सूचना: फोटो सध्या क्रोमातून दिसतील
आगरी जमातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो. मोठ्या टोपल्या व रवळी (छोटी उभट टोपली) ची ऑर्डर दिली जाते.
वडे करण्यात निष्णात अशा काही बुजुर्ग बायका गावामध्ये असतात त्यांना भेटून साधारण किती माणसे येतील याचा अंदाज सांगून त्यांच्याकडून वड्याच्या सामानाची यादी घेतली जाते. साधारण गहू आणि तांदूळ सम प्रमाणात घेतले जातात.
ज्याप्रमाणे नवरीचा नूर चढण्यासाठी काही दिवस आधीपासून तयारी चालू असते तशीच एकीकडे वड्यांची तयारी चालू होते. साधारण १५-२० दिवस आधी तांदूळ व गहू आणून ठेवले जातात. हे तांदूळ व गहू निवडण्यासाठी एक खास दिवस ठरवून शेजार-पाजारच्या स्त्रियांना खास ह्या निवडण्याच्या कामासाठी आमंत्रण दिले जाते. बायका जमल्या की गहू तांदळाची पोती त्यांच्यापुढे ठेवली जातात. निवडता निवडता हळदी कुंकवाचा कार्यक्रमही चालतो. प्रत्येक सवाष्णीला हळद कुंकू, फुल दिले जाते. खाऊची डिश व चहा किंवा सरबत देऊन हा निवडण्याचा छोटासा समारंभ पार पाडला जातो.
लग्नाला ७-८ दिवस राहिले असताना वड्यांचे तांदूळ धुवण्याचा कार्यक्रम केला जातो. ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणजे पाण्याची सोय, टोपल्या, रवळी , तांदूळ धुण्यासाठी मोठे गंज (मोठी टोपे), बालद्या एकत्र आणून ठेवल्या जातात.
सर्व प्रथम ज्या ठिकाणी तांदूळ धुणार म्हणजे नळ/विहीर वगैरे तिथे नारळ-कलश, पानाचा विडा, नारळ ठेवून घरातील मुख्य स्त्रिया त्याची पूजा करतात. हा विधी बुज्रुर्ग बायकांच्या मार्गदर्शनाखाली होतो.
ज्या टोपल्यांमधे आणि रवळीमधे धुतलेले तांदुळ ठेवायचे असतात त्या भोवती रांगोळी काढली जाते.
जिचे किंवा ज्याचे लग्न ठरले आहे त्याला किंवा तिला कुंकू लावून, थोडी वाटीत हळद ओली करून गालावर दोन बोटे लावली जातात. उरलेली हळद इतर जण एकमेकांच्या दंगामस्ती करत लावून एन्जॉय करतात. सगळ्या सवाष्णींना हळद-कुंकू, फुल आणि गोड खाऊ वाटला जातो. मोठ्या टोपात अगर बालदीत तांदूळ घेऊन २-२ किंवा ३-४ जणींचा ग्रुप करून टीम वर्कने तांदूळ धुण्याचे काम केले जाते.
तांदूळ धुऊन झाले की मोठ्या टोपल्यांमध्ये फडके टाकून ते निथळण्याकरिता ठेवतात.
पाणी ठिबकायचे बंद झाले की घरातील एका कोपर्यात रांगोळी काढून पाट मांडले जातात. मग मध्ये रवळी ठेवून बाजूला तांदूळ भरल्या टोपल्या ठेवल्या जातात. ह्या टोपल्यांना हळद कुंकू लावून त्यावर कापड झाकण देऊन त्यावर बोरीच्या झाडाच्या फांद्या शास्त्र म्हणून ठेवल्या जातात.
दुसर्या दिवशी हे तांदूळ उन्हात थोडे वाळवले जातात.
वाळलेले तांदूळ एका गोणीत भरून ठेवतात. गिरणमालकाची अपॉइंटमेंट आधीच घेतली जाते. धुतलेले तांदूळ व गहू घेऊन ३-४ बायका व घरातील १-२ पुरुष मंडळी गिरणीकडे रवाना होतात. गिरणवाल्यांनी वड्याच्या पिठात भेसळ होऊ नये म्हणून गिरण साफ केलेली असते. मंगलकार्याचे पीठ दळायचे म्हणून दळण घेऊन आलेल्या सवाष्णी गिरणीची पुजा करतात.
त्यानंतर गिरणीत गहू व तांदूळ घालून त्याचे रवाळ पीठ दळले जाते. घरी आल्यावर ह्या गोणी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवल्या जातात. मध्येच पीठ चाळवण्याचे काम करून पीठ व्यवस्थित पुन्हा पोत्यात भरून ठेवले जाते.
लग्नाच्या दोन दिवस आधी वा आदल्या दिवशी वडे करण्याचा बेत ठरलेला असतो. ज्या दिवशी वडे करायचे त्याच्या आदल्या दिवशी गावात जाऊन "उद्या सकाळी पीठ मळायला आणि संध्याकाळी वडे काढायला या" असे आमंत्रण लग्नघरातील एखाद्या व्यक्तीमार्फत गावभर फिरते. सूर्यनारायणांचे आगमन होण्यापूर्वीच वडे-निष्णात सुगरण हजर असते. तिच्या मार्गदर्शनाखाली पीठ मळले जाते. स्त्रिया लाइनमध्ये आपल्या समोर पराती वा ताटे व पीठ मळण्यासाठी पाणी घेऊन आपल्या लगबगीच्या गप्पागोष्टी करत असतात.
आग्री जमातीच्या लग्नामध्ये लग्नाच्या विधीच्या प्रसंगांना अनुसरून एक स्त्री गाणं म्हणते. ह्या गाणे म्हणणार्या स्त्रीला धवलारीण म्हणतात. तिलाही तितक्याच मानाने बोलावले जाते. धवलारीण प्रत्येक विधी, प्रसंगाला अनुसरून आगरी भाषेत गाणं म्हणते. गाण्यात नवरा/नवरीचे, त्याच्या घरातल्या सगळ्या कुटुंबातील माणसांची नावे विधीसाठी जमलेल्या स्त्रियांची समाविष्ट केली जातात.
पीठ मळायच्या वेळीही धवलारीण गाणी म्हणण्यास सज्ज असते. पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा मोठा गज चुलीवर चढविला जातो.
ह्या पाण्यात किंवा पिठात धणेपुड, जिरेपुड, पापड खार, मीठ इ. टाकण्याचे काम मुख्य वडेमाहीतगार महिलेच्या हस्तेच केले जाते.
हे पाणी सुक्या पिठात थोडे थोडे टाकत लाटणीच्या साहाय्याने प्रार्थमीक स्वरूपातील पीठ कालवले जाते. हे थोडे घट्टच ठेवतात. मग हे पीठ परातीत घेऊन ते जमलेल्या स्त्रियांच्या परातीत थोडे थोडे मळण्यासाठी दिले जाते.
पीठ मळून झाले की एक स्त्री हे मळलेले पीठ मोठ्या टाकीमध्ये जोरदार आपटून जमा करते. असे आपटल्याने पीठ अजून सैल होते. टाकी भरली की वर जळता कोळसा टाकून त्यावर थोडे तेल ओतून टाकीचे झाकण लावले जाते. जमलेल्या स्त्रियांना हळदकुंकू चहा-नाश्ता दिला जातो. व वडे तळण्यासाठी ४-५ तासानंतरची वेळ दिली जाते.
वडे तळण्यासाठी गावातील काही घरांमध्ये मोठे तवे/कढई असतात. त्या त्यांच्याकडून आणून ठेवलेल्या असतात.
वडे करण्यापूर्वी आपले वडे चांगले निर्विघ्न व्हावे, बिघडू नये अशी मनोकामना मनी बाळगून चुलीच्या पूजेची तयारी केली जाते.
रांगोळ्या काढून त्यावर ३-४ चुली मांडल्या जातात. चुलींची हळद-कुंकू, फुल वाहून पुजा केली जाते.
चुली पेटवून त्यावर मोठे तवे चढवून तेल तापविले जाते. पहिले पाच वडे नवरा मुलगा किंवा नवरी मुलीच्या हस्ते कढईत सोडले जातात. तोपर्यंत हळू हळू गावातील स्त्रिया जमा होतात व ४-५ चुलींभोवती वडे सोडायला व तळायला हौशेने सज्ज होतात. पीठ पुन्हा परातीत घेऊन थोडे पाण्याने सैल करून घेतले जाते. हाताला पाणी लावून पिठाचा गोळा हातात चपटा करून मध्ये भोक पाडून सटासट वडे तेलात सोडले जातात.
मोठ्या काठ्यांची टोके निमुळती करून त्या काठ्या वडे उलटण्यासाठी व काढण्यासाठी वापरतात.
वडे लालसर खरपूस झाले की टोपलीत काढले जातात.
हे तळत असताना खरपूस खमंग वास परिसरात दरवळत असतो. वडे ठेवण्यासाठी एक वेगळी खोली आधीच तयार ठेवलेली असते. त्यात कापड अंथरून त्यावर तळलेले वडे थंड करण्यासाठी पसरवले जातात.
वडे करण्यासाठी आलेल्या सर्व स्त्रियांना, गावातल्या प्रत्येक घरात वड्यांची भेट दिली जाते. आल्या-गेल्या पाहुण्यांना ह्या वड्यांचा आस्वाद दिला जातो. दुपारच्या वेळेत चहा बरोबर तर संध्याकाळी मटण, जवळा, चवळी/वाटाण्याच्या भाजी बरोबर वडे पानात वाढले जातात.
आगरी जमातीत देवांच्या मानासाठी हे वडे व तांदळाच्या फेण्या नैवेद्यात ठेवल्या जातात. मंडपातील तसेच लग्न ठिकाणातील दारकशीलाही फेण्या व वड्यांचे तोरण बांधले जाते.
तर असे हे सगळ्या गावकर्यांना आपल्या आनंदात सामावून, विविध विधी करून तयार झालेले रुचकर भोकाचे वडे लग्नघरातील मेजवानीत रंगत आणतात.
हे लेखन ऑगस्ट २०१६ च्या माहेर अन्नपूर्णा ह्या अंकात प्रकाशीत झालेले आहे.
मस्त माहिती आणि फोटो!
मस्त माहिती आणि फोटो!
अगदी तोंपासु, खुप छान.
अगदी तोंपासु, खुप छान.
शिर्षक बदलण्यासाठी धन्यवाद ,
शिर्षक बदलण्यासाठी धन्यवाद , आता जास्त समर्पक आहे.
अक्षय, अनघा, मामी, प्राजक्ता,
अक्षय, अनघा, मामी, प्राजक्ता, शोभा, योकु, ममोताई, सोनालिसा, सुमुक्ता, भानुप्रिया, आर.एम.डी., धनी, च्रप्स, टवणे सर, शुम्पी, मद्रकन्या, चर्चा, राया, ऋन्मेष, वावे, स्वाती, दक्षिणा, असुफ, राधिका, वत्सला, विठ्ठ्ल, अमा, प्रिती, मानीनी, श्री धन्यवाद.
आरारा, आदिती, देवकी, झंपी क्रोम मधुन दिसतील फोटो
जिज्ञासा नक्कीटाकेन नंतर ही रेसिपी. पण ह्यात मिठ, जिरेपुड, धणेपुड ह्या व्यतिरिक्त काहीच टाकत नाहीत.
फेरफटका लवकरच एखादी माशाची रेसिपी टाकेन धन्यवाद.
जिप्सी हे जात विधीसाठी लागतच आमच्याकडे. त्यात उडीद आणि तांदूळ दळतात विधी करताना. पाच सवष्णी हात लावतात हे दळताना.
ते फेण्यांवर नाव टाकून रुखवतीत पण ठेवतात.
अक्षय, अनघा, मामी, प्राजक्ता,
..
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
तांदुळ वाळत घातलेली गच्ची माझ्या घराच्या गच्चीसारखीच दिसतेय.
वडे तर मस्तच. सुंदर.
छान माहिती! वडे पण यम्मी
छान माहिती! वडे पण यम्मी दिसतात.
तळताना झारे का नाही वापरले? काठ्या वापरायचे काही विशेष कारण?
सस्मित:स्मितः:
सस्मित:स्मितः:
राहूल वडे काठी ने पटापट उचलता येतात. त्यामुळे शिवाय कढईत वडे सरकवायलाही सोपे पडते.
मस्तयं!
मस्तयं!

रोह्याला असताना पाहिलेले हे!
नाव उगीच बदलले. त्याला एक
नाव उगीच बदलले. त्याला एक ग्रामीण बाज होता. हे लईच शिष्ट वाटतंय ....
जागू कित्ती सुरेख लिहिलयस
जागू कित्ती सुरेख लिहिलयस सगळं. नुस्त्या लिखाणातून तुझा जिव्हाळा, प्रेम , तुझ्या समाजाच्या चालीरितींविषयीचा अभिमान दिसून येतो. फोटो पण छान एकदम.
मी वडे म्हणजे थालीपीठासारखे असतील अस वाटलेल कारण कोल्हापूरला मटनाचे वडे म्हणजे मटणाबरोबर खायचे थालीपीठ (भोक असलेले )असतात ते समजले. सहसा बारशाला , गौरीला मटण आणि वडे असा बेत असतो. हे बरचस वड्या सारख जास्त वाटतय. थालीपीठापेक्षा.
जागु ताई मस्तचं लिहिलं आहेस.
जागु ताई मस्तचं लिहिलं आहेस.
मस्त माहिती आणि वडे लाळगाळू
मस्त माहिती आणि वडे लाळगाळू दिसत आहेत अगदी!>>>>+999
लय भारी!!
लय भारी!!
छान वाटलं वाचायला!
छान वाटलं वाचायला!
त्य टोपल्यांभोवतीच्या साध्यासुध्या रांगोळ्या सुरेख दिसतायत.
जागु मस्तचं लिहिलं आहेस.
जागु मस्तचं लिहिलं आहेस.
मस्त महिती.... पहिल्यांदाच
मस्त महिती.... पहिल्यांदाच ऐकले ..छान वाटले वाचून
कृष्णा, अजय, सीमा, स्वरा,
कृष्णा, अजय, सीमा, स्वरा, शशांकदा, अॅमी, अदीजो, सामी, जूई धन्यवाद.
मस्त फोटोज आणि लेख . एवढ्या
मस्त फोटोज आणि लेख . एवढ्या सगळ्यांना वडे करायचे म्हणजे जबरी मेहनतीचं काम आहे
आहाहा सुंदर एकदम. अप्रतिम
आहाहा सुंदर एकदम. अप्रतिम फोटो आणि वर्णन.
वर आल्यामुळे परत वाचला हा लेख
वर आल्यामुळे परत वाचला हा लेख. किती मस्त वर्णन केलं आहे आणि फोटोही अगदी समर्पक आहेत.
हे वडे कमी प्रमाणात एरवी करतात का? त्याची पाकृ इथे किंवा वेगळ्या धाग्यात देता येईल का जागूताई?
जागूताई , खूपच सुंदर वर्णन
जागूताई , खूपच सुंदर वर्णन केलय आणि फोटो हि अगदी अनुरूप.
मस्त वाटलं वाचून जागूताई. छान
मस्त वाटलं वाचून जागूताई. छान लिहिलंय.
कसलं मस्त फोटोफीचर आहे. वडे
कसलं मस्त फोटोफीचर आहे. वडे सेम मेदूवड्यांसारखे दिसत आहेत.
मस्त लेख जागुताई. आणि फोटोही
मस्त लेख जागुताई. आणि फोटोही सुंदर. असेच लिहीत रहा.
जागु मस्तच लेख नेहमीप्रमाणे.
जागु मस्तच लेख नेहमीप्रमाणे. सगळा सोहळा बघतेय असंच वाटलं.
एकमेकांना धरून समारंभ साजरे
एकमेकांना धरून समारंभ साजरे करायची परंपरा खूप आवडली. वडे तर खूप छानच आहेत. आमच्या कडे मराठा समाजात लग्ना आधी असेच गोड सारणाच्या पुऱ्या करतात. त्याला शेवंती करणे असे म्हणतात. घरोघरी जाऊन स्त्रियांना शेवंतीला या असे आमंत्रण दिले जाते.
लेख आधी वाचलेला, आज परत वाचला
लेख आधी वाचलेला, आज परत वाचला. वडे खायचा योग कधी येणारे माहीत नाही.
लेख आधी वाचलेला, आज परत वाचला
लेख आधी वाचलेला, आज परत वाचला. वडे खायचा योग कधी येणारे माहीत नाही.>>>>> साधना
अगदी टेम्टींग दिसताएत वडे.
साधना,धनिडी एखाद्या गटगत
साधना,धनिडी एखाद्या गटगत करुया हे वडे.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
अमर तुमची परंपराही नव्याने कळली.
Pages