लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.

Submitted by सचिन काळे on 6 May, 2017 - 12:37

लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं. आता नवीन नवीन कॉम्प्लेक्स उभे रहाताना दिसताहेत. डोंबिवली गेलं. आज गाडी धावताना जरा जास्तच झोल मारतेय. असंच एकदा एक मुलगी मोबाईलवर काहीतरी करत गाडीच्या दरवाजात उभी होती. आणि अचानक गाडीने जोरात झोल मारल्याबरोबर तिच्या हातातील मोबाईल निसटून गाडीच्या बाहेर फेकला गेला होता. नशीब ती नाही फेकल्या गेली. डोंबिवली सोडल्यावर पुढे मुंब्र्यापर्यंत ट्रॅकच्या दोन्ही बाजूला आसमंतात खाडीचा एक घाण उग्र वास भरून राहिलेला असतो. बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय. मुंब्रा कळवा लाईनच्या बाजूने समांतर हायवे जातो. त्याच्यावर कायम ट्राफिक जाम असते. कळवा स्टेशन आलेय. बाजूच्या खिडकीतून कोवळं ऊन आत यायला लागलंय. संध्याकाळी परत येताना मी उन्हाच्या बाजूच्या रांगेत बसत नाही. तिथून कडक ऊन आत येतं. आणि ती बाजू दिवसभर उन्हात तापून निघालेली असते. फार गरम होते त्याबाजूला. कितीतरी स्टेशनवर पंखे बिनकामाचे फिरत असतात. त्यांच्याखाली ते बंद करायला बटनं हवी होती. सकाळी सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बऱ्याच स्टेशनवर घोळका दिसतो. कुठून कुठे आणि कसल्या कामावर जातात, कोण जाणे! ठाणे स्टेशनवर एक माणूस कामावर बॅग घेऊन जाताना पाहिला. रिटायर व्हायला आला असेल, पण जरा जास्तच म्हातारा झालेला वाटतोय. अंध आणि अपंगांचा डबा प्लॅटफॉर्मवर जिथे येतो, तिथे वर छताला अंधांना कळण्यासाठी एक सतत 'पीक पीक' आवाज करणारे छोटे स्पीकर लावलेत. त्याचा चोवीस तास येणारा आवाज इतरांची छळवणूक करणारा आहे. त्या स्पीकरजवळच जे कॅन्टीनवाले आहेत, त्यांना त्याचा किती त्रास होत असेल. मुलुंड स्टेशनवर बूट पॉलिशवाला पॉलिशचे सामान काढून जमिनीवर व्यवस्थित रचून ठेवतोय. काही स्टेशनच्या भोवतालच्या जागेत छान बगीचे केलेत. तिथे सुंदर फुले उमलेली दिसताहेत. बऱ्याच स्टेशनवरच्या भिंती शाळा कॉलेजच्या मुलांनी छान छान चित्रे काढून सुशोभित केल्या आहेत. मी बऱ्याचदा ही चित्रे निरखून पहात असतो. पुष्कळशा चित्रांमध्ये सामाजिक संदेश दिलेला दिसतो. काही चित्रांमध्ये त्या त्या स्टेशनच्या परिसरात असलेल्या प्रसिद्ध स्थळांची माहिती दिलेली आढळते. फारच छान उपक्रम आहे हा! भांडुप गेले. माझ्या समोरच्या बाकावरील तिघाजणांची मस्तपैकी ब्रह्मानंदी टाळी लागलीय. त्यापैकी एकाचा घोरल्याचा आवाज येतोय. माझ्या बाजूला बसलेला एकजण जोरजोऱ्यात मद्रासीत कसले तरी मंत्र पुटपुटतोय. एक कॉलेजचा विद्यार्थी पुस्तकावर पिवळ्या मार्करने रेघोट्या ओढतोय. अरे! अरे!  रेघोट्या ओढून ओढून सर्वच पुस्तक रंगवतोय की काय? बाकीचे जे जागे आहेत, ते आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेत. काही वर्षांपूर्वी हीच लोकं पुस्तक नाहीतर पेपरमध्ये डोकं खुपसलेली दिसायची. चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. उतरायच्या तयारीत रहायला पाहिजे. नाहीतर लिहिताना मी एवढा गुंग होऊन जातो, की बऱ्याच वेळा दोन तीन स्टेशन पुढे जाऊन पोहोचतो. अहो, एकदा तर अशावेळी रिटर्न येताना पुन्हा दोन स्टेशन पुढे (की मागे?) गेलो होतो. हा! हा! हा! बाय! उद्या भेटा! नवीन वाचायला!

माझा ब्लॉग :
http://sachinkale763.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन !
चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. उतरायच्या तयारीत रहायला पाहिजे. नाहीतर लिहिताना मी एवढा गुंग होऊन जातो, की बऱ्याच वेळा दोन तीन स्टेशन पुढे जाऊन पोहोचतो. अहो, एकदा तर अशावेळी रिटर्न येताना पुन्हा दोन स्टेशन पुढे (की मागे?) गेलो होतो. हा! हा! हा! बाय! उद्या भेटा! नवीन वाचायला! >>>> Lol भारी लिहिलयं Happy

"गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". "आमची डोंबिवली गायब? कल्याणवरुन लोकल थेट ठाकुर्ली ला पोचली.
बाकी वर्णन छान.

@ मेघा, किट्टु२१, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

"गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". "आमची डोंबिवली गायब? कल्याणवरुन लोकल थेट ठाकुर्ली ला पोचली. >>> बरोबर आहे की त्यांचे, कल्याणनंतर आधी ठाकुर्ली येते मग डोंबिवलीना... त्यांनी कल्याण ते CST असाच प्रवास लिहालाय तो पण स्लो ट्रेनचा असे निदान मला वाटले.

बाकी ईतक्या रिकाम्या गाड्या कशा मिळतात हो तुम्हाला, नाहीतर ईथे थोडीशी चालु ट्रेन पकडावी लागते तर कुठे जागा मिळते

@ मी मानिनी, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

त्यांनी कल्याण ते CST असाच प्रवास लिहालाय तो पण स्लो ट्रेनचा असे निदान मला वाटते.>>> होय, खरंय!

आणि मी रोज सकाळी ०५.३० च्या दरम्यान गाडी पकडतो. त्यामुळे तुलनेने गर्दी कमी असते.

रोजच्या ट्रेन प्रवासावर रोज एक कथा होईल इतकं वैविध्य असतं रोज ... .+786 .. आणि ते ट्रेनने प्रवास करणारया कोणीही वाचले तरी रिलेट होतेच होते !

आता पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू झाला की "आज तुनची ट्रेन किती रखडली?" नावाचा एक रोजच्या रोज अपडेटचा धागा काढायचा विचार करतोय Happy

नशीब ती नाही फेकल्या गेली.

>> सॉरी. हे खुप अवांतर आहे. पण हल्ली हे असे (फेकल्या गेली, आवडल्या गेले आहे इ.) व्याकरण सर्रास वाचायला मिळते.
हे असं कुठल्या प्रांतात बोलतात?

@ राया, मनीमोहोर, ऋन्मेष, नानाकळा, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

@ पियू, नशीब ती नाही फेकल्या गेली.>>> आपण अगदी योग्य ठिकाणी अंगुलीनिर्देश केला आहे. सदर व्याकरण आपणांस आवडले नाही, ह्याकरिता मी अत्यंत दिलगीर आहे. वास्तविक हे वाक्य लिहिताना मलाही कुठेतरी खटकत होतेच. आपण योग्य पर्यायी वाक्य सुचवल्यास मी जरूर त्यात बदल करेन.

एक सांगू!!!?<<< आज गाडी धावताना जरा जास्तच झोल मारतेय.>>> हेही वाक्य मला आवडलेले नाही.

मी थोडेसे गावखात्याच्या भाषेतील शब्द वापरले. क्षमस्व.

लिखाणाचा छान प्रयत्न Happy थोडे परिच्छेद सोडले असते तर अन, काहीतरी "ठाशिव कथामूल्य" असते तर बरे झाले असते

>>>> बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय <<<<<
डब्यातुन नीट निरखुन कसे बघता येईल? त्या ऐवजी, " नीट लक्ष देऊन ऐकले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खडखड करतेय हे ऐकायला येत होते/समजत होते... ". असे केले तर?

@ limbutimbu, मी माबोवर लिखाण चालू केल्यापासून प्रथमच आपले पदस्पर्श माझ्या धाग्यावर झाले आहेत. हे मी माझे थोर भाग्य समजतो. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले फार आभार!!!

लेख लिहिताना परिच्छेद सोडावयास हवेत याची मला पूर्णतः जाणीव होती. पण वर्णनात्मक लेख असल्याने आणि स्टेशन बदलण्याव्यतिरिक्त इतर काही वेगळे घडत नसल्याने परिच्छेद पाडण्याची संधी मिळाली नाही.<<<चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. >>> येथे ही संधी होती, पण माझ्याकडून दुर्लक्ष झाल्याने मी ती घालवली.

या लेखाला काहीच ठाशीव कथामूल्य नाही हे मी मान्य करतो. आणि म्हणूनच अशापद्धतीचा लेख लिहू की नको, ह्या संभ्रमात मी होतो. लोकलप्रवास हा मुंबईकरांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यानेच कदाचित पुष्कळ वाचकांनी माझ्या ह्या लेखाला आश्रय दिला. ह्याकरीता मी सर्वांचा सदैव ऋणी राहील.

>>>> बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय <<<<< हे वर्णन मी बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या खड्खड् करणाऱ्या चाकाविषयी लिहिले आहे. मी नीट लिहू शकलो नाही, हा कदाचित माझ्या लिखाणाचा दोष असावा.

या पुढेही आपल्या प्रतिक्रियेची मला नेहमीच आस राहील.

सचिनजी, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
मी आपले सहज सुचले ते मांडले, त्यातिल योग्य ते आपण गंभिरपणे स्विकारालच....
अर्थात आधी काही एक रचना, कच्चा आराखडा केल्याशिवाय का दिसणार आहे? अन तो तसा केला की त्यात सुधारणेला वाव असतोच, कधी अत्याधिक गरजेचा, तर कधी केले पाहिजेच असे नसते.
अहो, मी माझ्या नुसत्या साध्या पोस्टी देखिल तिनतिनदा एडीट करतो... करावी लागते हा माझा दोष, पण चार पाच वाक्यांच्या पोस्टी मध्येही मी परिपूर्णता (माझे समाधान होईस्तोवर) येईस्तोवर जसे सुचेल तशा दुरुस्त्या करीत रहातो.
तेव्हा कृपयाच, माझ्या सांगण्याचा राग न मानता, त्यातिल सुचनांचा तुमच्या मते जरुर असेल, तर तितकाच उपयोग करुन घ्या.
तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा..... Happy

वरील कथेला कथामूल्य नाहीच्चे असे म्हणता येत नाही, फक्त ते ठाशिव पणे सामोरे आले नाहीय....
कथा नायक लोकलमधुन प्रवास करताना आजुबाजुचे निरीक्षण नोंदवतोय..... एका अर्थी त्याची ती सजगता, प्रवासात ट्रेनमधिल त्याचे अस्तित्व, आजुबाजुच्या घटना/प्रसंग समजुन घेण्याची उत्सुकता , हीच मुळात एक "कथामूल्य आहे".
परंतु संपुर्ण कथेमध्ये, कथानायक आजुबाजुचे वर्णन करताना, जर "त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख" अगदी एखाद दोन वाक्यातुन पेरली गेली असती तर कथेमध्ये "प्रवास करणारा कथा नायकाचे अनुभव" ... .नायक व सभोवताल अशा पदरा पदराने कथामुल्य उलगडत गेले असते.... असे मला वाटते. Happy दुसर्‍या शब्दात म्हणजे, आजुबाजुच्या वर्णन केलेल्या घटनाप्रसंगांशी वाचक तादात्म्य पावतो, पण सांगणार्‍याशी पावत नाही, कारण त्याची ओळखच करुन दिलेली नाहीये....

(वरील पोस्ट तुम्हाला कळली, तर प्लिज तसे जरुर सांगा....... कायेना, माझ्या पोस्टी कळत नाहीत असे सांगणारेच बरेच भेटलेत आजवर... Proud कित्येकदा मलाही दोनदोनचा वाचायला लागतात माझ्याच पोस्टी.... Wink )

@ limbulimbu, वा: फारच सुंदरतेने आपण माझ्या लेखाचे विश्लेषण केलेत. आपली प्रतिक्रिया वाचून समजतेय की कथेचा आराखडा करणे किती जरुरी असते. लेखनमूल्य ठाशीवपणे कसे निर्माण करावे हे आपण फार छान प्रकारे सांगितलेय. लिखाण करण्यामागे एवढी प्रक्रिया करावयाची असते, एवढा विचार करावयाचा असतो हे जाणवून खरेच आता मला दडपण आलेय. पण मी आपल्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या सहवासात असल्याने मला बरेच काही शिकायला मिळेल याचा आनंदही होतोय.