बाहुबली २

Submitted by मेधा on 15 May, 2017 - 10:31

प्रसन्न रविवारची दुपार. सहकुटुंब सर्वांच्या आवडीच्या रेस्टॉरंट मधे जेवण झालंय. मदर्स डे सारखा गर्दी खेचणारा दिवस असून सुद्धा रेस्टॉमधे गर्दी नसल्याने निवांतपणे जेवलोय. आता घरी जाऊन एक मस्त डुलकी काढावी. मग थोडे बागकाम करावे नाहीतर पपीला घेउन ट्रेक करावा. शहाण्या फॅमिलीने असा प्लॅन केला असता.

पण आमच्या फॅमिलीतल्या ( अति) शहाण्या मेंबरांनी यू एस ए टूडे मधल्या रिव्ह्यू ने प्रभावित होऊन बाहुबली २ ची पहाण्याची टूम काढली.

काही कारणाने मी थेटरमधे पोचता सिनेमाचा पहिलाच सीन सुरु होत होता. समर मधे येणार्‍या सिनेमांचे ट्रेलर्स बघता आले नाहीत याचं दु:ख वाटतंय न वाटंतय तोच एक रणचंडीचा चेहरा , मणभर दागिने आणि तितकाच मेकप केलेली एक स्त्री हातात भाला घेउन मार्च पास्ट करतेय असा सीन. कानठळ्या बसवणारं , "use every instrument you can find" हे एकच ब्रीदवाक्य असलेलं ब्याकग्राऊंड म्युझिक!

ती राजमाता कसल्याशा पूजेकरता अनेक कोस अनवाणी चालत आलेली असते. प्रेक्षकांच्या सुदैवाने त्या तीस कोसांपैकी शेवटचे काही मीटर्स फक्त कॅमेरा कव्हरेज आहे. ( ट्रायथलीट मित्र मैत्रीणी त्या रेसमधे कॉल ऑफ नेचरला कसे हाताळतात ते माहिती आहे . इथे राजमातेला इतके सगळे दागदागिने, भरजरी वस्त्रे आणि पांव रुकने नहीं चाहिये असा रुल. बट इट डिपेंडस असं म्हणून तो विचार झटकून टाकला मनातून.) इतके दूर चालल्यामुळे तिचं पेडिक्युअर खराब न होता पायांना छाले पडलेले असतात. अन कोसोंदूर चालल्यामुळे अब मै किस किस को कोसूं अशी बदले की आग तिच्या चेहर्‍यावर ! डोक्यावर खरी खुरी आग असते ते वेगऴ्ंच. कदाचित त्या मुळेच ती पूर्ण सिनेमाभर डोक्यात राख घातल्यागत वागत असावी.

काही शूर वीर अमेरिकन इंडियन्स अस्वल वा इतर जंगली प्राण्यांशी निशस्त्र झुंज करुन शिकार करत असे म्हणतात. तसेच ही राजमाता सुद्धा एखाद्या प्राण्याचा बळी देणार की काय असे भाव घेऊन चालत असते. पण एक पिसाळलेला हत्ती आणि तितकाच पिसाळेलेला दिसणारा एक लांब केस आणि दागदागिने घातलेला युवक एवढेच येऊन तो सीन संपतो.
इथेच थियेटर बाहेर पडलो असतो तरी चालले असते.

पण प्रारबधस्य अंतगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणं या उक्तीवर विश्वास ठेऊन पूर्ण सिनेमा पाहिला.

हवेत उडणारी सेल बोट, टॉम & जेरी लॉज ऑफ फिजिक्स ( ढाल घेऊन ताडवृक्षाचं कॅटॅपुल्ट वापरुन पूर्ण फॉर्मेशन मधे उड्या मारणारे गावकरी ) रान डुक्कराची शिकार करताना निळ्या आणि गुलाबी टॅग्स वाले मुलांचे आणि मुलींचे बाण , त्यातही एक निळा टॅग वाला बाण गुलाबी बाणाला छेदून डुक्कराची शिकार ; राजमहालाच्या खांबांना लावलेली प्लास्टिकचीप फुले ; सतत सराव करुन ही एकावेळी दोन बाण मारणे न जमणारी राजकन्या, तिला शत्रू राजमहालावर हल्ला करत असताना अचानक मनगट १८० मधे फिरवून एकावेळेस तीन तीन बाण मारायला शिकवणारा हिरो, आपल्या मुलावर आणि नवर्‍यावर नको तेंव्हा विश्वास ठेवणारी राजमाता ; एकमेकांना छेदणारे भाले, कुठलासा पूल जाळायल ओतलेलं डांबर , दुष्ट राजपुत्राचा कंग फू पांडा २ मधल्या सिक्रेट वेपन च्या डिझायनर कडून ' और शायनिंग मंगता भाय' म्हणुन बनवून घेतलेला रथ असे सगळे स्टॉप्स घेत घेत सिनेमा एकदाचा संपतो. क्रेडिट्स रोल होतात ते पूर्ण बघितल्याशिवाय चिल्लर उठत नाहीत खुर्चीतून. पण इथे क्रेडिट्स आल्याआल्या लेट्स गो म्हणत मंडळी निघालीच. गाडीत बसल्यावर म्हणे नो म्युझिक प्लीज. माय इयर्स हर्ट स्टिल.

घरी आल्यावर थोरली म्हणे सिनेमाने किती गल्ला केला असेल माहित नाही पण फेक ब्लड बनवणार्‍या कंपनीने मात्र सॉलिड कमावलं असेल. डू दे यूझ हाईंझ केचप इन बॉलीवूड ?

दिल तो पागल है नावाचा एक अत्यंत रटाळ आणि वैतागवाणा सिनेमा पाहिला होता . नंतर एकदा मुहाब्बते नावाच्या टुकार सिनेमाचे मधून मधून थोडे सीन्स पाहिले होते . त्याच मालिकेतलं हे पुढचं फूल .

पाच लोकांच्या तिकीटाचे $७५ अक्कल खाती जमा . यूएसए टूडे मधल्या चित्रपट परिक्षणावर भरोसा ठेवणे म्हणजे मुक्तपीठ वाचून अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचे ज्ञान मिळव्ण्यासारखेच .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा! मला कुणी विचारलं असतं की सांगा बघू माबोकरांपैकी काल बाहुबली बघायला कोण गेलं असेल ? तर शोनू हा माझा शेवटचा गेस पण नसता. Happy ग्रेट शोनू !!

मेधा, बेस्ट, अगदी असच वाटतं,
वर height म्हणजे,
या राजमातेला माहिती आहे आपल्याकडे 2 मुले लग्नाची आहेत, आणि मागणी घालणाऱ्या पत्रात मुलाच्या नावाचा उल्लेख नाही, डायरेक्ट त्याची तलवार पाठवत आहे, तिच्या बरोबर लग्न करू। नांदायला चल,
ती उल्लेख करत नाही तर नाही, पण या महाभागाना पण विचारावासा वाटत नाही, नवर्यामुळाचे नाव काय म्हणून,
अक्खा पिक्चर झालाच नसता मग,

कुंतल राज्यात भटरखान्यात राहणाऱ्या BB ला हल्ला करणाऱ्या सैन्याचा आवाज ऐकू येतो, पण तटबंदीवर जो कोनि पहारा याSएल त्याला पत्ता नाही (नंतर च्या एका शॉट मध्ये दिसते, त्या राज्यचांपूर्ण तट unmanned असतो, )
शत्रू महालात शिरालाय अशी वॉर्निंग मिळाल्यावर बाई, उठून कपडे बदलून, मॅचिंग दागिने घालून एकट्याच टाक टुक टाक टुक महालाच्या कॉरिडॉर मधून फिरत असतात,

गर्भवती मुलीला महालाबाहेर काढलय हि बातमी कळल्यावर तिचे आई वडील/भाऊ कोणी परत घेऊन जायला आले नाही का?
या उलट तो कुमार, (ज्याच्या बरोबर तिचे लग्न ठरवणार असतात ), तोच येऊन यांच्या बरोबर राहतो, आणि पुढे अजून त्यांना गोत्यात आणतो.

जाऊ दे अनंत चुका आहेत पिक्चर मध्ये, उगाच डोक्याची मंडई कशाला करून घ्या,

शोनू?? हा धागा शोनूने काढला???
मुंग्यांनी मेरूपर्वत तर ... इ. इ.
Proud

>>> शोनू हा माझा शेवटचा गेस पण नसता.
एग्झॅक्ट्ली!!

अजून बघायची रिस्क घेतली नाहिये.. मी ऐकलेलं - "चांदोबा वाचतोय असं समजून बघा.. मग मजा येऊ शकते."

तुमचे लिखाण नाही आवडले. आधीच या चित्रपटावर ४/५ धागे निघाले आहेत. केवळ तुम्हाला नाही आवडला म्हणून धागा काढण्यापेक्षा आधीच्या धाग्यावर पोस्ट टाकली असती तरी चालली असती.

कोणत्याच सौदेडियन मुवीमध्ये लाॅजिक नसतं.. बाहुबली 1 बघितला नाही तरी 2 चं नुसतं पोस्टर बघुन पण लक्षात येतं की फुल चांदोबा आहे.. (प्रत्यक्ष चांदोबा कसला नेपच्यून आहे पार Happy )
मग अपेक्षा कशा काय भारी सेट होऊ शकतात..?

"दिल तो पागल है नावाचा एक अत्यंत रटाळ आणि वैतागवाणा सिनेमा पाहिला होता . नंतर एकदा मुहाब्बते नावाच्या टुकार सिनेमाचे मधून मधून थोडे सीन्स पाहिले होते . त्याच मालिकेतलं हे पुढचं फूल" - दिल तो पागल है आणी मोहोब्बते विषयी आपली मतं ईतकी जुळतायत, की तुमचा सल्ला मान्य करून बाहूबली-२ ला पास देण्याचे करावे असे संस्थानाने योजिले आहे. तो पहिला भाग सुद्धा १०-१५ मिंटात बंद केला होताच.

बाहुबली आणि मेधा हे कॉम्बो मी बराच वेळ डोळे फाडून वाचले, माझ्या मेंदूने दगा दिला नाहीये याची खात्री करून घेतली आणि मगच भीत भीत डोकावले Proud
अगदी मी ज्या संभाव्य कारणांसाठी सिनेमा बघायचा अजून धीर केला नाहीये, ती खरीच निघाली तर!
शिवाय दि तो पा है बद्दल आपलं मत तंतोतंत जुळत असल्याने (मोहब्बतें बघितलाच नाहीये) तुझं चित्रपट परीक्षण अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं आहे...

बाहूबलीच्या सेट डिझाइन करणार्‍याला ( महिश्मती नावाची महान राजधानी ) अमरावती , आन्ध्रप्रदेशाची नव्यानी जन्माला येउ घातलेली राजधानी प्लॅन करायच काम देण्यात आलय! Uhoh हे इतकच नाही तर एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन घेउन , दिग्गज ( अन लायक) प्लॅनर्स ना निवडून झाल्यावर , जनमत म्हणून त्याना डावलून ( हाकलून वाचल तरी चालेल ) हा निर्णय जाहीर केला. चांदोबा च्या राज्यातच रहायचय लोकाना , सिनेमा तर आवडणारच!
हताश च्या पलीकडे आहे हे !!
सिनेमा च्या परिक्षणाबद्दल पण पूर्ण सहमत!

जनमत म्हणून त्याना डावलून ( हाकलून वाचल तरी चालेल ) हा निर्णय जाहीर केला. चांदोबा च्या राज्यातच रहायचय लोकाना , सिनेमा तर आवडणारच! >> अरे बापरे . किती बटबटीत आणि तद्दन खोटा दिसणार सेट आहे. त्याला काही थीम, काही इन्स्पिरेशन, काही कल्चरल रेफरंस असे काही नाही. गणपती उत्सवातले देखावे करणारी मंडळी देखील याहून बरं काम करतील. इन्डोअर सीन्स किंवा राजवाड्याच्या आवारातले सीन्स सुद्धा इतके बेकार आहेत.

वेषभूषा वाले सुद्धा दोन चीफ्स असावेत असा माझा समज आहे. बाहुबली जेंव्हा गावात रहात असतो तेंव्हाची वेषभूषा थोडी तरी रिअलिस्टिक वाटते. ते काम बिग चीफ ने लिटल चीफ ला डेलीगेट केलं असणार. बिग चीफ चा मूळ बिझनेस अल्ट्रा ( आणि नव्याने) रिच लोकांचे वेडिंग प्लानिंग करायचा असणार. शिकारीला जाताना सुद्धा दागदागिने आणि रंगी बेरंगी पेंट केलेले स्नीकर्स Happy

जंगलात राहायला गेल्यावर एकदा कुठल्यातरी सीन मध्ये देवसेना पटोला नेसलेली दाखवली आहे. जंगलात पटोला??? ते पण नेसत्या वस्त्रानीशी बाहेर काढल्यावर

बाहुबलीवर लिहून संपृक्तता की विरक्ततता काय ते आलेय म्हणून लिहिणार नव्हतो पण
दिल तो पागल है नाव वाचून अगदीच राहावले नाही...
फुल्ल ऑफ रोमान्स चित्रपट फारसा मसाला नसूनही पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा, भारतीय वंशाच्या कॅरेबियन क्रिकेटपटू चंदरपॉलचा आवडता चित्रपट दिल तो पा गल है ची तुलना अतर्क्य, अचाट आणि बालिश बाहुबलीबरोबर कशी होऊ शकते..
मोहोब्बतेबाबद काही अंशी सहमत. तो टोटली शाहरूख शो आहे, त्याला वगळल्यास एक चित्रपट म्हणून त्याचे मूल्य उपद्रवी आहे हे कबूल.

थिएटरच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात हाक मारणारे,
आठ जणांच्या फॅमिली ची जागा दोन जणांनी अडवणारे,
ईंटरवल च्या ब्रेक मध्ये गप्पा मारून पुन्हा सिनेमा सुरू झाल्यावर लोकांना तुडवत रेस्टरूम ब्रेक ला जाणारे,
पॉपकॉर्न सोडून घरचे 'घमघमीत' तळीव पदार्थ लपवून आणणारे,
हिरो/ हिरॉईनच्या एंट्रीला चेकाळून ओरडणारे,
$१५ वसूल करायचेच हेतूने रडणारी बाळे प्रेक्षकांच्या माथी मारणारे

असे सगळे देशबांधव न भेटल्यास कुठलाही सुपरहीट बॉलिवुडी सिनेमा बोरिंगच वाटणार, ते सोडा.

दिल तो पागल है स्वतःच अचाट आणि अतर्क्य आणि बालिश आहे. शाहरूख तर एक्स्ट्रीम बॅड इन इट. मोहोब्बतें नामक भयाण गोष्टही त्याच लेव्हलची. अगदी बरोबर कंपॅरिझन आहे मेधा. छान लेख आहे.