ना मारो पिचकारी

Submitted by सखा on 7 May, 2017 - 15:26

आपला कथा नायक पुण्यनगरी निवासी वीरभद्र या बत्तीस वर्षाच्या घोड युवकाला, लग्नासाठी अजिबात मुलगी न मिळणे, ही काही जागतिक दर्जाची समस्या नाही हे जरी मान्य असले तरी, त्याच्या आई-बापासाठी त्याला सांभाळणे ही नक्कीच समस्या होती.
एकदाचे लग्न झाले की या रागीट, हट्टी, तर्कट आणि स्वार्थी पोराला त्याची बायको फुल्ल टू सरळ करेल या भारतीय रूढीवर त्यांची अपूर्व श्रध्दा होती.
कायम वाद घालण्याच्या त्याच्या हेकट स्वभावा मुळे कॉलेजात कुणी मुली जवळ येण्याचा प्रश्नच नव्हता दोनचार त्याच्या सारखे किंबहुना वरचढ हेकट मित्र मात्र कसे बसे होते पण त्यांनाही वीरभद्र स्वतःच्या विनोदावर हसू लागला की भीती वाटे. धिप्पाड गोलाकार ढेरीचा वीरभद्र हसताना महानगर पालिकेच्या गाडीने बेसावध डुक्कर धरल्यावर कसे केकाटते तसा काहीसा आर्त हसत असे.
आत्ता पर्यंत आई बापानी शोधून आणलेल्या सुमारे सत्तर एक गरीबा घरच्या पोरींना त्यांनी केलेले पोहे खाऊन ढेकर देत नकार दिल्यावर लग्न करेन तर असामान्य विचारसरणीच्या मुलीशीच हा त्याचा अट्टाहास आजही कायम होता.
मात्र असामान्य विचारसरणी म्हणजे काय हे त्याच्या स्वतःच्या बापाच्या प्रश्नाला त्यालाच सांगता येत नव्हते. नुकताच वीरभद्र एका प्रसिद्ध ऑन लाईन डेटिंग साईट् वर "सुमडीमे13" या नावाने रजिस्टर झाला होता. वेबसाईटने विचारलेले प्रश्न आणि त्याने कधी नव्हेतो दिलेली अत्यंत प्रामाणिक उत्तरे या मुळे "लतिका25" आणि "वेडाबाई69" या दोन मुली त्याला प्रोफाइल मॅच म्हणून आल्या होत्या.
अख्ख्या भारतातून केवळ दोनच मुली मॅच झाल्या तरी अजिबात खट्टू ना होता त्याने दोन्ही मुलींना आपला इंटरेस्ट कळवला. काय आश्चर्य काही क्षणातच "वेडाबाई69" चे उत्तर आले. ती म्हणाली की एका तासात ऑनलाईन चॅट साठी येते. मग काय विचारता तो पर्यंत वीरभद्र तिचे अकाऊंट वरचे सुबक फोटो न्याहाळत बसला. तिच्या फोटोवरून तर ती अक्षरश: लावण्यवती होती. एकुलती एक असलेल्या या उंच टंच मुलीचे वडील सिनेमातल्या सारखे अर्थात फार मोठे बिसिनेसमन होते आणि त्यांचा आखातात तसेच आफ्रिकेत फार मोठा हिऱ्यांचा व्यवसाय होता. तिला स्वयंपाकाची आवड असून आल्या गेल्याचे करणे आणि नवऱ्याची सेवा करणे यातच धन्यता होती. कॅरिबिअन बीच वरील तिचे फोटो बघून आनंदाने वीरभद्र वेडाच होण्याची वेळ आली. तिच्या बापाच्या प्रायव्हेट जेट मधल्या आपल्या हनिमून प्रवासाच्या सुखद कल्पनेने वीरभद्र चेकाळून उन्मादी हसणारच एव्हढ्यात "वेडाबाई69" ऑनलाईन आली. हाय हॅलो होताच क्षणी ती वीरभद्रला म्हणाली:
"यु नो भद्रा हनी यू आर व्हेरी हँडसम माणूस मला तुझ्या सोबत संसार करायला नक्कीच आवडेल!"
हे ऐकताच वीरभद्र अधिक वेडा होऊन हूकूमी हसणार इतक्यात ती म्हणाली:
"बट द स्मॉल प्रॉब्लेम इज आय एम ऑलरेडी मॅरीड, आय फॉरगॉट टू डिलीट धिस अकाउंट रे, सो सॉरी!"
एव्हढे बोलून ती चॉकोलेटी गोड आवाजात:
"बाय बाय डियर नाईस टू मीट यू!!" असे म्हणत लुप्त झाली.
हरामखोर साली मुद्दाम अकौन्ट ठेवलाय तिने. अजून मार्केट मध्ये आहे का नाही पाहायला! असे मनातल्या मनात चरफडत वीरभद्र रागाने जोरात ओरडून रागावलेल्या गोरिला सारखी छाती बडवणार इतकयात त्याची आई कालच्या उरलेल्या शिळ्या पोळीचे कुटके घेऊन आली. आता अन्नावर काय राग म्हणून मग त्याने शांतपणे आपली ताजी ऑनलाईन फजिती शिळ्या कुटक्या बरोबर गिळून टाकली.
पण कुठले तरी थोर व्हेटर्नरी डॉकटर म्हणतात ना की "दिलसे चाहो तो पूरी कायनात कुत्ते की दुम सिधी करनेमे मदत करती है". इथे तर प्रश्न फक्त एका मामुली लग्नाचा होता. जगात कुठल्या न कुठल्या मुलीचे नशीब वाईट असणारच होते आणि तिचे बिचारीचे वीरभद्रशी लग्न होणारच. हे प्रखर सत्य आपल्या सारख्या समाजातल्या अनेक विजोड जोड्या पाहिलेल्या चौकस वाचकांना सांगण्याची काय बरे गरज? आता प्रश्न फक्त एवढाच होता की ती कमनशीबी मुलगी कोण? कौन है वह?
शेवटी नियतीने जणू ठरवल्या प्रमाणे "लतिका२५" चा मेसेज आला. सुरवातीला अगदी सामान्य असतात तशी दोघांची प्रश्नोत्तरे झाली. तिने सांगितले कि मला प्रवासाची फार आवड आहे. वीरभद्र म्हणाला की मलाही आयुष्यात एकदा मंगळावर जायचे आहे. तिला पण ही आयडिया फार आवडली. तिने विचारले तुम्हाला स्वयंपाक आवडतो का? कुठलेही इलेक्शनला उभे राहिलेले भाऊ नेते म्हणतात तसेच वीरभद्र म्हणाला,
"फक्त स्वैपाकच नाही तर भांडी घासणे, ग्रोसरी, लाँड्री आणि झाडलोट पण आवडते."
"अय्या खरंच? मला हे सगळं अजिबात आवडत नाही कित्ती छान! वी आर मेड फॉर इच अदर."
त्यावर वीरभद्रने प्रामाणिकपणे कबुली दिली की पोळ्या अजून इतक्या गोल होत नाहीत. लतिका म्हणाली हरकत नाही तुम्ही कशापण करा मी खाईन.
एकदा तिने विचारले तुम्हाला प्राणी आवडतात का? खरे म्हणजे वीरभद्रला प्राण्यावर काहीही प्रेम नव्हते उलट त्याला बघताच गल्लीतील सारी कुत्री पळून जात पण केवळ लग्नाळू धूर्तपणे तो म्हणाला हो तर मला वाघ, कुत्रा, गाढवे, मांजर, घुबड आणि माकडे विशेष आवडतात. लतिका म्हणाली मला पण कित्ती छान! वी आर मेड फॉर इच अदर. हळू हळू वीरभद्रला खात्री पटली की वेगळ्या विचारसरणीची जी आपण मुलगी शोधत होतो ती हीच.
होता होता एक दिवस जेव्हा वीरभद्र म्हणाला की मला घर जावई व्हायला आवडेल तेव्हा तर मग लतिका लगेच म्हणाली अरे वा कित्ती छान! वी आर मेड फॉर इच अदर, तू आमच्या घरी ये एकदा. येत्या रविवारी आई बाबा लोणावळ्याला जात आहेत तेव्हाच आलास तर बरे म्हणजे आपल्या प्रत्यक्ष चांगल्या गप्पा होतील. येताना तुझ्या हातची पोळी भाजी आणि दोन डझन केळी मात्र आणायला विसरू नकोस. दोन डझन केळी कशाला असा त्याला प्रश्न पडला पण त्याने तिला काहीच विचारले नाही. ठरल्या दिवशी मात्र वीरभद्रने घोटून दाढी करून मिशीचे टोक कोरून आणि मुख्य म्हणजे नाकातले केस कात्रीने व्यवस्थित कापले. घरच्या पोळ्यावाल्या मावशी बाईंनी कटकट करून का होईना पण केलेल्या एक्सट्रा पोळ्या आणि बेचव भाजी डब्यात नीट भरून घेतली. जाताना कोपऱ्यावर घासाघीस करून दोन डझन केळी विकत घेतली विक्रेत्याचे लक्ष नाही पाहून एक बारके केळ हळूच हडप करून खिशातपण टाकले.
लतिकाने जेव्हा दार उघडले तेव्हा तिला पाहून वीरभद्राचे डोळे पार विस्फारले. मोठ्या डोळ्याची, लांब केसाची, हसरी अशी अत्यंत लावण्यवतीच होती ती.
"या ना आत या" असे जेव्हा ती आपल्या मधाळ आवाजात म्हणाली तेव्हा तोंडातील गुटख्याची लाळ गिळत वीरभद्र आत गेला. सुंदर आणि गुबगुबीत कोचावर वीरभद्राला ती जवळ पास खेटूनच बसली. आपल्या नशिबावर वीरभद्राचा विश्वासच बसेना.
"आई बाबा गेले का?" वीरभद्राने सावध पणे विचारले."
"हो ना सक्काळीच गेले."
आता घरात आपण दोघेच या रोमांचक कल्पनेने वीरभद्रच्या गोलाकार पोटात वर्तुळाकार आनंद लहरी निनादल्या.
"अय्या मी तुम्हाला साधे पाणी पण विचारले नाही", लतिका म्हणाली.
"नाही अहो प्लिज मला काहीच नको". चिटकून आपल्या बाजूला बसलेली ही सुंदरी उठून जाऊन पाणी आणणार हा विरह देखील वीरभद्रला असह्य होताच पण मुख्य म्हणजे नुकताच खाल्लेला गुटका पण गिळावा लागला असता.
"नाही नाही तुम्ही अज्जीबात नका उठू. आपण असेच गप्पा मारीत बसू."
"अहो मी नाही उठणार झुंझार आणेल ना?"
"झुंझार? हा झुंझार कोण?"
"माझा धाकटा भाऊ?"
"म्हणजे घरात तुमच्या धाकटा भाऊ आहे? मला वाटले ..."
"हो ना त्याच्या जिवावर तर मला आई बाबा खुश्शाल एकटीला सोडून जातात..."
असे म्हणून लतिकाने,
"झुझार ए झुंझू पाणी आण बरे" अशी हाक मारली.
आतल्या खोलीत काही तरी खुडबुड झाली आणि मग काय आश्चर्य दारातून एक लाल तोंडाचे हुप्प्या माकड सर्कशीतल्या प्रमाणे हातात पाण्याचा ट्रे घेऊन आले.
त्याला बघून आता वीरभद्राची बोबडीच वळायची बाकी राहिली.
पाणी टेबलावर ठेवून तो तो हुप्प्या सरळ लतिका आणि वीरभद्रच्या मध्ये येऊन डोके खाजवीत बसला.
"थँक यु ब्रो .... वीरभद्र काका ला नमस्कार कर!" लतिका म्हणाली
तसे त्या माकडाने दात विचकावून वीरभद्राला वाकुल्या दाखवल्या.
"अय्या चक्क लाजतोय तुम्हाला तो."
"हे हुप्प्या माकड.... तुमचा भाऊ?" - कशीबशी वीरभद्राला वाचा फुटली
"खबरदार जर झुंझाररावला माकड म्हणाल तर, तो माझा भाऊ आहे." - लतिका लाल लाल होत रागात म्हणाली. तिच्या डोळ्यात दोन आसवे तरळली.
लतिकेला रागावलेले पहिले कि झुंझाररावानी अचानक वीरभद्राच्या श्रीमुखात अशी काही भडकावली की त्याच्या डोळ्या समोर अगणित तारे आणि कानात गुईssssss असा आवाज बराच वेळ आला. दोन मिनिटांनी जेव्हा वीरभद्राची मती भानावर आली तेव्हा त्याला लतिका म्हणाली,
"पाहिलात कसा रागावला झुंझार ते, आता ऍटलीस्ट एखाद्या जण्टलमन प्रमाणे माझ्या भावाची माफी तरी मागा."
पुन्हा थोबाडीत मारली तर काय करता हा सुज्ञ विचार करून वीरभद्र शक्यतो प्रेमळ आवाजात म्हणाला
"सॉरी झुंझार राव".
तसा झुंझार राव उठला आणि वीरभद्रची पॅन्ट हुंगू लागला मग अचानक त्यांनी वीरभद्रच्या पॅन्ट खिशात हात घालून वीरभद्रानी मघाशी चोरलेले केळे काढून मटकावले.पॅन्ट मध्ये हात घातल्यावर वीरभद्रला अशा काही गुदगुल्या झाल्या की विचारता सोया नाही. वीरभद्राला जोर जोरात हसू आले त्याचे ते राक्षसी हसू ऐकून क्षणभर लतिका आणि झुंझार दोघेही दणकन दचकले. हसू आवरताच गोऱ्यामोऱ्या झालेल्या वीरभद्रला केळी प्रकारा बद्दल नेमके काय बोलावे हे कळेना. केळे खाऊन होताच झुंझारराव अचानक डोके बडवू लागला आणि वीरभद्र कडे हात करून गडबडा लोळू लागला. लतिका त्याला काळजीने काळवन्डून "झुंझार काय झाले? काय झाले?" असे शोकाकुल विचारू लागली.
झुंझारने फक्त वीरभद्र कडे हात दाखवत छाती आणि डोके बडवायला सुरवात केल्यावर ती रागात वीरभद्राला म्हणाली:
"खरं सांगा केळ्यात काय टाकले होते तुम्ही? विष?"
"अहो तुमच्या भावाची शप्पथ गाडी वरून चोरलेले बारीक केळ ते त्यात काय टाकणार?"
"मग तुम्ही मगाशी ते खुनशी का हसलात?"
"अहो तुमच्या आईची बापाची शप्पथ मी असेच हसतो."
"मग हा झुंझार असा काय करतोय?"
"आता मला काय माहिती तुमचा भाऊ तुम्ही विचारा?" काकुळतीला येत वीरभद्र म्हणाला.
"काय झाले झुंझू? मला नीट सांग". लतिका त्याच्या डोक्यावर हात फिरवीत प्रेमाने म्हणाली.
तसा तो हुप्प्या ताड्कन उठला आणि त्याने वीरभद्रच्या अंगावर उडी मारत त्याचा संपूर्ण शर्ट क्षणात टराटरा फाडला. एका क्षणात वीरभद्र मारोतीमंदिरा समोरच्या सुदृढ पण केविलवाण्या भिकाऱ्या सारखा दिसू लागला.
"अहो काय हो हे? तुमच्या भावाने माझा नवा कोरा शर्ट फाडला?" वीरभद्र अन्यायाच्या स्वरात म्हणाला
"बरोब्बर आहे मुळी त्याला लाल रंग अज्जीबात आवडत नाही. हो ना रे झुंझू?" लतिका
"आं? लाल रंग आवडत नाही?"
"होच मुळी. तुम्ही दुसऱ्या रंगाचा शर्ट घालायला हवा होता." लतिका ठामपणे म्ह्नणाली
"हो तेही खरेच म्हणा माझेच चुकले."
"मग म्हणा माझ्या भावाला सॉरी." इति लतिका
"काय?? आता पुन्हा? अहो माझा शर्ट फाडलंय तुमच्या बंधूने" वीरभद्र चकित होत म्हणाला
"होच मुळी. सॉरी म्हणायलाच हवे. ही इज अपसेट" लतिकाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.
"लाल शर्ट घालून तुझ्या भावना दुखावल्या बद्दल सॉरी रे झुंझारराव." वीरभद्र चडफडत म्हणाला.
तसा झुंझाररावने उघड्या बंब वीरभद्राच्या ढेरी वरून चढत वीरभद्राच्या गालाचा मुका घेतला आणि उतरताना गळ्यात उरलेली कॉलर ओरबाडून काढली.
"सो स्वीट झुंझू, पाहिलंत किती प्रेमळ आहे तो" असे म्हणत लतिकाने त्याच्याकडे कौतुकाने पाहत फ्लाईंग किस दिला.
वीरभद्रने मुकाट्याने मान हलवली. उघडाबंब वीरभद्र आता कसा बसा अंग चोरून कोपऱ्यात एका स्टुलावर बसून कोचावर बसलेल्या प्रेमळ बहीणभावा कडे करूण नजरेने पाहू लागला. तेव्हढ्यात लतिकाचा सेलफोन वाजला. फोनवर "हो हो आलेच मी, लगेच निघते". असे म्हणत ती घाईने आतल्या खोलीत पळाली आणि गाडीच्या किल्ल्या आणि पर्स घेऊन बाहेर आली.
पायात चप्पल सरकवताना ती वीरभद्रला म्हणाली :
"अहो समोरच्या बिल्डिंग मध्ये एक धामिण निघालीये तिला रेस्क्यू करण्यासाठी मला ताबडतोब जावे लागेल मी येतेच अर्ध्या तासात. तो पर्यंत प्लीज झुंझारचे बेबी सीटिंग कराल? नाही म्हणू नका. मी आलेच. खूप खूप थँक्स हं. झुंझू टेक गुड केअर ऑफ काका."
असे म्हणत ती फ्लॅट चे दार बंद करून झपाट्याने निघूनही गेली.
ती जाताच क्षणी झुंझार वीरभद्राने आणलेली केळ्याची पिशवी घेऊन फ्लॅटच्या दाराला आरामात टेकून बसला आणि एकएक केळी खायला सुरुवात केली.
वीरभद्रला हळू हळू आपल्या झालेल्या फजितीचा राग येऊ लागला. एका माकडांनी आपल्याला हे असे वागवावे हे त्याला अजिब्बात आवडले नाही. त्याच्या मनातील भीतीची जागा आता क्रोधाने घेतली. खड्ड्यात गेले हे लग्न आपण आपले तडक घरी जावे म्हणून तो दाराकडे जाऊ लागला तर दारात शांतपणे केळे खात बसलेला झुंझार त्याला दात विचकवून दाखवू लागला. आता आली का पंचाईत हे साले माकड दार अडवून बसले आहे. याचे कसले बेबी सीटिंग हाच माझे करतो आहे. इथून कसे बाहेर पडावे असा विचार करत करत वीरभद्रने मग हळूच खिशातून तंबाखूची पुडी काढली आणि शांतपणे मळून तोंडात टाकली. झुंझार नाक फेंदारून दुरून वास घेऊ लागला. खायला काही तरी नवीन आहे या सद्भावनेने तो वीरभद्र येताच वीरभद्रने सगळे बळ एकवटून त्याला एक लाथ मारली आणि दरवाज्याकडे धूम ठोकली. अचानक झालेल्या हल्ल्याने दचकलेला वानरराज आता क्रुद्ध झाला पण काही झाले तरी ते माकडच त्याने एका झेपेतच वीरभद्राला गाठले आणि पळत्या वीरभद्रची पॅन्ट दातांनी फाडून टाकली. वीरभद्र पण आता जेरीस पेटला होता त्याने वळून दोन चार ठोसे त्या बदमाश माकडाला लगावले. पुराणात असते तशी दोघांची अत्यंत तुंबळ कुस्ती झाली. दोघांनी एकमेकांना येथेच्छ बुकलून काढले. ओरखडे काढले, चावे घेतले. झुंझारने प्रत्येक हल्ल्याला मोठ्या शिताफीने थोडी थोडी करत वीरभद्राची पॅन्ट ही फाडून टाकली. शेवटी या गुद्दा गुद्दीत एका निर्णायक क्षणी व्ही आय पी धारी वीरभद्राने झुंझारची मान हातात घेऊन त्याच्या डोळ्यात खुनशी पणे पाहत आपल्या तोंडातील तंबाखूची पिचकारी मारली आणि काय आश्चर्य महाराजा झुंझार डोळे चोळीत गडबड लोळायला लागला ना. तंबाखूतील चुन्याने डोळ्याची आग झाल्यावर काय करणार एखादे बिचारे माकड. ती संधी साधून वीरभद्र दरवाजा उघडून एखाद्या दिशा चुकलेल्या वेड्या रॉकेट सारखा वेडा वाकडा पुण्याच्या रस्त्यावरून लांब पळत गेला आणि अर्थात फेसबुक आणि व्हाट्सअपवर एक फोटो व्हायरल झाला.
आता या घटनेला सहा महिने झाले आहेत. वीरभद्रचे चहा-पोहे चालू आहेत. मात्र एखाद्या मुलीने प्राण्याची आवड आहे का हा प्रश्न विचारताच वीरभद्र तत्परतेने "अज्जीबात नाही" असे म्हणतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

खुपच भन्नाट, जबराट आणि अप्रतिम विनोदी कथा....!!! तुमची कल्पना शक्ती खुपच जबराट आहे....!!! अजुन पर्यंत हसत आहे....!!!

Proud mast