प्रश्न बधीरतेचा...!

Submitted by अतुल ठाकुर on 2 July, 2017 - 00:54

suppot-628x318-628x214-628x214.jpg

फार पूर्वी वाचलेल्या एका पुस्तकात लेखकाने आपल्या मृत्युच्या दारात जाण्याच्या अनुभवाचे वर्णन केले होते. त्यातून तो बाहेर आल्यावर त्याच्यात कसा अमुलाग्र बदल झाला त्याचा सुरेख आढावा त्या पुस्तकात होता. आणि माणसाला असा अनुभव यावा कारण असे अनुभव त्याला बदलण्यास भाग पाडतात, मदत करतात असेही विधान त्यात केले होते. पुस्तक खुप आवडले म्हणजे त्यातली सर्व मते पटलीच पाहिजेत असे माझे तरी नसते. लेखकाच्या या मताबद्दल मी साशंक होतो. त्यानंतर जसजसे आजुबाजुचे अनुभव यायला लागले, ते मत पटेनासे झाले. जवळच्या नात्यात आणि बाहेरदेखील अगदी मृत्युच्या दारात उभी राहिलेली माणसे जास्तीत जास्त हेकट आणि हट्टी होताना पाहिली. मृत्युच्या दारातून परतून आलेली माणसे जी काही वर्षे मिळाली त्यात स्वभाव सुधारताना दिसली नाहीत. त्यांचे स्वभावदोष तसेच राहिलेले दिसले. असे वाटले एखादा जळजळीत अनुभव अनेकांना त्याच तीव्रतेने आला तरी ज्यांना बदलायचं असतं तीच माणसे त्या अनुभवाचा आधार घेऊन बदलतात. सरसकट सर्वांमध्ये बदल घडेल अशी अपेक्षा करता येणार नाही. जी माणसे बदलत नाहीत, समोर होत असलेले नुकसान दिसत असले तरीही, किंवा त्यामुळे इतरांना होणारा त्रास दिसत असला तरीही, त्यांच्या आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याचा स्वभावातला जो चिवटपणा दिसला तो मला नेहेमीच अनाकलनिय वाटला. जणू एक तर्‍हेचा बधीरपणा असावा, एखाद्या विशिष्ट जागी माणसाला संवेदनाच नसावी त्याप्रमाणे...

पुढे संशोधनाच्या निमित्ताने सपोर्टग्रुप्स मध्ये जाणे घडले आणि या बधीरपणाचे अनेक नमुने पाहायला मिळाले. संशोधनात असाध्य किंवा गंभीर समजल्या जाणार्‍या आजारांशी निगडीत असलेल्या सपोर्टग्रुप्सचा समावेश होता. व्यसन हा एक असाच आजार. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक जीवनाची धुळदाण उडवणारा. आजतरी त्यावर औषध उपलब्ध नाही. मात्र एक विशिष्ट जीवनशैली अंगिकारल्यास, मनोनिग्रह करून माणुस अगदी सर्वसामान्य जीवन जगु शकतो. मुक्तांगणमध्ये व्यसनी माणसाला दाखल करून घेताना एक प्रश्न रुग्णाला समुपदेशक वारंवार विचारतात. "तुम्हाला स्वतःला दाखल होण्याची इच्छा आहे का?" याचे कारण रुग्णाची स्वतःची इच्छा व्यसन सोडण्याची असेल तरच रिझल्टस चांगले मिळतात. एकदा असंच सपोर्टग्रुपमध्ये बसलो असताना एका रुग्णाला हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. साहेब बराच वेळ गप्पच होते. बाजुला बायको बसलेली होती. मुक्तांगणला आणेपर्यंत वेळ आली होती म्हणजे हा माणुस व्यसनाच्या तळाशी जाऊन पोहोचलेला असणार आणि त्यामुळे व्हायचा तो सर्व खेळखंडोबा झालेला असणार हे मानण्यास जागा होती. तरीही बराच वेळ हा माणुस उत्तर देईना. नंतर अगदीच नाईलाज झाला म्हणून असेल पण तो म्हणाला,"थोडी कमी करायची इच्छा आहे". ज्यामुळे सर्वनाशाच्या टोकाशी आलो ते व्यसन इतके जीव की प्राण की अजूनही सोडण्याची नाही तर थोडी कमी करण्याची इच्छा आहे याला बधीर पणा नाहीतर काय म्हणावे? या बधीरपणाचा त्याच्या घरच्या मायभगिनींना, लहान मुलांना, वृद्धांना किती त्रास होत असेल? या बधीरपणामुळेच किती मारझोड, छळवाद होत असेल? बायकांवर संशय घेतले जात असतील? व्यसनासाठी चोर्‍या होत असतील? मुक्तांगण हा माझ्या संशोधनाचा केस स्टडी असल्याने अशी असंख्य उदाहरणे पाहायला मिळाली. कदाचित त्यामुळेही असेल पण मुक्तांगणच्या समुपदेशकमंडळींमध्ये जशी व्यसनी माणसांबद्दल अपार करुणा असते तशी माझ्या मनात कधीही उत्पन्न होऊ शकली नाही.

मात्र मुक्तांगणबाहेर इतर गंभीर आजारांच्याबाबतीत जे सपोर्टग्रुप्स पाहिले तेथेही अशी उदाहरणे आढळली. आणि हा बधीरपणा सर्वच स्तरांवर दिसला. आजार सहन करु पण पथ्य नको असा एकंदरीत खाक्या. पार्किन्सन्स सपोर्टग्रुप मध्ये एका धडपडणार्‍या रुग्णानेच सतत कंप पावणारे शरीर सरळ रेषेत स्थिर रहावे म्हणून पाठिला काठ्या बांधून आधार देण्याची पद्धत शोधून काढली. स्वतः येऊन त्याचे प्रात्यक्षिक देण्याची तयारी ठेवली. पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याच सपोर्टग्रुपने प्रदर्शनात समाजाला मदतीसाठी आवाहन केले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांना पैशाची मदत नको होती. कार्यकर्ते हवे होते. अतिशय उत्कृष्टपणे काम चालवलेल्या या सपोर्टग्रुपचे काम पाहून अत्यंत उत्साहाने ५६ जणांनी कार्यकर्ता म्हणून नावनोंदणी केली. जेव्हा प्रत्यक्ष कामासाठी सभेला बोलावलं तेव्हा फक्त आठच जण आले. आणि त्यातलेही फक्त तीन चार जणच टिकले. हा त्या नाव नोंदणी केलेल्यांचा बधीरपणा होता. क्षणभर सेवेची उबळ यावी आणि नंतर सर्व संवेदना विरून जाव्यात तसे. बाकी सपोर्टग्रुप ही आजच्या काळातील एक चांगली संकल्पना आहे. गंभीर आजार असलेली माणसे आणि त्याचे कुटुंब अनेक ठिकाणांहून फसवली जातात. अशांना योग्य ते ज्ञान मिळावे, मदत मिळावी, शारिरीक, मानसिक, भावनिक आधार मिळावा, आपल्या भावनांना वाट मिळावी, त्यांचा निचरा व्हावा, आजाराला यशस्वीपणे तोंड देणार्‍यांशी मैत्री व्हावी यासारखे अनेक फायदे सपोर्टग्रुपमुळे होतात. मात्र लोकांना हे सारं खरोखरंच हवं असतं का? तेवढी त्यांची तयारी झालेली असते का? तुमच्या दृष्टीने आजारीमाणसाला मदत व्हावी म्हणून तुम्ही सपोर्टग्रुप चालवत असाल, चांगल्या, प्रॉडक्टीव आयुष्याची तुमची काही एक कल्पना असेल पण लोकांचीही तशीच असते का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचेही उत्तर एका इपिलेप्सीसाठी काम करणार्‍या सपोर्टग्रुपचा अभ्यास करताना मिळाले.

एपिलेप्सीबाबत आपल्या समाजात असंख्य गैरसमजुती आहेत. अंधश्रद्धा तर खुपच. त्यामुळे लपवाछपवी प्रचंड. कुठल्याही वयात हा आजार होऊ शकत असल्याने लग्नासाठी अडचणी खुप येतात. फसवणूक, कोर्टकेसेस अशा गोष्टी होऊ शकतात. मी अभ्यास करीत असलेल्या सपोर्टग्रुपने खास एपिलेप्सी रुग्णासाठी मॅरेज ब्युरो चालवला. त्यांच्या इतर कुठल्याही कर्यक्रमापेक्षा त्यांना मॅरेज ब्युरोसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. कारण लोकांना प्रामुख्याने त्यातच रस होता. भावनिक, मानसिक आधार वगैरेत त्यांना इंटरेस्ट नव्हता. सपोर्टग्रुपमुळे लग्न जमल्यावर ग्रुपच्या कार्यकर्त्यांना लग्न पत्रिका द्यावी इतकीही माणुसकी ही मंडळी दाखवायला तयार नव्हती. किंबहूना ही माणसे लग्नाला आली तर आपला एपिलेप्सी ग्रुपशी संबंध आहे हे उघड होईल आणि त्यामुळे आपल्या आजाराची माहिती जगजाहीर होईल याच भीतीने लोकांना ग्रासले असेही उदाहरण पाहायला मिळाले. लग्न झाल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यात ओळख दाखवल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरवून निघून जाण्याचा प्रकारही घडला आहे इतकी माणसे स्वार्थ साधल्यावर बधीर होताना दिसली आहेत. एकंदरीतच माणसांच्या स्वतःच्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात. तुम्ही सपोर्टग्रुपच्या रुपाने समोर ठेवलेलं, आजारातही समृद्धपणे जगायला शिकवणारं साधन हे त्यांच्या प्राथमिकतेत बसेलच असं सांगता येत नाही. आपला कार्यभाग संपला की त्या सपोर्टग्रुपसाठी काही करावं ही भावना नसते. लग्न जमले की हजार रुपये दोन्ही पार्टीजनी सपोर्टग्रुपला द्यावेत अशी एक अपेक्षा या सपोर्टग्रुपने व्यक्त केलेली असते. लग्नासाठी लाखो रुपये खर्च करणार्‍या लोकांना या हजार रुपयांची आठवणही क्वचितच येते. हा गरज सरो वैद्य मरो प्रकार श्वेतकुष्ठ रोगासाठी काम करणार्‍या सपोर्टग्रुपमध्येही पाहिला.

श्वेतकुष्ठाचंही काहिसं एपिलेप्सीसारखंच. असंख्य गैरसमजुती आणि अंधश्रद्धा. येथे शारिरीक धोका नाही. मानसिक त्रास प्रंचड. येथेही सपोर्टग्रुपच्या मिटिंगला ज्यांचे प्रश्न ऐरणीवर आलेत त्यांचीच हजेरी असते. ज्यांना हवे ते मिळाले आहे ती माणसे पाठ फिरवताना दिसतात. एका बाईंनी तर आपले काम साधल्यावर " मला आता त्या कळपात पुन्हा जायचे नाही" असे विधान केले होते. सर्वसाधारणपणे आपले अनुभव सांगणे, त्यांची देवाणघेवाण करणे, त्याद्वारे स्वतःच्या भावनांना वाट करून देणे, आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना देणे हा सपोर्टग्रुपच्या कार्यपद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण यापेक्षाही अनेकदा लोकांना डॉक्टरच्या व्याख्यानांमध्येच रस असतो. अशी व्याख्याने ठेवली तर सपोर्टग्रुपच्या मिटींग्जमध्ये गर्दी होते. निव्वळ अनुभवांची देवाण घेवाण ठेवली तर हे ग्रुप्स चालणारच नाहीत. लोकांनी ग्रुप मिटिंग्जना यावं यासाठी अशा तर्‍हेच्या प्रवृत्तीचा खुप विचार करून कार्यक्रम ठरवावे लागतात. आणि हे सारं काही बहुतेक वेळा लष्करच्या भाकर्‍या भा़जण्याचे काम असतं. लोकांचे आयुष्य जास्त सोपे व्हावे यासाठी धडपडणारी मंडळी ही कामे विनामुल्य करीत असतात. अनेकदा असं वाटतं माझ्यासारख्याने अशी विधाने केल्यावर लोक म्हणतील "जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे" "तुम्हाला काय अनुभव? तुम्हाला का माहित?" असं म्हटल्यावर पूर्वी मी बॅकफूटला जात असे. पण आता वाटतं अरे आपणदेखील वृद्ध आईवडिलांच्या आजारपणात शुभंकराची (केअरटेकरसाठी सपोर्टग्रुपमध्ये वापरला जाणारा शब्द) भूमिका बजावत आहोतच की. त्यामुळे कधी आलेला वैताग, कंटाळा, राग , चीडचीड आपणही अनुभवली आहे. त्यातून धडा घेतला आहे. आपल्या आयुष्याला त्यामुळे अपरिहार्यपणे पडलेल्या मर्यादा स्विकारल्या आहेत. म्हणून हे निव्वळ पुस्तकी नाही. अर्थातच संपूर्ण चित्र इतकं वाईट नाही. किंबहूना खूप आशा वाटावी अशाच गोष्टी घडत आहेत.

डॉ. शोभनाताई तीर्थळींसारख्या संपूर्णपणे पार्किन्सन्स सपोर्टग्रुपच्या कार्यात झोकून दिलेल्या व्यक्ती आहेत. त्यांचा या वयातील उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या सपोर्टग्रुपचा प्रसार करण्यासाठी वापर करण्याचा उत्साह माझ्यासारख्याला सतत प्रेरणा देत असतो. यशोदा वाकणकरांसारख्या एपिलेप्सीसपोर्ट ग्रुपला वाहुन घेतलेल्या व्यक्ती आहेत. आपल्या ग्रुपसाठी त्या नवनवीन योजना आखत असतात. गरजूंसाठी औषधखरेदीत आर्थिक मदत ही त्यातीलंच एक महत्त्वाची योजना. डॉ. माया तुळपुळेंच्या श्वेतकुष्ठावरील सपोर्टग्रुपची माहिती तर अनेकांना आहेच. शिवाय "नितळ" सारखा सिनेमा पदरचे पैसे घालून त्यांनी काढला आणि श्वेतकुष्ठाबद्दलची वैज्ञानिक माहिती कलेच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोचवली. आपले माणुस गेल्यावर देखील सपोर्टग्रुपशी कृतज्ञतेने संबंध ठेवलेली, ग्रुपला आर्थिक मदत करणारी आणि ग्रुपच्या कामात भाग घेणारी माणसेही आहेत. सपोर्टग्रुपच्या कामासाठी आपल्या जागा फुकटात वापरायला देणारी माणसे आहेत. मात्र अजुन खुप काही करायचं आहे. आजही आपल्याकडे स्वमदत गट ही संकल्पना (अल्कहोलिक अ‍ॅनॉनिमसचा अपवाद वगळता) समाजात रुजली आहे असे मला वाटत नाही. ती रुजावी म्हणून अनेक माणसे अथक परिश्रम करीत आहेत. सपोर्टग्रुपची मूलतत्वे कार्यक्रमांद्वारे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रश्न आहे तो माणसात असलेल्या बधीरतेचाच.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.
हा बधिरपणा लोकेशन स्पेसिफिक आहे का? प्रगत देशांत वि. विकसनशिल देशांत इ. काही अभ्यास/ अ‍ॅनेकडॉटल पुरावे सापडले आहेत का?
किंवा एकूण समाजाची मानसिकता/ जाग्रुत समाज आणि बधिरपणा असं सॅम्पल साईझ सिलेक्टिव्ह अशा अर्थी म्हणायचं होतं.

अमितव, संशोधनाच्या दरम्यान आपल्याकडे ही वृत्ती मला आढळली. मला एकुण आपल्याकडली समाजव्यवस्था याला कारणीभूत वाटते. विशिष्ट आजाराशी निगडीत असलेल्या अंधश्रद्धा आणि त्याला चिकटलेले "स्टिग्मा". त्यामुळे लपवाछपवीचे प्रमाण प्रचंड. या लपवाछपवीमुळे आजार जास्त वाढतो असेही पाहिले.

लेखातिल काही उदाहरणात मला अंधश्रद्धा, स्टिग्मा बरोबरच केअरलेस वागणूक, उदासीनता, सिविक सेन्सचा अभाव अशा ही गोष्टी वाटल्या.

<<<<जी माणसे बदलत नाहीत, ................. चिवटपणा दिसला तो मला नेहेमीच अनाकलनिय वाटला. >>>>

मला पण. स्वतःच्या भल्यासाठी सुद्धा, अगदी लहान सहाण गोष्टींतहि काही बदल करायला ते नाखूष असतात, करत नाहीत.

दुसरे कारण म्हणजे वयोमानाप्रमाणे, आयुष्यातील अनुभवामुळे येणारे डिप्रेशन. त्यामुळेहि कधी कधी लोक उपचार, प्रयत्न करायचे टाळतात.

छान लेख.
ही बधीरता दैनंदिन जिवनातही बघायला मिळते.

लेखातिल काही उदाहरणात मला अंधश्रद्धा, स्टिग्मा बरोबरच केअरलेस वागणूक, उदासीनता, सिविक सेन्सचा अभाव अशा ही गोष्टी वाटल्या. >>> +१

व्यसनी लोकांचे उदाहरण मात्र या एकंदर बधीरतेत बसत नाही असे माझे मत, त्यांची अवस्था या पेक्षा खूप दयनीय असते.

लेखातिल काही उदाहरणात मला अंधश्रद्धा, स्टिग्मा बरोबरच केअरलेस वागणूक, उदासीनता, सिविक सेन्सचा अभाव अशा ही गोष्टी वाटल्या.
सहमत.

व्यसनी लोकांचे उदाहरण मात्र या एकंदर बधीरतेत बसत नाही असे माझे मत, त्यांची अवस्था या पेक्षा खूप दयनीय असते.

कधीकधी मला त्यांचेच वागणे बधीरपणाचे वाटते. कारण व्यसन सुटल्यास एरवी त्यांना काही दुखणे नसते. पण त्यांच्यामुळे घरचे ज्येष्ठ आजारी पडतात. सगळ्यांनाच अतोनात त्रास होतो पण यांना फरकच पडत नाही. हा आजार आहे त्यामुळे असं होतं असं म्हणण्याची पद्धत आहे खरी. पण ही माणसे आपल्या व्यसनाच्या बाबतीत अत्यंत सेन्सीटीव असतात. इतकी की व्यसनमुक्त झाल्यावरदेखील "व्यसन हे पहिले प्रेम आहे ते कसे सुटणार??? पण काय आहे ना, आम्हाला हा आजार असल्यामुळे आता आम्हाला ते झेपणार नाही म्हणून नको" अशी काहीतरी रोमँटिक विचारधारा असते.

संशोधनाच्या दरम्यान व्यसनी लोकांचे असंख्य अनुभव ऐकले. माणसाच्या मनात आपल्या व्यसनाच्या बाबतीत पुढे अपराधीपणाची भावना असु नये कारण तो आजार आहे हे एकवेळ मान्य करता येईल. मात्र त्याची खंत आणि आपण इतरांना प्रचंड त्रास दिला याची जाणीव त्या माणसाला आयुष्यभर असलीच पाहिजे असे माझे मत आहे. तरच तो ताळ्यावर राहिल. व्यसन हा आजार आहे म्हणजे केव्हाही व्यसनात बुडण्याचे लायसन्स मिळाले असे थोडेच आहे?

तुमचा मनस्ताप कळतो, पण व्यसनाधीनता किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या बाबतीत, जिथे बधीरता हे आजाराचंच एक लक्षण असतं तिथे त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नसतो.
सपोर्ट ग्रूपचा उपयोग केअरगिव्हर्सना होऊ शकतो, होतो हा अनुभव आहे - निदान इथे अमेरिकेत.

लेख चांगला लिहिला आहे. पण व्यसनी लोकांचे उदाहरण मात्र या एकंदर बधीरतेत बसत नाही असे माझेही मत आहे.

>आम्हाला हा आजार असल्यामुळे आता आम्हाला ते झेपणार नाही म्हणून नको" अशी काहीतरी रोमँटिक विचारधारा असते.
मेंदूमधे व्यसनांमुळे झालेल्या बदलांमुळे व्यसनाधीन व्यक्तींची सारासार स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताच बदलली असते हे लक्षात घ्या. हे फक्त व्यसनांबद्द्लच नाही मनोव्यापारांशी निगडीत अनेक विकारांबद्दल आहे. आपल्याला ते मनाचे खेळ वाटतात. ते असतातही पण त्या व्यक्तीला त्याची जाणिवच होऊ शकत नाही.
>मात्र त्याची खंत आणि आपण इतरांना प्रचंड त्रास दिला याची जाणीव त्या माणसाला आयुष्यभर असलीच पाहिजे असे माझे मत आहे.
व्यसनशील माणसाचा मेंदू ही खंत निर्माणच करू देत नाही. आणि त्याचा त्या माणसावर (तुमच्या आमच्यासारखा) कंट्रोल नसतो. कारण कंट्रोल ठेवणारे विचार मेंदूच्या ज्या भागात तयार होतात त्याच भागावर व्यसनामुळे परिणाम झालेला असतो.

बधीरतेबद्द्ल इतर उदाहरणे जी दिली आहेत ती आधारगटापुरती मर्यादीत नाहीत, तर एकूणातच भारतीय समाजात "परतफेड" करण्याची उदासीनता दिसून येते. अगदी साधे उदाहरण म्हणजे स्वतःच्या शाळेला, कॉलेजला कितीजण मदत करतात? अगदी जे त्या शाळेचे ॠण मान्य करतात ते प्रत्यक्षात मदत देण्याची वेळ आली की कारणे शोधतात. मदत करणारे असतातही पण ते अपवाद म्हणून.

पण गेले काही वर्षे "परतफेड" करण्याची उदासीनता नक्कीच कमी होते आहे असे मला वाटते. तंत्रज्ञानामुळे एका ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकांना एकत्र येणे सोपे झाल्यापासून याबद्दलची जाणीव निर्माण करणे आणि बधिरता कमी करणे या बद्दल नक्कीच योग्य दिशेने प्रयत्न होताना दिसतात.

स्वाती, अजय, मानव +१

मी सुदैवाने टोकाची व्यसनी माणसे जवळून बघितलीही नाहीयेत पण याबद्दल या फील्डमध्ये काम करणारे
पोलिसीमेकर्स व मेडिकल प्रोफेशनल्स यांच्याकडून जे ऐकलं / वाचलं आहे ते असंच की हा एक आजार आहे. व्हिक्टिमलाच बधीर म्हणून ब्लेम करणं योग्य नाही.
याचा अर्थ अशा व्यक्तीच्या संबंधित केअर गिव्हर कुटुंबियांनी एकच प्याला मधील सिंधुप्रमाणे त्रास सहन करावा असंही नाही. प्रत्येक केसप्रमाणे उचित निर्णय घ्यावा. पण सर्वांची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे प्रिव्हेन्शन व रिकव्हरी ऑप्शन देण्याची.

मेंदूमधे व्यसनांमुळे झालेल्या बदलांमुळे व्यसनाधीन व्यक्तींची सारासार स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताच बदलली असते हे लक्षात घ्या.
व्यसनशील माणसाचा मेंदू ही खंत निर्माणच करू देत नाही. आणि त्याचा त्या माणसावर (तुमच्या आमच्यासारखा) कंट्रोल नसतो. कारण कंट्रोल ठेवणारे विचार मेंदूच्या ज्या भागात तयार होतात त्याच भागावर व्यसनामुळे परिणाम झालेला असतो.

या दोन्ही गोष्टी काहीएक मर्यादेपर्यंत मान्य आहेत. मात्र व्यसनाचा आजार आणि इतर आजार यात फरक करणे आवश्यक आहे. व्यसनमुक्तीवर उपाय योजताना कसलेही औषध वापरले जात नाही कारण तसे काही औषध उपलब्धच नाही. मग एकच पर्याय असतो तो म्हणजे मनोनिग्रह. असंख्य टिप्स आणि ट्रिक्स ज्या व्यसनमुक्तीसाठी वापरल्या जातात त्या नीट बारकाईने निरखून पाहिल्या तर त्यामागे कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे संयमाचं तत्वच कार्य करताना आढळते.
मग संयमानेच व्यसनमुक्ती साधणार असेल तर व्यसनात असताना तो "आजार" म्हणजे "काहीतरी आपल्या हाताबाहेरची गोष्ट" आणि व्यसनमुक्ती करायची तर मात्र "संयम" हे डबल स्टँडर्ड कशाला? तो आजारच आहे हे तर मान्य आहेच. मात्र असे किती आजार आहेत जे व्यसनाप्रमाणे निव्वळ संयम ठेऊन बरे होतात?
शिवाय "तुमच्या घशात कुणी दारु ओतायला गेले नव्हते. पहिला प्याला तुम्हीच उचललात" असेही उपचारांच्या दरम्यान सांगीतले जाते.
सबब जेव्हा व्यसनाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व काही मेंदूतील बदलामुळे "अपरिहार्य"पणे घडते हे म्हणणे मला योग्य वाटत नाही इतकेच मला म्ह्णायचे आहे.

व्यसनमुक्तीवर उपाय योजताना कसलेही औषध वापरले जात नाही कारण तसे काही औषध उपलब्धच नाही. मग एकच पर्याय असतो तो म्हणजे मनोनिग्रह.

This is incorrect. Medications are used to treat drug addiction.

This is incorrect. Medications are used to treat drug addiction.

व्यसनामुळे जे यकृताचे वगैरे गंभीर आजात होतात त्यावर उपचार आहेत. व्यसनाची लक्षणे म्हणून जे त्रास होतात त्यावरदेखील उपाय आहेत. व्यसन सोडताना जो विथड्रॉलचा त्रास सहन करावा लागतो, काहीवेळा माणसांना भास होतात त्यावरदेखील औषधे आहेत.
जेव्हा मी म्हणतो उपाययोजना करताना औषध नाही याचा अर्थ ज्याप्रमाणे मधुमेहाची औषधे घेऊन तो आटोक्यात आणता येतो किंवा रक्तदाबाची औषधे घेऊन तो आटोक्यात ठेवता येतो त्या अर्थाने एखादे औषध रोज घेतले की व्यसनाची तलफ येऊ शकत नाही असे व्यसन बरे करणारे औषध सध्यातरी उपलब्ध नाही अशी माझी माहिती आहे. आणि जी औषधे असा दावा करतात ती फोल ठरली आहेत असेही मला सांगण्यात आले आहे.

ज्यावर अजून औषध उपलब्ध नाही ते सगळे आजार आजारच नाहीत असं म्हणताहात का?
असं जर माझ्या म्हणण्यातून ध्वनित होत असेल तर ती माझी चूक आहे असंच मी म्हणेन. क्षमस्व. मला तसं काहीच म्हणायचं नाहीय.

"सबब जेव्हा व्यसनाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व काही मेंदूतील बदलामुळे "अपरिहार्य"पणे घडते हे म्हणणे मला योग्य वाटत नाही इतकेच मला म्ह्णायचे आहे." हे वरच्या प्रतिसादातले वाक्य.

>>संयमानेच व्यसनमुक्ती साधणार असेल तर व्यसनात असताना तो "आजार" म्हणजे "काहीतरी आपल्या हाताबाहेरची गोष्ट" आणि व्यसनमुक्ती करायची तर मात्र "संयम" हे डबल स्टँडर्ड कशाला? > >
व्यसनाच्या बाबतीत हा आजार एका रात्रीत होत नाही. न्युरोप्लास्टिक इवेंट म्हणून याकडे बघितले तर मेंदू हळूहळू ' मद्यपान करणे' हे वर्तन एकप्रकारे शिकत असतो. नवे पाथवे तयार होतात आणि कालांतराने घट्ट होतात. इतके की मेंदूला मद्यपाना पलीकडे इतर बाबींची किंमतच उरत नाही. व्यसनाशी संबंधीत घट्ट पाथवे तयार झाला म्हणजे आजार. आता या आजारी मेंदूला नव्याने शिकवण्यासाठी संयम हे हत्यार. ते देखील सुरवातीला आजारी माणसाच्या हातात नसतेच. संयम म्हटले तरी मद्यापासून जबरदस्तीने दूर ठेवून मेंदूला त्या शिवाय काम करायला शिकवणे, सायकोथेरपीमर्फत नवे पाथवे निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे, होणारे पाथवे घट्ट करण्यासाठी प्रयत्न असेच तर रिकव्हरीचे स्वरुप असते. तसेच व्यसनामुळे मेंदूवर जो परीणाम होतो त्यामुळे काही बाबतीतली कार्यक्षमता रिकव्हरी होत कालांतराने हळूहळू परत येते पण काही बाबतीतली कार्यक्षमता कायमची गमावलेलीही असते. प्रत्येकाचा मेंदू वेगळा आणि रिकव्हरीही वेगळी. त्यामुळे व्यसनाबद्दल ते व्यक्त कसे होतात तेही वेगवेगळे. काही जण खंतावतात काही जण नाही खंतावत.
व्यसन या आजारात मेंदूची आनंदकेंद्रे ही व्यसनाच्या ताब्यात गेलेली असतात. आनंद हा व्यसानातूनच मिळत असतो. असा पाथवे सहजासहजी नष्ट होत नाही . नवे पाथवे तयार केले तरी व्यसन आणि आनंद हा जुना पाथवे असतोच. नवे पाथवे आणि त्यातून मिळणारा आनंद ही हळूहळू वाटचाल सुरु असतानाच जुना घट्ट पाथवे परत ताबा घ्यायला टपलेलाच असतो. ज्या गोष्टीचे व्यसन आहे त्यागोष्टीपासून सातत्याने दूर राहून( अ‍ॅबस्टिनन्स) नवा पाथवे सशक्त करायचा प्रयत्न करणे एवढेच हातात असते.

अतुल, व्यसनांवर (अद्याप) तसे औषध नाही हे बरोबर आहे.
पण व्यसनाचं मानसशास्त्रच पूर्ण वेगळं आहे. व्यसन म्हणजे फक्त ड्रगचा शरिरावर / मनावर परिणाम नसून व्यसनी व्यक्तींचे आणि समाजाचे व्यसनाबद्दलचे प्रचंड गैरसमज, वेगवेगळ्या टोकाच्या धारणा, कळत /नकळत होणारे व्यसनाचे उदात्तीकरण, यामुळे होणारे ब्रेनवॉश ई. प्रंचंड गुंतागुंत सुद्धा समाविष्ट आहे.

तुम्ही बधीरतेची जी ईतर उदाहरणं दिली आहेत, तशी बधीरता असणारी व्यक्ती तशात त्याला व्यसन असे कॉंबिनेशन असेल तर त्या व्यक्तीला बघुन तुम्ही लेखात वर्णिलेली बधीरताच दिसून येईल.

पण अशी बधीरता अजिबात नसलेली व्यक्ती, पूर्ण संवेदनशील असलेली व्यक्ती, जी आपल्या व्यसनामुळे इतरांचे नुकसान होत नाही ना याची काळजी घेतेय ती व्यक्ती सुद्धा व्यसनामध्ये तेवढीच असहाय्य, हवालदिल असते जेवढी वरील व्यक्ती.

(वर ड्रगचा उल्लेख केलाय त्यात निकोटीन, अल्कोहोल सुद्धा समाविष्ट आहेत)

व्यसन फारंच पुढची पायरी झाली ....
ईमानेईतबारे, स्ट्रिक्ट रूटीन पाळून व्यायाम करणारा नॉर्मल माणूस हेल्दी ईटिंग हॅबिट्स कसोशीने पाळतो, अगदी मोहाच्या क्षणी सुद्धा मिठाई वगैरे बाजूला सारू शकतो आणि हेच जर व्यायाम काही काळासाठी थांबवला, आळशीपणामुळे एनर्जी लेवल कमी झाली, स्ट्रेस डिप्रेस्ड थॉट्स वाढले तर तोच माणूस अनहेल्दी (म्हणजे घातक नाही पण एकंदर स्वीट, जंक किंवा भूक नसतांना ऊगीचच खाणे वगैरे) ईटिंग हॅबिइट्स च्या स्लीपरी स्लोपवर घसरत जातो.
मनोनिग्रहाने (निग्रह करू शकणे, हे सुद्धा पुन्हा मेंदूचेच कार्य) पुन्हा व्यायामाकडे वळता येते पण हेल्दी ईटिंग हॅबिट्स पाळण्याची किंवा न पाळण्याची प्रेरणा हेल्दी थॉट्स तयार करणार्या मेंदूतील संप्रेरकातूनच येत रहाते त्यावर कुणाचा कंट्रोल असणे अवघड आहे. असा नॉर्मल माणूस अनहेल्दी ईटिंग वर घसरल्यास त्याला तुम्ही बधीर म्हणणार का?
पळणारे, फास्टिंग आणि रेग्यूलर जिम करणारा प्रत्येक जण ह्या अनुभवातून नक्कीच गेला असेल.

असा नॉर्मल माणूस अनहेल्दी ईटिंग वर घसरल्यास त्याला तुम्ही बधीर म्हणणार का?
नाही. पण मला व्यसनाबाबत वेगळे वाटते. त्यात स्वतः माणुस मरणाच्या दारात जातो. इतरांना मरणाच्या दारात लोटतो. त्याला इतरांची तमा नसते. पण स्वतःच्या व्यसनाबद्दल तो अतिशय हळवा असतो. पुढे रॉकबॉटम्स येतात. आणि कधीतरी त्याला उपरती होते. ते झाल्यावर व्यसन सोडल्यावरदेखील व्यसनाशी काहींचा रोमान्स सुरुच राहतो. झेपत नाही, नाईलाज झाला म्हणून सोडली अशी ही भुमिका असते. मग काहींच्या पाच पाच दहा दहा वर्षानंतर स्लिप्स आणि रिलॅप्सेस येतात. ज्या व्यसनाने सर्वनाश केला त्याबद्दल त्यांना तिटकारा वाटत नाही.
हे सर्वच जर मेंदुतील रासयनिक बदलामुळे आणि आजारामुळे अपरिहार्यपणे घडते असं म्हणायचं असेल तर यावर काय बोलणार. लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री.

मग काहींच्या पाच पाच दहा दहा वर्षानंतर स्लिप्स आणि रिलॅप्सेस येतात. ज्या व्यसनाने सर्वनाश केला त्याबद्दल त्यांना तिटकारा वाटत नाही. >>>
कारण सामाजीक उदात्तीकरण, ब्रेनवॉश सुरुच असते. समाज व्यसंनांविरुद्ध कडक भूमिका घेण्यास असमर्थ ठरतो.

अतुल हे मेंदूतील रासायनिक बदलांमुळेच घडते .. ह्यात साध्या ओसीडी पासून पॅथॉलॉजिकल लायर्स, सिरिअल किलर्स, रेपिस्ट्स सगळे आले.
सिगरेटचे अ‍ॅडिक्शन जसे तसेच व्यायामाचे सुद्धा मेंदूतील सारख्याच संप्रेरकांमुळे होते फक्तं एकाचा परिणाम चांगला आणि दुसर्‍याचा वाईट.
हेल्दी मायटोकाँड्रिआजचे फंक्शन कॉग्निटिव विचारांसाठी (सारासार विचार) जरूरी असते... व्यसनं त्यातून मिळणारे प्लेझर आणि मग कंपल्शन मेंदूच्या नॉर्मल कार्यावर डेमेजिंग ईफेक्ट्स मागे ठेवतात. मनोनिग्रह बनून राहण्यासाठीचे कार्य मेंदू नीट करत नाही ज्याचे पर्यावसान अपरिहार्यतेमध्ये आणि काही केस मध्ये वायलंट वागण्यात होत राहते.
बहुतांश केसेस मध्ये रूगणाला हे कळते सुद्धा पण 'बरोबरचे' वागणे त्याला जमत नाही म्हणून कुटुंबाच्या, मित्रांच्या, डॉक्टरांच्या आधाराची, सपोर्ट ग्रूपची गरज पडते, कमकुवत/मोहाच्या क्षणी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होते.
अमेरिकेतल्या 'स्पेशल विक्टिम्स युनिट' ह्या मालिकेत तुम्हाला अगदी अश्याच केसेस मध्ये रूग्ण, कुटुंब, तज्ञ, डॉक्टर्स, संशोधक, पोलिस, वकील, जज अशी सगळ्यांची मत मतांतरे ऐकायला मिळतील. चांगला प्रोग्राम आहे जरूर पहा.

असहमत हायझेनबर्ग.
ओसीडी असो की पॅथॉलॉजिकल लायर्स...
त्यांचा व्यसनांशी अजिबात संबंध नाही.

व्यसन असो वा प्री-एक्झिस्टिंग कंडिशन (मान्य आहे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत) ... मेंदू कायम प्रोग्राम होत राहतो आणि without support or help its difficult to control your behavior.

उदा:
ओसीडी कॅन बी वेल कंट्रोल्ड विथ SSRI's
पण SSRI's व्यसनांनर काम करत नाहीत.