लिऊ झिओबो आणि लिऊ झिआ यांची प्रेमकहाणी

Submitted by Sankalp Gurjar on 1 August, 2017 - 02:12

लिऊ झिओबो हे चीनमधील मानवी हक्क आणि लोकशाही यासाठी संघर्ष करणारे लेखक - विचारवंत. त्यांचा या वर्षीच्या जुलै महिन्यात वयाच्या ६२ व्या वर्षी तुरुंगात असतानाच मृत्यू झाला. झिओबो हे चीनमधील मानवी हक्कांसाठी केल्या जाणाऱ्या संघर्षाचे प्रतीक बनले होते. चीन सरकारने त्यांची आठवण पुसून टाकण्याचे सर्व प्रयत्न त्यांच्या मृत्यनंतर केले आहेत. सरकारी दडपशाही आणि मृत्यू यांच्या छायेत कायम वावरलेल्या झिओबो यांच्या अनोख्या प्रेमकहाणीवर लिहिलेला हा लेख.

****

वादळापूर्वीची शांतता असते ना तसे ते दिवस होते. तो एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक होता तर ती एक सरकारी अधिकारी. दोघेही चांगल्या, सुस्थिर घरातून आलेले. त्याला वाचन लेखन करण्याचा, भाषणे देण्याचा नाद होता. तर ती कविता लिहिणे, कॅनव्हासवर चित्र रंगवणे, फोटोग्राफी यात रमत असे. दोघांचीही (वेगवेगळ्या व्यक्तींशी) लग्ने झालेली होती. दोघेही आपापल्या संसारात होते. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात येतात तसे थोडेफार चढ उतार त्यांच्याही आयुष्यात येत होते. मात्र त्यात विशेष दखल घ्यावी असे काहीही नव्हते. आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक यश यामुळे सर्वसामान्य लोकांना जगायला आवडेल असे आयुष्य ते दोघेही जगत होते.

कविता करण्याच्या छंदामुळे आणि साहित्याच्या आवडीमुळे तिच्या घरी साहित्यविषयक चर्चा करणाऱ्यांचा एक गट जमत असे. त्यालाही वाचन व त्यावरील चर्चा आवडत असे. त्यामुळे कधी कधी तोही त्यात जात असे. दोघांचीही एकमेकांशी तिथे ओळख झालेली. दोघांचे स्वभाव तसे वेगळे होते. तिचे कलासक्त मन जीवनातील हळुवार गोष्टींकडे आकर्षित व्हायचे तर त्याचा रस दाहक समाजकारण – राजकारण यामध्ये. त्याची तेव्हा देशात आणि परदेशात एक उगवता तारा अशी ओळख व्हायला सुरुवात झालेली तर ती तशी फार लोकांना माहित नव्हती. मात्र कधी कधी तरी या चर्चांच्या निमित्ताने झालेल्या भेटींमुळे म्हणा आणखी काही कारणांमुळे म्हणा ते एकमेकांकडे आकर्षित झाले आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

मात्र त्यांच्या प्रेमाचा प्रवास हा साधा सरळ होणार नव्हता. परिस्थितीने निर्माण केलेल्या आव्हानांतून वाट काढत पुढे जाणे आणि कधी तरी परिस्थिती शांत होईल अशी वाट पाहणे हेच त्यांच्या हाती होते. ती परिस्थिती तर शेवटपर्यंत शांत झाली नाही आणि आता तर तोच या जगात नाही. गेल्याच आठवड्यात त्याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. आता केवळ त्याच्या आठवणींच्या साथ संगतीत आणि वाट्याला आलेल्या मोजक्या काही क्षणांच्या पाऊलखुणा जागवत तिला आपले पुढचे दिवस काढायचे आहेत. त्याचे नाव लिऊ झिओबो आणि तिचे नाव लिऊ झिआ. त्यांच्या वादळी प्रेमाची आणि त्याहूनही वादळी सहजीवनाची ही कहाणी.

झिओबो आणि झिआ हे दोघेही चिनी कम्युनिस्ट शासन आपल्याला विरोध करणाऱ्यांची काय अवस्था करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. याबाबतची सर्वात दुर्दैवी गोष्ट अशी कि झिओबो जरी राजकीय विषयांवर काम करत असले, सातत्याने शासनावर टीका करत असले तरी झिआ यांना राजकारणात तसा रस नव्हता. मात्र झिओबो यांच्यावरील राग शासनाने कायम झिआ यांच्यावर काढला. एका अर्थाने झिओबो भाग्यवान कारण त्यांना जसे हवे तसे आयुष्य जगता आले. आपल्या विचारांसाठी झगडता आले. मात्र त्या आयुष्याच्या चटक्यांनी भाजून निघाली ती त्यांची सहचारिणी झिआ. तिचे कवयित्रीचे मन मात्र वाट्याला आलेला एकांतवास, सरकारी नजरकैद आणि विरहाचे दु:ख यांनी होरपळून निघाले.

या साऱ्या कहाणीची सुरुवात होते १९८९ मध्ये. अनेकविध बदलांनी तेव्हा जग ढवळून निघत होते. त्याच वर्षी शीत युद्धाचे प्रतीक मानली जाणारी बर्लिनची भिंत कोसळली आणि जर्मनीचे एकीकरण झाले. त्याच काळात कम्युनिझमच्या अंताची सुरुवात झालेली होती. जगभरात १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात कम्युनिस्ट राजवटी अस्थिरतेच्या गर्तेत सापडल्या होत्या. सोव्हिएत रशियात खुलेपणा आणि पुनर्रचना यांचे वारे वाहत होते. चीनमध्ये मात्र आर्थिक खुलेपणा यायला सुरुवात झाली असली तरी राजकीय बाबतीत शासनाचे पूर्ण नियंत्रण होते. तिथे माणसांना जगण्याचे मुलभूत हक्क सुद्धा नाकारले जात होते. त्यामुळे आपल्या देशात सुद्धा खुलेपणा यायला हवा, लोकशाही असायला हवी, आपल्याला सुद्धा मुलभूत मानवी हक्क मिळायला हवेत यासाठी त्या देशातील तरुणांनी राजधानीत आंदोलने सुरु केली. चिनी राजधानी बीजिंगमध्ये या मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी जमा झाले होते आणि शासनाला थेट आव्हान देऊ लागले होते. कोणत्याही बंदिस्त राजवटीला अशी आव्हाने आवडत नाहीत. चीनसारख्या देशातील राजवटीला तर नाहीच नाही. त्यामुळे चिनी शासनाने अतिशय निर्दयीपणे, लष्कराचा वापर करून हे आंदोलन चिरडले. हजारो विद्यार्थी यात मारले गेले.

जेव्हा चीनमध्ये विद्यार्थ्यांची अशी आंदोलने सुरु झाली तेव्हा झिओबो एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळाल्याने अमेरिकेत होते. ते तेथून चीनमध्ये परत आले. तिआनमेन चौकात चिनी शासनाने रणगाडे आणि लष्कर आणून हल्ला करण्याआधी झिओबो यांनी विद्यार्थ्यांशी आणि शासनाबरोबर वाटाघाटी करून शेकडो विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले होते. मात्र याच त्यांच्या मध्यस्थीमुळे आणि लोकशाहीवादी राजकीय मतांमुळे त्यांना त्याच वर्षी तुरुंगवासात पाठवण्यात आले. दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून ते १९९१ मध्ये बाहेर आले.

तुरुंगातून बाहेर आल्यावर झिओबो यांनी आपले शासनविरोधी लेखन आणि काम चालूच ठेवले होते. मात्र तुरुंगात असताना त्यांची विद्यापीठातील प्रतिष्ठेची नोकरी गेली होती. घर जप्त झाले होते. त्यांचे पहिले लग्नसुद्धा मोडले. अक्षरशः सर्वस्व गमावून झिओबो तुरुंगातून बाहेर आले होते. मात्र झिआ आणि त्यांचे प्रेम त्यानंतरच्याच काही वर्षांत बहरले असावे. कारण याच सुमारास कधी तरी झिआ यांचे सुद्धा आधीचे लग्न मोडले आणि झिओबो हे झिआ यांच्या घरी राहायला गेले. झिओबो यांचे एकूण कर्तुत्व आणि राजकीय मते पाहू जाता अशा व्यक्तीला आपल्याबरोबर ठेवणे म्हणजे पदरी विस्तव बाळगण्यासारखे होते. मात्र झिआ यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याबाबत पूर्ण पाठिंबा दिला. याच काळात झिआ यांनीही सुरक्षित सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ कविता लेखन आणि इतर छंद यांच्या आधारे जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. मात्र झिओबो यांच्याबरोबर असलेले सहजीवन कसे असेल याची बऱ्यापैकी कल्पना झिआ यांना त्यावेळेपर्यंत आलेली होती तरीही त्यांनी झिओबो यांची साथ सोडली नाही.

उलट पहिल्या तुरुंगवासानंतर झिओबो यांना १९९६ मध्ये लेबर कॅम्प मध्ये तीन वर्षांसाठी पाठवण्यात आले तेव्हा त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वैचारिक बाबतीत पुनःप्रशिक्षण करणे हा हेतू ठेवून चिनी सरकारने त्यांची रवानगी इथे मध्ये केली गेली होती. बीजिंग शहरापासून दीड हजार किमी अंतरावर ईशान्य चीनमध्ये हा कॅम्प होता. दोघांचे लग्नसुद्धा तिथेच झाले. लग्नाची मेजवानी त्यांनी कॅम्पमधील कँटीनमध्ये दिली. दोघांचे हे मुलखावेगळे लग्न होताना सुद्धा सतत अडचणी येत होत्या. लग्नाचे फोटो काढण्यसाठी जो केमेरा आणला होता तो ऐनवेळी बंद पडला. चिनी कायद्यानुसार जर लग्नाचे फोटो नसतील तर ते लग्न कायदेशीर मानले जात नाही. अखेरीस मग झिओबो आणि झिआ या दोघांचेही एकेकट्याने घेतलेले जुने फोटो एकमेकांच्या शेजारी चिकटवून लग्नाचा फोटो तयार केला गेला!

लग्न झाल्यानंतर पुढे तीन वर्षे झिओबो लेबर कॅम्पमध्ये होते. दोघा पती पत्नींची भेट महिन्यातून एकदा होत असे. तीही अवघ्या तासाभराची. ती भेट घेतानासुद्धा चिनी सरकारी अधिकारी आजूबाजूला असत. खाजगीपणा वगैरे काहीही नाही. त्या तेवढ्या भेटीसाठी झिआ दीड हजार किमीचा प्रवास करून जात आणि परत येत. त्या बर्फाळ प्रदेशातील बोचऱ्या वाऱ्यांचा आणि सरकारी छळाचा सामना करीत झिओबो आपली लोकशाहीवादी राजकीय मते आणि झिआ यांच्या प्रेमावरील निष्ठा अभंग ठेवून होते. त्या काळात झिओबो आणि झिआ या दोघांनीही एकमेकांना भरपूर पत्रे लिहिली, एकमेकांवर उत्कट कविता केल्या. दुर्दैव असे कि चिनी शासनाने त्यापैकी फारच कमी पत्रे त्यांच्यापर्यंत पोचू दिली. बरेचसे लेखन तर जप्तच केले. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा सरकारी धाड पडत असे तेव्हा तेव्हा झिओबो यांचे लेखन गायब होत असे.

लग्नाची पहिली तीन वर्षे असा दुरावा सहन केल्यानंतर झिओबोंची सुटका झाली. ते परत आले आणि पुन्हा लेखन, राजकीय काम यात अडकले. त्यांच्या कामामुळे सतत त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असायची. घरावर पोलिसांची नजर असायची. जीवनातील कोणतीही सुखे सहजासहजी त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत याची पूर्ण काळजी शासन घेत असे. झिओबो यांनी एकदा झिआ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक मागवला होता. तो पोलिसांनी अडवला. काय तर म्हणे आजकाल सर्वत्र बॉम्बस्फोट होत आहेत आणि झिओबो यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे केक आणणे योग्य नाही. तसेच त्याच दिवशी झिआ यांची एक मैत्रीण वाढदिवस साजरा करायला वाईनच्या दोन बाटल्या घेऊन येत होती. त्या बाटल्याही पोलिसांनी अडवल्या. इतक्या साध्या साध्या गोष्टींमध्ये सरकारी हस्तक्षेप होत असे. एका अर्थाने पाहू जाता झिओबो आणि झिआ यांच्या प्रेमात चिनी शासन हा एक तिसरा घटक कायमच अस्तित्वात होता. त्यांच्या प्रेमाला शासकीय दडपशाहीची काळी कुट्ट किनार असल्यामुळेच असेल कदाचित पण त्यांचे सहजीवनाचे ते दिवस उजळून निघालेले आहेत. अगदी झिओबो यांच्या शेवटपर्यंत आणि मृत्युनंतर सुद्धा शासनाने त्यांच्या जीवनातील आपला हस्तक्षेप कायम ठेवला.

झिओबो यांनी २००८ मध्ये चीन मध्ये नवी राज्यघटना यावी आणि बहुपक्षीय लोकशाही पद्धत आणावी अशी मागणी करणारा एक जाहीरनामा तयार करण्यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी बीजिंगमध्ये अतिशय यशस्वी अशा ऑलिम्पिक स्पर्धा होऊन गेल्या होत्या. त्यामुळे चिनी शासनाला आता आंतरराष्ट्रीय टीकेची भीती उरली नव्हती. हा जाहीरनामा तयार करून त्यावर विचारवंत आणि इतर लोकांच्या सह्या मिळवण्यासाठी झिओबो बरेच सक्रीय झाले होते. त्यांच्या हा कृत्यामुळे चिनी शासनाने त्यांना अटक केली आणि देशद्रोहाचा खटला भरून त्यांना अकरा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ही शिक्षा युरोप अमेरिकेत ख्रिसमसचा सण असतो त्याच सुमारास सुनावली. यामागील हेतू असा कि सण साजरा करण्यात गुंतलेल्या जगाचे त्याकडे फार लक्ष जाऊ नये.

या जाहीरनाम्याची पहिला मसुदा घरात आल्यापासून झिआ यांना असे वाटत होते कि काही तरी वाईट घडणार आहे. पुढे तसे त्यांनी एका मुलाखतीत सुद्धा सांगितले आहे. आणि झिआ यांची भीती खरी ठरली. झिओबो यांना अटक झाली. जाहीरनामा तयार करण्यातील कामामुळे आणि चीनमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधल्याबद्दल झिओबो यांना २०१० मध्ये अतिशय प्रतिष्ठेचे असे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. मात्र आता परिस्थितीने एक वेगळेच वळण घेतले. हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी झिओबो यांना जाऊ देण्यास चिनी शासनाने नकार दिला. त्यांच्या सुटकेची मागणी जगभरातून होत होती तीसुद्धा फेटाळली. पूर्वी सोव्हिएत रशिया आपल्या देशातील लेखक, कलावंत यांच्याबाबत असे वागत असे. कम्युनिस्ट चीनने त्याचाच कित्ता गिरवला.

झिओबो यांचे भाषण पारितोषिक वितरण समारंभात वाचून दाखवण्यात आले. ते आले असते तर ज्या खुर्चीवर बसले असते ती खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. ती रिकामी खुर्ची हे चिनी शासनाच्या दडपशाहीचे प्रतीक ठरली. आपल्या भाषणात झिओबो यांनी ‘माझ्या मनात (आपल्याला शिक्षा देणाऱ्या पोलीस, न्यायाधीश आणि इतर सरकारी अधिकारी, दडपशाही करणारे चिनी शासन अशा) कोणाहीबद्दल द्वेषभावना नाही’ असे सांगितले कारण ‘द्वेषभावनेमुळे देशातील सहानुभूती आणि मानवता नष्ट होते आणि देशाचा लोकशाही आणि स्वातंत्र्याकडे होणाऱ्या प्रवासात अडथळे येतात’. नेल्सन मंडेलांची आठवण यावी असे हे प्रतिपादन आहे. आपल्या याच भाषणात शेवट त्यांनी पत्नी झिआ यांचा गौरवाने उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘जरी आमच्या प्रेमामध्ये बाह्य परिस्थितीमुळे कडवटपणा आलेला असला तरी आता मला त्याची रेंगाळणारी चव हवीहवीशी वाटते’. झिआ यांच्यामुळेच मी इतका संघर्ष करू शकलो असे सांगत त्यांनी कधी तरी चीनमध्ये लोकशाही येईल याबाबत आशावाद व्यक्त केला होता.

या भाषणानंतर शासनाने झिआ यांच्याकडे लक्ष वळवले. झिओबो असेही तुरुंगात होतेच. शासनाने झिआ यांना नजरकैदेत ठेवले. त्यांच्या घरातील फोन आणि इंटरनेट कनेक्शन तोडले. जवळचे नातेवाईक आणि काही मित्र वगळता इतर कोणाशीही बोलण्यावर बंधने आणली. सुरुवातीला झिआ यांना वाटले कि अशी परिस्थिती महिना दोन महिने टिकेल आणि बाकी मग सर्व पूर्वपदावर येईल. मात्र तसे व्हायचे नव्हते. यावेळेस सरकारने त्यांचा पूर्ण छळ करण्यचा चंगच बांधला होता. सर्वात वाईट भाग म्हणजे आपल्याबाबत काय केले जात आहे हे झिओबो यांना सांगण्यावर सुद्धा शासनाने बंदी घातली. तसे काही उल्लेख त्यांच्या बोलण्यात आले तर लगेच त्यांची भेट संपवली जात असे. मात्र एकदा ‘माझीही अवस्था तुझ्यासारखीच आहे’ असे त्यांनी सांगितले होते त्यातून झिओबो यांना काय होत असावे याचा अंदाज आला असावा.

या सततच्या मानसिक छळामुळे संवेदनशील मनाच्या, आनंदी स्वभावाच्या झिआ यांच्यावर परिणाम झाला. त्यांची आनंदी वृत्ती हरवत चालल्याचे त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले होते. मध्यंतरी एकदा एका परदेशी वृत्तसंस्थेने सुद्धा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यातून सुद्धा असेच लक्षात आले होते. रोजच्या जगण्यावरील बंधने आणि हा छळ भोगायला झिओबो सोबत नसणे यामुळे झिआ यांना नैराश्य आले असावे. त्यांनी त्या परदेश वृत्तवाहिनीला सांगितले होते कि त्या अजूनही मन रिझवण्यासाठी चित्र रंगवणे, फोटोग्राफी करणे असे छंद थोडेफार जोपासत होत्या. अर्थात इतकी खोलवर मानसिक घुसमट होत असताना लिहिणार तरी काय आणि फोटोग्राफी तरी कसली करणार?

तसेच त्यांनी त्याच मुलाखतीत असेही सांगितले होते कि, जेव्हा झिओबो परत येतील तेव्हा जर त्यांना लक्षात आले कि मी यापैकी काहीच करत नव्हते तर ते माझ्यावर फार चिडतील कारण चित्र, फोटोग्राफी यातूनच मला समाधान मिळते हे त्यांना माहित आहे. झिओबो आणि झिआ यांची एकमेकांना किती खोलवर ओळख होती हे दाखवणारा हा प्रसंग आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रकारे होणाऱ्या छळाला त्या इतक्या शांतपणे कशा तोंड देऊ शकतात असा प्रश्न त्या परदेशी वार्ताहराने झिआ यांना विचारला होता. आपण केलेले वाचन आणि त्यातून तयार झालीली वृत्ती आता आपल्या उपयोगाला येत आहे असे त्यांनी त्यावर उत्तर दिले होते. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले होते.

झिओबो यांना केन्सर झाला आहे हे २०१७ च्या जून महिन्यात जगाला कळले. त्यांना उपचारासाठी चीनच्या बाहेर पाठवावे आणि त्यांच्यासोबत झिआ यांनाही येऊ द्यावे अशी मागणी जगातून होत होती. मात्र त्याला चीनने ठाम नकार दिला. जर उपचारांसाठी आपल्याला देशाबाहेर जाता आले तर झिआ यांना बाहेर जाऊन परदेशात कायमचे राहता येईल आणि त्या दृष्टीने बाहेर जाणे फार उपयुक्त ठरू शकेल असेही झिओबो यांना वाटत होते. तसेच गेल्या काही वर्षांत आपल्यामागे झिआ यांना आर्थिकदृष्ट्या नीट जगता यावे यासाठी झिओबो प्रयत्न करत होते. अखेरीस या वर्षीच्या जुलै महिन्यात झिओबो यांची झुंज संपली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत तुरुंगाच्या बाहेर रुग्णालयात त्यांना ठेवण्यात आले होते. तसेच या शेवटच्या काही दिवसांत झिआ त्यांच्यासोबत होत्या. आता तरी चीन सरकारने त्यांच्यावरील बंधने उठवावी आणि त्यांना मोकळ्या मनाने जगू द्यावे अशी आशा आता जगाला आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या सत्तर वर्षांत सरकारी तुरुंगात असताना मरण पावलेले लिऊ झिओबो हे पहिलेच नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. ते एका कम्युनिस्ट देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी संघर्ष करत होते. आपल्या या राजकीय मतांची किंमत त्यांनी चुकवली. ऐन उमेदीची गेली तीस वर्षे सरकारी छळ त्यांनी सहन केला. नेमक्या याच काळात लिऊ झिआ त्यांच्या बरोबर होत्या. झिओबो यांच्या बरोबरीने झिआ यांनाही छळ सोसावा लागला. कोणत्याही हुकुमशाही राजवटीत विरोधकांच्या कुटुंबियांना लक्ष्य करणे हे सर्रास केले जाते. झिआ सुद्धा त्याला अपवाद नव्हत्या. झिओबो तुरुंगाच्या आत राहून छळ भोगत होते तर झिआ यांना तुरुंगाच्या बाहेर राहून सरकारी दडपशाहीचा सामना करावा लागला. या संघर्षाची किंमत त्यांनी एकमेकांपासून येणारा दुरावा, मानसिक तणाव आणि एकांतवास याद्वारे चुकवली. झिआ यांच्यासारख्या संवेदनशील मनाच्या कलावंताने या साऱ्या दिवसांच्या काय वेदना भोगाव्या लागल्या असतील याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. या छळाच्या सोबतीला जोड होती कौटुंबिक दुःखाची. गेल्या वर्षभरात झिआ यांचे आई आणि वडील दोघेही मरण पावले असून त्यांच्या भावाला काहीही कारण नसताना कोर्टाच्या केसेसना सामोरे जावे लागत आहे. यातच भर म्हणजे ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले ते झिओबो आता या जगात नाहीत. त्यामुळे ‘ही वाट एकटीची’ म्हणत त्यांना आता आपला पुढचा प्रवास करायचा आहे.

दरम्यान झिओबो हे चीनमधील लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्यांचे कायम प्रेरणास्थान म्हणून राहतील. चीन सरकारने त्यांची स्मृती पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न गेल्या काही दिवसांत केला आहे. तसेही गेल्या पाच वर्षांत चिनी शासन आपल्या देशांतर्गत विरोधकांबाबत अधिकाधिक असहिष्णू होत गेले आहे. त्यामुळे झिओबो यांच्या अंत्यविधीचा समारंभ होऊ न देता अतिशय खाजगी पद्धतीने त्यांना अखेरचा निरोप दिला गेला. चिनी सरकारच्या या प्रयत्नामुळे झिओबो जगभरातील लोकांना आता पुन्हा नव्याने माहित झाले आहेत. लोकशाहीवादी चीन अस्तित्वात येईल तेव्हा येईल पण जोपर्यंत त्यासाठी असा संघर्ष करणारे झिओबो यांच्यासारखे व त्यांना शेवटपर्यंत साथ देणारे पत्नी झिआ यांच्यासारखे लोक चीनमध्ये आहेत तोपर्यंत लोकशाहीसाठी थोडीफार आशा बाळगायला काहीच हरकत नाही!

(पूर्वप्रसिद्धी: साप्तहिक साधना २९ जुलै २०१७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख, बरेच दिवसांनी काहीतरी वेगळ्या विषयावरचं लेखन बघून बरं वाटलं.
पु ले शु

तुमच्या लेखणीतून माहिती संकलनापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषणात्मक लेखांची अपेक्षा आहे. या विषयात आणि विद्वतशाखेत अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञ लोकांचे दृष्टिकोन आणि मते वाचायला कायमच आवडतील. Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

माहिती संकलन केलेले लेखन मी करीत नाही अशी माझी समजूत आहे, वरदा. Happy

मायबोलीवर स्वागत.
छान लेख, बरेच दिवसांनी काहीतरी वेगळ्या विषयावरचं लेखन बघून बरं वाटलं.

मस्त ! पात्रांची नावे वाचून काहीतरी वेगळ्याच म्हणजे विनोदी वगैरे पठडीतील लेखाच्या अपेक्षेने उघडले.. पण हे तर कमाल निघाले __/\__

<<<<<<
द्वेषभावनेमुळे देशातील सहानुभूती आणि मानवता नष्ट होते आणि देशाचा लोकशाही आणि स्वातंत्र्याकडे होणाऱ्या प्रवासात अडथळे येतात
>>>>>>

+ 786