३. अडुम्बाची विलक्षण सफर (भाग तिसरा )

Submitted by सखा on 29 June, 2017 - 08:02

प्रत्येक देशात आख्यायिका असतात अंधश्रद्धा असतात. अडुम्बा तरी त्याला अपवाद का असेल? ठार घनदाट जंगलातील क्रूर अशा भूर्रा जमातीच्या लोकांनी सुध्दा पिढ्यानं पिढ्या आपल्या आज्जी आजोबां कडून ऐकले होते की एकदिवस सर्वांचा तारणहार सैतानाचा अवतार एका शहामृगावर बसून येईल. तो दिसायला भयंकर असेल, अजब भाषेत बोलेल. नेमके त्याच वेळी चार भूर्ररे बिचारे शिकारीला म्हणून बाहेर पडले होते तेवढ्यात त्यांना दिसले की एक इसम शहामृगावर स्वार होऊन आला आणि जमिनीवर तोंडघाशी पडला. आपला सर्वांचा तारणहार तो हाच असे त्यांच्या मनात आल्याने एका बलदंड भुर्र्याने हाडे शेकलेल्या मास्तरांना मांजरा सारखे अलगद उचलून त्यांना वेताळा प्रमाणे खांद्यावर टाकून वस्तीच्या दिशेने निघाले. आता या चार बलदंड भुर्र्यांच्या मनात काय आहे हे मुटकुळे करून उचलबांगडी झालेल्या मास्तरांना कळणे शक्यच नव्हते. ते बिचारे मराठी मध्ये,
- "अरे बाबारे सोडा रे मी भूमितीचा गरीब मास्तर आहे ..... पाया पडतो सोडा सोडा"
असे बोंबलू लागले तेव्हा त्या चौघा भुर्र्यांना "तो दिसायला भयंकर असेल आणि अजब भाषेत बोलेल" हे अडुम्बाच्या पुराणातले सिम्प्टम्स आठवले. ते देखील जोर जोरात "सोडा" "सोडा" असा जयघोष लागले. त्यांना वाटले या तारणहर्त्याचे नाव "सोडा" आहे.
आता आकाशात सुंदर पौर्णिमेचा चंद्र आला होता. भुर्र्यांच्या वस्तीवर मास्तरांची वरात आल्यावर चंद्रप्रकाशात त्यांना थोडी थोडी गावठी दारू पाजून कबिल्याने "सोडाचे" मस्त स्वागत गेले. भुर्र्या मध्ये पाहुण्यांच्या स्वागताची पारंपरिक पध्धत अशी:
१) पाहुण्यास आधी मोहाची दारू पाजून मग मध्यभागी उभे करावे.
२) आता बाकीच्यांनी पाहुण्या भोवताली गोल रिंगण करावे.
३) आता प्रत्येकाने आळीपाळीने पाहुण्यांचे नाव घेत स्वेच्छे प्रमाणे पाहुण्याच्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करावा.
४) जेव्हढा जोरात लत्ता प्रहार तेव्हढा मोठा मान.

"सोडा सोडा" असा जयघोष चालू असताना एक पाच पन्नास लाथा खाऊन झींगलेल्या मास्तरानी आता माझे स्वागत करायचे सोडा मी कधीच मुलाना मारणार नाही असा नवस मनात सोडला.
कबील्याच्या सरदार मोठा दिलदार माणूस होता. संधी पाहून आपल्या काफिल्यातल्या पाच बायका त्याने ताबडतोब जाहीररित्या मास्तरांना देऊ केल्या परंतु सरदाराच्या महाकाय मुलीने माझा पती पळून गेल्याने याला मी माझा मनोमन पती वरले आहे असे म्हंटल्यावर सरदाराच्या बायका खट्टू होऊन माघारी आल्या.
लोक कशा साठी टाळ्या वाजवत आहेत आणि त्या पाच बायका आपल्या जवळ येऊन परत का गेल्या? तसेच ही महाकाय दिसणारी पैलवान बाई आपल्याला आता खेटून का उभी आहे? हे दारू पिऊन झिंगलेल्या मास्तरला कळेना. दारूचा अंमल चढल्याने त्यांना हसू पण फुटू लागले होते आपले पाहुणे खुश आहेत म्हणून सर्वांनीच आनंदाने भाले आपटत आगी भोवती फेर धरला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती राक्षसी जेव्हा मास्तरला उठल्या पासून हिडीस फिडीस करू लागली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की काल दारूच्या अमला खाली आपले शुभ मंगल या बाईशी लागले आहे. सरदाराच्या सांगण्यावरून पाच भूर्रे नव्या जावयाला आपल्या सारखाच पांढरा निळा पिवळा वनस्पतीचा रंग फासून घेऊन नदीवर गेले. हातात भाला आणि कमरेला चिंचेचा पाला बांधलेले मास्तर जतिवन्त भूर्रे दिसू लागले. नदीवर बायकोनी दिलेली धुणी धुता धुता मास्तरांना भाषा जरी कळली नाही तरी त्यांच्या लक्षात आले की हे बाकीचे पुरुष लोक सुध्दा धुणे धुताना आपल्या बायकांची निंदा नालस्ती करत आहेत आणि आपल्या कडे कारुण्यमय बंधुभावाने बघत आहेत. आता मात्र मास्तराचे धाबे दणाणले ते मनातल्या मनात म्हणाले: "च्या-मारी न मागताच अडुम्बाची सिटीझनशिप मिळाली."
धुणे धुता धुता अचानक एका भूर्र्याला भल्या मोठ्या मगरीने ओढून नेल्याने बाकीचे मग धुणे अर्धवट टाकून आपापल्या बायकांच्या शिव्या शापाची पर्वा न करता धूम पळत वस्तीवर परत आले. घरी येताच आपल्या जालीम बायकोला पाहताच त्या भुर्र्या पेक्षा आपल्याला का बरे त्या मगरीने नाही बरे गिळले असा विचार एका नवविवहित व्यक्तीच्या मनात आल्या शिवाय राहिला नाही.
दुपारी मास्तरांचा जरा डोळा लागतच होता की बाहेर आरडा ओरडा ऐकू आल्याने ते बाहेर आले. एक महाकाय दैत्य डोळे लाल करून आरडा ओरडा करीत होता. त्यांच्या बायकोचा पहिला नवरा "झोझो" परत आला होता आणि रागाने लाल होत शिव्या शाप देत होता. त्याचे म्हणणे होते की मी दहा दिवस काय बाहेर गेलो तर मी मेलो असे समजून त्याच्या बायकोने नवा नवरा केलाच कसा?
शेवटी तोडगा निघाला की मास्तर आणि झोझो यांच्यात दंगल सिनेमा प्रमाणे तीन स्पर्धा मॅचेस होतील, हे ऐकून मास्तरला आनंद झाला. चूक एव्हढीच झाली की मास्तरला वाटले जो जिंकला त्याची सुटका होणार.
पहिली मॅच होती चित्र काढण्याची मास्तरला पहिली संधी मिळाल्याने मास्तरांनी एका काळ्या दगडावर आपले भूमितीचे ज्ञान वापरून चुन्याने एका अष्ट्कोनात पंचकोन काढून त्यात एक वर्तुळ काढले. "झोझो" ला भूमितीत गंध नसल्याने अर्थातच तो साफ बिचारा हारला आणि रागावून त्याने आपली छाती बडवून घेतली. मास्तर खुश झाले.
दुसरी मॅच होती जास्तीत जास्त मिरच्या खाण्याची. झोझो ने दहा बारा मिरच्या सहज चॉकलेट सारख्या खाऊन टाकल्या. मास्तरने मात्र एक मिरची खाताच तोंडात विस्तव ठेवल्या प्रमाणे आख्या वस्तीत ता ता थय्या केला. सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. स्कोर झाला १-१. तिसरी निर्णायक मॅच अर्थातच कुस्तीची. जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात सुरु झालेली मॅच कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच असे मास्तरानी ठरवले होते. कुस्ती सुरु होताच मास्तरांनी झोझो च्या पोटाला दणादणा बुक्के मारले. झोझोला काहीच फरक पडला नाही त्याने मास्तरला उचलून चिपाटा प्रमाणे जवळच्या झाडावर फेकून दिले. दोन लोकांनी मास्तरांना झाडावरून उतरायला मदत केली. झोझो एखाद्या डिवचलेल्या जनावरां प्रमाणे मास्तरला आपल्या अजस्त्र पंजात चिरडून टाकायची वाट बघत होता पण तुडतुडे मास्तर कधी या बाजूने कधी त्या बाजूने तर कधी पायातून निसटून जात होते. एकदा मास्तरला त्याने धरले सुध्दा पण मास्तरनी झोझोच्या बगलेत गुदगुल्या केल्या मुळे त्याने खदाखदा हसत मास्तरला दूर प्रेक्षकात फेकून दिले. प्रेक्षकांनी मास्तरला परत रिंगणात आणून सोडले. सगळ्यांनाच ही कुस्ती बघून फार मज्जा येत होती. शेवटी एका निर्णायक क्षणी झोझो पाय घसरुन सरळ मास्तरच्या अंगावर पडला आणि मास्तर चारी मुंड्या चीत झाले! झोझोचा सर्वत्र एकच जयजयकार झाला. मास्तर भानावर आले तेव्हा आधी जोराने हंबरडाच फोडला कारण त्यांचा गैरसमज होता की जो हरला त्याला त्या भवानी बरोबर संसार करावा लागेल. हळू हळू जेव्हा मास्तरच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण सुटलो आहोत. तेव्हा ते मोठं मोठ्याने हसू लागले वेड्या सारखे नाचू लागले. त्या नंतर मास्तरांच्या तोंडून जे वाक्य निघाले ते जर कुणी मराठी नाट्य लेखकाने ऐकले असते तर नक्कीच आपल्या नाटकात शेवटच्या सिनसाठी वापरले असते. मास्तर म्हणाले: "हे मित्र झोझो, लौकिक दृष्टीने मी हरलो असेन, पण इतिहासकार सांगतील माझा पराभव किती अलौकिक आहे!" (ढेण टेss ढेण)
दोन दिवसांनी मास्तर जंगलातून वाट काढत कसे बसे शहरात आले. त्यांना जिवंत पाहून मल्लमला फार आनंद झाला त्याने त्यांना गच्चं मिठीच मारली!
आता बोकलवाडीच्या शाळेत मास्तर पुन्हा रुजू झाले आहेत. कधी ते आपण अमेरिकेला गेलो होतो तर कधी ब्राझीलला असे काही बाही सांगतात. प्रवास वर्णन लिहायचा त्यांचा सध्यातरी काही प्लान नाहीये. मुलांना फारसे मारत पण नाहीत. नयनबाईला तर परवा चुकून नयनताई म्हणाले.
नाही म्हणायला फक्त हेडमास्तर दाबेना मास्तर खाजगीत म्हणाले.
-"सर परदेशात जायचेच असेलना तर अडुम्बाला जा तुम्ही. फार जबरदस्त देश आहे. बघा विचार करा सध्या स्कीम चालू आहे म्हणे!"
(समाप्त)
मागील भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भार्री लिहिलंयत.
पण हे काय ! इतक्या लवकर का संपवलंत अजून भरपूर भाग लिहायचेत की.

अडुंबाची धावपट्टी इटक्यात झाली सुद्धा रिपेअर ? 3ऱ्या भागातच मास्तर चढ़ल की विमानात रिटर्न टिकिट घेवून Sad
थोड़ी अजुन सफर घड़वायला हवी होती असे मनापासून वाटत होते ....बघा जरा , हां रिटर्न जर्नीचा भाग म्हणजे मास्तराना पडलेले सुखद स्वप्न दाखवून ४था भाग पुन्हा अडुंबासफर कंटिन्यू करता आली तर बरे वाटेल Happy भले त्या मास्तरांचा स्वप्नभंग होईल हो ! पण असा अर्धवट डाव सोडून आमचा नका न अपेक्षा भंग करु, म्हणून थोड़े एक्टेंट करा ही सफर अशी विनंती ...

मस्तच.... Happy
अजून लिहायला हव होतं पण Sad ...तुम्ही लिहू शकला असतात अजुन.......

आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. सफर लौकर संपली असे आपल्याला वाटले हेच माझ्या कथेला मिळालेली आपली दाद आहे. पुढे मागे जमल्यास बोकडे सरांना पुन्हा एकदा परदेश प्रवासाला पाठवू की. तूर्तास एव्हढेच गोड मानून घ्या. धन्यवाद!

हा हा तीनही भाग वाचून काढले .मस्त आहेत Lol Proud

काही निर्थरक धाग्यांमुळे वाचायचे बाफ मागे पडतात आणि मग मागे जाऊन खणून काढाव लागत. चालायचच. असो.

बऱ्याच दिवसांनी हलकं फुलक लिखाण वाचायला मिळालं .लिहीत राहा Happy

वा! विलक्षण सफरीची मज्जा आली.; अजूनही कुठल्या तरी देशात मुक्काम करायला/ वाढवायला हवा होता मास्तरांनी.

तिन्ही भाग एकत्र वाचले. धम्माल आहेत. Lol Lol
बोकडे सरांच्या चित्रविचित्र देशांच्या सफरी वाचायला मजा येईल.