२२ जून १८९७: आज स्मृतीदिन

Submitted by मंदार-जोशी on 22 June, 2012 - 03:23

22June1897.jpg

आज २२ जून. १८९७ साली याच दिवशी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचा आज स्मृतिदिन. वासुदेव हरी चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. पुण्यात प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाचारण केल्या गेलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅडने रोग नियंत्रणाच्या नावाखाली अत्याचाराचे सत्र सुरु केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे अनेकांसारखाच चाफेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात ब्रिटिशांविरुद्ध आणि प्रामुख्याने रँडविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला.

रँडचा सूड घेण्याची योजना तयार करुन त्याची अंमलबजावणीही केली. यात आधी दामोदरांच्या "गोंद्या आला रे आला" या आरोळी ऐकून बाळकृष्ण चाफेकरांनी रॅंड आहे अशा समजाने बग्गीत शिरून चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चाफेकरांनी रँडवर गोळीबार केला.

यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅड याने ३ जुलै १८९७ रोजी इस्पितळात प्राण सोडले. चाफेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही पकडण्यात आले. दामोदर चाफेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेव चाफेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चाफेकर यांना १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रांतिकारकांमधे चाफेकर बंधु यांना आद्य क्रांतिकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चाफेकर बंधूंचे गौरव "भारतातील क्रांतीचे जनक" असा केला आहे.

अशा या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीदिनी या पुण्यात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुया.

गुलमोहर: 

मंदार....

"चाफेकर" कुटुंबियांच्या वंशवाटचालीबद्दल तुम्ही दाखविलेल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद.
मला आज धूसर आठवते की असाच काहीसा प्रयत्न आमच्या मित्रांपैकी दोघातिघांनी २००२-०३ मध्ये केला होता. त्यामध्ये एक 'द्रविड' पातीही होती, जी १९५० नंतर कोल्हापूरात स्थायिक झाली होती. गणेश द्रविडांचेच ते नातेवाईक होते की नाही याबद्दल संभ्रम आजही आहेच, पण त्या शोध मोहिमेत एक द्रविड जरूर होते.

तिन्ही चाफेकर बंधू हे किर्तनकार हरिभाऊ चाफेकरांचे पुत्र आणि डोळ्यासमोरच तिघेही देवाघरी गेल्यानंतर हरिभाऊंनी पुढे काही काळ मुंबई इलाख्यातील आपले 'चातुर्मास प्रवचन' सत्र चालूच ठेवल्याचे आढळते. त्यांच्या निधनाबद्दल कसलाही पुरावा नाही (नैसर्गिकच मृत्यु आला असेल असे मानू या). फाशीसमयी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव अनुक्रमे २७, २४ आणि १८ वर्षे वयाचे होते. तिघांचीही त्या काळातील प्रथेनुसार लहानपणीच विवाह झाले होते. वासुदेवाची पत्नी सीता पती निधनाच्या धक्क्यामुळे दुसर्‍या महिन्यातच निधन पावली. बाळकृष्णाची पत्नी गंगूबाई आणि दामोदरपंताची पत्नी दुर्गाबाई यानी पुण्यातून आपला मुक्काम हलवून चिंचवडमधील वडिलोपार्जित 'चापेकरवाड्या'त मुक्कामास आल्या. तीन भावापैकी फक्त दामोदरपंताना 'धोंडीराम' नावाचे अपत्य होते. त्याच्याच पालनपोषणात दुर्गाबाई आणि गंगुबाईनी हयात घालविली. पतीनिधनानंतर दोघीही सुमारे २० वर्षे हयात होत्या. पुढे उद्योगधंद्याच्या निमित्ताने धोंडीरावानी १९३५ मध्ये परत पुणे हेच आपले घर मानले व चिंचवडमधील चापेकर वाडा भाडेकरुंसाठी देण्यात आला. (धोंडीरामांनी संसार केला असणारच पण ते परत चिंचवडला परतल्याचा दाखला नाही). तिथून वाड्याला अवकळा आली, इतकी की तिथे अगदी दिवसाढवळ्या राजरोस चोरट्या दारुचे गुत्ते आणि जुगारी अड्डे सुरू झाले. १९७० नंतर मात्र पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळींनी अशी स्फूर्तीदायक इतिहासकालीन वाडे जतन करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर त्या निमित्ताने १९७२ मध्ये 'चाफेकर स्मारक समिती' ची स्थापना झाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पुढाकार घेऊन तो वाडा समितीकडे रक्षणासाठी दिल्याचा इतिहास आहे.

अप्पा बळवंत चौकातील अनेक दुकानापैकी एका दुकानात श्री.विनायक श्रीपाद जोशी यानी लिहिलेले "कंठस्नान आणि बलिदान" हे चाफेकर इतिहासावरील पुस्तक उपलब्ध असल्याची बातमी मध्यंतरी समजली, पण सांगणार्‍याने त्या दुकानाचे नावच सांगितले नाही (कदाचित त्याच्याही स्मरणातून ते नाव गेले असेल). तेवढ्या तुटपुंज्या माहितीवर मी तसेच आणखीन् एका मित्राने दोन दिवस अ.ब.चौक उभा आडवा चाळला, पण व्यर्थ. ते पुस्तक मिळाले नाही. ही २००५ मधील गोष्ट. तुम्ही स्वतः वा पुण्यातील तुमचे या विषयात गम्य असणारे कुणी मित्र असतील तर जरूर हे पुस्तक मिळविण्याचा प्रयत्न करा. मी वर सांगितलेल्या माहितीपेक्षाही तिथे जादाची माहिती आहे.

या माहितीव्यतिरिक्त या संदर्भात आणखीन् जादाचा विदा कुणाकडे असल्यास आणि तो इथे दिल्यास मलाही ती माहिती वाचायला खूप भावेल.

अशोक पाटील

बरोबर चिनूक्स....पण ते तसे राहणे केवळ किर्तनकाळातच घडत असते. चापेकरांचे तेथील यजमान तशी व्यवस्था त्या त्या काळात करीत असत. तसा प्रघातच होता असे म्हटले तर ते जास्त योग्य ठरेल. पटवर्धन दांपत्याच्या त्या चित्रपटात हरिभाऊ आणि मंडळी रेल्वेने मुंबईला जात असल्याचा पुसटसा उल्लेख आहेच.

अशोक पाटील

>>> फाशीचीच शिक्षा दिली हे दामोदर चाफेकरांना कळल्यावर, फाशीची शिक्षा टाळण्यासाठी ज्या भ्याडपणे इंग्रजी सत्तेसमोर ते शरण गेले (म्हणजेच स्वत: दिलेला गुन्हाचा कबुलीजबाब बदलने वगैरे) ही अगदिच लाजिरवाणी गोष्ट होती. त्याऐवजी <<<<
या मताशी मी सहमत नाही. घटनेनन्तर जवळपास सव्वाशेवर्शानन्तर हे मत बनविणे तुलनेत फारच सोपे आहे.
मात्र, मूळात आपण पकडले गेल्यानन्तर "थर्ड डीग्री" ती देखिल गोर्‍या सोजिरान्ची सहन करणे अवघड होऊन त्यातुन इतरान्ची नावे फुटणे शक्य असल्याने, स्वतः पुरता गुन्हा कबुल करुन फाशीची शिक्षा एकट्यापुरती मर्यादीत ठेवल्याचा कार्यकारण भावच मी तरी माझ्या आईकडून शिकलो आहे.
शिवाय, इन्ग्रज सरकारने जन्गजन्ग पछाडूनहि, लो. टिळक वा अन्य राजकीय पुढार्‍यान्ची नावे गोवण्याची इन्ग्रजान्ची बळाद्वारेची शिकस्त या तिनही बन्धुन्नी उधळून लावली हे देखिल विसरता कामा नये.

तत्कालिन सामाजिक परिस्थितीप्रमाणे (सध्याही फार वेगळी नाही) अशा सरकारी खप्पामर्जीला घाबरुन, बाकी समाज/सगेसोयरे/नातेवाइक अशा कुटुम्बाला आपसूकच अलिखित नियमाप्रमाणे वाळीत टाकत असत. दुर्दैवाने चाफेकरांबाबतचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत, तर स्वा. सावरकरान्चेही बाबतीत, कावळ्यान्करता वाहिलेल्या स्मशानातिल पिन्डाचा भात खाऊन दिवस कण्ठावे लागल्याचा पुसटसा उल्लेख आहे. आत्यन्तिक गुप्तता पाळीत करीत असलेल्या क्रान्तिकार्याचे परिणामस्वरुप सामोर्‍या आलेल्या परिस्थितीस तोन्ड देताना, ती भीषण परिस्थिती कशाप्रकारे "भोगली" याबाबतही उर्वरित शिल्लक कुटुम्बियान्नी गुप्तता पाळली अन बाकी समाज/नातेवाईक/सगेसोयरे इत्यादीन्नी त्याची काडीचीही दखल घेतली नाही, केवळ हेच वास्तव मला समजते. दामोदर चाफेकर भ्याड होते की नव्हते याचेशी मला देणेघेणे नाही, अन भ्याड अस्ते, तर रॅण्डवर गोळी झाडूच शकले नस्ते.
या सम्पुर्ण सत्यकथेला "फितुरीच्या घाताचा" एक उपपदरही आहे, अन कथेमधे फितुराचे निष्ठूरपणे केलेले निर्दाळणही आहे.

@अशोक पाटील
खालील दुव्यावर "कंठस्नान व बलिदान" (प्रकाशकः राजा प्रकाशन) हे वि श्री जोशींचे चाफेकर बंधूंवरील संशोधनात्मक पुस्तक सवलतीत २२५ रूपयाला उपलब्ध आहे तसेच "अक्षरधारा" बुक गॅलरीतही (सणस प्लाझा, बाजीराव पथ, अत्रे सभाग्रुहाजवळ) उपलब्ध आहे. राजा प्रकाशनचे कार्यालय निंबाळकर तालिमला आहे. तेथे नक्की मिळेल. मी bookganga वरून घेतले आहे. मौल्यवान व संग्रही ठेवावे असे पुस्तक आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books?BookSearchTags=%E0%A4%95%E0%A4%82%...

तुम्ही दिलेल्या चाफेकरांच्या दुर्मीळ माहितीविषयी धन्यवाद!

१८ एप्रील १९९८ या दिवशी ( दामोदर चापेकरांना फाशी दिले त्याची शताब्दी ) चिंचवडच्या चापेकर चौकात एक ऐतीहासिक सभा झाली. या सभेत साधारण ७५-८० वर्षांचे चापेकरांचे नातेवाईक हजर होते. ( नात्याने तीन चापेकर बंधुंपैकी कुणाचे तरी पणतु असावते ) ज्यांनी चापेकरवाडा चापेकर स्मारक समितीची तांत्रिक हस्तांतरच्या प्रक्रियेत मोलाची भुमिका बजावली.

हे नातेवाईक असही म्हणाले की भोसरीत आमची आणखी पिढीजात जमिन आहे. कोणी विधायक कार्यासाठी मागीतली तर मी ती ही देईन.

या चापेकर वाड्यात अनेक वर्ष व्यायामशाळा होती आणि या व्यायामशाळेत अनेक व्यायामपटु होते. मी स्वत: जाधव सरांकडे दोरीवर चढणे, जोर बैठका इ शिकलो आहे.

चापेकर चौकातल्या टॉवर आणि पुतळ्याचा भुमीपुजन समारंभ आणिबाणीच्या कालात कै. बॅ. विठठलराव गाडगीळ ( तत्कालीन संरक्षण उत्पादन केंद्रीय मंत्री ) तसेच महाराष्ट्राचे तरुण तडफदार क्रिडा मंत्री श्री शरद पवारसाहेब यांच्या उपस्थीतीत झाला होता.

पुढे पुतळ्याचे अनावरण मा. मोहन धारियांच्या हस्ते झाले जेव्हा जनता पक्षाचा काळ होता.

या निमीत्ताने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.

@ अक्षय ~ पुस्तकाच्या महत्वपूर्ण माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. बूकगंगा आणि फ्लिपकार्टवरून मी पुस्तके मागवित असतोच, पण श्री.जोशींचे हे पुस्तक नजरेतून निसटले हे नक्की. आता जरूर मागवून घेतो. अक्षरधारा प्रदर्शन कोल्हापूरात नित्यनेमाने भरत असते, पण पुस्तकांची रचना इतकी किचकट केली जाते की असे 'जरासे हटके' पुस्तक नेमके कुठे सापडेल या विषयी तिथला स्टाफ अजिबात सहकार्य करीत नाही असा माझा अनुभव आहे. (या संदर्भात मी तेथील 'सूचनावही'त तक्रारही नोंदविली होती, पण त्याबद्दल अक्षरधाराकडून एका अक्षरानेही खुलासा करण्यात आला नाही.)

@ रोहित ~ 'चाफेकर' की "चापेकर". इंग्रजीमधील लिखाणात जिथेजिथे 'रॅण्ड प्रकरण' आले आहे तिथे तिथे या तिघा बंधूंचा उल्लेख Chapekar brothers असा झाला आहे, त्यावरून हिंदी भाषिकात 'चापेकर' हाच उच्चार रुढ झाला आहे. पण चित्पावन ब्राह्मणांत "चाफेकर" असा थेट उल्लेख केला जातो. ही मंडळी जाणीवपूर्वक आपल्या नावाचे स्पेलिंग Chaphekar असा करतात.

थोडक्यात आडनावाच्या उच्चारातील भिन्नतेबाबत असे प्रसंग ठिकठिकाणी आढळतात. मराठ्यांची आडनावेही अपवाद नाहीत. आशा भोसले यांच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये Bhonsale, Bhosle, Bhosale, Bhonsle अशी विविधता आढळते. एकट्या एच.एम.व्ही.ने ७८ आरपीएम प्लेईंग रेकॉर्डसवर भोसले आडनावाची चार रुपे वापरली आहेत.

चापेकर/चाफेकर त्याला अपवाद नाहीत.

अशोक पाटील

@लिंबू जी
>दामोदर चाफेकर भ्याड होते की नव्हते याचेशी मला देणेघेणे नाही, अन भ्याड अस्ते, तर रॅण्डवर गोळी झाडूच शकले नस्ते. <

सहमत.
शिवाय मराठ्यांचे [ जातीवाचक नव्हे ] प्रेरणास्थान शिवराय होते आणि आजही आहेत.. शत्रूशी कसे वागायचे याचे धडे शिवरायांच्या चरित्रात जागोजागी उपलब्ध आहेत. आंग्रे यांना विनंति की त्यांनी त्यांच्या मताचा पुनर्विचार करावा.

@अशोक , मंदार आणि अक्षय
आपल्या सर्वांकडे नेहमीच माहितीचा खजिनाच उपलब्ध असतो.
अशोकजींचे कोणत्याही बाबतीत संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी घेतलेले कष्ट तर अनुकरणीयच!
मी मे महिन्यात[२२ वा २३ असेल] देहूला गेलो होतो. परतीच्या वाटेवर चाफेकर चौकातून आलो तर तेथील काढलेला पुतळा कोपर्‍यात अद्यापही स्थानापन्न झाला नसल्याचे दिसले.आता महिना उलटून गेल्यावर काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.

दामोदरसुत ~

प्रतिसादाबद्दल वर व्यक्त केलेल्या आपुलकीच्या भावनेबद्दल आपले आभार मानतो.

गेला आठवडा घरगुती कारणास्तव मी चिंचवड परिसरातच आहे. त्यामुळे दुपारच्या भोजनानंतर त्या हॉस्पिटलमध्येच वाचत बसण्याऐवजी आजुबाजूचा परिसर अशाच माहितीसाठी धुंडाळत असतो. 'चापेकर चौक' ही अगदी मनसोक्त फिरलो. तिथे 'हुतात्मा चापेकर प्राथमिक विद्यालय' देखील पाहिले. 'चापेकर की चाफेकर' हा गोंधळ मनी घुमत होताच म्हणून सोमवारी थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच प्रवेश केला. मुख्याध्यापक नसल्याने मग पर्यवेक्षकांना माझे ओळखपत्र दाखवून उत्सुकतेपोटी त्यांच्या शालेय दप्तरावर 'चापेकर की चाफेकर' यापैकी कोणता उल्लेख आहे ? असे विचारले. त्यानीही तत्परतेने (अनेक रजिस्टर्स चाळून) 'चाफेकर नसून चापेकर' अशीच सर्वत्र नोंद महापालिकेने दिली असल्याची कबुली दिली.

शिवाय त्या परिसरातील चौकात 'चापेकर चौक' असाच फलक दिसला. रिक्षा स्टॉपचेही नाव 'चापेकर रिक्षा स्टॅण्ड' असेच आहे.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुतळ्याचा मात्र कुठेच मागमूस नाही.

अशोक पाटील

मंदार लेख तर छानच, परंतु या लेखावरील प्रतिसादही आवडले..
माझ्याकडे होते कंठस्नान आणि बलीदान पुस्तक..
एका मित्राने नाटकातील भूमिकेसाठी वाचायला नेले, दुर्दैवाने तो त्या काही दिवसांतच वारल्याने पुस्तक परत मिळण्याची शक्यताच संपली.. Sad

जोग सर व इतर,
कालच हे पुस्तक बुकगंगावरुन मागवले. माझ्यापर्यंत पोहोचले की सांगतो.

मात्र बुकगंगावर इतर संकेतस्थळांसारखे (उदा. फ्लिपकार्ट) पोहोचवणे विनामूल्य नाही. या पुस्तकाला ९ रुपये पोस्टेज खर्च त्यांनी लावला. तरी हे पुस्तक होते म्हणून हरकत नाही. Happy

अशोक जी शाळेतूनच माहिती मिळविल्याबद्दल धन्यवाद!
फार पूर्वी कधितरी दाते पंचांगात कोकणस्थ आडनावांच्या यादीत चापेकर असेही एक आडनाव वाचल्याचे आठवते. साठे, साठये जशी खरी तर एकच. तसेच हेही असावे.
[ थोडे अवांतर : पांडे आडनावाचे स्पेलिंग पी ए एन डी ई वाय केलेले आणि मग त्याचे देवनागरी करतांना पांडेय असे केलेले आणि म्हणून एकदा रेकॉर्ड्मध्ये पांडेय आले म्हणून एक पांडे, पांडेय झाल्याचे मला माहीत आहे.]

दामोदरसुत, दाते पन्चान्गात असली / म्हणुन ती आडनावे बरोबरच आहेत असा खुद्द दाते पन्चान्गवाल्यांचाही दावा नाही. माझेच आडनाव, दाते पन्चागात १९७४ चे आधी भलतेच होते, मी वडीलान्ना ते दाखवुन दिल्यावर, त्यान्नि पत्र वगैरे पाठविले होते, नन्तर आता जे आडनाव येते ते "इन्ग्रजी " उच्चाराप्रमाणे आहे, तर मूळातील आडनाव कोकणातील नातेवाईक लावतात व त्याचेही इन्ग्रजी स्पेलिन्ग दोन प्रकारे होऊ शकते. त्यातही मूळातील आडनावातही कुलातील काही मोजक्या शाखा ज ऐवजी द लावतात.
इन्ग्रजी आमदानीत आडनावान्ची, गावान्च्या/शहरान्च्या नावान्ची तोडमोड इन्ग्रजान्नी केली म्हणण्यापेक्षा त्यान्चे उच्चाराप्रमाणे सत्ताधारि बाबावाक्यम प्रमाणम असे करीत एतद्देशीयान्नी ते चालवुन घेतले, व जेव्हा बदल करायची वेळ आली तेव्हा बॉम्बे की मुंबई यावर राजकीय वाद घालित कालहरण करीत बसले. महाराष्ट्रात बॉम्बेचे मुंबई झाल्यानन्तर देशभरात अन्य राज्यात मात्र अनेकानेक शहरांची नावे बिनबोभाट बदलली गेली ज्याची वाच्यता/ ज्यावर गदारोळ झाला नाही. महाराष्ट्राला मात्र नेहेमीप्रमाणेच वेगळाच न्याय लावला गेला
पण देशभक्तिच्या कोणत्याही स्वरुपातील कृतीची सुरुवात परकीय इन्ग्रजी धाटणीची, परकीय इन्ग्रजान्च्या चूकीच्या उच्चाराची नावे पुन्हा मूळ रुपात आणण्याची सुरुवातही नेहेमीप्रमाणे महाराष्ट्रातच झाली, त्यास पूर्वीप्रमाणेच एतद्देशीयान्चा विरोधही तितकाच झाला. पण ते झाल्यावर मात्र त्या रुळलेल्या वाटेवरुन बाकिच्यान्नी आपले काम साधून घेतले. असो. हा वेगळा विषय आहे.

सर्वश्री दामोदरसुत आणि लिंबुटिंबू....

महाराष्ट्रीयन संस्कृतीतील कित्येक व्यक्ती वा घराणे आडनाव "एकारान्त" असल्याचे दिसते. उदा. फडके, साठे, गुप्ते, घाटे, दाते, माने, मोरे, साधले, नेने, देशपांडे, जेधे, विचारे, रेगे, देठे, कांबळे इ. अन्य राज्यांमध्ये (विशेषतः उत्तर पट्टा) आडनावात 'इकारान्त' प्रमाण बरेच मोठे असल्याचे दिसते. उदा. बॅनर्जी, अडवानी, बायपायी, अग्निहोत्री, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, खत्री, प्रजापती इ.

यामुळे झाले असे की इकारान्त आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग करताना शेवटी " i " लेटर येत असल्याने उच्चारातील गोंधळाची शक्यता अल्प असते. मात्र आपल्याकडील एकारान्त आडनावात " e " येत असल्याने मग इंग्रजी उच्चारामध्ये फरक पडतो. जसे मोरे स्पेलिंग More होते, मग याचा उच्चार परका माणूस 'मोअर" करेल म्हणून जाणीवपूर्वक मोरेचे स्पेलिंग Moray असे बदलून घेणे (जसे साठे यानी साठ्ये करून घेतल्याचे दिसते, त्यानुसार) क्रमप्राप्त बनते.

"मुळे" हे एक असेच अनोखे उदाहरण. या आडनावाचे रितीनुसार स्पेलिंग होते "Mule", पण या स्पेलिंगचा इंग्रजी अर्थ आहे 'गाढव' वा 'खेचर'. आता कोण शहाणा 'मुळे' आपल्या नावाचा तसा अर्थ होऊ देईल ? म्हणून मग सुशिक्षित पिढीने स्पेलिंग Mulay असे बदलून घेतले.

असो....काहीसे विषयांतर झाले आहे, पण धागाकर्ते मंदार समजून घेतील.

अशोक पाटील

मंदार छान लेख..चापेकर वाडा/ शाळा आणि त्याच्या मागेच आम्ही रहात असलेला पुरंदरे वाडा..असंख्य आठवणी जाग्या झाल्या. कालच घरी मस्त गप्पा रंगल्या होत्या.. चापेकर वाडा, व्यायामशाळा, चापेकर शाळा, पुरंदरे वाडा, राम आळी, घारे डॉक्टरांचा दवाखाना, वाड्यातले बालपणीचे दिवस Happy मस्त ह्यावर नक्कीच काहितरी लिहायला आवडेल.

अशोकजी, हे विवेचनही पटते!
अर्थात सर्वच ठिकाणी लागू पडते असे नाही. Happy कारण अन्य कित्येक स्पेलिन्गान्ना वरील अर्थाचा निकष लागू होत नाही, अन जेव्हा की "नाम" असेल तर पहिले अक्षर क्यापिटल मधे लिहीले तर more मोअर ऐवजी More मोरे असे वाचणे आजही सहजशक्य आहे, तसे वाचायचेच नाही असे खोडसाळपणे ठरविल्याशिवाय उच्चारात गल्लत करणे कोणाही "सुशिक्षितास" शक्य नाही, नाही का? असो.

लिंबुटिंबू....

"नाम" संदर्भात जेव्हा आपण स्पेलिंगचा विचार करतो त्यावेळी दिलीपचे Dileep असे केले काय किंवा Dilip केले तरी उच्चारात फरक होत नाही. तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या स्पेलिंगमध्ये Shivaji ऐवजी Sivaji अशी लेटर्स येतात तर बंगालमध्ये सुभाषबाबूंचे नाव Subhas babu असे केले जाते (त्यातही सुभाष आणि बाबू मध्ये एक स्पेस का सोडतात हे समजत नाही. असो)

मात्र आपण 'नेम' आणि 'सरनेम' ह्या दोन घटकांकडे स्वतंत्ररित्या पाहिले तर त्यातून अन्य ध्वनी निघण्याच्या शक्यता गृहित धरली जाते. मी वर जे 'मुळे' यांचे उदाहरण दिले आहे, त्याविषयी इंग्लंडस्थित एका "मुळ्या"नेच मला सांगितले होते कारण त्याने ज्यावेळी आपल्या नावाचा शिक्का Shrish N. Mulay असा केल्याचे पाहिल्यावर मी त्याला त्यामागील कारण विचारले असता त्याने 'खेचर' गोंधळ सांगितला होता.

MORE असे लिहिले तर इथे उच्चार योग्य होईल यात शंका नाही, प्रश्न येतो तो जर एखादा मोरे साता समुद्रापल्याड गेला तरच. इथल्या पेंडसे पातीतील एक मुलगीचे लग्न झाले तर तिच्या रिसेप्शन कार्डवर Mrs. and Mr. Arvind S. Pendsay cordially invite you...... असे प्रिंट करण्यात आले होते आणि विशेष म्हणजे हे मि.पेंडसे माझ्याच कार्यालयात गेली २५ वर्षे आहेत आणि शासकीय पगार मात्र A.S. Pendse या नावानेच घेतात.

हीच गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांचीही झाली आहेच ना. 'मातोश्री' दादर येथील ही सारी मंडळी आपल्या आडनावाचे स्पेलिंग उच्चारानुसार Thakare असे न करता Thakaray असेच का करतात हे काही मोठे कोडे नाही.

(अवांतर : मंदार तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेत आहे..... Happy Happy

>>> हीच गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांचीही झाली आहेच ना. 'मातोश्री' दादर येथील ही सारी मंडळी आपल्या आडनावाचे स्पेलिंग उच्चारानुसार Thakare असे न करता Thakaray असेच का करतात हे काही मोठे कोडे नाही.

इंग्लिश वृत्तपत्रात ठाकरे आडनावाचे स्पेलिंग 'Thackeray' असे छापून येते.

"इंग्लिश वृत्तपत्रात ठाकरे आडनावाचे स्पेलिंग 'Thackeray' असे छापून येते."

~ होय मास्तुरे....तशा स्पेलिंगला बाळासाहेब आणि को. सदस्यांनी कधी आक्षेप घेतल्याचे आढळत नाही. राजचे वडील श्रीकांत ठाकरे यांची मराठी भावगीत जगतात संगीतकार म्हणून चांगली ओळख होती. एच.एम.व्ही. आणि पॉलिडॉर तबकड्यावर त्यांच्या नावाचे स्पेलिंग मात्र 'Thakare' असेच आहे.

अशोकजी, बरोबर विवेचन Happy
नशिब आपले चान्गलय कि मायबोलीवर देवनागरीतुन मुळे वगैरे आडनावे टाईप करताना या इन्ग्रजी स्पेलिन्गाच्या गोन्धळाची अडचण येत नाही. Proud
अर्थात अजुन काही वर्षानीचे सान्गता येत नाही, की तेव्हा देवनागरीतून लिहू/वाचू शकणारे किती असतील अन मराठी बोलणारे किती असतील. असो.

२२ जून १८९७ या चित्रपटाची सीडी माझ्याकडे आहे. अतिशय मेहनत घेऊन बनविलेला सुंदर चित्रपट.
चाफेकर बंधुंच्या बलिदानातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उदय झाला. !

@ अक्षय जोग | 23 June, 2012 - 14:45
तुम्ही सुचवलेले व बुकगंगातर्फे मागवलेले 'कंठस्नान व बलिदान' (राजा प्रकाशन) हे पुस्तक आज घरी आले. आता वाचून काढतो.
कसे आहे ते इथे लिहेनच. हे पुस्तक सुचवल्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे समजत नाही Happy

@मंदार जोशी व अशोक पाटील

चापेकरांचे वंशज सध्या डोंबिवलीत राहतात अशी माहिती डॉ सच्चिदानंद शेवडेंच्या "चापेकर पर्व" पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिली आहे.
खालील दुव्यावर हे पुस्तक मिळेल व प्रस्तावनाही वाचता येईल.

http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=4827249809049200462...

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4827249809049200462?BookNa...

Pages