कारण काय? तर मुलं !

Submitted by विद्या भुतकर on 31 July, 2017 - 21:48

मागच्या आठवड्यात मुलं आणि नवरा भारतात आले आणि मी एकटीच बॉस्टनमध्ये. दोन आठवड्यानी मी येणारच होते. सुरुवातीला हे असं बुकींग केलं तेंव्हा मनात बरेच मनोरे रचले होते. आता 'आई' म्हणून ते समोर मांडले की त्यावर टीकाही होऊ शकते पण दोन आठवडे एकटीच असताना भरपूर टीव्ही पाहायचा, मनोसक्त आराम करायचा आणि बरेच लिखाण पूर्ण करायचे असं ठरवलं होतं. मुलं घरातून गेली आणि घर एकदम शांत झालं. रविवारी बरीचशी कामे पूर्ण केली. तरीही भरपूर वेळ उरला. पण लिहिण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. मन एकदम सुन्न झालं होतं. तिसऱ्याच दिवशी तिकीट बदलून घेतलं आणि चार दिवसांत घरी पोचले.

मुलांच्या शाळा, क्लास आणि सर्व असूनही मी नियमित लिखाण करत होते आणि रनिंग वगैरेही. ते नसताना मात्र टीव्ही किंवा आळसात खूप वेळ घालवला आणि कामाचं असं काहीच केलं नाही. अगदी आम्ही दोघे असतानाही पूर्वी असंच व्हायचं. धक्का मारायला कुणीही नसल्याने सर्व कामं रेंगाळत व्हायची. आता हे सांगायचं कारण असं की अनेकदा आपल्याला वाटतं की मुलांच्या मुळे अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही. साध्या साध्या गोष्टी म्हणजे, एखाद्या मैत्रिणीला अनेक दिवस किंवा महिन्यांत फोन होत नाही. कारण काय? तर मुलं ! एखाद्याला म्हणावं की 'अरे ये भेटायला' तर नकार, कारण काय तर, मुलगा. तो खूप धडपड करतो, त्याला बरंच नाहीये किंवा अजून काही.

अर्थात हे कारण मीही काही वेळा सांगितलं आहे. पण खरंच इतका मोठा बाऊ का केला जातो? आपली जवळची मैत्रीण आहे ना? मग पाच मिनिट बोलायला वेळ काढू नाही शकत? एखाद्या ट्रिप ला जायचं आहे. पण ती आजारीच पडेल ना किंवा अजून काही तत्सम कारण. अगदी साधं कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यावरही हेच कारण ऐकायला मिळतं. व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा एखादी कला जोपासायला वेळ मिळत नाही. कारण? मुलं !! कधी वाटतं आपण त्या गोष्टीची सवय तर लावून घेत नाहीये ना हे पुन्हा एकदा प्रत्येकाने चेक केलं पाहिजे.

मुलं सोबत असल्यावर आपण बरीचशी कामे पटकन उरकून घेतो असं मला वाटतं. साधं उदाहरण देते. मी भाज्या आणायला ग्रोसरी स्टोरला जाते. मुलांच्या सोबत गेलं की ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या मनात किंवा पेपरवर यादी करून ठेवलेल्याच असतात. पटकन त्या त्या ठिकाणी जायचं आणि पटकन घरी यायचं. नाहीतर दोघे मिळून दुकानात काही ना काही मागत बसतात त्यामुळे जास्तीत जास्त १५-२० मिनिटांत हवं ते सामान घेऊन मी घरी आलेली असते. याउलट मी एकटी गेले की एकदम भरकटल्यासारखं होतं. उगाच नको असलेल्या वस्तूही घेऊन येते. कुणीही मागे कटकट करत नसल्याने उगाच फिरलं जातं आणि एक तास फिरूनही बरेच वेळा हवी असलेली वस्तू घ्यायची राहूनच जाते.

सुट्टीच्या दिवशीही पूर्वी तासनतास रात्री जागत बसायचो आणि उशिरा उठून काहीही प्रोडक्टीव्ह केलं जायचं नाही. आता मात्र सकाळी ते दोघे उठतात त्यामुळे नाईलाजाने उठावं लागतच. त्यांचे क्लास असतील काही तर बाहेर जावं लागतंच. त्यामुळे मग उगाच फालतू जागरण न करता सकाळी उठून पळायला जाणं इ होऊन जातं. अशा एक ना अनेक गोष्टी किंवा घटना आहेत. अगदी बाहेर पडायच्या वेळी कपडे काय घालायचे. यासाठीही उगाच तासभर विचार केला जायचा. आता घाईत आवरायचं म्हणून तेच काम ५ मिनिटांत होतं.

एकूण काय की मुलांना आपल्या आवडत्या गोष्टी न करण्याचं कारण बनवायचं थांबवलं पाहिजे. मुलांसोबत बराचसा वेळ जात असल्याने उलट उरलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेतला पाहिजे. आपण एखादी गोष्ट करत नसू तर त्याचं कारण केवळ आपण स्वतः आहे. बाकी कुणीही नाही. याचा नुकताच ताजा अनुभव येऊन गेल्याने आवर्जून लिहिले आहे. Happy तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी!
मी पण बरेचदा असेच मनोरे रचायचे. मुलगा घरी नसतांना हे करुयात, ते करुयात. पण प्रत्यक्षात काहीच करणे व्हायचे नाही.
पण तो घरी असतांना त्याला सोबत घेवून अनेक कामे उरकली जातात.

छान लिहीलय.
(कोरेगाव म्हणजे सातारजवळचे का? मी सातारचाच आहे)

खर आहे, असच होत बरेचदा असेच मनोरे रचायचे वेद घरी नसतांना हे करुयात, ते करुयात पण आळसात खूप वेळ घालवलाजातो आणी काहिच काम होत नाही.

मी सुध्धा सध्या similar situation मधून जातेय. पण माझी समस्या वेगळीच आहे. आजूबाजूच्या लोकांनी/ नातेवाईकांनी मुलगी (वय ७ वर्षे) तुला सोडून कशी रहाणार हा प्रश्न विचारून मला भंडावून सोडलयं.
मी आणि नवरा दोघं job करत असल्याने, दोघांनाही घरातली/ बाहेरची आणि मुलीची सर्व कामे करता येतात. मुलीला emotional support ही देता येतो. आणि मुख्य म्हणजे मुलगी लहान नाही आणि ३च आठवडे माझ्यापासून लांब रहाणार आहे. असं असताना लोकांना एवढी काळजी का वाटते कळतं नाही.

अगदीच पटलय.... पण २-३ वर्ष्याच्या मुला ला घेउन काहीही काम होत नाही हो.. जेवण सुद्धा करु देत नाहीत पोर Sad