प्रवासी

Submitted by पुरंदरे शशांक on 9 May, 2017 - 06:45

प्रवासी

ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?

हा विशिष्ट शब्द ऐकून मी त्या माणसाकडे जरा निरखून पाहू लागलो आणि झटक्यात - "अरे, दिगू ना तू वामनभटजींचा ???" हे शब्द माझ्या तोंडातून कसे बाहेर पडले हे मलाही कळले नाही....
खिन्नसा हसत दिगू मान हलवत होता.
"पण हे काय? काय हा तुझा पोषाख ?, वामनभटजी कसे आहेत, खूप वर्षांपूर्वी गाव सोडल्यापासून तुम्हा लोकांची काही खबरबातच नाही..." माझी एकदम प्रश्नांची सरबत्तीच चालू झाली.

खूप आडवळणाचे आमचे गाव. तिथेच या दिनूला लहानगे असताना मी पाहिले होते. वामनभटजी पंचक्रोशीत भिक्षुकी करुन रहात होते ते.... त्यांच्या अतिशय साध्या- सरळ वागणुकीमुळे माझ्या चांगलेच लक्षात होते. पुढे वडिलांची बदली झाल्यामुळे ते गाव सुटले ते सुटलेच.

माझी प्रश्नांची सरबत्ती ओसरल्यावर पुढे दिगू सांगू लागला - माझी आई लहानपणीच गेल्यामुळे बाबा (वामनभटजी) मला शेजारच्या मुसलमान कुटुंबाच्या ताब्यात देऊन भिक्षुकी करायला बाहेर पडत. आईवेगळा पोर म्हणून ते कुटुंबही माझ्यावर खूप प्रेम करत असे. मी दिवसच्या दिवस त्या कुटंबात राहिल्यामुळे त्यांचे नमाजपठण, कलमा पढणे हे सर्व मला अस्सल मुसलमानासारखे येऊ लागले. संध्याकाळी बाबा आले घरी की संस्कृतची संथा देत - असा मी संस्कृत पठण व नमाजपठण दोन्हीत पारंगत होउ लागलो. त्या मुसलमानी कुटुंबात तीन मुली - त्यातील धाकटी शमा, जवळपास माझ्याच वयाची. आमची दोघांची खूपच गट्टी होती, आम्ही सतत एकत्रच खेळायचो. तिच्या दोन्ही बहिणींची लग्ने माझ्यादेखतच झाली आणि मी ही त्याच वेळेस किशोरावस्थेत येत होतो. माझ्याबरोबरच शमाही मोठी होत होती. दोघे एकमेकात कसे गुंतत गेलो ते दोघांनाही कळले नाही. पण दोन्ही कुटुंबे सनातनी असल्याने आम्ही एकत्र येणे शक्यच नव्हते - याची जाणीव मला ही होती व शमालाही.
ज्यादिवशी शमाचा निकाह ठरला त्याचदिवशी गावाबाहेर शमाला शेवटचे भेटलो व त्या तिरीमिरीत गावही सोडले.
मी थक्क होऊन ऐकत होतो. काय प्रतिक्रिया द्यावी हे ही कळत नव्हते.

"अरे पण हा मुसलमानासारखा वेश घेऊन का रहातोस" - माझ्या मनातील ब्राह्मणी वळण एकदम सरळ पुढे येऊन ठाकले. "काय करतोस तरी काय सध्या, कुठे रहातोस ?"

"काही नाही, त्या दिवसापासून असाच निरुद्देश भटकत आहे - भारतभर. शमाची आठवण काही केल्या जात नाहीये मनातून. ती परत कधीच भेटणार नाहीये हे कळत असूनही आत वळत नाहीये. लहानपणी तिच्या बरोबर जे क्षण घालवले तेच असतात आता सोबतीला. संधाकाळी कुठल्याही मशिदीत नमाजाला गेलं की त्याबरोबर भुकेची सोय होतेच होते. त्या नमाजाच्या शब्दात शमा कुठे सापडते का ते शोधत असतो......"
मी डोळे घट्ट मिटून घेतल्यावरही गालावर ओघळणारे ते अश्रू मला कळत होतेही व नव्हतेही.....

तो जोर ओसरल्यावर मी डोळे उघडून समोर पाहिले तर समोरची सीट रिकामी. तसाच उठून धावत धावत डब्याच्या दाराशी जातो तो कुठल्यातरी स्टेशनवर गाडी थांबल्याचे कळले. सर्व प्लॅटफॉर्मभर माझी नजर दिगूला शोधत होती.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users