हुरहूर, किती खास शब्द आहे ना? इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेत ती भावना व्यक्त करणारा असा शब्द असेल तरी का नाही अशी शंका वाटते. इतका योग्य शब्द आहे एका ठराविक मनस्थितीसाठी तो. तो नुसता लिहून चालत नाही, अनुभवायलाच हवा. आणि माझ्यासारखा सर्वांनाच त्याचा अनुभव येतंही असेल.
परवा पहाटे ४ वाजेपर्यंत जागून मित्राच्या घरी सर्वांसोबत गप्पा मारल्या, दंगा घातला आणि नाईलाजाने पहाटेच ड्राईव्ह करून घरी परतलो. अवघी दोनेक तासांची झोप घेऊन पुन्हा ऑफिसलाही गेले. तर झालं असं होतं, वीकेंडला जवळचे जुने मित्र सहकुटुंब शहरात आले होते आणि आमच्याच एका मित्राकडे राहात होते. त्यांच्यासोबत फिरायला जाणं, घरी बोलावणं, गप्पा, पॉट दुखेपर्यंत हसणं, सगळं केलं. जेवायचं काय, मुलांचं काय याच्या पलीकडे जाऊन मजा चालू होती. त्या सर्वांना सोडून जेव्हा घरी आलो तेव्हा जड मनाने दोघं गाडीत बसलो. गेले तीन दिवस कसे गेले होते कळलंच नाही. संध्याकाळी घरी परतूनही पहिले काही मिनिटं जरा शांततेतच गेले. We were already missing them.
हळूहळू सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोचले. सर्वांची कामं पुन्हा सुरु झाली. आम्हीही, मी आणि संदीप घरातल्या मागे पडलेल्या कामांबद्दल, आराम करण्याबद्दल बोललो. दोन दिवसातले फोटोही पुन्हा पाहून झाले. त्यावर व्हाट्स अँप वर बोलून झालं. सगळं नेहमीसारखं असूनही पुढचे दोन दिवस अजून शांततेत गेले. तसं हे नेहमीचंच. एखाद्या चांगल्या मित्राची, मैत्रिणीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. काहीतरी विषय काढून मन रमवण्याचा प्रयत्न करतो पण तोही व्यर्थ ठरतो.
एखाद्या ट्रीपला गेल्यावर विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित 'परत तेच रुटीन' असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर? की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो. एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. इकडे असताना माझे आई-वडील, सासू सासरे राहून भारतात परत गेले की एअरपोर्टपासूनच एक प्रकारची उदासी मनावर यायला लागलेली असते. घरी येऊन सगळं आवरायचं पडलेलं असतं. ते मुकाट्याने करत राहतो, पण तेही यंत्रवत. किंवा भारतातून परत येताना अख्खा प्रवास आणि घरी येऊनही मनावर असलेलं उदासीचं सावट.
तीच गोष्ट एखाद्या कार्यक्रमाचीही. एखादा मोठा साजरा केलेला वाढदिवस किंवा कार्यक्रम पार पडला की सर्व पाहुणे निघून गेलेले असतात. एखा-दुसरा जवळचा माणूस मागे थांबलेला असतो, मदतीसाठी.
घरातलं आवरत आवरत आम्ही बोलत राहतो,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी म्हणतं,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हॉल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका आजचा कार्यक्रम.'.
तर कार्यक्रम संपल्यावर मागे राहिलेल्या लोकांच्या तोंडून बाहेर पडणारी ही नेहमीची वाक्य. त्यात सर्व नीट झालं याचं समाधान असतं पण एक प्रकारची हुरहूरही.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. विचार करा लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
बऱ्याच दिवसांनी अशीच हुरहूर मनात दाटून आली सर्व जुन्या मित्रांना भेटून. कदाचित इथे लिहून तरी थोडी कमी होते का बघते. त्यासाठी एकच उपाय असतो पुन्हा एकदा रोजच्या कामात गुंतून जाणं. मग त्यात इथे लिहिणंही आलंच.
-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
छान लिहीलंय!
छान लिहीलंय!
.
.
.
एखादं नविन लिखाण करून पोस्ट केलं की त्यावर कशा कॉमेंट्स/प्रतिसाद येतात याबद्दल ही एक वेगळीच हुरहूर लागून राहीलेली असते..नाही का?
हृदयस्पर्शी लेख!!!
हृदयस्पर्शी लेख!!!
जत्रा पांगते, पालं उठतात
जत्रा पांगते, पालं उठतात
मोकळ्या जमिनीत उमाळे दाटतात
- फ. मुं. शिंदे ( आई)
तुम्ही वर्णन केली आहे ती भावना मला वाटतं हीच आहे.
पण हुरहूर ही भावना जास्त काही तरी आहे असं मला वाटतं.
अस्वस्थता, पण त्या अस्वस्थतेचे कारण कळत नाही बर्याच वेळा.
पण हुरहूर ही भावना जास्त काही
पण हुरहूर ही भावना जास्त काही तरी आहे असं मला वाटतं.
अस्वस्थता, पण त्या अस्वस्थतेचे कारण कळत नाही बर्याच वेळा. >>>> +100 . कातरवेळीची जीवघेणी हुरहुर .
मस्त लिखाण ! आवडेश!
मस्त लिखाण ! आवडेश!
आज निरोप घेतल्याशिवाय उद्या
आज निरोप घेतल्याशिवाय उद्या पुनर्भेटीचा आनंद कसा मिळणार?
छान लेख आहे.. पु.ले.शु.
छान लेख!
छान लेख!
खरचं " हुरहुर" शब्द किती योग्य आहे ना? अशी हुरहुर खूप वेळा अनुभवलेय. आणि अनुभवत असतोच आपण.
खूप सुंदर लेख
खूप सुंदर लेख
छान लेख! अशी हुरहुर खूप वेळा
छान लेख! अशी हुरहुर खूप वेळा अनुभवलेय. >> +१ काही वेळा कार्यक्रमाच्या आधी पण सगळे नीट होईल की नाही अशी हुरहुर लागते.. तिन्हीसांजेची, घरचे कुणी रोजची वेळ होऊन गेले तरी आले नाही त्याची ही वेगळीच हुरहुर असते.
"हुरहुर" दिसायला छोटा असणारा
"हुरहुर" दिसायला छोटा असणारा शब्द. पण किती आणि काय काय यात सामावल आहे. प्रत्येकाची 'हुरहुर' अनुभवण्याची वेगळी पद्धत आहे.
लेख आवडला. काही आठवणींनी मनाला 'हुरहुर' लावून गेला.
सर्वाण्चे मनापासून आभार.
सर्वाण्चे मनापासून आभार.
लिहायला जरा उशीरच झाला. असो.
विद्या.