'थिएट्रिक्स' न्यू जर्सी- अग्निदिव्य

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 June, 2017 - 13:26

न्यू जर्सीतील 'थिएट्रीक्स' ही नावाजलेली संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात "अग्निदिव्य" हे नाटक सादर करणार आहेत. यानिमित्ताने आम्ही या नाटकाच्या निर्मात्या अनु महाशब्दे, दिग्दर्शक मकरंद भावे आणि संगीत/प्रकाश योजना पहाणारे विकास फाटक यांच्याशी बोललो.

मायबोली टीमः नमस्कार अनु, सर्वप्रथम थिएट्रीक्स बद्दल आमच्या वाचकांना काय सांगाल?
अनु महाशब्दे: नमस्कार. रंगभुमी, चित्रपट आणि टेलेव्हिजन या माध्यमांत यश मिळवलेल्या काही उत्साही मंडळीनी थिएट्रीक्स ही कला आणि सांस्कृतीक संस्था २००५ मध्ये न्यू जर्सी येथे सुरू केली. ऊत्तर अमेरिकेतील स्थानीक कलाकारांना एक उत्तम दर्जाची कलाकृती सादर करण्यासाठी लागणारं व्यासपीठ ही संस्था देते.
न्यू जर्सीतील प्रेक्षकांना 'थिएट्रीक्स' हे नाव नवीन नाही. गेली कित्येक वर्षे सातत्याने आम्ही उच्च दर्जाची नाटके रंगभूमीवर सादर केली आहेत. नुकतेच महाराष्ट्र फाउंडेशनच्या निधी संकलन कार्यक्रमासाठी आम्ही "जी..जैसी आपकी मर्जी" आणि "टॅक्टोनीक पार्कवे" ही नाटके सादर करून त्यांच्या संकलनाचे उद्दीष्ट गाठायला मदत केली. २००५ च्या अ‍ॅटलांटा अधिवेशनात आम्ही "वेस्टर्न घाट्स" हा अमेरिकेतील मराठी अनुभव साजरा करणारा प्रयोग सादर केला. SATS या संस्थेकरता आम्ही "मत याद दिला" आणि "ऑन व्हेकेशन" ही २ हिंदी नाटके सादर केली. "उद्गार" सारख्या काही नाटकांचे प्रयोग तर आम्ही भारतातल्या अनेक शहरांमध्ये देखील केले. "पावसातला पाहुणा", "मनोमीलन", "मुक्तिधाम" या अशा अनेक एकांकिकाना राष्ट्रीय स्तरावरील विजेती पारीतोषके मिळाली आहेत. व्यावसायीक, प्रायोगीक रंगभुमीप्रमाणे आम्ही "बेसमेंट रंगभूमी"ला देखील चालना दिली आहे. त्यातूनच "सखुबाई" ही एकांकीका नुकतीच सादर केली गेली. आमचा मुख्य भर हा नवीन पिढीला भारतीय रंगभूमीकडे आकर्षून घेण्याकडे आहे तसेच भारतातील कलाकारांशी सबंध प्रस्थापीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या या प्रयत्नाचे फळ म्हणजे अपूर्व भालेराव या कलाकाराने "डॉट कॉम मॉम" या व्यावसायीक चित्रपटात केलेली भूमिका.
2016-12-31-PHOTO-00000016.jpg
आता 'अग्निदिव्य' संबंधी. मला सांगायला अतीशय आनंद होत आहे की या नाटकासाठी आम्हाला मकरंद भावे सारखा अगदी योग्य दिग्दर्शक मिळाला. मकरंद फार पुर्वीपासून भारतातील व्यावसायीक, प्रायोगीक रंगभुमीशी निगडीत आहे. त्याने "कोणी तरी आहे तिथे", "लग्नाची बेडी", "टूर टूर", "तरूण तूर्क म्हातारे अर्क" अश्या अनेक प्रसिद्ध नाटकांत भुमीका केल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या "शँक्स" या चित्रपटात त्यांची मुख्य भुमीका आहे. तसेच त्यानी "डॉट कॉम मॉम" या चित्रपतात देखील भुमिका केली आहे. थिएट्रीक्सच्या "ड्बल गेम, कलम ३०२, मुक्ति धाम" यांत तो सहभागी होता. आंतर्कोलेजीयेट तसेच राज्य पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. मला खात्री आहे की मकरंदनी या नाटकाला दिलेली स्पेशल ट्रीटमेंट आणि आमच्या कलाकारांनी दाखवलेला यातील पात्रांचा भावनीक प्रवास सर्व प्रेक्षकांना मोहीत करेल.

मायबोली टीमः मकरंद अभिनंदन तुमचे!! हे नाटक निवडण्यामागची तुमची भुमीका काय होती?
मकरंद भावे: डबल गेम चे १० प्रयोग केल्यावर पुढलं नाटक कुठलं करायचं यावर विचार चालू होता. 'दिपस्तंभ'ची स्क्रीप्ट गेली ५/७ वर्ष माझ्याकडे होती. तेव्हा हा विचार करताना जाणवलं की या नाटकातून आपल्याला बरंच सांगण्यासरखं आहे. प्र. ल. मयेकर यांनी ही संहीता १९८० मध्ये एका ईंग्लीश टीव्ही सिरिजवर आधारीत लिहिली. नुकतंच या नाटकाचं भारतात पुनरुज्जीवनही झालं आहे. या संहीतेचं वाचन केल्यावर प्रभावीत झालो आणि लक्षात आलं की ही "टाईमलेस" संहीता आहे. यातले जे नातेसंबंध आहे, नाट्य आहे ते आपल्याला कुठल्याही काळात दाखवता येईल आणि प्रेक्षकांना थोडं मनोरंजन आणि विचाराना चालना देता येईल. आत्ताच्या आयुष्यात नात्याला, मैत्रीला, लॉयल्टीला किती महत्व आहे हे आपल्याला साध्या सोप्या कहाणीतून मांडता येईल असं वाटलं.
मूळ संहिता ३ अंकी आहे आणि सिक्वेन्शीयल आहे. तेव्हाच्या काळानुसार बरोबर होती. दोन वेगळे काळ आहेत आणि स्थळं पण दोन आहेत. हे वाचताना मला लक्षात आलं की हे कदाचीत जास्त वेगवान पधतिने मांडता येईल. सध्याच्या ट्रेंडनुसार एकंदर वेळही कमी करता येईल. त्यावर मग बराच विचार करुन संकल्पना आणि कहाणी तीच पण एक पूर्णतया नवीन नाटक लिहून काढलं. एकंदर जे मांडायचं आहे त्याला "अग्नीदिव्य" हे नाव जास्त समर्पक वाटलं. अर्थात हे सर्व मयेकरांची परवानगी घेऊनच.
मला या नाटकाची गोष्ट हि एक डिस्नीच्या कहाणीसारखी वाटते. डिस्नीच्या कहाण्या या लार्जर दॅन लाईफ, गूड विरुध्द बॅड, शेवट माहीत असूनही प्रेक्षकांना पहावेसे वाटते. या नाटकामध्ये मला चॅलेंज वाटलं की लोकांनी हे नाटक शेवटपर्यंत पाहत राहिलं पाहिजे. त्याकरता वेग पाहिजे, मराठी नाटकात प्रेक्षकांनी अनुभवलेलं नसेल असं सादरीकरण केलं पाहिजे. तसंच BMM अधिवेशनात ब्रॉडवेसारख्या थीएटरमध्ये हा प्रयोग करता येणार आहे. तर स्टेज / लाईट्स च्या माध्यमातून हे वेगळेपण दाखवता येईल. अश्या प्रकारे आम्ही नव्या प्रकरची मांडणी केली.

मायबोली टीमः खूपच चांगली माहिती दिलीत. तुम्ही त्यातली चॅलेंजेस पण सांगितलीत. या रुपांतर लेखनाकरता किती वेळ द्यावा लागला?

मकरंदः प्रक्रिया अशी होती की अक्खी संहिता आधी वाचून काढली. नेहमीचं काम सांभाळून साधारण चार महिने हे काम चालू होते. आधिच्या धाटणीत बदल करताना काही नवीन प्रसंग जोडले आहेत. काही प्रसंग पुढे मागे केले.

मायबोली टीमः नाटकाची थोडक्यात रुपरेषा सांगाल का?
मकरंदः एका स्त्रीचा आयुष्यातल्या प्रवासाबद्दल हे नाटक आहे. तीला आलेले अनुभव, प्रेम, मैत्री, विश्वासघात, आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि या सगळ्यात ती कशी बदलत जाते.

मायबोली टीमः हे नाटक बसवताना काही चॅलेंजेस आले होते का?
मकरंदः हे रुपांतर करत असतानाच मला ते चित्र डोळ्यासमोर दिसत होतं. काहितरी वेगळं प्रेक्षकांना दिलं पाहिजे अशी व्हिजन होती. पण त्यातली पात्रं आणि त्यांचे संवाद यात कुठेही कमी न करता मला ती भव्यता दाखवयाची होती. हे एक दिग्दर्शक म्हणून पहिलं चॅलेंज होतं.
या नाटकातल्या प्रत्येक पात्राचा एक प्रवास आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर येण्याआधी त्यांची एक गोष्ट आहे. ती प्रत्येक कलाकाराला समजावुन देऊन त्याचा एकत्रीत परीणाम तयार करणं हे दुसरं चॅलेंज होतं.
विकास फाटक हे थिएट्रिक्सचे एक खंदे कार्यकर्ते आहेत. त्यांनी या नाटकाच्या संगीताची बाजू सांभाळली आणि स्टेज/ लाईटस मध्ये खूपच मदत केली आहे. या नाटकासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि आमची यासंदर्भात बरीच चर्चा झाली. तर विकास तुम्हाला याबद्दल अजून माहिती देतील.

विकास फाटकः माझ्या नाटकातल्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर १० वर्षापूर्वी थिअ‍ॅट्रीक्सची सुरुवात झाली तेव्हा लक्षात आलं की अभिनय, दिग्दर्शन यासाठी बरेच जण असतात पण लाईट, साऊंड याकडे दुर्लक्ष होतं म्हणून मी त्याकडे वळलो. आता या नाटकासंबंधी बरेच महिने चर्चा चालू होती. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो मी आमच्या अख्ख्या बॅकस्टेजच्या टीमच्या वतीने बोलतोय. बरीच मोठी टीम या नाटकासाठी मेहनत घेतेय. तर सर्वप्रथम हे नाटक जेव्हा अधिवेशनासाठी निवडलं गेलं तेव्हा लक्षात आलं की जिथे प्रयोग होणार आहे ते ब्रॉडवे क्लासचे थिएटर आहे. त्याचा पूर्ण वापर करून प्रेक्षकांना एक चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही स्टेज, संगीत, प्रकाशयोजना या सर्वांचा एकत्रीत विचार केला. मी या थिएटरला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्था पाहून घेतली. दुसरा महत्वाचा मुद्दा, सेटअप साठी जेमतेम २ तास मिळत असतात. त्यामुळे त्याचा पूर्ण विचार करुन, कुठल्या ऑर्डरने गोष्टी केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार केला आहे.
ह्या नाटकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व आहे. त्यामुळे लाईट्सच्या, कपड्यांच्या माध्यमातून, तसेच सेटस मधुन हे दाखवायचे एक चॅलेंज होतं. या नाटकासाठीचा सेट खूपच कठीण होता. एका प्रसंगात दोन पातळीवरचा सेट आहे, तसेच याच प्रवेशात दुसर्‍या स्थळाचा सेट दाखवायचा आहे. या सेट्ससाठी आमचे फ्लोरीडातले मित्र श्री. किशोर पाठारे मदत करत आहेत. आम्हाला अजुनही प्रयोग करायचे असल्याने हा सेट पोर्टेबल असणं महत्वाचं होतं.

अनू महाशब्दे: मायबोलीच्या सर्व वाचकांना मी आग्रहाचं निमंत्रण देत आहे. आम्ही हा जो भव्य दिव्य प्रयोग सादर करत आहोत तो पहायला जरुर या. ह्या नाटकासाठी बर्‍याच मंडळीनी मेहनत केली आहे. हे नाटक जुळून यायला ह्या सर्वांचा महत्वाचा हातभार लागला आहे.
FINAL FLYER(1) (3).JPG
मायबोली टीमः तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल आभार आणि प्रयोगासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा! 'थिएट्रीक्स' च्या 'वेस्टर्न घाट्स', 'पावसातला पाहुणा', 'वटवट सावित्री', 'सूर्याची पिल्ले' या कलाकृती पाहिल्या आहेत. या नाटकाला शुभेच्छा!!
ट्रेलर मधे जर कलाकारांचे त्या नाटकातल्या पिरियड कॉस्च्युम मधले काही फोटो/झलक दिली असती तर अजून रंगत आली असती Happy

Dhanyavad, prayog changla zala. Khoop Chan pratikriya milalya.
Ebaba mhanje Prataprao