मनाचे खेळ- भाग २

Submitted by विद्या भुतकर on 22 June, 2017 - 23:40

आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते.
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?".

"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं.

"झोपली ती मघाशी. "

"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."

"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं.
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला.
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच.

"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं.

"ह्म्म्म अरे जरा चेक करायचे आहे. थोडा वेळ बसते. तू काय करणार आहेस? जागा आहेस का झोपतोयस?" तिने विचारलं.

"आहे मी जागा, बैस जरा वेळ." म्हणत त्याने टीव्ही सुरु केला.

टीव्हीच्या आवाजात लक्ष लागेना म्हणून बेडरूममध्ये जाऊन बसली. घोळ छोटा नव्हता. लाखो रुपयांचा होता. आणि तोही फक्त ३ महिन्यातला. म्हणजे याच्या आधी किती असेल काय माहित? तिने तीही माहिती काढायचा प्रयत्न केला. पण मागच्या क्वार्टरची माहित तिला मिळत नव्हती. अमित आत येऊन तिच्याकडे पाहून तिच्याशेजारी बसला.

"काय झालं सांगशील का? किती टेन्शन मध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारलं.

"अरे मी हे मनोजचे रिपोर्ट चेक करत होते."....मनोज म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा उरतलाच होता. ती पुढे बोलू लागली.

".....तर त्यात काहीतरी घोळ वाटतोय. तू बसतोस का जरा शेजारी? एकदा टॅली करून बघू."
त्याने मग तिला मदत केली बराच वेळ आणि नक्की किती रुपयांचा घोळ आहे तेही दोघांनी लिहून काढलं.
त्याने कॉफी बनवली. बाहेर कॉफी घेत दोघेही विचार करत बसले होते.

"मी तुला सांगतो मला हा मनोज कधी पटलाच नाही. एकतर नको इतका आगाऊ वाटतो मला तो." अमितने विषय काढला. तिला बोलायचे त्राण नव्हतेच. तो बोलत राहिला.

"तू इतकी मारामारी करतेस रेव्हेन्यू साठी, नवीन क्लाएंट मिळवण्यासाठी हे मी पाहिलंय. हा बाबा आपला नेहमी पुढे असतोच, शिवाय बाकी ऐश चालूच असते त्याची. काहीतरी घोळ घालतच असणार आहे. नाहीतर तू सांग एकट्याच्या पगारात इतकं भागतं का?", त्याच्या या प्रश्नावर तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिने कधी विचारच केला नव्हता मनोज असं करू शकतो. एखाद्या गोष्टीत कामचुकारपणा करणे वेगळं आणि हे असे घोटाळे वेगळे. आपला मित्र, एकेकाळी आवडणारा व्यक्ती असा असू शकतो? ती विचार करत होती.

"तुला सांगतो आरती, मला तर शंका आहे त्याच्या मनातून तू अजूनही गेली नाहीयेस. मी पाहतो ना कसा तुझ्याकडे पाहतो तो." त्याने पुढे बोलणं चालूच ठेवलं.

"हे बघ आता या विषयावर बोलायलाच हवं का? आमच्यात काही नाहीये हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. उगाच कशाला तिकडे जायचं परत?", तिने वैतागून विचारलं.

"तसं नाही ग. माझं म्हणणंय की त्याला वाटत असेल तुही त्याची मैत्रीण आहेस तर या अशा चुका कुणाला सांगणार नाहीस. नाहीतर त्याने तुला हे असं एकटं सोडलंच नसतं. तुला सांगतोय तू आपलं रिपोर्ट करून टाक. उद्या काही बाहेर आलं तर त्याला मदत केली म्हणून तुही आत जाशील." हे मात्र त्याचं म्हणणं बरोबर होतं.

आपण आताही विचार करतच आहे की त्याला रिपोर्ट कसं करणार याचा? उद्या त्याला साथ दिली म्हणून मलाही बाहेर काढतीलच की. झोपायला गेलं तरी विचार कमी होत नव्हते. ती तशीच बेडवर पडून राहिली. कधीतरी तिची झोप लागून गेली.
----------------------------------------

सकाळी ती लवकर आवरून निघाली. गेल्या गेल्याच तिने मनोजला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून घेतलं. त्याच्यासमोर तिने सर्व हिशोब मांडला आणि जाबही विचारला.

"असं कसं करू शकतोस मनोज तू? तुला माहित आहे कंपनी पॉलिसी. जेल होईल तुला क्लाएंटला असं खोटं बिल केल्याबद्दल. तुझ्याकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती. एखादी चूक समजू शकतो पण हा तर घोटाळा आहे मोठा.", आरती.

मनोजला काय बोलायचं कळत नव्हतं. चोरी पकडली गेली होती. ती त्याच्याकडे आली म्हणजे अजून बॉसकडे गेली नाहीये इतकं नक्की होतं.

"आरती सॉरी चूक झाली."

"चूक?सॉरी? हे या सगळ्याच्या पलीकडे आहे. चूक म्हणजे एखादी एंट्री तू विसरून गेलास तर. पण हे तरी फसवणूक आहे क्लाएंटची. उद्या त्यांना आणि बाकी क्लाएंटला कळलं तर कंपनी बुडीत जाईल. मला तर कळत नाहीये काय करायचं?"

"म्हणजे? हे बघ मी तुला माझा शब्द देतो यापुढे नाही असं होणार. हा क्वार्टर माफ कर प्लिज."

"हा क्वार्टर म्हणजे? या आधी केलं असशील तर? आज केलं म्हणजे कालही केलं असणारच ना? तू हे सॉरी कशाला म्हणतोयस? तुला माहित आहे तुला रिपोर्ट केलं नाही तर माझी नोकरीही जाऊ शकते."

"हो मान्य आहे मला. मी कुठे म्हणतोय उद्या हे असं होईल. प्लिज यावेळी सोडून दे, पुढच्या वेळी असं होणार नाही, मी शब्द देतो तुला."

"हे बघ मी आता काहीच सांगू शकत नाहीये. तू सुटलास असं तर अजिबात समजू नकोस. मला मिटिंग आहेत आता, दुपारी बोलते." असं म्हणून आरती पुन्हा डेस्कवर गेली.
दुपारी जेवायच्या वेळी मनोज स्वतःच तिला घेऊन कॅंटीनमध्ये गेला. कितीतरी वेळ ती गप्पच होती. शेवटी तिने न राहवून विचारलं,"का असं केलंस? काय गरज काय होती?"

"आता तू गरज म्हणतेस पण त्या क्षणाला फ्रस्टेटेड होतो. वेगवेगळ्या नव्या क्लाएंटशी बोलूनही नवीन बिझनेस येत नव्हता. आता नवीन नाही आला तर निदान जुन्या क्लाएंटचं बिलिंग तरी तेव्हढं राहायला पाहिजे ना? तेही कमीच होत आहे. म्हटलं असतो एखादा क्वार्टर. पुढच्या क्वार्टरला करू काहीतरी. आता हे क्वार्टर प्रमोशन्स पण आहेत. सगळंच एकदम आलंय. पुढच्या क्वार्टरमध्ये करतो ना काहीतरी. नाही मिळालं काही तर नाही दाखवणार. मला वाटलं नव्हतं इतकं वाढेल प्रकरण. आता मला काही तुला अडकवायचं नव्हतं. बॉसने तुला करायला दिलं रिव्ह्यू तर मी काय करू? तुला योग्य वाटेल ते कर. पण उगाच तुला त्रास नको माझ्यामुळे. " त्याचं बोलणं ऐकून ती जरा शांत झाली.

"जाऊ दे अमु काय म्हणतेय? कशी आहे?" त्याने विषय बदलला.

"ठीक आहे. काल रात्री उशीर झाला तर झोपून गेली होती." तिने सांगितलं.

"हां जरा जास्तच उशीर झाला माझ्यामुळे. सॉरी. ",मनोज.

"इट्स ओके. अमितने केलं होतं सर्व. ती झोपली होती. जेवणही त्यानेच वाढलं काल मलाही.", तिने अमितचं कौतुक केलं तसा त्याचा चेहरा थोडा मावळला.

"चांगलं आहे तुला मदत आहे घरी. मला काही जमत नाही बाबा यातलं." त्याने प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं.

थोडा विचार करून त्याने पुढे तिला विचारलं,"आरती मला एक सांग, काल माझ्या प्रोजेक्टबद्दल काही बोललीस का त्याला तू?"

"हो आधी सांगितलं नव्हतं. पण त्याला माहित होतं तुझा रिव्ह्यू करतेय ते. मी बराच वेळ बसले तेव्हा काय झालं म्हणून विचारलं. त्यामुळे सांगितलं." आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण आपण त्याला का देतोय हे तिला कळत नव्हतं आणि चोरी तिने थोडीच केली होती?

"कशाला सांगितलंस उगाच? तू पण ना?", त्याने विचारलं.

"अरे पण त्याला सांगणारच ना? रात्री १-२ वाजेपर्यंत बसून काम करत होते तेही टेन्शनमध्ये." ती बोलली.

"तसं नाही. तुला सांगू का? मला वाटतं तो अजूनही माझ्याकडे शंकेनेच बघतो.", मनोज बोलला.

"कसली शंका?", ती.

"कसली म्हणजे? हेच की आपलं अफेअर आहे की काय अशी?",त्याने अडखळत सांगितलं.
"अरे असं काही नाहीये. उगाच फालतू शंका आणू नकोस." ती बोलली.

"हे बघ मला माहितेय तो माझ्याकडे कसा पाहतो ते. त्यात तू रात्री माझ्यासोबत इतका उशीर थांब्लीस. "

"हे बघ उगाच फालतू शंका मनात आणू नकोस. मनाने खूप चांगला आहे तो. त्याच्यामुळेच मी आज इतक्या पुढे जाऊ शकलेय."

"ते असेल गं. पण एका पुरुषाचा स्वभाव तू बदलू शकत नाहीस. निदान या बाबतीत तरी. जाऊ दे तुला नाही कळणार. पण एक सांगू. आपल्या दोघांचं नातं अमित किंवा रुचापेक्षा कितीतरी जुनं आहे. त्यामुळे तो किंवा ती काय म्हणते याने आपल्या नात्यात फरक पडू देत नाही. तूही तो पडू देऊ नकोस. किती वर्ष झाली आपण ओळखतोय एकमेकांना?"

तिने पुन्हा गणित केलं.

"किती बावळट होतो ना आपण जॉईन झालो तेंव्हा?"तिला आठवून हसू आलं.

"आता ही नवीन पोरं नोकरीला लागली की मला आपलीच आठवण होते. किती सुखाचे दिवस होते ते...." आरती पुन्हा एकदा भूतकाळात रमली होती.
फोनवरच्या रिमांईंडरने तिची तंद्री भंगली.

"चल जाते मी मिटिंग आहे बॉसबरोबर", तिने घाईने जेवण उरकलं आणि मीटिंगला गेली.
मनोजशी बोलताना पुन्हा एकदा तिला हलकं वाटू लागलं होतं. अर्थात काय करायचं हा प्रश्न अजूनही होताच.
----------------------------------

बॉससोबत बाकी चर्चा झाल्या पण हा विषय कसा काढायचा तिला कळत नव्हतं.
शेवटी तिने विचारलं, "सर ते रिव्ह्यू चं काम कधी करू कळत नाहीये. बराच बॅकलॉग राहिलाय माझाच. यावेळी दुसऱ्या कुणाला जमणार नाही का?"

"ओह मला वाटलं तुला असेल वेळ. सॉरी. उलट मागच्या वेळी भेटलो तर मनोजच म्हणाला, बाकी सर्व बिझी आहेत आरतीला आहे थोडा वेळ म्हणून........"

कितीतरी वेळ मनात अडकलेल्या तिच्या प्रश्नाचं उत्तर बॉसने दिलं होतं. संध्याकाळी ती पुन्हा बॉसकडे जाऊन आली होती, रिपोर्ट करायला.

मनोजशी ती एकच वाक्य बोलली होती,"तू मला गृहीत धरायला नको होतंस".

समाप्त.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी direct हाच भाग वाचला... पहिल्या भागाची गरज नाही आहे... हा भाग संपूर्ण वाटतोय

झकास!!

आवडली कथा. छोटी आहे त्यामुळे वाचताना ट्रॅक सुटला नाही.

मनोजशी ती एकच वाक्य बोलली होती,"तू मला गृहीत धरायला नको होतंस". +99999999
या एकाच वाक्याने कथा वजनदार झाली

पुढील कथेच्या प्रतीक्षेत.

I am a very old member of Maayboli, however after a long period of time I am trying to post my "Katha" on Gulamohar but could not find "Lekhanach Dhaga"

Kindly assist me for this. Also kindly adv if we have any android app of maayboli, if yes kindly give me the link

Regards
Anand (Sobati)
anand_rv@rediffmail.com

NOTE : I tried directly using contact us, but that is not working, so I am asking help here

Anand(Sobati),
first of all u are supposed to be a member of group in which you want to publish your story.( eg: if you are visiting कथा then in the right column you will see an option सभासद व्हा. Click on that, follow the instructions and you'll be the member of that group.) After becoming member of group, log in your account on maayboli, click on नविन लेखन करा and create लेखनाचा धागा. If having problem again, then ask me personally in माझी विचारपूस.