२२ जून १८९७: आज स्मृतीदिन

Submitted by मंदार-जोशी on 22 June, 2012 - 03:23

22June1897.jpg

आज २२ जून. १८९७ साली याच दिवशी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचा आज स्मृतिदिन. वासुदेव हरी चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. पुण्यात प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाचारण केल्या गेलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅडने रोग नियंत्रणाच्या नावाखाली अत्याचाराचे सत्र सुरु केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे अनेकांसारखाच चाफेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात ब्रिटिशांविरुद्ध आणि प्रामुख्याने रँडविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला.

रँडचा सूड घेण्याची योजना तयार करुन त्याची अंमलबजावणीही केली. यात आधी दामोदरांच्या "गोंद्या आला रे आला" या आरोळी ऐकून बाळकृष्ण चाफेकरांनी रॅंड आहे अशा समजाने बग्गीत शिरून चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चाफेकरांनी रँडवर गोळीबार केला.

यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅड याने ३ जुलै १८९७ रोजी इस्पितळात प्राण सोडले. चाफेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही पकडण्यात आले. दामोदर चाफेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेव चाफेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चाफेकर यांना १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रांतिकारकांमधे चाफेकर बंधु यांना आद्य क्रांतिकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चाफेकर बंधूंचे गौरव "भारतातील क्रांतीचे जनक" असा केला आहे.

अशा या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीदिनी या पुण्यात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुया.

गुलमोहर: 

"चापेकर पर्व" हे पुस्तक बुकगंगा वरुन मागवले आहे. दोन-तीन दिवसात येईल. माहितीबद्दल धन्यवाद.

रॅण्डला मारले या घटनेला १९९७ साली १०० वर्षे पुर्ण झाली होती, तेव्हा पुणे विद्यापीठ रस्त्यावर त्या घटनेचे नाट्य रुपांतर (खरी घोडागाडी आणून) केले होते. ते पहाण्याचा योग आला होता.

तसेच चित्रपटात हरिभाऊंची (वडिल) भुमिका केलेले श्री. वासुदेव पाळंदे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलण्याची संधी देखील मिळाली होती.

टिळकांनी तेव्हाच सांगितले होते या युवकांना, की तुम्ही जो मार्ग निवडत आहात त्याने फार काही साध्य होईल असे नाही. कारण १८५७ नंतर युद्धाने कोणी जिंकू शकेल अशी परिस्थिती नव्हती. Sad

शेवटचा युद्धवाला नेता म्हणजे वासुदेव बळवंत फडके (१८८३) त्याच वर्षी सावरकरांचा जन्म.
आणि चाफेकरांना फाशी झाली तेव्हा सावरकर होते अवघे १४ वर्षांचे.

आणि २२ जून १८९७ हा चित्रपट या घटनेला १०० वर्ष पुर्ण झाली म्हणून लॉ कॉलेज रोडच्या फिल्म इन्स्टिट्यूट ला १९९७ साली दाखवला होता. तेव्हा ज्येष्ठ् अभिनेते दिलिप प्रभावळकर माझ्या शेजारच्या खुर्चित बसले होते.

.

महेश, दोन्ही पुस्तके वाच. टिळकांचा चापेकरांना पूर्ण पाठिंबा होता. ब्रिटिशांनी अधिक त्रास देऊ नये म्हणून एकमेकांवर टीका करण्याचा मार्ग त्यांनी योजला होता.

क्रांतीकारक दामोदर चापेकर
यांचा आज बलीदानदिन
सोमवार, १८ एप्रिल, १८९७ चा निर्णायक दिवस उजाडला......

फाशीची संकल्पित वेळ सकाळी ६:३० ची होती. त्या वेळेच्या आधी काही वेळ काळोखातच पहाटे चापेकरांना उठवावे लागले. स्नान उरकून चापेकर स्तोत्रपाठ म्हणत होते. त्यावेळी भयाचा त्यांच्यात मागमूसही नव्हता. ध्येयासाठी मरणा-या क्रांतिकारकांच्या अंगात ही धैर्यशाली वृत्ती कुठून येते त्याचं उत्तर, स्वातंत्र्यदेवीकडून आपल्या भक्तांना मिळणा-या मत्यूलाही मारणा-या स्फूर्तीतच फक्त सापडू शकेल.

दामोदर चापेकर फाशीच्या तक्तावर उभे राहिले, त्यांचे पाय एकत्र बांधण्यात आले, मुखमंडलावर फाशीची टोपी चढवण्यात आली. फास मानेभोवती टाकला आणि त्याची गाठ गळ्याच्या डवीकडे व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी सरकवण्यात आली. आणि ती आवळली जाताच चापेकरांचे हरिनामाचे अंतीम गीताचे सूर थांबले ! सगळीकडे भीषण स्तब्धता पसरली.

क्षणार्धात...... त्यांच्या पायाखालच्या फळ्यांच्या कळीची दांडी भेसूरपणे वाजली आणि त्या दुभंगून हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी व आपल्या देशबांधवांवरील, आयाबहिणींच्या विटंबनेचा प्रतिशोधघेण्यासाठी हा जगतविख्यात महान क्रांतिकारक फाशीच्या तक्ताखाली मृत्यूच्या साडेसहा फूट खोल दरीत फेकला गेला ! देह अचेतन झाला. दामोदर हरि चापेकरांनी स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या आत्मयज्ञात मृत्युंजयाच्या शौर्यानं आत्महवन केल !

क्रूरकर्मा वॉल्टर रँडचा वध करणारे महान क्रांतिकारक दामोदर हरि चापेकरांना विनम्र अभिवादन !!!

धन्यवाद अप्पाकाका!

दामोदररावांना नम्र अभिवादन. सावरकरांच्या कमला काव्यातल्या ओळी आठवल्या :

अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची

संदर्भ : http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%...

आ.न.,
-गा.पै.

स्वर्गीय चाफेकर बंधुंच्या निस्पृह व नि:संदेह धीरोदात्त उदात्त शौर्य स्मृतिस अभिवादन
आज १२० वर्षे होताहेत ...

इतक्या काळात त्यांचे बलिदान व्यर्थच गेल्यासारखे भासते आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही

>> समजले नाही... व्यर्थ का?

>>>> इतक्या काळात त्यांचे बलिदान व्यर्थच गेल्यासारखे भासते आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही
>> समजले नाही... व्यर्थ का? <<<<
इथे असली मते मांडण्यात अर्थ नाही म्हणुन मजकुर काढुन टाकला आहे. पण समाजात सर्वदूर पसरलेली "पराकोटीची स्वार्थांधता व त्यानुसार भ्रष्टाचार" बघता, मी त्या मताशी ठाम आहे.

समाजात सर्वदूर पसरलेली "पराकोटीची स्वार्थांधता व त्यानुसार भ्रष्टाचार" बघता,

>> हे सर्वकाळात सर्व समाजात सार्वत्रिक आहे हो. आजचे काय घेऊन बसलात. क्रांती करणारे क्रांती करत असतात, तळमळ असणारे आयुष्य पणाला लावत असतात, जीव देत असतात, घेतही असतात, पण 'स्वतःचे सुख' बघणारे समकालिन त्यांना येडे समजत असतात.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मी खालची पोस्ट टाकली होती: काहींना जाम खुपली. ते का हेही मला कळले नाही.

जेव्हा स्वातंत्र्य चळवळ जोरात होती तेव्हाच फाळकेंचे सिनेमे काढणे, प्रदर्शित करणे आणि त्याला गर्दी होणे हेही जोरात सुरु होते, संगीत नाटके, बालगंधर्व वगैरे हाऊसफुल असायचे, लोक रात्र रात्र मेहफिल सजवयाचे.….. स्वातंत्र्य लढा असा हातघाईवर आला असतांना ही नेमकी कोण लोकं होती जी मजेत शांततेने आयुष्य जगत होती हा मला प्रश्न पडतो.

सर्वकाळात सर्व समाजात सार्वत्रिक आहे हो. आजचे काय घेऊन बसलात. क्रांती करणारे क्रांती करत असतात, तळमळ असणारे आयुष्य पणाला लावत असतात, जीव देत असतात, घेतही असतात, पण 'स्वतःचे सुख' बघणारे समकालिन त्यांना येडे समजत असतात. ++++++1111111

२० वर्षांपूर्वी याला १०० वर्षे झाली होती तेव्हा गणेशखिंड रस्त्यावर याची एक re-enactment झाली होती. तशी न्ंतर कधी पुन्हा झाली का कल्पना नाही.

२२ जून आला की लोकांना हटकून चापेकर बंधू - रॅंड आयर्स्ट - गणेशखिंड - 'गोंद्या आला रे' वगैरे गोष्टी आठवतात. वर्षोनवर्षे हेच सुरु आहे. चार ओळी श्रध्दांजली फेसबुकवर 'फेकली' की आपलं 'राष्ट्रीय कर्तव्य' झालं!

हे न करता मी आज काहीतरी वेगळं लिहीतोय.

वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं. १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच - खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने मुंबईला जाण्यासाठी 'व्हिक्टोरीया' जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)

त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £२५० व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती अायर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत.

दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या. ह्या पुढे ६० वर्षे - म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या - १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट - माझ्यामते २२ जूनची ही खरी शोकांतिका आहे!

- संकेत कुलकर्णी (लंडन)
वरील माहीती व्हाॅट्स अँप आलेली ,

Sorry cant resist but-

१७ वर्षांच्या मुलीला पुढे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहणे, दुसरे लग्न करून नवरा मुलांसोबत नॉर्मल आयुष्य जगणे हे पर्याय १८९७ साली नसणे ही मला पेन्शन वा ताम्रपट नसल्यापेक्षा खरी शोकांतिका वाटते.

कालच हा चित्रपट पाहणे झाले . १२० वर्षापूर्वीचा काळ अप्रतिम उभा केला आहे . एका घरातील तीन तरणीताठी होतकरू मुले देशभक्तीने प्रेरित होवून बलिदान देतात हे पाहणेदेखील आजच्या काळात जड गेले . चाफेकर बंधूंच्या अतुलनीय शौर्य अन पराक्रमास वंदन . आमच्या आजच्या किडामुंगी सारख्या क्षुद्र स्वार्थाने पछाडलेल्या जगात असली व्यक्तिमत्त्वे म्हणजे एलियन वाटावीत इतकी भारतातील सामाजि परिस्थिती बिघडली आहे याचे वैषम्य वाटले ...

Pages