दिसला गं बाई दिसला

Submitted by pratidnya on 26 July, 2017 - 14:02

तशी मला निसर्गाची लहानपणापासूनच आवड. पण अकरावी बारावीला वनस्पतीशास्त्राच्या विषयातली किचकट लॅटिन नावे वाचून पुन्हा बॉटनीच्या वाटेला जायचे नाही असे ठरवून इंजिनीरिंग करण्याचा मूर्ख निर्णय घेतला. पण एखादी गोष्टी करायची नाही असे ठरवले आणि मग मात्र ती करावीच लागली असे बऱ्याचदा झालेय. आपली निसर्गाची आवड फक्त पक्षीनिरीक्षणापुरती मर्यादित ठेवावी आणि झाडांना त्यात आणू नये असा ठाम निश्चय केला असतानाही पक्ष्यांवरून गाडी फुलपाखरांकडे वळली आणि या जगातल्या निष्णात बॉटॅनिस्टने मला पुन्हा झाडांकडे आणून सोडलं. फुलपाखरांच्या होस्ट वनस्पती शोधताना त्यांची हळुहळू आवड लागू लागली. मग ठाण्यातल्या फर्न संस्थेचा बेसिक बॉटनी हा कोर्स लावला आणि दर शनिवार रविवार नित्यनेमाने या नव्या मित्रांची भेट घडू लागली. लहानपणीचा मामाच्या अंगणातला चाफा, गावातल्या गिरणीमागचा गुलमोहोर,अंगणातला शेवगा हे बालपणीचे मित्र पुन्हा नव्याने आठवू लागले.
एकदा फर्नच्या वाचनालयातून नवा आसमंत हे पुस्तक आणले आणि त्यात ओळख झाली एका नव्या मित्राची. ' Barringtonia acutangula' म्हणजे नेवर. त्यात या झाडाच्या फुलांच्या सड्याचे इतके सुंदर वर्णन केले आहे कि बस्स. काही करून हे झाड पाहायचेच असे ठरवले. नेवर कोकणात मोठ्या प्रमाणावर आढळतो. बहुधा नदीकाठी किंवा समुद्राजवळ वाढणारे हे झाड आहे. याचाच एक भाऊ 'Barringtonia racemosa' म्हणजे समुद्रफळ मरिन ड्राईव्हच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर आढळतो. तेवढा नेवर काही मुंबईमध्ये कॉमन नसावा. राणीच्या बागेमध्ये पाहायला मिळेल असं सांगण्यात आले पण याच्या फुलांची फ़ुलायची वेळ संध्याकाळी त्यामुळे फुललेला नेवर काही तिथे पाहायला मिळाला नसता.
पण अनपेक्षितपणे आमची भेट शेवटी झालीच. आमच्या कंपनीचे चीफ मांजरेकर सर गेल्यावर्षीच निवृत्त झाले होते. त्यांची आणि माझी निसर्गाची आवड सारखीच. त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. बोलता बोलता त्यांनी या खिडकीबाहेर दिसणाऱ्या झाडाचे नाव सांगशील का असे विचारले. पाने ओळखीची वाटत होती. कुठे पहिली असावी बरं ? अचानक ऑफिसमधला आणि मरिन ड्राईव्हवरचा ' Barringtonia racemosa ' आठवला. पण ही पाने तर त्यापेक्षा लहान वाटत होती. अरेच्चा मग हा नेवर तर नव्हे. एकदम सरांना विचारलं कि याला लाल रंगाची दीपमाळेसारखी फुले येतात का? सर हो म्हणाले. मग तर शंकेला जागाच नव्हती. असा ध्यानीमनी नसताना अचानक भेटेल असा वाटलंही नव्हता. झाडाला फुले येऊन गेली होती. एकच माळ पानाआडून लटकत होती. त्यावरच समाधान मानावे लागले. सरांना अतिशय उत्साहात नेवरबद्दल माहिती दिली. त्यांच्या मिसेस अतिशय खुश झाल्या. मला म्हणाल्या कि त्यांना या झाडाचा वैताग यायचा. याच्याऐवजी एखादे आंब्याचे झाड असते तर किती बरं वाटलं असत असं त्यांना सारखं वाटत राहायचं. आता याची माहिती सांगितल्यावर या झाडाकडे बघून खूप छान वाटते आहे असं त्या म्हणाल्या.
तरीदेखील फुललेला नेवर पाहायची इच्छा पूर्ण झाली नव्हतीच. पण तीही लवकरच पूर्ण झालीच. आमच्या फर्नमधल्याच एका विद्यार्थिनीने म्हणजे कल्याणमधल्या वैदेहीकाकूंनी त्यांच्या घराजवळ असलेल्या तीन नेवरांपैकी एक पूर्ण फुलला असल्याचे कळवले. मग एका शनिवारी संध्याकाळी कॅमेरा घेऊन आम्ही आमचा मोर्चा तिथे वळवला. संध्याकाळी सहा वाजता तिथे पोहोचल्यावर झाडांवर विरळ फुलांच्या माळा पाहायला मिळाल्या. फुले अजून फुलली नव्हती. तरीही त्यावर खूप मधमाश्या घोंगावत होत्या.
प्रचि १
1.jpg

पंधरा वीस मिनिटांनी चहा पिऊन पुन्हा यायचे असे ठरवले. पंधरा मिनिटांनी परत आल्यानंतर जे काही दृश्य दिसले त्याचे सौंदर्य मला शब्दांत मांडता येणार नाही.
प्रचि २
2.jpg
प्रचि ३
3.jpg
प्रचि ४
4.jpg
प्रचि ५
5.jpg
प्रचि ६
6.jpg
प्रचि ७
7.jpg
प्रचि ८
8.jpg

जवळ जवळ एक तासभर मी माझा फुललेला नेवर डोळे भरून पाहिला.मनासारखे हवे तेवढे फोटो काढले. भररस्त्याच्या कडेला अंधारात फुटपाथवर उभ्या राहून, गळ्यात न झेपणारी उपकरणे अडकवून ह्या बायका आणि पोरी काय करताहेत हे विचारायला आलेल्या बायकापुरुषांना पण अगदी उत्साहाने झाडाची माहिती सांगितली. काहींनी काहीतरी येडपट प्रकरण दिसतंय असे तर काहींनी कौतुकाचे कटाक्ष टाकले. पण मला मात्र कशानेच फरक पडणार नव्हता. माझ्या बकेटलिस्टमधील एक इच्छा शेवटी पूर्ण झाली होती.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त फोटोज! Happy
मी हे झाड लहानपणी पाहिलंय. पण याचं नाव माहित नव्हतं.
थँक्स.

सुंदर फोटो.

सरांना अतिशय उत्साहात नेवरबद्दल माहिती दिली. >> नेवर बद्दल आणखी माहिती दिलीत तर आवडेल.

अतिशय मस्त फोटो.

राणी बागेत 3 4 झाडे तरी आहेत आणि पूर्ण फुललेले वृक्ष सहज पाहायला मिळतात. नव्या मुंबईत पण खूप ठिकाणी पाहिलाय पण इथे अजून खुरटी झुपडे आहेत, डेरेदार वृक्ष झालेले नाहीत.

मस्तच
स्क्रोल करताना फोटो दिसल्यावर ओहो झाले Happy

ठाण्यातल्या खोपट रोडच्या दुतर्फ़ा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोल व सुगंधी फळांच्या कदंब वृक्षांवरही असाच सुंदर लेख लिहा!

छ्हन छान Happy आम्ही बहीणी भारद्वाज दिसला कि असा मेसेज करतो एकमेकींना. ते आठवलं.

मस्त फोटो Happy

राणी बागेत 3 4 झाडे तरी आहेत आणि पूर्ण फुललेले वृक्ष सहज पाहायला मिळतात.>>>>, हो एक मगरीच्या तळ्याशेजारी आहे. Happy

कुर्ला सिग्नलच्या जवळ एक झाड आहे. एके दिवशी संध्याकाळी पुण्याला जात असताना अचानक पूर्ण बहरलेलं झाड दिसलं. Happy दापोलीला पन्हाळेकाजी लेणी परीसरात भरपुर झाडे आहेत. Happy

हे झाड, टेबल टेनिस बॅाल सुंदर दिसतात.राणी बागेत आहे.
टेटे आता डोंबिवली फुले स्डेडिअम जवळची दोन फुलली आहेत.
भारद्वाज दिसला की प्रवास चांगला होतो.

Pages