एकेक शब्द माझा ..

Submitted by कविता क्षीरसागर on 27 June, 2017 - 13:22

एकेक शब्द माझा ...

हृदयात पेटलेला अग्नी सचेत आहे
एकेक शब्द माझा उजळून येत आहे

वाहून नाव गेली लाटेत प्राक्तनाच्या
हातास पण जराशी अद्याप रेत आहे

वादात वेळ जातो .. वाटू समान सारे
बाबा तुलाच घे मी आईस नेत आहे

आयुष्यभर तिनेही खस्ताच काढल्या ना !
आईस फक्त सांगा छकुली मजेत आहे

बुद्धी, मनास देखिल दे तेवढाच दर्जा
सौंदर्य काय नुसते गो-या त्वचेत आहे ?

श्वासात दुःख भरले .. याचे न दुःख आता
काहीतरी नशा ह्या चिरवेदनेत आहे

शब्दात प्राण भरता .. आयुष्य गीत झाले
बेसूर दुःखसुद्धा आता समेत आहे

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छकुली आणि आईस हे शेर आवडले!
रेत शेर ईंटरेस्टींग आहे... शेरच त्या शेरातल्या नावेसारखा आहे. पूर्ण अर्थ मला लागत नाहिये पण काहीतरी मनात रेंगाळत राहतय शेर वाचून झाल्यावर... हातास उरलेल्या रेतीसारखं.