ती गझल- 06 जुलै 2017

Submitted by बेफ़िकीर on 27 July, 2017 - 23:45

जी मनावरती नशा बनुनी पसरते ती गझल
जी कवीपासून मदिरा दूर करते ती गझल

भांडणे होतात माझी सारखी माझ्यासवे
जी स्वतःबद्दल स्वतःचे कान भरते ती गझल

जो तिला प्रत्येकवेळी साथ देतो तो कवी
ऐनवेळी जी कवीलाही विसरते ती गझल

दाद वरवरचीच घेतो आत्मप्रौढीने कुणी
जी मुळापासून हृदयाला उकरते ती गझल

फेकली जाते प्रवाहातून जेव्हा सारखी
भोवरा शोधून त्यामध्ये उतरते ती गझल

प्रियकराच्या वेदनांना मानते प्रसुतीकळा
प्रेयसीच्या बेवफाईने बहरते ती गझल

कडकडाटाची अपेक्षा ठेवती सारे.... तिथे
एक टाळी वाजल्यावर जी बिथरते ती गझल

वाहुनी चिंता जगाच्या वाकते सार्‍यांपुढे
चांगले वागून जी बदनाम ठरते ती गझल

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडकडाटाची अपेक्षा ठेवती सारे.... तिथे
एक टाळी वाजल्यावर जी बिथरते ती गझल

वाहुनी चिंता जगाच्या वाकते सार्‍यांपुढे
चांगले वागून जी बदनाम ठरते ती गझल
>> हे आवडले.

पहिल्याचा मिटर गंडलाय का?

व्वा..क्या बात है!
>>>भांडणे होतात माझी सारखी माझ्यासवे
जी स्वतःबद्दल स्वतःचे कान भरते ती गझल>>>मस्त!

>>>जो तिला प्रत्येकवेळी साथ देतो तो कवी
ऐनवेळी जी कवीलाही विसरते ती गझल>>>जबरदस्त!

>>>जी मुळापासून हृदयाला उकरते ती गझल>>>मिसरा खास!

>>>फेकली जाते प्रवाहातून जेव्हा सारखी
भोवरा शोधून त्यामध्ये उतरते ती गझल

कडकडाटाची अपेक्षा ठेवती सारे.... तिथे
एक टाळी वाजल्यावर जी बिथरते ती गझल>>>सर्वाधिक भावलेले शेर!

बाकी,हे उमजेल त्याची गझल नक्कीच उमलेल!