परिस्थितीजन्य कोडे (मनातील कथा ओळखा)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 04:12

मायबोलीच्या मित्र मैत्रिणींना नमस्कार.
आज जरा एक हटके चॉलेंज घेऊन आलोय.

माझ्या ५० सुक्ष्मकथा या धाग्यावर मानव पृथ्वीकर सरांनी एक कल्पना मांडली होती. ते म्हणाले होते की Situation Puzzle वर कथेच्या दृष्टीकोनातून एक धागा काढा. तेव्हापासून ही कल्पना डोक्यात आहे. मधे जरा विसर पडला होता. परवादिवशी अक्षयने आठवण करून दिली अन एकदाचा हा धागा काढला.
परिस्थितीजन्य कोडं म्हणजे काय भानगड आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. सांगतो.

इंग्रजी सिनेमे (चांगलेवाले) सगळ्यांनी पाहिले असतीलच. त्यात कुठेतरी खालील प्रकारचा प्रसंग दिसला असेल–
चारपाच लोकं बारमध्ये बसलेले आहेत. एकजण कागदावर काहीतरी नाव लिहतो अन समोरच्याच्या कपाळावर चिकटवतो (कागद डिंकानं चिटकवतात की अजून कशानं याचं उत्तर मी अजून शोधतोय. असो) तर मित्रांनी आपल्या भाळी काय लिहलंय हे त्या बिच्याऱ्याला ओळखायचं असतं. तो मग वेगवेगळे प्रश्न विचारतो अन बाकीचे त्याला हो किंवा नाही एवढंच फक्त सांगतात.
समजा त्या कागदावर ‘हरिण’ हा शब्द लिहलाय. प्रश्नोत्तरं पहा कसे होतील :

तो : ती सजीव वस्तू आहे का ?
बाकीचे : हो
: मनुष्यप्राणी आहे का ?
: नाही
: मोठा प्राणी आहे का ?
: हो
: मांसाहारी आहे काय ?
: नाही
: शिंगावाला आहे का ?
: हो
: रेडा ?
: नाही
: म्हैस ?
: नाही
: हरिण
: हो

अशा पद्धतीने त्याला उत्तर शोधायचं असतं. या खेळात थोडा बदल करून Situational Puzzle बनवण्यात आले. यात एक होस्ट असतो आणि बाकीचे त्याला प्रश्न विचारणारे. होस्टच्या डोक्यात एक कथा असते. तो सुरुवात सांगेल किंवा काहीतरी हिंट देईल. बाकीच्यांनी त्याला प्रश्न विचारायचे. तो त्याचं हो, नाही किंवा असंबद्ध यापैकी एक उत्तर देईल. (असंबद्ध म्हणजे प्रश्न विषयाशी निगडीत नाही किंवा उत्तर हो किंवा नाही यापैकी काहीही असलं तरी काही फरक पडत नाही.) यातून अंदाज बांधत बाकीच्यांनी त्याच्या मनातील काय आहे हे ओळखायचं आहे.
उदा मी खालील प्रश्न विचारला :

तो तिला एक पिन देतो आणि मरतो. काही क्षणांत तीपण मरते.
सांगा काय झालं असेल.

बऱ्याच शक्यता असू शकतील पण त्याला इथे अर्थ नाही. माझ्या डोक्यात नेमकं काय आहे हे तुम्हाला ओळखायचय. खाली नमुना प्रश्नोत्तरे टाकत आहे जेणेकरून या प्रकाराबद्दल अजून थोडा अंदाज यावा.

तुम्ही : तो मरतो म्हणजे त्याचा खून झाला की आत्महत्या ?
मी : हो किंवा नाही उत्तर देता येईल असेच प्रश्न विचारा.
: ओके. त्याचा खून होतो का ?
: नाही.
: मग तो आत्महत्या करतो का ?
: नाही
: तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि शेवटच्या घटका मोजतोय का ?
: हो
: ती त्याची बायको आहे का ?
: असंबद्ध
: तिचा खून झालाय का ?
: हो तसं म्हणता येईल
: तिला तिसऱ्या व्यक्तीने मारलंय का ?
: नाही
: म्हणजे त्यानेच तिला मारलं का ?
: हो
: ती मेल्यावर रक्त सांडतं का ?
: हो
: गॉट इट. ती त्याची प्रेयसी किंवा बायको आहे. तिने त्याला फसवलंय. तिच्यामुळेच तो शेवटच्या घटका मोजतोय. ( इथपर्यंतच्या भागावर आपण हवे ते तर्क लावू शकतो.) त्याला ही गोष्ट उशीरा कळते. तो तिला हॉस्पिटल मध्ये भेटायला बोलावतो आणि तिच्या पोटात धारदार पिन खूपसतो. बरोबर न ?
: नाही. म्हणजे आधीचं बरोबर आहे पण शेवटची ओळ मला अपेक्षित असलेली नाही.
: छोटी पिन आहे का ?
: हो
दुसरा कुणीतरी : ती हॅण्डग्रेनेड (बॉम्बची पिन) आहे का ?
मी : अगदी बरोबर.

तर साधारणतः अशा पद्धतीने हे कोडं सोडवलं जातं. हे सुक्ष्मकथांपेक्षा थोडं वेगळं आहे. तिकडे एका वाक्यावरून वाचक बऱ्याच शक्यता मांडू शकतात इथे ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्या डोक्यात काय आहे हे शोधायचंय. किती लवकर हे उत्तर सापडेल हे आपण काय प्रश्न विचारतोय त्यावर अवलंबून आहे.

मग आहात का तयार अशी कोडी सोडवायला ?

मी भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री दहा वाजता एक कोडं टाकेन. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर धाग्यावर यावं. जास्तीत जास्त जणं एकावेळी उपस्थित असतील तर जास्त मजा येईल म्हणून वेळ देतोय.

तूर्तास एक प्रश्न:

परिस्थितीजन्य कोडं हे प्रत्येकवेळी टायपायला अवघड जातं म्हणून याला शॉर्टमध्ये पकोडे म्हणायचं का ? Lol

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पकोडे चविष्ट होणारच फक्त रेसिपी तयार व्हायला किती वेळ जाईल हे पण नवीन कोडं आहे..

रात्री दहा ला ऑनलाईन येणं मुश्कीलच तेव्हा मी ऑनलाईन येईपर्यंत चविष्ट तयार पकोडा खायला मिळेल हि अपेक्षा ...

पकोड़े स्टॉल तयार ठेवा दहा वाजता ....आम्ही पोहोचतो विचाऱ्यांच्या तर्काच्या चटण्या घेवून
>> नक्कीच

पकोडे चविष्ट होणारच फक्त रेसिपी तयार व्हायला किती वेळ जाईल हे पण नवीन कोडं आहे..
>> Biggrin

+१

सही Happy

पकोडे करायला आणि खायला तयार !!

वॉव ! इंटरेस्टिंग ! विनय मानलं तुमच्या डोक्याला ( Thumbs up ) खुप वेगळी कॉन्स्पेप्ट आहे आणि माझ्यासाठी अगदी नविन. मजा येइल फार.
परिस्थितीजन्य कोडे = पकोडे. एकदम भारी Lol
आता कॉफी ब्रेक मधे २ मिनिटं डोकावले, नाही तर तसा खरा मोकळा वेळ रात्री १० नंतरच असतो. मला तरी पकोडे गरम मिळणार Happy

जाता जाता : 'आक्षेप - गोष्टीचा शेवट सुचवा' अशा नावाचा कमाल विनोदी धागा आठवला. Proud

विनय, No offence ! तुमच्या कथा उत्तम असतात. मी आवर्जुन वाचते, पण ती विनोदी कथा आठवली कारण त्यमधेसुद्धा वाचकांचा सहभाग होता आणि नंतर त्याला प्रचंड विनोदी वळण लागलं.

धन्यवाद सर्वांचे Happy
बादवे, पकोड्यांचा स्टॉल वेगळ्या धाग्यावर लावू की यातच edit करून टाकू ?

चित्रपटाची नावे ओळखण्याच्या खेळाला "दमशरारा" असे काहीसे नाव आहे. यात चित्रपटाचे नाव समोरच्या व्यक्तिने इशार्‍याने इतरांना सांगायचे असते.
त्याची आठवण झाली

मस्त कल्पना आहे
ऑनटाईम ऑनलाईन अशक्य आहे पण वाचत राहीन..

आम्ही शाळेत असताना ऑफ पिरीअडला लोकप्रिय व्यक्ती ओळखायचा खेळ करायचो ते आठवले.
पंधरा प्रश्नात व्यक्ती ओळखायची
उत्तर अर्थातच हो किंवा नाही मध्ये
ती व्यक्ती अगदी पुराणकाळातील कुब्जा नाहीतर मोनिका सुद्धा असायची..
प्रश्न साधारण असे असायचे

पुरुष आहे का?
जिवण्त आहे का?
ऐतिहासिक वा पौराणिक आहे का?
कलाकार किंवा खेळाडू आहे का?
मैदानी खेळ खेळायची का?
भारतासाठी खेळलीय का?
मेडल जिंकलीय का?
.. ?
..?
गीत्ताबबित्ता?
कर्रेक्ट Happy