श्री तुकोबांचे अभंग धन

Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2017 - 00:08

श्री तुकोबांचे अभंग धन

परीसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळाहीन नोहे ।१|
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ।२|
पिकली सेंद पूर्वकर्मा नये। अव्हेरू तो काय घडे मग ।३|
तुका म्हणे अाणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाके ।४|गाथा ३३२२॥

वाकणे - वक्र, कळाहीन - निस्तेज, परिस - नुसत्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक पदार्थ, सेंद - एक फळ, अव्हेर - अस्विकार

भगवत्कृपेने मनुष्यात नक्की काय बदल होतो हे बुवा इथे स्पष्ट करताहेत.
याकरता तीन उदाहरणे बुवांनी दिली अाहेत.....
१) गवत कापायला वापरला जाणारा साधासा, वक्र लोखंडी विळा.... याचे जर परीसस्पर्शाने सोने झाले तर किती वाकडा अाहे हा, किती निस्तेज होता हा अाधी असे म्हणून कोणी याला टाकून देईल का ?
२) कच्चे असताना कडवट लागणारे सेंद फळ पिकल्यावर इतके छान गोड लागते..... तेव्हा त्याच्या कच्चेपणातील अवगुण (कडवटपणा ) अाठवून कोणी त्याला नाकारते का ?
३) सुरणाचा नुसता कंद हा अजिबात स्वादिष्ट नसतो, पण जेव्हा स्वयंपाकात त्याच्यावर जे काही संस्कार केले जातात त्यामुळे पंगतीत त्याला मोठा मान मिळतो.
ही उदाहरणे बुवा अशाकरता देत अाहेत की जी व्यक्ती अाधी कुकर्मी, अवगुणी होती तिच्या अंतरातच जर पालट घडला तर तीच व्यक्ती जगाला वंदनीय होते. ( उत्तम उदाहरण.... वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषि )

मनुष्याच्या अंतरात हा पालट घडतो फक्त भगवत्कृपेने....
भगवत्कृपा लाभते कशी तर संतसंगतीने व त्या संतांनी सांगितलेल्या परमार्थसाधनेनेच.
(संतचरणरज लागता सहज । वासनेचे बीज जळूनी जाये। गाथा ४३४१॥)

इति।।
..................................

तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥1॥

तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥ तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥2॥ तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाइचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥3॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥4॥अभंगगाथा २७७३||

जंबूक -कोल्हा
पंचानन - सिंह
परमाई - वीरमाता

भोंदू बुवा बैराग्यांना उद्देशून तुकोबांनी हा अभंग लिहिलेला असावा.

अग्निसारखे धगधगीत वैराग्य, विठ्ठलचरणी संपूर्ण शरणागती, किर्तनाचे खडतर व्रत अाचरण अशा बुवांच्या अापल्याला ज्ञात असलेल्या साधनामार्गाने बुवांच्या ठाई जो एक विशेष अात्मविश्वास निर्माण झालाय त्याचा देदिप्यमान अाविष्कार म्हणजे हा अभंग.

बुवा यातून अापल्याला खर्‍या साधूला ओळखायला प्रवृत्त करताहेत हे ही अापण लक्षात घेणे अावश्यक.

बुवाची अभंगगाथा जर नित्य वाचन -मननात असेल तर अापण योग्य साधनमार्गावर राहू, रस्ता चुकणार नाही.
बुवांचरणी दंडवत.

इति.

..................................................

येणे मार्गे अाले । त्याचे निःसंतान केले ।१|
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ।२|
नागविल्या थाटी । उरो नेदीच लंगोटी ।३|
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ।४|अभंगगाथा २७७२|

बोभाट - तक्रार
थाटी - समुदाय

बुवांचा जो परमार्थ अाहे तो उत्कट अाहे, स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन केलेला अाहे. अापला संसार, इतकेच काय अापला अहंकार विठूपायी समर्पण करणे ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. एकवेळ अापल्या जवळील सर्व वस्तूंचे दान करता येईल, पण "स्व" चे म्हणजेच अहंकाराचे भगवंताच्या चरणी समर्पण ही परमार्थातील अति उच्च कोटी..... या कोटीतले बुवा अाता मागे वळून पहाताहेत, म्हणताहेत....
हा जो परमार्थ मार्ग अाहे - विठूपायी जायचा त्यात स्वतःचे असे काही उरतच नाही रे बाबांनो..... फार फार कठीण अशी ही वाट..... इथे कोणाकडे तक्रार करायचीही सोय नाही (अापणहूनच हा मार्ग मी स्वीकारलाय ना !!)
साधूजनांचे समुदायच्या समुदाय या विठ्ठलाने नागवले अाहेत (त्यांच्या सर्वस्वाचे, स्व चे देखील संपूर्ण हरण केले अाहे)

कबीरजी म्हणतात ना... प्रेम गली अति साकरी ता ने दो न समाय । जहाँ मैं था वहाँ हरी नही । जहाँ हरी था वहाँ मैं नही....
अगदी तोच बुवांचा अनुभव अाहे.

सगळ्यात शेवटची ओळ मधुरतम सख्यभावाने ओथंबून लिहिली गेलीये... या विठ्ठलाला ते प्रेमाने "चोर" म्हणताहेत... भक्तांचा "स्व" देखील चोरणारा असा तो बुवांचा प्राणप्रिय सखा गालातल्या गालात हसत असेल हे वाचताना....

इति ।

.........................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.