माणसं अशी का वागतात ?

Submitted by केदार जाधव on 30 June, 2017 - 05:14

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमधून आलेल्या उद्वेगातून हे लिहितोय तेव्हा जर थोडा चिडचिडा सूर जाणवला तर सुरूवातीलाच माफी मागतो. काही घटना इतक्या साध्या असतील की कुणालाही वाटेल हा का इतका विचार करतो ? पण मी विचार करतो अन मग सगळ्याचा एकत्र प्रचंड त्र्रस होतो , म्हणून त्याचा निचरा करून हलक होण्यासाठी हे लिखाण . यातल्या काही घटनाना दुसरी बाजूही असू शकते याची मला पूर्ण जाणीव आहे हेही तितकेच खरे आहे .

गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या छोट्या छोट्या घटना पाहिल्या की अस वाटू लागत की काही माणसांचा स्वभाव हा बेसिकली वाईट असतो . एखाद्या वेळी जीवन मरणाचा प्रश्न असेल किंवा काही मोठा लाभ /हानी होणार असेल तर वाईट गोष्टी करणे मी समजू शकतो , पण अस काही नसताना उगाच माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा अगदी त्रास होतो.

१. तुम्ही तुमच्या मित्रांच्या आग्रहाखातर तुमचा जॉब सांभाळून मिळालेल्या वेळात विनामूल्य जर्मन भाषेचा क्लास घेत आहात . त्यासाठी २ २ तास नोट्स काढत आहात , अन महिन्याभराने घेतलेल्या अगदी सोप्या टेस्टमधे एक जण ० मार्क घेऊन येतो अन विचारल्यावर मला वेळ नाही अभ्यासाला म्हणतो , त्यावेळी काय करायच ?

२. तुम्ही लहान मुलांच्या पार्टीला गेला आहात . तुमची मुलगी अन एक मुलगा एकच फुगा घेऊन आहेत , तो मुलगा तिला मारतो आहे , (आमची पोरगी चांगली पैलवान आहे , पण कुणाला मारायच नाही ही आमची शिकवण )
त्यात त्याची आई येते अन मुलगीच्या हातातील फुगा हिसकावून त्याला देते , तुमची मुलगी रडू लागते , काय करायच ?

३. सध्या बायकोला घरी यायला वेळ होतो , म्हणून तुम्ही मुलीला सोसायटीच्या गार्डन मधे घेऊन जाता , दोनच झोपाळे . तुम्ही शांतपणे तुमच्या टर्नची वाट पाहता . टर्न आल्यावर तुमच्या मुलीला बसवता . २ च मिनिट झाली असतील , एक आजोबा नातीला घेऊन येतात , तुम्ही तुमच्या मुलीला १७ मोजून उतरवता (तिला तेवढच मोजता येत) आणि टर्न टर्न बसायच हे सांगता. आजोबा नातीला बसवतात. २ , ३, ५,१० ,२० मिनिट होतात . मुलगी बिचारी तुमच्याकडे अन तुम्ही आजोबांकडे बघता , आजोबा ढिम्म . तुम्ही मुलीला स्लाईड्स वर घेऊन जाता .

४. साधं सोसायटी मधल्या क्रिकेटच उदाहरण . आपण खेळतो ते मनोरंजनासाठी , मनाचा ताण हलका करण्यासाठी . यात माणूस का चिडत असेल ? खोटेपणा करत असेल ? काय साध्य होत त्यातून ? हाफ पिच मधे कुणीही फास्ट बॉल फेकू शकत हे माहित असताना , अन फास्ट बॉल अलाऊड नसताना फास्ट बॉल फेकून अन तो नो नाही म्हणून भांडण्यात काय मर्दुमकी आहे ? Out आहे हे सगळ्याना माहित असूनही केवळ भांडून नंतर तुम्ही शतक काय त्रिशतक जरी केल तरी ते गल्लीत टेनिस बॉलने हाफ पिच वरच ना ? Is it worth it ? कळतच नाही .

ही लगेच आठवलेली प्रातिनिधिक उदाहरणे. अन ही सगळी माणस काही रूढार्थाने वाईट नाहीत , किबहुना आपण काही वाईट करतोय हेच त्याना वाटत नसेल .
पण खरच काही कळत नाही . लोक सिग्नल का तोडतात ? वन वे मधून (अगदी खंबाटकीच्या बोगद्यातूनही) गाडी का घालतात ? यासारख्यापासून ते जिम मधली उपकरण का तोडतात ? स्विमिंग पूल मधे घाण का टाकतात ? लिफ्टच्या सेन्सरपाशी का थुंकतात ? असे अनेक प्रश्न . यातून त्याना असा काय मोठा फायदा होतो ? की ते तसेच आहेत ?

हे सगळ पाहून कधीकधी वाटत मात्र, की आपण तर कसे का होईना यात आपली तत्त्च (मोठा शब्द वाटतो ना , प्रिन्सिपल्स सोप आहे ) घेऊन तरलो . पण सगळ जगच अस असेल तर आपण आपल्या मुलीला दुबळं बनवत नाही ना ? थोड वाईट आपणही बनल पाहिजे का ? किमान तिलातरी बनवल पाहिजे का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला असं वाटतं की मागच्या काही वर्षांमधे (१०-१५ वर्षे) समाजामधे काही खोड्कर बदल झालेत.
उपद्रवमुल्य जास्त असलेल्या गोष्टी करण्याचे प्रमाण वाढलय. जितका त्रास देवु तितके आपले महत्त्व जास्त या विचारसरणीतुन लोकांचा कल अश्या बाबतीत वाढलाय. अश्या वेळेस भीडस्त स्वभावाच्या माणसांचा कोंडमारा होतो.
एकुण काय तर लोकांच्या अस्मितेचे गळवे फारच हळवे झालेत.

मला असं वाटतं की मागच्या काही वर्षांमधे (१०-१५ वर्षे) समाजामधे काही खोड्कर बदल झालेत.
उपद्रवमुल्य जास्त असलेल्या गोष्टी करण्याचे प्रमाण वाढलय
+१११११११११११११११११११११११११११११११

जिथे जावे तिथे असलीच माणसे सर्वत्र भरली आहेत. आपण इर्रिलिवेंट झालोय या जगाशी, किंवा नियम बदललेत जे आपल्याला माहित नाहीत. एक भलत्याच मॅट्रिक्समध्ये आहोत ज्याचे नियम आपल्याला समजत नाही, पाळता येत नाहीत.

चिडचीड होणे स्वाभाविकच आहे. वेळच्य वेळी उत्तर देणे उत्तम! >>>
विनिता जी, समोरचं जे कोणी असेल ते आपल्यापेक्षा वयानं खुपच मोठं असेल तर असं वेळच्या वेळी सडेतोड उत्तर दिल्यानंतर आपल्याकडं विक्षिप्त, असंस्कारी अशा नजरेनं पाहीलं जातं आपला मुद्दा एकदम रास्त असतानाही!! Sad

धन्यवाद सगळ्यांचे .
मला जास्त त्रास तेव्हा होतो , जेव्हा लोक काही फायदा नसताना (किंवा नगण्य फायदा असताना ) अश्या गोष्टी करतात.
याचा अर्थ असा नाही की , चोरी , लाच घेणे हे बरोबर आहे , ते जास्ती चूक आहे , पण त्याच्यामागे काहीतरी फायदा तरी आहे .
पण वर दिलेल्या उदाहरणात किंवा लिफ्टच्या सेन्सरवर पिंक मारून काय मिळत लोकाना हे कळत नाही Sad

चिडचिड पोचली केदार. Happy
बर्‍याचदा काही करता येत नाही ह्यामुळे जास्त चिडचिड होते.

आमची पोरगी चांगली पैलवान आहे , पण कुणाला मारायच नाही ही आमची शिकवण >>>>> मी उलट सांगेन. स्वतःहून मारायचं नाही हे बरोबर आहे. आपल्याला कोणी मारलं तर आपण उलट्या दोन ठेऊन द्याव्या असं सांगावं मुलींना (अगदी समोरचा/ची ओळखीतला असला तरी). समोरच्याला आपण चुकतो आहे हे कळणार कसं नाहीतर. बर्‍याचदा आई-बाप ढिम्म काही बोलत नाहीत !

लोकसंख्या वाढली की psychopathy वाढते असे मानववण्शशास्त्रज्ञ मानतात.माझा सायकोपॅथी वरचा लेख वाचा.किंवा psychopathy वर थोडं वाचल्यास राग कमी होईल.

लोकांनी पहिल्याच दिवशी तेजस एक्सप्रेसची दुरावस्था केली तेव्हा, मुले स्वतःच्याच शाळेचा बेंच खराब करतात तेंव्हा, रूम पार्टनर्स न विचारता माझे कपडे घालून जातात तेंव्हा, बँकेत मदत म्हणून दिलेला पेन परत मिळत नाही तेंव्हा, काही निर्लज्ज कलीग्स त्यांच्या चुका आपल्या डोक्यावर मारतात तेंव्हा हाच प्रश्न पडतो.

आपल्याकडं विक्षिप्त, असंस्कारी अशा नजरेनं पाहीलं जातं >>>हो पण अश्या लोकांनी आपल्याला चांगले समजून तरी काय उपयोग? नंतर मनस्ताप होण्यापेक्षा तिथल्या तेथेच आपल्या रागाचा निचरा केलेला बरा.

विचारल्यावर मला वेळ नाही अभ्यासाला म्हणतो , त्यावेळी काय करायच ?>>>आता सरळ सांगा कि तुला वेळ नसेल तर मी तरी माझा वेळ का वाया घालवू किंवा homework द्या, पुर्ण केला तर पुढचे शिकवा. नाहीतर......तुझा तू वेळ मिळाला तर अभ्यास कर आणि काही अडचण आल्यावर विचार मग मी मदत करेन असे सांगा.

आजोबा नातीला बसवतात. २ , ३, ५,१० ,२० मिनिट होतात . मुलगी बिचारी तुमच्याकडे अन तुम्ही आजोबांकडे बघता , आजोबा ढिम्म . >>>>मग लगेच म्हणायचे चला चला आता आमचा डाव, पटापटा उतरा.....आपणच त्या पोरीला उतरवायचे अन आपल्या मुलीला बसवायचे आता थोड्यावेळाने तुझा नंबर असे सांगायचे. हसत हसत बोलायचे.

कधी कधी आपल्याला वाद घालायला वेळ नसतो तेव्हा मनातल्या मनात जे बोलायचे ते बोलून घ्यायचे आणि सगळे विसरुन जायचे. Happy

सिंजी लोकसंख्या कमी करणे हा एक उपाय आहे का? तिसर्या महायुद्धाची तयारी करायला घ्यावी काय हाती? >>>
नॉस्ट्राडेमस ला विचारावं लागेल त्यासाठी ....

आपल्याकडं विक्षिप्त, असंस्कारी अशा नजरेनं पाहीलं जातं >>>हो पण अश्या लोकांनी आपल्याला चांगले समजून तरी काय उपयोग? नंतर मनस्ताप होण्यापेक्षा तिथल्या तेथेच आपल्या रागाचा निचरा केलेला बरा. >>>
विल ट्राय.. धन्स! Happy

अगदी अगदी झालंय. लेख रिलेट झाला खूपच. कधी वाटतं उलट बोलून टाकावं, कधी वाटतं दोन ठोसे द्यावे पण यातलं काहीच करायचा स्वभाव नसल्याने परत आहे ते सहन करत बसते. Sad
२ आणि ३ तर अगदी फारच जिव्हाळ्याचे विषय आहेत. बर्याच लोकांना कॉमन सेन्स नसतोच. जाम चिडचिड होते. काही काही लहान मुलेही अगदी डोक्यात जातात मग.

पराग ह्यांच्या मुद्द्याशी जोरदार असहमती.
आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाचे ऊट्टे मुलांकरवी काढण्यात काय हशील आहे? एका अनुभवानंतर मुलांना खुशाल 'तू ही मारत जा' अशी परमिशन दिल्याने नेमके कोण मुलांना घडवतेय, त्यांना चूक/ बरोबर शिकवते आहे, पालक की पहिल्याने मारले तो अजाण मुलगा/मुलगी आणि त्याचे पाल़क? त्या मुलांच्या पालकांशी कन्फ्रन्ट करणे (मुलांसमोर नाही) योग्य आहे किंवा स्वतःला व मुलाला/मुलीला त्यां फॅमिलीपासून डिसअसोशिएट करणे, नियमावली/ ऑथोरिटी ह्यांची मदत घेणेही योग्यं.

अश्या स्वार्थी, आततायी लोकांना टाळणे, एकटे पाडणे हाच एक रामबाण ऊपाय आहे आपणही त्यांच्यासारखा त्रागा करू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही. केदार ह्यांनी लिहिले ते ठीक आहे पण त्याच लोकांकडून तसाच अनुभव दुसर्‍यांदा आपल्याला येणार नाही ह्याची जबाबदारी आपलीच आहे.

>>>>अहो, मग अशाने लोकांमध्ये जाणे बंद करावे लागेल. >>> शंभरात अशी आडमुठी लोकं ३०-४० असतील असे गृहीत धरले तरी ऊरलेली ६०-७० लोक सोशलाईझ होण्यास पुरेशी नाहीत का?
समजा असे शंभरातले ९८ लोक आहेत जे ईश्यू निदर्शनास आणून देवून, समजावून सांगण्याने, नियमांची आठवण करून दिल्याने, ऑथोरिटीजची मदत घेतल्यानंतरही बधत नसतील, त्यांच्या वागण्यात फरक पडत नसेल आणि अश्या लोकांशीच वारंवार डील करत राहिल्याने तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर त्या त्रासाला जबाबदार तुम्ही स्वतः की ते लोक?
ऊरलेल्या २ लोकांत समाधान मानायचे नसेल तर प्रयत्नपूर्वक आपल्याला अवेलेबल असलेल्या सर्कलच्या बाहेर जाऊन ज्यांचे विचार पटतील अश्या लोकांच्या शोधात रहावे आणि त्यांच्याशी संपर्क वाढवावा.

माझ्या मित्राचा मुलगा ६ वर्षाचा आहे. अतिशय हट्टी, आणि त्रासदायक. माझ्या २.५ वर्षाच्या मुलीच्या खुप खोड्या काढतो, तिच्या वस्तु घेतो, ढकलुन देतो वगैरे वगैरे . ३ वेळेस मित्राला सांगुन पाहिलं, त्याचं म्हणनं की सगळे मुलं असच वागतात. त्यानंतर मात्र मीच त्याच्या मुलाला वेळोवेळी सांगणं चालु केलं. माझा मित्र आता माझा राग करतो. त्याचा मुलगा मात्र माझ्या मुलीसोबत बराच व्यवस्थित वागतो आता.

प्रातिनिधिक आणि चांगला लेख.
अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे व एकदा वाईट अनुभव आल्यावर त्यांना टाळणे हा बेस्ट उपाय. मुलांना मारामारी करायाला शिकवू नये पण स्वतःला defend करायला नक्कीच शिकवावं.
बाकी जगात चांगली माणसेही असतात त्यामुळे वाईट अनुभ्वापेक्षा त्यावर फोकस ठेवावा.

एकच उपाय - व्हेन इन डाउट, बी सेल्फिश! थोडक्यात, ज्या लोकांची आपल्याला नीट पारख नाही त्यांच्या बाबतीत चांगुलपणा, माणुसकी , स्त्री दाक्शिण्य वगरे दाखवण्यापेक्षा स्वार्थी व्हा!

१) तो मुलगा क्लासला आला काय नि गेला काय? लक्षच देऊ नका. त्याला नसेल शिकायचे पण बरोबरीचे सगळे क्लासला येतायेत म्हणून तो आला असावा.

२) त्या मुलाच्या आईला ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणायला पाहिजे होते, "जाऊ दे बेटा, ते लोक 'गरीब' आहेत, दे त्यांना फुगा. आपण दुसरा घेऊ"

३) आजोबांना सरळ नम्रपणे सांगायचे "आजोबा, आता तुमची टर्न. तुम्ही बसा. मी तुम्हाला झोके देतो."

४) त्या माणसाला म्हणायचे की "मी आता आऊट, तुला डबल बॅटींग!"
पुढच्या वेळेस सांगायचे की आता चिडलास की तुझ्या आईलाच नाव सांगून.

पुणेकर आहात, हे असे बोलायचे हे आम्ही सांगायचे. Happy

प्रामाणिकपणे सांगायचे तर जर तुम्हाला तुमच्या तत्वांमुळे काही त्रास होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला ती तत्वे झेपत नाहीयेत.
आपण काही अमुकतमुक आदर्श तत्वे बनवायची आणि मग ती पाळताना जगानेही आपला आदर राखून आपल्याशी वागायला हवे अशी एक नकळत आपल्या मनाशी अपेक्षा तयार झाली तर समजायचे काहीतरी चुकतेय.
ही अमुक माझी तत्वे आहेत पण या आजच्या जगात ती काही कामाची नाही असे स्वताचे सांत्वन करणे किंवा या बाह्य जगामुळे मला ती तत्वे बदलावी लागत आहेत अश्या सबबी पुढे करणे हे मला पटत नाही.
आपण काय आहोत हे ओळखून आपण ज्यात कम्फर्टेबल आहोत तसे वागावे. लोकं म्हणतात चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट वागावे. पण मला वाटते वाईटाशीही चांगलेच वागावे जर आपण चांगले वागणारे असू.

तुमच्या वरच्या केसमध्ये मी नेमके कसे वागलो असतो वा कोणी कसे वागावे हे सांगू शकत नाही कारण नुसते ईतक्या तपशीलावरून ते ठरत नाही. समोरची व्यक्ती काय कोण कशी आहे, त्यावेळी नेमकी कशी वागली, चेहरयावर काय भाव होते, काय एटीट्यूड होता, त्या व्यक्तीबद्दल आपला पूर्वानुभव वगैरे बरेच पैलू आहेत जे आपली रिएक्शन ठरवतात. पण एकाच गोष्टीची काळजी घ्यायची. आपली चीडचीड कधी होऊ द्यायची नाही. जर काहीच बोलता न आल्याने चीडचीड होणार असेल तर बोलून मोकळे व्हावे, आणि रोखठोक बोलणे आपला स्वभाव समजावा.

मुल सोबत असताना मात्र सिच्युएशन बदलते. आपल्या वागण्याने त्याच्यावर संस्कार होत असतात. जर न वाद घालता तिथून जाणार असाल तर त्याला आपले आईबाबा असतानाही आपल्यावर अन्याय झाला आणि त्यांनी काही केले नाही असा चुकीचा संदेशही पोहोचला नाही पाहिजे. तर अश्यावेळी मुलाला दोन समजूतदारपणाच्या गोष्टी सांगून असे वागणे कसे योग्य होते हे पटवून द्यावे.

मला माहित आहे की वरच्या प्रत्येक केसमध्ये काही ना काही तरी उपाय काढता येऊ शकतो .
मला हे कळत नाही की माणसाला क्रिकेट खेळताना चिडावस का वाटत ? त्या आईला किंवा त्या आजोबाना तस वागावस का वाटत ? लिफ्ट्च्या सेन्सरवर थुंकावस का वाटत ? Sad

याला लोकशाहीचा दुष्परिणाम म्हणावा लागेल. प्रत्येकाला स्वतःच्या सोयीसाठी केलेली/झालेली कृतीच योग्य वाटतेय.

Pages