तीन दिवस दोन रात्री : भाग १

Submitted by नानाकळा on 15 June, 2017 - 01:24

(अनुभव खरा, नावे खोटी)

त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

................................................

"साहेब, निघायचं की नाही?"
"हो, अहो बस पाच मिनिटांत आलो, हे फ्लेक्स घेतोय...फक्त"
"अहो, सात वाजले इथेच, मुंबईला कधी पोचणार..? खरं सांगा फ्लाईट रात्री दोन ला आहे ना?"
"नाही हो, फ्लाईट अकरालाच आहे. आपण पोचू, काळजी नका करु."
"या लवकर.."

दिनेशशेठ धीरगंभीर आवाजात फोनवर मला बोलत होता. मी चटदिशी दोन्ही फ्लेक्सचे बाड उचलून गाडीत घातले. गर्रकन फिरवली, आणि त्याच्या दुकानासमोर उभा राहिलो. आम्ही त्यांच्या बोलेरोतून जायचे ठरले होते. ड्रायवर आम्हाला सोडायला येणार होता एअरपोर्टपर्यंत. मुंबईत धुमाकूळ पाऊस सुरु होता. टीवीवरच्या बातम्यांनी इतर पाशिंजरांना दहशतीत आणलेले होते. मी निश्चिंत होतो. मला वेळ माहित होती.

सगळे बोलेरोत बसले. मी, दिनेशशेठ, गणेशशेठ असे तिघे आणि रमेशशेठला पुढच्या गावावरुन उचलायचे होते. ड्रायवर आणि त्याचा साथीदारही होता. मी मागच्या सीटवर दोघांसोबत बसलो. ड्रायवरने गाडी सुरु केली. आणि तो आरामात निघाला. पाऊस सुरु होताच, ट्रॅफिकही होतंच. सारथ्याचे लक्षण मला ठिक वाटत नव्हते, मी विचार केला, पुढचे गाव येईस्तोवर बघू. ह्याच्या संथपणाने गेलो तर कदाचित बोलेरो घेऊनच राजस्थान गाठायला लागेल.

पुढचे गाव आले. रमेशशेठला घ्यायचे म्हणून थांबलो. ड्रायवरला म्हटले, "मित्रा तू जरा मागे बस, गाडी मी चालवतो", दिनेशशेठ अगदी ओशाळला, म्हणाला, "अहो साहेब, तो चालवेल ना, तुम्ही कशाला त्रास करुन घेताय?" मी म्हटले, "मला चालवू द्या, बाकीचे मान-पानाचे विचार नंतर करु, आत्ता इथे मी काही कंपनीचा साहेब आहे असं समजू नका, आपण सहलीला चाललोय, आपण एकाच लेवलला राहूया."

मी बोलेरो हातात घेतली. पहिल्यांदाच. फार उत्सुकता असते मला नवनविन गाड्यांची. तशी बोलेरोबद्दलही होतीच. पहिल्या दहाच मिनिटांत ड्रायवरसिटला बसलो ह्याचा भयंकर पश्चाताप व्हायला लागला. कारण ह्या गाडीची सिटींग कारच्या सिटींगपेक्षा वेगळी आणि ब्रेक-अ‍ॅक्सिलिटर-क्लच ट्रक सारखे अगदी पायाखाली. पाय उचलून धरायला लागत होते. गुडघे दुखायला लागले आणि मी स्वतःलाच शिव्या द्यायला लागलो, कुठून ही अवदसा आठवली आपल्याला. पण आता स्वतःच तोंड मारल्याने गप्प बसलो आणि निमूट चालवत राहिलो. सुदैवाने पुढे जास्त गिअर बदलत बसायला लागले नाही. पुण्यातून एक्स्प्रेसवे पकडला आणि बोलेरो निघाली सूसाट... सांताक्रुजशिवाय कुठेही थांबायचे नाहीच.

पाच तासांत विमानतळाच्या गेटवर होतो. अकराच्या ठोक्याला शार्प.
दिनेशशेठ म्हणाला, "तुम्ही योग्यच केलं, ह्या पोराने दोन वाजवले असते आपल्याला इथे आणायला"
मी, "अहो ती ट्रान्सपोर्टची पोरं, त्यांचे काही चुकत नाही, पण कधी कधी वेळप्रसंग बघावा लागतोच"
आम्ही सगळे हसलो आणि बॉसला फोन लावला. बॉस अजून पोचले नव्हते. दिनेशशेठ मंद हसत म्हणाला, "खरंच सांगा फ्लाईट दोन वाजताची आहे ना?" मी हसतच म्हटलं, "जेवण करुयात का?"

एअरपोर्टरोडच्यासमोर एक से एक होटेलं आहेत. आम्हाला परवडण्यासारखं दिसेल असं कोणतंही नव्हतं. शेवटी पर्शियन दरबार ह्या बाहेरुन स्वस्त दिसणार्‍या रेस्तराँमधे जायचे ठरवले. गाडी त्याच्या दरवाज्यासमोर लावताच वॅले चावी मागायला आला. आणि माझ्या डोक्यात खण्णकन घंटा वाजली. बाबारे, दिसतंय तितकं स्वस्त नै हे. मरता क्या न करता. आता जास्त वेळ घालवणे फायद्याचे नव्हते. मुकाट जनता आत घेऊन गेलो. आत जाताच लक्षात आलं आपल्यासोबत असलेली जनता रेस्तराँच्या वातावरणात फिट बसत नाहीये. त्याचा प्रत्ययही लगेच आला. मी वॉशरुमला जाइस्तोवर पब्लिकला कोणीही काही विचारलं नव्हतं, का बसायला टेबल दिला. मी आल्यावर तिथल्या कॅप्टनला विचारलं, सहा जणांसाठी टेबल द्या. तो एका मोठ्या राउंड टेबलकडे बोट दाखवून म्हणाला, "उनका होने दो, फिर वहां बैठो" त्या 'उन्स' कडे बघून मला प्रचंड खात्री वाटत होती की त्यांना कोणतीही फ्लाईट पकडायची घाई नाही. मी परत त्या कॅप्टनला विचारले, "आप जरा उपरके फ्लोअरपे चेक करके बताओ, उपर कोई टेबल खाली होगा तो.." त्यावर त्या महान माणसाने ज्या अतिव प्रेमाने, गोंडस नजाकतीने आम्हाला उडवून लावत तो डायलॉग मारला की बस, "तुम जाकर देख के आओ.." बस, माझी सटकली. आणि मग अस्खलित इंग्लिशमधे त्याला झापझाप झापला. आमची गावठी लोकं बघून तो हुडूत करत होता, त्याची जरा चंपी झाली. मग वेगाने हालचाली होऊन पुढच्या मिनिटाला आम्ही वरच्या फ्लोअरला आसनस्थ झालो. वरच्या फ्लोअरचा कॅप्टन मात्र खर्‍याखुर्‍या यजमानाच्या आदबीने आमच्या बोलला, नीट ऑर्डर घेतली, व्यवस्थित सुचवणी केल्या, उत्तम सर्विस दिली. तरीही एकंदरच त्या वातावरणात आमची मंडळी मिसफिट होती हेच खरे. पर्शियन दरबारसारख्या उत्तम मांसाहारी ठिकाणी निव्वळ शाकाहारी खायचे म्हणजे..! चला, पण जेवण उत्तम झाले आणि बिलही उत्तम आले!

आता मोर्चा वळवला परत एअरपोर्टकडे. आता खरोखर टर्मिनल टू च्या प्रवेशद्वारातून आत शिरलो तेव्हा फारेनात आल्यागत वाटत व्हतं. बोलेरो चालकद्वयींकडे सुपूर्त केली, तीन दिवसांनी परत इथेच येण्यास सूचना दिल्या आणि त्यांचा निरोप घेऊन गेटनंबर चारकडे गेलो. सिक्युरिटीने थांबवले, त्याला मोबाईलवरुन टिकिटे दाखवली, बाकी आमच्याकडे काहीच नव्हते. ही टिकिटे ऑफिसवरुन व्हॉट्सप वर आलेली, इतर लोक नाशिकहून येणार होते. आमचे ओळखपत्र दाखवून निघत होतो. चौथा गडी लटकला, त्याला गार्डने थांबवले आणि मला आवाज देऊन परत बोलावले, "इनका नाम आपके लिस्टमें नही है", त्याला परत सगळी लिस्ट दाखवत, त्याचे नाव आणि ओळखपत्र जुळवून देऊन सुटका झाली. अकरा वाजून चाळीस मिनिटे झालेली. बॉस अजूनही आले नव्हते.

दिनेशशेठ परत, "किती वाजता आहे फ्लाईट??" मी काही उत्तर दिलेच नाही. मोबाईल काढला आणि टिकिट दाखवले, १२:५० ची फ्लाईट होती.

"साहेब, नक्की काय प्लान आहे ट्रिपचा?"
"मलाही माहित नाही हो, सगळं गुलदस्त्यात आहे, फिक्स काहीच सांगितलेलं नाही"
"फिक्स नाही म्हणजे काय, असं कसं चालायचं?"
"बघा आता, प्लान फिक्स असेल तर भारीच असेल, नसला तरी आपल्याला सरप्राईज असेल, दोनो सूरतमें आपको क्या गंवाना है?"
"ते तर खरंच आहे म्हणा, मानकरसाहेबांचे प्लान भारीच असतात हे माहित आहे, त्यामुळे जौ देत"

मी वेळ जात नव्हता म्हणून सहज चेक-इन काउंटरला गेलो. एअरैंडिया ची बया शांतपणे घाई करत मला सांगत होती, लवकर करा. मी म्हटलं ठिक आहे, मी माझी बॅग चेक-इन केली, बोर्डिंग पास घेतला आणि परत रमतगमत येऊन ह्या तिघांशी गप्पा मारत राहिलो. बॉस अजूनही आले नव्हते. आता तर त्यांचे फोनही लागत नव्हते. शेवटी साडेबारा झाले तसं मी ह्या तिघांना म्हटलं, त्यांना यायचं तेव्हा येऊ देत, तुम्ही तुमचे बोर्डिंगपास काढून घ्या. ते तिघे काउंटरला गेले तसा बयेनी बॉम्ब टाकला. "आता बोर्डिंग पास मिळणार नाही, फ्लाईट क्लोज झाली"

मला गर्रकन चक्करच आली. आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास, आपल्याला शष्प अनुभव नाही, दुसरं कोणी सांगणारं नाही, ज्याला सगळं माहिती तो अद्याप हजरच नाही. आणि ही बया म्हणते, "माझी वेळ संपली, मी काही करु शकत नाही, त्या ऑफिसर्सना सांगा आता.. मी तर तुम्हाला आधीच म्हणत होते, लवकर करा म्हणून." तिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही हे तिने फार खुबीने पटवून दिले. तीने आपली पर्स उचलली आणि चक्क चालू पडली. एअरैंडियाला शिव्या का मिळतात ह्याची पहिलीच झलक होती ही.

आता पुढच्या डेस्कला वयस्कर ऑफिसर बसलेले होते तिथे आलो, त्यांना समस्या सांगितली तर साहेब अस्खलित मराठीत बोलले, "इतक्या उशिरा यायला ही काय बस आहे काय?" आमच्या मंडळींमुळे हा टोमणा होता हे समजलं आणि खुपलंही. पण अडला हरी म्हणून त्याला मार्ग काढायची विनंती केली. तो म्हणाला, "काही नाही, आता हे टिकिट कॅन्सल करा आणि सकाळची दुसरी फ्लाईट बुक करा. विमान आता रनवेवर जाईल, काहीच होऊ शकत नाही",

मी म्हटलं, "अहो काहीतरी करा, माझ्यासोबत अजून लोक आहेत," तो म्हणाला, "कुठे आहेत?", मी, "अहो येतायत, गेटवरच आहेत," तो," हे बघा, असं नाही चालत, तुमची माणसे रमतगमत येतील तोवर काय विमान थांबवून ठेऊ?"

"साहेब, आमचं तीस लोकांचं बुकिंग आहे" मग मी ही बॉम्ब टाकला.

क्षणार्धात साहेबांच्या चेहर्‍यावरचे हावभाव, रंग बदलले, संभाव्य धोक्याची बहुधा त्याला जाणीव झाली असावी किंवा तीस लोकांना सोडून विमान कसे काय जाईल असे ही वाटले असावे, त्याला काय वाटले मला माहित नाही, पण त्याने मग तडक फोनाफोनी सुरु केली आणि तीस लोकांचं बोर्डिंग आहे, तीस लोकांचं बोर्डिंग आहे असे कोणाकोणाला सांगू लागला. चार माणसे कुठून तरी पैदा झाली, त्यांना काउंटरवर बोर्डिंगपास द्यायला बसवलं. आमची माणसे गार्डच्या ओळखपत्रांच्या चाचणीतून आरामात रमतगमतच येत होती. इथे आमच्या फ्रंटवर होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा अजिबात सदर इसमांना गंध नव्हता.

धावत पळत आतल्या चेकिंगच्या लाईनीत उभे राहिलो ते कळले की बाकीचीही वीसेक माणसे अजून विमानात बसायची आहेत, पावसामुळे सर्वांनाच उशीर झालेला. अशी एकूण पन्नासेक डोकी बाहेर ठेवून विमान कसं जाईल ह्याची मी माझ्या बालमनाशी समजूत घालून घेत होतो. काय करणार? पहिला विमानप्रवास हो...

सरतेशेवटी विमानात स्थानापन्न झालो. माझ्याशेजारच्या सीट्सवर एक तीशीतली ताई आणि तीचं इच्चक लेकरु होतं. बराच वेळ समोरच्या स्क्रीनकडे बघण्यात गेला, नंतर त्याचे रिमोट सिटमधून कसे काढावे याबद्दल डोके लढवण्यात गेला. अगदी आडाण्यासारखं (कुणी आपल्याकडे बघत नाही हे बघुन) इकडे दाबून बघ, तिकडे दाबून बघ प्रकार सुरु होते. हळूच माझ्या खांद्याला स्पर्श झाला. आमचा एक गावठी गडी मला ते कुठून काढायचे त्याचे बटन दाखवत होता. ते रिमोट हातात आलं, त्याचं काय करायचं हा पुढच्या प्रश्नाला सामोरे जाणे एवढेच त्या खटपटीचे फलित होते. मग ते परत जिथल्यातिथे ठेवून दिले. चाळा म्हणून हेडफोन घेतले. त्याचेही फलित एवढेच की त्याला कुठे प्लग करावे ते काही उमजत नव्हते. शेवटी गप बसलो गळ्यात घालून.

मग अचानक तो परमसुखदायी, 'ह्याचसाठी केला होता अट्टाहास, भोगला होता इतका त्रास' अशी सुखद जाणीव करुन देणारा आवाज कानी पडला, 'पायलटसाहेब' बोलत होते हो. आवाजावरुन तरुण वाटत होते. त्या आवाजातल्या तारुण्याने उभारी येण्याऐवजी काळजी पडली. ह्या बाबाला नक्की विमान चालवता येईल ना? की पैसे भरुन पायलटचं लायसन काळ्लं असंल? त्यांनी इंग्रजीत फ्लाईटची खबर दिली, सगळ्यांच स्वागत केलं, उशीर होत असल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. स्क्रीनवर सेफ्टीअवेरनेस विडियो सुरु झाला. 'यात्रीगण, कृपया अपनी कुर्सीकीपेटी बांधले' हा आजवर फक्त चित्रपटातून ऐकलेला आवाज आज प्रत्यक्ष ऐकायला मिळेल ह्याचा सपशेल स्वप्नभंग करत तोही विडियोतूनच ऐकायला आला. मधेच ते प्रसारण थांबून पायलटसाहेब सूचना देत होते. फ्लाईटची नियोजित वेळ टळून वीस मिनिटे झालेली. "वी आर वेटींग फॉर सम ऑफ अवर फेलो पॅसेंजर्स" असं मधाळ शब्दात डाराडूर झोपायच्या तयारीत लागलेल्या जन्तेला गोंजारत होते. अनेकांची निद्रादेवीची आराधना सुरु झाली होती. स्क्रीनवर परत सेफ्टीवाले विडियो सुरु झालेले. आणि अचानक पायलटचे दोन शब्द ऐकू आले, "लेडिज अ‍ॅन्ड जेन्टलमन, अनफॉर्चुनेटली........................................"

शप्पथ! त्या 'अनफॉर्चुनेटली' च्या पुढे किमान तीस मिनिटे एकही शब्द ते महाराज बोलले नाहीत, आणि मी जीव मुठीत घेऊन प्रत्येक सेकंद हा आता काहीतरी बोलेल, मग काहीतरी बोलेल ह्याची वाट कानात प्राण आणून का काय म्हणतात ते पाहत होतो. अरे काय अन्फॉर्चुनेटली, कशाचं अन्फॉर्चुनेटली. विमान कॅन्सल झालं, आग लागली, को-पायलटची गर्लफ्रेंड पळून गेली, तुला झोप येत्येय, तुला कामावरुन काढून टाकलंय, नेमकं काय अन्फॉर्चुनेटली... कोणाला काय विचारावं हेच सुचत नव्हतं, आधीच त्या रिमोटच्या आणि हेडफोनच्या गावठीपणात गहिवरुन आलेलं! मग बाकीचे काय लोड घेत नाहीत हे बघून मीही कोणता चित्रपट बघावा हे लिस्टमधे शोधू लागलो, इण्टरस्टेलार दिसला आणि पटकन लावला. सुरुवातीचाच सीन बहुतेक स्पेसक्राफ्ट क्रॅशचा असावा... म्हटलं, बरं चाललंय. तिकडे ते अनफॉर्चुनेटली म्हणून गप पडलंय, हिकडे हे क्रॅश दाखवतायत. त्यात मेकॅनिक लोक कसले-कसले आयुधं घेऊन विमानात मागे दुरुस्तीला जात होती. दूधाला हळूहळू उकळी फुटावी तशी गविमहाराजांची आठवण येत चाललेली.

फायनली, कसलातरी टेक्निकल फॉल्ट दुरुस्त होऊन दोन वाजून दहा मिनिटांनी एकदाचं ते विमान रनवेवर आलं. त्याने रन-अप घेतला. आणि मला पक्की खात्री झाली की आपण नक्की लालडब्यातच बसलो आहोत. अख्खं विमान खाडखाड हलायला लागलं, धडधडायला लागलं, झटके बसायला लागले, वरच्या खोक्यांतून बॅगा एखाद्याच्या डोक्यावर आपटायला अधीर झाल्यासारख्या धडका द्यायला लागल्या. विमान विमान म्हणतात ते हेच का? चिटिंग आहे राव! असे काहीबाही विचार येऊन गेले.

टेकऑफ झाल्यावर मात्र गविंचा एक एक लेख मोठमोठ्या उकळ्यांसारखा मनात वर वर येत होता. टेकऑफ घेतांना विमानात जास्त इंधन तर नाहीना? कुर्ल्याला जाणारा एखादा ट्रॅक्टर विमानाला आडवा जाईल काय? हायटेन्शनच्या वायरी नाहित ना? बांद्र्याच्या समुद्रावरुन कलतांना त्याच्या त्या घड्याळी नीट उजवी-डावी बाजू कळवतीलना? इंजिनपासून प्रत्येक भागाचे सेन्सर नीट काम करत आहेत ना? पायलट, को-पायलट कोणत्या दबावात, त्रासात तर नाहीना? प्रत्येक प्रकारची संभावना डोक्यात येऊन जात होती. शेवटी जे होईल ते होवो म्हणून कानाला हेडफोन लावले, बाजूच्या ताईला ते कुठे प्लग करतात ते विचारले आणि गप गाणी ऐकत शांत बसून राहिलो.

एअरिंडियाच्या आज्जीबाईंबद्दल अल्रेडी सगळ्यांना माहिती आहे, परत रिपिट करण्यात अर्थ नाही. त्याबद्दल अजुन काही बोलावे असे वेगळे त्यांनी (मी आज त्यांच्या विमानातून प्रवास करत आहे हे त्यांच्या किती भाग्याचे आहे ते त्यांना पामरांना माहिती नसल्याने) काहीच केले नाही, थंडगार सॅन्डविच माझ्या थंड पडलेल्या गाढ झोपलेल्या सहप्रवाशाला ढुशा देऊन उठवून हातात कोंबले ते मनोरंजक होते. बाकी आज्जींबद्दल काहीच तक्रार नाही. चांगल्या प्रेमळ होत्या त्या दोघीही. लोकांना उगाच टंच मॉडेलबिडेल एअरहोस्टेस म्हणून का हव्या असतात काय माहित? त्यांनी आपली नीट काळजी घ्यावी, झालं! (कोल्ह्याला द्राक्षं आंबट असं कोण म्हणतोय रे तो..?)

तासाभरात विमान जमिनीवर आले. उत्कंठा संपली. लालडब्याचा प्रवास उत्तम झाला. अहमदाबादहून उदयपूरसाठी खाजगी बस होती. हे एक विचित्र प्लानिंग का होते ते शेवटपर्यंत कळले नाही.

................................

मुरकत मुरकत ती हळूच त्याच्याजवळ अंगचटीला आली, आपले लिपस्टीकात घोळवलेले ओठ नाजुकपणे त्याच्या कानाजवळ नेत म्हणाली, "मादरचोत, मुफ्तमें मजा चाहिये क्या? तेरे जेब में पैसा नहीं हो तो मैं तुझे लाकर देती हूं"

.........................

क्रमशः

(वाचक व संपादकांना सूचना: मालिकेत अनेक ठिकाणी अभद्र भाषेचा वापर होणार आहे, याबद्दल आपली काही हरकत नसावी अशी आशा ठेऊन आहे, अन्यथा ही तिखट भेळ मिळमिळित होईल. तरीही शक्य तेवढी खबरदारी घेऊनच अगदी आक्षेपार्ह वाटेल असे लेखन असणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल.)

Group content visibility: 
Use group defaults

वर्णन फक्कड जमलंय!

अभद्र भाषा आणि सुचनेची गरज नाही. लोकांना फिल्टर लावू देत किंवा विकत घेऊ देत तुम्ही पुढे लिहा अजून. प्रतीक्षेत!

लेखनशैली आवडली....!!! तुमचा पहीला विमान प्रवास आवडला...!!! आणि खास करुन कथेच्या पुढच्या भागाबद्दल उत्कंठा वाढली आहे...!!!

जबरदस्त सुरुवात विमानात जाईपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन उत्तम केले आहे. लेखनशैली खुप आवडलि पुढिल भाग लवकर टाका

वर्णन फक्कड जमलंय!
अभद्र भाषा आणि सुचनेची गरज नाही. लोकांना फिल्टर लावू देत किंवा विकत घेऊ देत तुम्ही पुढे लिहा अजून. प्रतीक्षेत!<<<+१११

सुरुवात आवडली.

>>एअरैंडियाला शिव्या का मिळतात ह्याची पहिलीच झलक होती ही>> १२.५० च्या फ्लाईटला १२.३० पर्यंत बोर्डींग पास घ्यायला का थांबलात? ते ही पहिला विमान प्रवास असताना. चूक तुमची आणि वरुन एअरलाईनला नावं ठेवणं पटलं नाही.