मनाचे खेळ - भाग १

Submitted by विद्या भुतकर on 22 June, 2017 - 00:32

कॉन्फरन्स रूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आरती आणि मनोज सध्या तिच्या टीमसाठी काही जणांचे इंटरव्यू घेत होते.

ती बोलत होती,"'अरे मॅगी करता येतं का?' हा काय प्रश्न आहे का कॅन्डीडेटला विचारायचा?".

"अगं पण तो बघ की? म्हणे माझा व्हिसा आहे तर ऑनसाईट कधी जायला मिळेल? इथे नोकरीचा पत्ता नाही अजून आणि डायरेकट ऑनसाईट? मग म्हटलं विचारावं तिथे जाऊन जेवण बनवता येईल की नाही ते. बरोबर ना? निदान सर्व्हायव्हल स्किल्स तरी पाहिजेत का नको?", मनोज.

"बिचारा किती विचार करत होता काय सांगायचं म्हणून. मग एनीवे हा पण नको का?", आरतीने विचारलं.

"हो कटाप. बघू पुढचं कोण आहे?", मनोजचा निर्णय झाला होता.

"नेहा नाव आहे. ७-८ वर्षाच्या अनुभव आहे असं लिहिलंय.",आरती.

"वा चला. नेहा म्हणजे कशी एकदम सिन्सियर वाटते.", मनोज नाव ऐकून खुश झाला होता.

"हो का? मुली म्हटलं की म्हणणारच तू. त्या पोराला इतका पिडलास. आता या मुलीला न विचारताच घेशील. बरोबर ना?", तिने विचारलं.

"हे बघ आरती, तुला खरं सांगतो. तुम्ही सगळ्या मुली ना खरंच सिन्सियर असता कामामध्ये. आता तूच बघ ना? किती सिरियसली काम करतेस? म्हणजे निदान माझ्यापेक्षा तरी जास्तच.", मनोजने हे मात्र याच्या आधीही तिला अनेकदा सांगितलं होतं. आणि खरंच त्याच्या प्रोजेक्टमध्ये बाकीच्या तुलनेत मुली जास्त होत्याही.

"काय करणार? करावं लागतं बाबा. आम्हाला रात्री बॉस बरोबर पार्ट्याना जाणं जमत नाही ना? मग त्याची भरपाई अशी करावी लागते.", तिची दुखरी नस होती ती.

"हे बघ आता तू टोमणे मारू नकोस हां.",मनोज बोलला.

"टोमणा काय? खरंच आहे की नाही? मीच नाही, मॅनेजमेंट मध्ये यायचं म्हटलं की आम्हाला जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतात.",ती.

"ह्म्म्म मी काय करू सांग मग? उलट मी तर तयार असतो मुलींना प्रोजेक्ट मध्ये घ्यायला. एकदम व्यवस्थित काम करतात. उलट ती पोरं माझ्यासारखी कामचुकार असतात.", त्याने हार मानली.

"जाऊ दे. चल नेहा बघू कशी आहे ते." म्हणत आरतीने तिला फोन लावला.

इंटरव्यू संपले. दोन चार कँडिडेट निवडून त्यांनी आजचं काम उरकलं होतं. ते बाहेर पडताना पाहून आजूबाजूच्या दोन-चार लोकांनी खुसपूस केली होतीच.

आरती आणि मनोज याच कंपनीत गेले १७-१८ वर्षे काम करत होते. दोघे एकाच वेळी कंपनीत नोकरीला लागले होते. इतक्या वर्षात दोघेही वेगवेगळ्या नात्यातून, अनुभवातून आणि भावनिक गुंतवणुकीतून गेले होते. सुरुवातीला मैत्री, मग प्रेम, ब्रेक-अप, राग, द्वेष आणि दोघांची लग्नं (आपापल्या पार्टनरशी) अशा अनेक तुकड्यातून ते फिरून आले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर झालं ते सर्व मागे टाकून जवळचे मित्र आणि ऑफिसमध्ये सिनियर म्हणून वागू शकत होते. अर्थात या सगळ्याचा इतिहास लोकांना सांगायची, स्पष्टीकरण द्यायची गरजही त्यांना वाटत नव्हती. नोकरीत ठराविक एका पदावर पोचल्यावर त्यांना एकटेपण जाणवत होतं. त्यात एकमेकांची सोबत कामी येत होती. अगदी दुपारी जेवायलाही दोघेच सोबत असत.
त्यादिवशी दुपारीही दोघे जेवायला बसले अन त्यांचं बोलणं सुरु झालं.

"काय गं डबा कुठे आहे? " त्याने विचारलं.

"रात्री खूप वेळ गेला कामात मग बाहेरच जेवलो आम्ही. त्यामुळे आजचा सकाळचा डबाही नाहीच. तुझं बरंय रे. बायको अगदी चार कप्प्यांचा डबा भरून देते."

"ह्म्म्म म्हणूनच हे पोट असं सुटलंय."

"पण काय रे? जरा मदत करत जा की बायकोला? किती वर्ष असा लहान पोरासारखा सांभाळणार बायको तुला?"

"हे बघ आता उगाच परत तेच लेक्चर नको देऊस. माहितेय तुझा नवरा खूप मदत करतो ते."

"हो, करतो बिचारा. म्हणून तर आज इतकं सगळं करू शकतेय. नाहीतर बसले असते घरी....."
त्याने वर बघून वाक्य पूर्ण केलं,"माझ्या बायकोसारखी. बरोबर ना?"

"हे बघ आता उगाच तू माझ्या बोलण्याचा अर्थ काढत बसू नकोस. पण तुलाही माहितेय की एकट्याच्या जीवावर सर्व जमत नाही. दोघांनी केलं तरच होतं करियर, निदान बायकांचं तरी. जाऊ दे ना. तू जेव. बघ उलट नशीब समज मी तुला नाही म्हटलं. नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागलं असतं माझं आणि हे कँटीनचं जेवण. "
त्यावर मनोज कसंबसं हसला. कितीतरी वेळा बोलणं या मुद्द्यावर येऊन बंद पडायचं.

पुढचे पाच मिनिट शांतता होती. एकदम आठवून मनोज म्हणाला,"ते राजीवने क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू करायला सांगितले आहेत. संध्याकाळी बसशील का जरा वेळ?"

"हां माझे त्यांनी त्या रेड्डीला दिले आहेत. तो अजून चुका काढत बसेल. बरंय तुझं, तू सुटतोस नेहमीच."

"म्हणजे? मी काय चुका करतो का? तुला सांभाळाव्या लागतात ते?"

"तसं नाही, पण फरक पडतो ना? नाहीतर एक काम कर तू माझा तपास, तुझा रेड्डीला दे." आरतीने आयडिया दिली.

"नको बाबा तो रेड्डी. नुसते व्याप लावतो मागे. माणसानं किती चिकट असावं? जरा स्पेलिंग चुकलं तरी बदल म्हणतो. आकडेवारी चार पैशानी चुकली तर फाशीच चढवेल तो.", मनोजला रेड्डी नको होता.

संध्याकाळी दोघेही मग कामं उरकून रिपोर्ट बघायला बसले. अगदी कॅल्क्युलेटर घेऊन गहन चर्चा सुरु झाली. नेहमीप्रमाणे लोकांनी 'यांचं चालू दे' म्हणून निरोप घेतलाच. मनोज बराच वेळ तिला समजावत होता काय प्रोजेक्ट होते, किती लोक, त्यांचे कामाचे तास, इ सर्व. पण काहीतरी गडबड वाटत होती. तो कितीही समजावून सांगत असला तरी ताळमेळ लागत नव्हता.

"अरे तो नवीन आलेला मुलगा, रवी, तो सुट्टीवर होता ना दोन महिने? आणि ती प्रेग्नन्ट बाई पण? काय यांची नावं मला आठवत नाहीयेत पटकन. पण त्यांच्या सुट्ट्या दिसत नाहीयेत यात?" आरतीने विचारलं.

मनोजने अशीच टोलवाटोलवीची उत्तरं दिली. तिने मग नाद सोडून दिला.

ती म्हणाली,"एक काम करूया का? मी घरी जाऊन बघू का? उशीर पण झालाय."

"नंतर कशाला? आताच बघ ना? जाऊ उरकून. मला पण उद्या सकाळी मेल करावा लागेल. तू आताच अप्रूव्ह करून टाक ना?", मनोजला जरा जास्तच घाई होती. पण जास्त बोललो तर आरती अजूनच चिडेल हे त्याला माहित होतं. तिच्या कामात कणभरही चूक चालायची नाही तिला.

तिने सर्व फाईल्स मेल करून घेतल्या आणि त्याला 'बाय' म्हणून ती घरी निघाली होती. कितीतरी वेळ गाडी चालवण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. मनोजच्या रिपोर्टमध्ये तिला काहीतरी मोठ्ठा घोळ दिसत होता. आता हे कसं, कुणाला सांगायचं ते तिला कळत नव्हतं.

क्रमश:

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीला मैत्री, मग प्रेम, ब्रेक-अप, राग, द्वेष आणि दोघांची लग्नं (आपापल्या पार्टनरशी) अशा अनेक तुकड्यातून ते फिरून आले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर झालं ते सर्व मागे टाकून जवळचे मित्र आणि ऑफिसमध्ये सिनियर म्हणून वागू शकत होत

गोष्ट छान आहे पण हे नाही पटलं फारसं. चांगल्या टर्मवर वेगळे झाले असल्यास ठीक पण राग, द्वेष नन्तर पुनः जवळची मैत्री- हजम नही हुआ!