगडी करून बरोबर पाच लाखात मिळवलीय, आणि त्यात आई,बाबा,मिस्टर देवीताई,टु बी मदर देवीताई,तो स्वतः अशी सव्वा पाच माणसं बसवतो, त्यामुळे त्याला त्याच्या 'जितके लाख तितकी माणसं गाडीत बसली पाहिजे' वाल्या तत्वाला चॅलेंज करायला मला तोंड नव्हतं.

शिऱ्या म्हणजे आमचा फायनान्शियल विझार्ड. एका मोठ्ठ्या बिझनेस स्कूल मधून एम बी ए करून हा आता गेली 5 वर्षं एका बँकेत चांगला चिकटलाय. 'कस्टमर रिलेशनशीप मॅनेजर' म्हणजे मोजक्या दोन तीन लोकांना वर्षाला त्यांचे जास्तीत जास्त पैसे जास्तीत जास्त वर्षं बँकेत गुंततील आणि त्यांना काढता येणार नाहीत अश्या स्कीम सुचवणे, त्यांना प्रत्येक सणांना मेसेज पाठवणे आणि त्यांचे भेटण्या आधीचे सुरुवातीचे फोन वरचे 'मी कोणताही फंड तुमच्याकडून कधीही विकत घेणार नाहीये' वाले दृढ निश्चयी काटेरी संभाषण ऐकून घेऊन एक महिन्यात त्यांनाच बँकेने काढलेला बँकेच्याच फायद्याचा सर्वात मोठा फंड विकणे ही कामं हा सफाईने करतो.हिंदी सिनेमात हिरोसे नफरत करणाऱ्या प्रेयसीच्या सुरुवातीच्या 'ना मे हां' असणं आणि शेवटी दोघे हिरोचं मूल खेळवताना च्या सीन वर 'दी एन्ड' ची पाटी वगैरे चित्रपटांप्रमाणे बँकेकडून म्युच्युअल फंड गुंतवणुकीला 'ना मे हां' असलेली कमकुवत मनाची गिऱ्हाइकं शिऱ्या बरोबर ओळखतो.त्याने भरपूर मोठ्या फंड गुंतवणुकी वाली अशी 3 गिऱ्हाईकं गेली अनेक वर्षं पक्की पकडून ठेवली आहेत.

खरं तर शिऱ्या अश्या प्रकारची नाती गोती सांभाळायला लागतील अशी कामं पत्करेल असं आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं.रॉक स्टार मधलं 'जो भी मै, कहना चाहू, बरबाद करे, अल्फाज मेरे(आणि पुढे ओ यां यां...यां यां यां..यां यां यां अश्या ताना)' हे गाणं याला समोर बसवून लिहिल्या सारखं आहे.त्याला कुठे चांगलं इम्प्रेशन बनवायचं असेल तर "तोंड बंद आणि ओठ स्माईल मध्ये ताणून ठेव" हा सल्ला आम्ही सर्वात पहिले देतो.

"शिऱ्या, चांगल्या फॅसिलिटी असलेल्या सेडान कार या भारतात सध्या जिफेन गुड्स आहेत, त्यात लाख तितकी माणसं वालं गणित कसं बसवता येईल?12 लाख किमती ठेवून पण लोक 1 महिना वेटिंग ने कार बुक करतातच ना?" हे बोलताना माझ्या चेहऱ्यावर आतून उमटलेलं हसू पाहून शिऱ्या उखडला.

'जिफेन गुड्स' ही कॉमर्स मधली संकल्पना हा शिऱ्याच्या आयुष्यातला एक दुखरा व्रण आहे.
झालं असं: एम बी ए करताना त्याच्या प्रोजेक्ट मधल्या मैत्रिणीने एका कॉम्प्युटराईझड पार्लर मध्ये जाऊन 1000 रु. देऊन केस एका बाजूने वर एका बाजूने खाली असलेला 'अन इव्हन' हेअर कट् केला.त्यावर शिऱ्याची प्रतिक्रिया: "हे काय, चांगले लांब केस का कापलेस?लांब केसवाल्या जरा चांगल्या दिसणाऱ्या मुली स्थळ म्हणून जिफेन गुड असतात, त्यांच्या अपेक्षा त्यांनी वाढवल्या तरी डिमांड वाढतच राहते.आणि कापले तर कापले, त्याला एका वेळी चेहऱ्याच्या दोन्ही बाजू बघायला सांगितल्या नाही का?" मैत्रीण चेहऱ्यावर शूर हसू ठेवून दीर्घ श्वास घेऊन सर्व रिऍक्शन कंट्रोल करत होती.काही महिन्यांनी शिऱ्याने एका काश्मिरी सुंदरीला एका महागड्या कॅफेत 200 रु ची कॉफी पीत असताना प्रपोज केले.तिची प्रतिक्रिया: "शिरीष, आय लाईक यु ऍज फ्रेंड.मैने तुम्हे उस नजर से कभी देखा ही नही. आय मीन, यु आर स्मार्ट, यु आर क्युट अँड डिपेंडेबल, बट तुम ना, जिफेन गुड नाही हो.मे बी आय ऍम लुकिंग फॉर समथिंग मोअर इन अ मॅन." जिफेन गुड वाला शिऱ्याचा डायलॉग "आगाऊच आहे मेला" या प्रिफिक्स सह महिलावर्गात वणव्या च्या वेगाने पसरवण्यात आला होता आणि ती एक लोकप्रिय उपमा बनली होती.

"कंपेअरिंग ऍप्पल्स टु ऑरेंजेस. मुळात सेडान किंवा प्रीमियम कार या जिफेन गुड नाहीत, आणि तुला जिफेन गुडचा विषय ओढून आणायचाय म्हणून चुकीच्या उपमा देऊ नकोस." 'कंपेअरिंग ऍप्पल्स टु ऑरेंजेस' हा शिऱ्याचा वाद विवादात किंवा एखाद्या पेच प्रसंगात काय बोलावं विचार करायला वेळ मिळवण्याचा वाक्प्रचार आहे.

हां, त्या काश्मिरी सुंदरीकडे परत वळूया.काश्मिरी सुंदरी च्या दारुण अनुभवानंतर शिऱ्याचं मन जडलं ते त्याच्या मैत्रिणीची मैत्रीण असलेल्या मेडिकल स्टुडंट वर.एका अश्याच एका कातरवेळी त्याने तिला व्हॉटस ऍप वर एक भावपूर्ण कविता लिहून आपल्या प्रेमाचा 'इजहार' केला.
शिऱ्याच्या भावनातून स्फुरलेलं काव्य रत्न खालील प्रमाणे:
"सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी ही हुरहूर टोकेरी,
आता सर्वच संपावं म्हणती मनीच्या उदास लकेरी,
आयुष्याच्या क्षितिजाच्या अखेरी,
मावळत्या जीवनाच्या किनारी,
बनशील का तू माझ्या डोळ्यातला एक अश्रू सोनेरी?"

"विल यु बी विथ मी टिल डेथ डझ अस अपार्ट" या इंग्रजी प्रपोजल चं हे मराठी काव्यांतर भावी डॉक्टरीण बाईंना अजिबात झेपलं नाही.तिने मैत्रिणीला लगेच पिंग करून "तुझ्या त्या मित्राला अवघड जागचा लास्ट स्टेज चा कॅन्सर झालाय का,त्याला बहुतेक तो मरेपर्यंत मी त्याच्याशी सहानुभूती मॅरेज करून हवंय,कायच्या काय सेंटी मारतोय" विचारलं.

या सर्व किश्श्यानंतर शिऱ्या ने ऍरेंज मॅरेज करायचा निश्चय केला.
एक एक्सेल बनवून तो 'प्रोजेक्ट लग्न' हँडल करायला लागला.मुली निवडणे,प्रायोरिटी लिस्ट करणे,मुलीच्या लोकेशन पुढे ड्रॉप डाऊन करून 'लोकल' आणि 'रिमोट' लिहिणे या गोष्टी तो लहान मुलं पहिल्या दिवशी शाळेचं वेळापत्रक लिहितात तितक्या उत्साहाने वेगवेगळ्या रंगात लिहू लागला.शेजारी रिमार्क्स मध्ये "मे हॅव ऑनसाईट ऍस्पिरेशन्स" "मे नॉट बी गुड टीम प्लेयर" "लॅक ऑफ सॉफ्ट स्किल्स" "लुकिंग फॉर पर्सन विथ 3बीएचके" "जॉब प्रोफाइल नॉट क्लीयर" अश्या शेरयांच्या सटासट गोळ्या मारू लागला.आईबाप नवं नवं स्थळ बघायचं कौतुक विसरून "बघ जरा तो शेजारचा पिंट्या.चांगली कॉलेजात असताना पासून गर्लफ्रेंड आहे.आणि प्रि वेडिंग फोटो शूट चालू आहे.आणि तू, आता उतारवयात दर रविवारी दगदग करायला लावतोस." म्हणून हताश सुस्कारे सोडायला लागले.

"काय रे, एखादी आयटी मधली सरळ केसांची बाहुली का नाही बघत?तू जात असतोस ना क्लायंट ना भेटायला कंपन्यांमध्ये?"
"मी बघून काय उपयोग?त्यांनी मला बघायला नको का?त्यांचे डोळे फक्त त्यांच्या स्मार्टफोन साठी असतात.शेजारी शेजारी चालत एकमेकींना काहीतरी मोबाईल ऍप रेफर करून डिस्काउंटं मिळवत बसतात.समोर कपड्याचं दुकान असेल तर ब्रँड बघून त्या ब्रँड चं ऑनलाईन शॉपिंग करतात.प्रत्यक्ष मनाने कुठेच नसतात.बोलताना अगदी मोजकं बोलतात.मात्र फेसबुक वर झाशीच्या राणीच्या आवेशात पन्नास ऑनलाईन आंदोलनं आणि 100 मेणबत्त्या आणि निषेध मोर्चे जॉईन करतात.आता माझ्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये 5 आहेत.पण यांना समोरून गेलो मी तर ओळखू येत नाही.फेसबुकवर कॉमेंट लिहिली तर लाईक आणि मोठे मोठे स्मायली रिप्लाय टाकतात.आपण प्रत्यक्षात 'हे वाईट जग' म्हणून अगदी सांभाळून चालत,बोलत असताना फेसबुकवर मात्र अगदी जवळच्या मैत्रिणीच्या बॅचलर पार्टीत केलेला डान्स व्हिडीओ शेअर करतात.एरवी ऑफिसातली मुलगी समोरून आली तर नाक वर करून जातात समोरून, पण फेसबुकवर मुआ मुआ वरून प्रेमाने पाप्या देत असतात.आयुष्यभराचा पार्टनर कसा रे शोधायचा असल्या व्हर्च्युअल लोकांत?"
"शिऱ्या, जनरलायझेशन होतंय.कंट्रोल.सगळे असे नसतात" आता माझं टेम्पर चढायला लागलं होतं.

शिऱ्याने आखूडशिंगीबहुदुधीयकांतासंशोधनविवेचन परत कंटिन्यू केले:
"आणि वर परत मुलीची आईशी केमिस्ट्री जमली पाहिजे.नंतरचे मेलोड्रामे नको.जी मुलगी आईला क्लिक होते ती मला म्युचुअल फंड घ्यायला तुम्ही रोज शेअर मार्केट ला जाता का विचारते.काय इंटरनेट, ऑनलाईन बँकिंग वगैरे शोध या शतकात लागले आहेत याचा पत्ताच नाय!!एक मला क्लिक झाली होती तिला समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाणारा मुलगा हवा होता.मी किती सांगितलं तिला,भर ऑफिस टाईम च्या ट्राफिक मध्ये यु टर्न मारून रिकाम्या समोरच्या रस्त्यावरून रोज बँकेत जातो म्हणून.तर नाही.तिने जे वर्णन सांगितलं त्यावरून अर्णब गोस्वामी सारखा कोणीतरी डॅशिंग माणूस समोर येत होता माझ्या.आता इतका प्रवाहा विरुद्ध जाणारा माणूस उद्या "कशाला पाहिजे घर नि बीर, मस्त मोकळ्या आकाशाखाली टेंट टाकून राहू" म्हणून मागे लागला म्हणजे?"

"शिऱ्या, खूप जास्त फिल्टर मारले तर फायनली वय वाढेल आणि "फॉर्म मध्ये सेक्स या रकान्यात 'एफ' लिहिणारी मनुष्यजातीची कोणीही व्यक्ती चालेल" इतका एकच फिल्टर ठेवता येईल"

"का? देवीताई चं नाही झालं लग्न?तिला मुलगा मिळणारच नाही म्हणून पैज लावली होती ना काकू किटी पार्टिने?"

देवीताई म्हणजे शिऱ्याची मोठी बहीण.तिच्या जन्माच्या वेळी काकूंनी खूप काकवी खाल्ली असावी अशी शंका येईल इतक्या वेळा ती 'का' विचारायची.'का?केक ताजा ताजाच केलाय मी.केक चा नैवेद्य का नाही चालणार गणपती ला?' 'चॉकलेट वाईट, मग पेढा चांगला कसा?पिझ्झा मॅगी वाईट,आणि तेलाचा 1 अर्धा सेंटीमीटर तवंग दिसणारी मिसळ पोटभर कशी जाते? आणि आईसक्रीम खाताना देशी विदेशी चा प्रश्न पडत नाही का?' असे 'पेन इन द नेक(किंवा पेन इन तुम्हाला हवा तो अवयव)' प्रश्न ती पावलोपावली उपस्थित करायची.पण देवाला चवबदल म्हणून तिने दिलेला केक आवडला असावा.एका बेंगलोरस्थित निरीश्वरवादी प्राण्याशी तिचं लग्न झालं.आता ताई प्रेग्नन्सी झुंबा चे क्लासेस घेते.अती सुंदर सजवलेले दोडकं वांगं पिझ्झा,लाल भोपळा पास्ता,गिलक्याचे कटलेट, शेपू पुलाव,ओट्स चे उकडीचे मोदक अश्या तिच्या पाककृती अनेक शाळकरी मुलांच्या आयांचे दुवे मिळवून जातात.

'देवी ताई सारख्या वेगळ्या विचारांच्या मुलीचं विचारात कोणतेही कॉम्प्रो न करता लग्न झालं.मी बिचारा साध्या अपेक्षा ठेवून एक मुलगी घरात आणायला बघतोय तर मिळत नाही.मुलगी बघायला गेल्यावर पहिले इस्टेट एजंट असल्यासारखं घराची बारीक चौकशी करतात.नंतर पगार किती,बँक नॅशनलाईज आहे का विचारतात.मग कश्यावर काम करतो विचारतात.मग 'म्हणजे 'तुम्ही शेअर ब्रोकर आहे का' विचारतात.बँकेत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर हा शेअर ब्रोकर?यांचा मुलगा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे त्याला क्वालिटी अश्यूरांस मॅनेजर म्हणून 'तेच हो ते' म्हणू का मी?'

'शिऱ्या, समज तुला एक जबाबदारीची नोकरी मिळाली एका दुरगावी.राहण्याची खाण्याची व्यवस्था ऑफिसकडून.कामं भरपूर पण कंपनी चांगली.तुझा 50 वर्षाचा बॉण्ड आहे.बॉण्ड अगदीच वेळ आली तर तोडता येतो पण त्याला मोठी किंमत मोजावी लागते.तू नाही नोकरी घेण्या आधी बारीक बारीक गोष्ट तपासून पाहणार?त्यापेक्षा त्यांना सांग, कंपनी नीट फिरून बघा.प्रश्न विचारा.तुही विचार..अगदी पाहिल्या दिवशी टीम बॉंडिंग होणार नाही.पण काही वर्षात नक्की होईल'

'बापरे!!!एकदमच सेंटी मोड ला गेला भौ तू.तुझे हेवी वेट फंडे ऐकतात का तुझ्या टीम मधली पोरं?'
'नाय ना राव!!म्हणून तर 'सिनर्जी विथ एनर्जी' ट्रेनिंग ठेवलंय त्यांना.तो 4 वर्षांपूर्वी कचाकचा भांडून गेला होता ना पगार देत नाही करुन?आता ही ट्रेनिंग घेऊन दुप्पट पैसे काढतो!!'

'त्याला विचार त्याने इन्व्हेस्टमेंट चा काही विचार केलाय का.'
शिऱ्या वैतागवाडी मोड मधून योग्य 'नातीगोती संगोपन,संवर्धन आणि प्रसार' मोड मध्ये आला आणि मी 'सिनर्जी विथ एनर्जी' वाल्याला एनर्जी यायला चहा पाण्याची व्यवस्था सांगून ठेवायला ऑफिसात निघालो.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl लय भारी.. Rofl

आखूडशिंगीबहुदुधीयकांतासंशोधनविवेचन>> हे जबरदस्त. Lol

धमाल. शेअर्स विकत घ्यायला रोज मार्केटमध्ये Rofl पण ईतक्या लवकर का संपवलं. पुढचा भाग वाचायला आवडलं असतं.

जबराट आवडले...
>>>>शेअर्स विकत घ्यायला रोज मार्केटमध्ये Rofl >>>
या वरून आठवले
आमच्या बिल्डिंग मध्ये एक CS मुलगा होता,
25 वर्षांपूर्वी हा प्रोफेशन जास्त माहीत नव्हता,
एक स्थळाने त्याला विचारले " तुमचा स्पीड किती"आणि सोबत टायपिंग ची खूण केली... Lol

Pages