पुन्हा कधी ―भाग पहिला

Submitted by र।हुल on 3 July, 2017 - 15:28

भाग- पहिला

कुठल्यातरी सुक्ष्म पातळीवर मनाच्या अर्धजागृत अवस्थेत असताना त्याच्या स्मृतीपटलावर तीचं दृश्य साकार होत होतं पण अगदीच अस्पष्ट! अंग कमालीचं जड पडलं होतं जणू शरीराचा कुणीतरी ताबा घेतला होता आणि त्याला नियंत्रित करू पहात होतं कुठल्यातरी गुढ आणि अनाकलनीय शक्तीनं. बराच वेळ त्या स्लिप पैरालिसिस च्या अवस्थेत गेल्यानंतर त्याला अचानक त्याच्या 'मी'पणाची जाणिव झाली आणि त्यानं मंत्रानं दिशा बांधायला सुरूवात केली. जसजसे तो मंत्र म्हणत होता, तसतसे लालनिळे वलयं त्याच्या सभोवताली आकार घेऊ लागले. तीन आवर्तनं पुर्ण होताच त्याचा दिर्घ रोखून धरलेला श्वास सुटला आणि भोवताली जमा होऊ लागलेली रक्षाकंकणं क्षणार्धात उधळली गेली आणि तो असहाय्य बनला.
गडगडाटी हसत आणि राक्षसी गर्जना करत तिनं तिचं अस्तित्व दाखवून दिलं. श्वास रोखून तो तिच्या आक्राळविक्राळ रूपाकडं बघतच राहीला. त्याला बंधक बनवून तीनं आपल्याबरोबर चालण्यास फर्मावलं. तो गुमान मान खाली घालून तिच्यामागोमाग चालू लागला..पराभूत मानसिकतेनं! ते दोघं जात होते तिच्या गढीकडे..तिच्या साम्राज्यात..अशा ठिकाणी जिथून पुन्हा माघारी परतून येणं कधीही शक्य नव्हतं..तो मनात विचार करू लागला सुटण्यासाठी प्रयत्न करण्याचा..पण तिनं जाणलं हे तिच्या शक्तीनं..त्याच्याकडे बघत तिनं ओठांनी काहीतरी पुटपुटलं आणि तो स्मृती हरवून बसला...
समोर दिसत होती तिचा सैतानी नंगानाच असणारी ती अदभुत्-अघोरी गढी..आतमधून बाहेर जांभळा निळा प्रकाश फेकणारी उंचच उंच खिडक्यांची ती रंगीत तावदानं..चारही बाजूंना पेटत्या ढणाणणार्या मशाली असलेली ती गढ़ी मंत्रमुग्ध झाल्यागत तो बघतच राहीला.. त्या पेटलेल्या ज्वालांनी त्याच्या मनाच्या अंतरंगात काहीतरी हालचाल घडवून आणली..त्याच्यावर जन्मोजन्मी करण्यात आलेले अग्निसंस्कार त्याला आठवले आणि तो पुटपुटला,

ॐ अग्नेः...........
________
स नः पितेव सूनवे.अग्ने सूपायनो भव। सचस्वा नः सवस्तये।ॐ..

त्याच्या पुटपुटण्यानं त्यानं आवाहन केलेला अग्नी विद्युल्लतेच्या चपळाईने त्याच्याकडे झेपावला. बंधक बनविलेल्या त्याला, तिच्या पाशवी जोखडातून बंधमुक्त करत तो अनल शांत झाला.
'अलख्ख' ची गगनभेदी आरोळी आसमंतात दुमदुमली. त्या एकाच आरोळीनं क्षणार्धात बाजू पालटली. मघाशी असलेला तीचा तो अघोरी अहंकार कुठल्या कुठे नाहीसा झाला. त्याच्यासमोर शरणागती पत्करण्याऐवजी ती वेगानं तिच्या गढ़ी कडे झेपावली स्वसंरक्षणार्थ! त्या गढ़ीच्या अदृष्य सिमारेषेच्या आंत पावलं टाकताच तीनं मागे वळून तिच्या त्या रक्ताळलेल्या नजरेनं जखमी वाघासारखं त्याच्याकडे रोखून पाहीलं आणि आव्हान देत म्हटलं,
"पुन्हा कधी!"...
.
.
.
ॐ भुर्भुवःस्वहा। तत्स्यवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धिमही। धी यो योन: प्रचोदयात्।।ॐ
नदीच्या पाण्यानं रोरावत वाहणार्या पात्रातील खडकाळ टेकडीवर पद्मासनात बसून त्यानं गायत्रीनं अग्नीला तृप्त करत धुनी सिद्ध केली. वार्याच्या वेगासोबत धडाडणार्या त्या ज्वालांनी उग्र रूप धारण केलं. सिद्धाग्नीचं ज्वालांमधील अस्तित्व आता ज्वालांच्या बदलणार्या रंगांमुळे जाणवू लागल्यावर हर्षोल्हासानं त्यानं मंद स्मित केलं, असं जणू तो त्या अग्नीत आवाहन करून बोलाविलेल्या देवतांशी गुढ भाषेत संभाषणच करतोय! शेवटची गायत्रीची आहुती अर्पण करुन त्यानं शांतपणे डोळे मिटले. प्रयत्नपूर्वक भ्रूमध्यात स्थिरावलेल्या अंतर्दृष्टी समोर लखलखीतपणे दिसू लागला तो निळाशार तेजस्वी प्रकाश फेकणारा त्राटकबिंदू. श्वासांची लय संथ होत चालली.

दुर किनार्यावरून बघणार्यांना किती विलोभनीय तरी विरोधाभासी असलेलं ते दृश्य दिसत होतं! आजूबाजूनं रोरावत वाहणारं नदीचं भरलेलं पात्र. तिच्या मध्यभागी असलेल्या त्या खडकाळ टेकाडावर भडकणार्या अग्नीज्वालांच्या सान्निध्यात डोळे बंद करून गुढ साधना करणारा असा तो शांत संयमी कृश शरीरयष्टीचा नाथपंथी साधक. नदीचं पाणीही कणाकणानं आपली पातळी उंचावत होतं जणू तेही त्याचा चरणस्पर्श घेण्यासाठी आसुसलेलं असावं.
बराच वेळ त्या ध्यान लावलेल्या स्थितीत गेल्यानंतर त्यानं आपले डोळे उघडले. एव्हाना सिद्धाग्नी मंद होत चाललेला. त्याकडे बघत त्यानं समर्पणाचे मंत्र म्हणत अग्नीला निरोप दिला. धुनीला वंदन करून तो जागेवरून उठला एका नव्या उत्साहानं! बाजूला ठेवलेला चिमटा हातात घेत तो टेकडीवरून नदीपात्राकडे सावकाशपणे उतरू लागला. पाण्याजवळ पोहोचताच एक जोरदार लाट त्याच्या दिशेनं आली. त्याच्या पायांना स्पर्श करत त्या लाटेनं त्याला नखशिखांत भिजवून टाकलं. तो तसाच पाण्यात पुढं सरकला. वेगानं उचंबळणारं ते पात्र लिलया पार करत त्यानं किनारा गाठला. किती सहज होतं त्याचं सगळंच! बघणार्यांना अचंबित करणार. पंचमहाभूतांवर असलेलं त्याचं प्रभूत्व असामान्य असंच होतं पण तरीही काय कमी होतं काल? का तो काहीवेळा साठी तिचा बंधक बनून तिच्याबरोबर तिच्या गढीकडं निघाला होता? फक्त त्यालाच स्वत:ला याची सगळी उत्तरं माहीत होती. त्याचं तेज लपत नसलं तरी त्याच्या ठायी असलेल्या सगळ्या असामान्य गोष्टी त्याच्या स्वत: च्या नव्हत्याच. निसर्ग त्याला करत असलेलं वंदनही त्याला नव्हतं, मघाशी पाण्यानं घेतलेलं दर्शनही, त्याचं घेतलेलं दर्शन नव्हतं. काल रात्री तिच्या गढीवर जात असताना त्यानं अग्नीसुक्तानं आवाहन केलेला अग्नी त्याच्या स्वत:च्या प्रभावामुळं त्याच्या मदतीला धावून आलेला नव्हता. घडणारं हे सर्व केवळ त्याच्या चैतन्यमय अवस्थेतील समाधीस्थित गुरूदेवांच्या तपोबळानं त्याच्यासाठी घडून येत होतं हे मर्म फक्त तोच जाणत होता. त्या तपोबळाची स्पंदनं तो साधनेत असताना अनुभवायचा. आता त्याला फक्त एकच ध्यास लागलेला होता, आपल्या ठायी असलेल्या अपुर्णतेला पुर्णत्वाकडे नेण्याचा, कानात बिजमंत्र फुंकून दिलेल्या साधनेच्या मदतीनं आणि विनयाच्या जोरावर....

साधनेगणिक कणाकणानं वाढणारं तपोबळ त्याला दररोज नव्या उंचीवर नेऊन ठेवत होतं. दरदिवशी ध्यानात एक एका नविन अनुभवाची भर पडत होती.. अद्वितीय स्वरूपाच्या त्या अनुभवांनी त्याचं आध्यात्मिक जिवन अधिकाधिक समृद्ध होत होतं. त्या साडेतीन वेटोळे मारून उर्ध्वगामी मुख करून बसलेल्या सर्पिनीचा* जाग आल्यानंतरचा प्रवास आतापावेतो मणिपुरात येऊन पोहोचलेला. मुलाधारातली स्पंदनं क्रमाक्रमानं वरवर सरकत होती. त्याच्या अंगावरील सगळं मांस, चरबी खाऊन तृप्त झालेली ती अनाहताकडे झेपावत होती. त्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळीधमक होऊन चकाकत होती. शरीर पिसाप्रमाणं हलकंहलकं झालं होतं जणू काही कापसाचा गोळाच! तासन्तास ध्यानमग्न अवस्थेत राहील्यानं जगाचं अस्तित्व त्याच्यालेखी नगण्य होतं. मोह-मायेचे पाश सैल झाले होते.वैराग्याकडे कललेलं त्याचं लौकीक मन त्याला अधिकाधिक अंतर्मुख बनवून उन्मनी कडे नेऊ लागलं होतं. भूक, तृष्णा या शरीराच्या गरजा सहजपणानं हळूहळू कमी होत जाऊन केवळ जपाच्या लयबद्ध श्वासांवर त्याचं सगळं शरीर चालू लागलेलं.. त्यानं ठरवल्याप्रमाणं प्रत्येक दिवस पार पडत होता. नदिवरचं रोजचं नियोजित 'साधन' चालूच होतं आणि अशातच एक दिवस एक विलक्षण घडलं...

―₹!हुल

क्रमशः

[*सर्पिनी-कुंडलिनी]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users