अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

Submitted by रसप on 29 April, 2017 - 02:25

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !

बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.

मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते किती स्क्रीन्सचं असतं, दोन्हीचं मार्केट किती आहे, अश्या बाबींचा विचार केल्यास दोन्हीच्या बजेटमध्ये तफावत न आली तरच नवल. अन्यथा, तांत्रिक सफाईदार सिनेमा आपण बनवू शकत नाही असं अजिबात नाही. हॉलीवूडचे व्हीएफएक्ससुद्धा प्रामुख्याने भारतात किंवा भारतीय तंत्रज्ञांनीच केलेले असतात.
हे झालं स्पेशल इफेक्ट्स व इतर तांत्रिक सफाईबाबत. आता दुसरा मुद्दा.
'बॉलीवूड म्हणजे मुख्यत्वेकरून मसालापट. इथे १०० सिनेमांच्या मागे एखादा 'मसान' बनतो' असं काहीसं बऱ्याच जणांचं मत असतं. मी म्हणतो, तुम्ही शंभरपैकी पन्नास तर बघा. मग तुमचं तुम्हालाच समजेल की हे प्रमाण 'शंभरपैकी एक'पेक्षा खूपच जास्त आहे !
सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला ही त्या त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन असते. सिनेमा तर खूपच स्पष्ट रिफ्लेक्शन असतं समाजाचं. समाज कसा विचार करतो, ह्यावर सिनेमा बदलतो, असं मला वाटतं. इथला समाज अजून हुंडा, ऑनर किलिंग, जातीद्वेष वगैरेंत गुंतलाय, पिछाडलाय. सिनेमा बनवणारेसुद्धा ह्याच समाजाचे प्रोडक्ट्स आहेत. शहरात राहून, एका अतिशय सुरक्षित वातावरणात वाढून एका अपरिपक्व समाजाचं प्रतिनिधित्व फुटकळ ठरवणं, हे चूक आहे. आपला चित्रपट त्याच त्या विषयांत गुरफटला आहे कारण आपला समाज त्याच त्या समजांत अडकलाय. आपला चित्रपट ढिसाळ आहे कारण आपला समाज विस्कळीत आहे. आपला चित्रपट उथळ आहे कारण आपला समाज अपरिपक्व आहे. ह्या समाजाला त्याच्या आवडीनुसार चित्रपट देणं, हा धंदा आहे. इथे भावनाप्रधानता प्रायोरिटीला आहे आणि तीच असावी. आपले विचार, अापले प्रश्न आणि प्रायोरिटीज ज्या आहेत, तसा आपला सिनेमा आहे. समाज ओव्हरनाईट बदलणार नाही, चित्रपटही ओव्हरनाईट बदलत नाही. पण हळूहळू खूप सकारात्मक बदल होत आहेत. समाजातही आणि चित्रपटातही.
सिमिलरली, हॉलिवूडचा सिनेमा तसा आहे, जसा त्यांचा टार्गेट समाज आहे. दोघांची आपसांत तुलना करुन सरसकट दोन्हीपैकी कुणा तरी एकाला फुटकळ मानणं, हे फक्त आंधळेपणाचं लक्षण आहे. आणि आंधळेपणा फक्त अंधारामुळेच येतो असं नाही, खूप जास्त एक्स्पोजरमुळेही येतो.
मसान, दम लगा के हैशा, दंगल, तारे जमीं पर, पा, बुद्ध इन ट्रॅफिक जॅम वगैरे सिनेमे आपल्याकडेच बनतील. मान्य आहे की जास्त सिनेमे वाईट असतात, पण जे चांगले असतात त्यांचं कौतुक नाही तर किंमत तरी करायला हवी. आणि मी हे फक्त पटकन जे आठवले आणि तेही नव्यातले सिनेमे सांगितले. विचार केला तर अजूनही आठवतील.
असो. नमनाला घडाभर तेल झालंय !

'बाहुबली' म्हणजे भव्यता, स्पेशल इफेक्ट्स, थरारक युद्धदृश्यं, नाट्य आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशीच ओव्हरअ‍ॅक्टिंग अशी माझी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली ! भव्यतेमध्ये सिनेमा कुठेच कमी पडत नाही. मोठमोठे सेट्स, दाही दिशांनी फिरणारा कॅमेरा, अप्रतिम रंगसंगती हे सगळं स्तिमित करणारं आहे. स्पेशल इफेक्ट्स - पहिल्या भागाप्रमाणेच - काही ठिकाणी बऱ्यापैकी फसलेले आहेत, पण बहुतांश ठिकाणी केवळ कमाल केली आहे ! युद्धदृश्यंसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच फसली/ जमली आहेत, पण त्यांचाही एकंदर परिणाम चित्तथरारकच आहे. नाट्याच्या बाबतीत मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या काही पाउलं पुढेच गेला आहे. पहिल्या भागाचं कथानक अंमळ बाळबोध वाटलं होतं, इथे त्याचा वेग, वळणं वेगळी आहेत आणि सरसही. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं', ह्याचं उत्तर अपेक्षाभंग करणारं नाहीय, हे विशेष. कारण ह्या एका उत्तरासाठीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती, की जर ते उत्तर तर्कशून्य असतं, तर अख्खा सिनेमाच कोलमडून पडला असता ! 'दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशी ओव्हरअ‍ॅक्टिंग' मात्र इथे औषधापुरतीच आहे. सुरुवातीचा काही भाग जराशी बाष्कळ विनोदनिर्मिती करण्यात गेला आहे, पण तो भागही तरीही बऱ्यापैकी मनोरंजक आहे. संगीत मात्र कमजोर बाजू ठरलेलं आहे. जी काही ३-४ गाणी आहेत, ती अजिबात लक्षात राहण्यासारखी तर नाहीतच, पण 'कधी एकदा संपतायत' असं वाटावं, इतकी नीरस आहेत.
तमन्नाच्या पंख्यांसाठी अपेक्षाभंग आहे कारण ती केवळ २-३ प्रसंगांत दिसते. पण अनुष्का शेट्टीच्या पंख्यांसाठी मात्र पर्वणी आहे ! ती फक्त 'दिसत'च नाही, तर मोहवते ! तिच्या अप्रतिम सौंदर्याला तितक्याच दमदार अभिनयाचीही जोड आहे, हे विशेष. युद्धदृष्यांतलाही तिचा वावर खूप सहज वाटतो. प्रभास, राणा दग्गुबाती, राम्या, सत्य राज, नासर ह्या सगळ्यांचीच कामं उत्तम झालेली आहेत. नासर आणि सत्य राज तर व्हेटरनच आहेत. तर 'प्रभास' सिनेमाचं केंद्रस्थान. पण 'राणा दग्गुबाती' हे एक सुखद आश्चर्य आहे ! धिप्पाड शरीरयष्टीवाल्या नटांची टिपिकल 'ठोकळा' इमेज तोडणारा हा नट आहे. महान अभिनय वगैरे तो करत नाही, पण लक्षवेधी नक्कीच ठरतो आणि त्याच्या जबाबदारीत कुठेही कमी पडत नाही. 'द गाझी अटॅक' मधलंही त्याचं काम मला आवडलं होतं आणि इथलंही आवडलंय.
'मनोज मुन्तशीर' ह्यांनी लिहिलेली गाणी सपशेल उथळ वाटली, तरी त्यांनी लिहिलेले संवाद मात्र मस्त जमून आलेले आहेत. ३-४ जागांवरच्या पंचलाईन्स तर कमालीच्याच आहेत ! ह्या एका बाबतीतही दुसरा भाग पहिल्यापेक्षा सरस आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांचा विचार केला तर भारतीय सिनेमाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. I know there is still a long way to go, पण गेल्या वीस वर्षांत भारतीय सिनेमाने अक्षरश: कात टाकलेली आहे. मला कुणाचीही स्पेसिफिक नावं घ्यायची नाहीयत. पण किमान १५-२० दिग्दर्शक असे आहेत, जे काळानुरूप किंवा काळाच्या पुढचा विचार करतात. 'एस. राजामौली' हे त्यांच्यापैकी एक नक्कीच आहेत. आजच्या काळात, जेव्हा सिनेमा इंडस्ट्री प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे, एक इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा करणं, तोही स्थानिक भाषेत आणि त्याला ह्या खंडप्राय देशात लोकप्रिय करून सगळे रेकॉर्ड्स मोडणं, ही किमया फक्त मार्केटिंगची असू शकत नाही. प्रोडक्टही तितकं सशक्त आहे, म्हणूनच हे शक्य झालं आहे. 'बाहुबली' हे फक्त दिग्दर्शक राजामौली ह्यांचं ड्रीम प्रोजेक्ट नाही, हे माझ्यासारख्या लाखो-करोडो चित्रपटरसिकांचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे ! हे स्वप्न स्वत: राजामौली गेली काही वर्षं जगतच असावेत, तीन तासांच्या खेळात आपणही ते नक्कीच जगतो. पण जर भारतीय चित्रपट प्रेक्षक हा मठ्ठच आहे आणि त्याला हातोहात बनवून सिनेमातून करोडो रुपये सहज मिळवले जाऊ शकतात, असा बाळबोध समज अगदी ठामच असेल तर तो ज्याचा त्याला लखलाभ ! माझ्या दृष्टीने तरी राजामौली अभिनंदनास पूर्णपणे पात्र आहेत !

To conclude the conclusion, तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास, दुसऱ्या भागाने पहिल्या भागावर बहुतांश बाबतींत मात केलेली आहे. बाहुबलीचं हे कन्क्ल्युजन अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा एक ४४० व्होल्ट्सचा झटका आहे. हा भारतीय मसालापटाने घेतलेला एक वेगवान टेक ऑफ आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा टेक ऑफ पाहता, कुठलाही पल्ला आवाक्याबाहेर नक्कीच नाही, हा विश्वास वाटतो आहे !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2017/04/blog-post_29.html

Bahubali-Part-2-Baahubali-2-First-Look-Poster-Bahubali-The-Conclusion-HD-Images-Pics-Wallpapers-Shooting-Stills-1.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो विनिता आपल्याला दुसर्या धाग्यावर पण कोणीतरी सांगितले आहे की ही न्युज धांदात खोटी आहे. तरी आपण प्रत्येक धाग्यावर अशी खोटी बातमी का बरे टाकतात ? Uhoh

बहुतेक "बाहुबली २" सैराटचा विक्रम तोडणार असे दिसतेय.
मायबोलीवरच्या सर्वात अधिक धागे असणार्‍या चित्रपटाच्या कॅटेगरीत Happy

प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय.
अजून एकदा तरी पहाणार >> + ११
तिरंदाजीच्या सीन मध्ये ते दोघे किती मस्त वाटतात .

देवसेनेचा "स्वॅग" जबरी आहे . कुंतला मधून निघताना , होडीत चढतानाचा सीन जाम अ‍ॅटीट्युडवाला आहे Happy .

'राणादा' ची अ‍ॅक्टीन्ग पण छान आहे . देवासेनेला पहिल्यांदा राजसभेत आणतात , सत्य कळल्यावर भल्लाल देवचे वडील उठून बोलू पहातात . तो खांद्यावर हात ठेउन त्यांना थांबवतो . आणि योग्यवेळ आल्यावर फक्त खांद्यावरचा हात काढतो . मस्त सीन आहे तो .

अहो विनिता आपल्याला दुसर्या धाग्यावर पण कोणीतरी सांगितले आहे की ही न्युज धांदात खोटी आहे. तरी आपण प्रत्येक धाग्यावर अशी खोटी बातमी का बरे टाकतात ? >>> गजोधर, पहिली गोष्ट मी कुठल्याही कंपूत नाही. तेव्हा मी कुठल्या धाग्यावर काय टाकले याची उठाठेव आपण करु नये. आणि दोन्ही धाग्यावर मी एकाच वेळी हा मेसेज टाकला होता. कृपया वेळ चेक करा. मग बोला.
माझ्याकडे तो मेसेज आला, म्हणून मी इथे माहितीसाठी दिला. तुम्हांला त्याने पैसे दिले नाहीत असे म्हणायचे असेल, तर तुम्ही तसे म्हणा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

विनिता, तुमच्या जागी तुम्ही बरोबर असाल पण हा बाणा आवडला नाही. खरीखोटी न करता आपण सोशल मीडियावर बातमी टाकायची आणि दुसऱ्या कोणी चांगल्या शब्दात जरी सांगितले तरीही त्याचा उपमर्द करायचा हे वागणे तुम्हाला योग्य वाटत असले तरीही ते योग्य नाहीये. असो. तुम्ही आता माझाही उपमर्द करू शकता. नो प्रॉब्लेम. पण त्या निमित्ताने तुमचे वागणे चुकीचे आहे हे तुमच्या नजरेखालून जाईल.

अप्रतिम सुंदर!!!
प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय.
अजून एकदा तरी पहाणार >>>+१११११११११११११११११ खुप खुप खुप खुप खुप आवडला प्रभास मस्तच....

साधना, माझ्यावर खोटी बातमी पसरवता हा आरोप लावण्याआधी त्यांनी दोन्ही पोस्टची वेळ चेक करायला हवी होती. आणि हे त्यांचे म्हणणे चांगल्या शब्दात आहे असे तुम्ही म्हणताय. आश्चर्य आहे. असोच.

हो पण जेव्हा बातमी खोटी आहे हे कळल्यावर आपण स्वतःची पोस्ट एडीट केली का? नाही ना याचा अर्थ काय घ्यायचा? ते स्पष्ट करा
आणि प्रभास हा फक्त अ‍ॅक्टर आहे पैसे दान करायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय करण जोहर याचा आहे. प्रभास हे पगारदार आहे. हे लक्षात घ्यावे. मालकाचे पैसे कामगार वाटू शकत नाही. Wink
मेसेज पसरवणार्‍यांनी इतकी जुजबी माहीती घ्यायला हवी. तथाकथित देशभक्तांच्या निशाण्यवर राहंणार्‍या करण जोहरचे नाव होऊ नये म्हणून सरळ प्रोड्युसरचे पैसे हिंदुत्व नव अभिनेता प्रभासच्या नावाने खपवायचे चालु आहे Happy

गजोधर भाऊ, मला माझी पोस्ट एडीट करायची गरज वाटत नाही. ती बातमी खोटी आहे हे तुम्ही आधी सिध्द करा.
तसेही माझ्या पोस्टना टारगेट करु नका. तुम्हाला उद्देशून ही माझी शेवटची पोस्ट.

विनिताजी, ती दान केल्याची माहिती खोटी आहे हे सगळीकडे सिद्ध झालंय आधीच. होक्सस्लेयरडॉटकॉमवर तुम्ही खात्री करुन घ्या.

चित्रपटाचा धंदा कसा असतो हे ज्यांना माहिती नाही त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्याची शक्यता जास्त आहे हे मी समजू शकतो. त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो. अमुक इतके करोड धंदा केला असे जेव्हा बातम्यांत येते तेव्हा ते कॅल्क्युलेशन हे तिकिटाचे गोळा झालेले पैसे असतात. निर्मात्याची कमाई नव्हे. निर्माता सोडून कोणालाही ह्या चित्रपटाच्या कमाईतून कोणतेही परसेण्टेज मिळत नसते. (तसा स्पेसिफिक करार झालेला असल्याशिवाय, काही प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक कायदेशीर करार करुन निर्मात्याच्या कमाईतून परसेन्टेज चा वाटा घेतात. कारण चित्रपटाच्या कमाईत त्यांच्या नावाचा वाटा असतो म्हणून.)

बाहुबलीने ११५ करोडचा धंदा केला त्यातले मूळ निर्मितीसंस्थेला किती मिळतात ह्याबद्दल आदूबाळ यांनी मिसळपावडॉटकॉमवर लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख वाचावा. http://www.misalpav.com/node/38487

प्रभास हा अभिनेता आहे. ११५ कोटी ही त्याची कमाई नाही. तो ती कोणाला दान देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रोपगंडाला बळी पडू नका. जे घडणे शक्यच नाही ते घडु शकत नाही. कोणी कितीही आयटीसेल कामाला लावल्या तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. खोट्या बातम्यांची सोंगं मात्र पैशाला पासरी आणता येतात...

नानाकळा, विनितानी त्यांना कोणी फॉरवर्ड केलेली बातमी इथे टाकली, तुम्ही त्यांच्याआडून भलतेच तर्क का बरे लढवताय? मग चुकीच्या बातम्या पसरवणारे आणि तुम्ही यात काय फरक? दोघेही स्वतःला जे खरे वाटतेय ते कोणतीही शहानिशा करता सोशल मीडियावर टाकताय. तुमच्या वरच्या पोस्टीतल्या शेवटच्या परिच्छेदाविषयी बोलतेय.

मला वाटतं सैराटच्या वेळीही असल्याच दातृत्वाच्या बातम्या होत्या.
झी टेलिफिल्मची कमाई मंजूळेंनी दान दिली असा काहीसा तो प्रकार होता.
पहिल्या दिवशी झालेली कमाई दान वगैरे फडतूस बातम्या हा ऑर्गनाईज्ड सोशल मेडिया प्रचाराचा भाग आहे, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.

पाहिला... आवडला बर्‍याच अंशी..जरा डोकं बाजुला ठेउन पाहिला तर छानच आहे.. भव्यता नजरेत भरण्याजोगी..
अनुष्का शेट्टी लय म्हणजे लय्यच आवडती.. यात त्या दोघांची केमिस्ट्री मस्त दाखवलीए..
तिरंदाजीवाला सीन मलापन खुप आवडला..मस्तच..

मला आवडला. थोडा लहान चालला असता. मी फर्स्ट पार्ट मधलं धबधबा, निसर्ग सौंदर्य आणि हिरोईन च्या साडी वरची फुलपाखरं खूप miss केली. मला नव्या सेनापतीला सटाक कापायचा, हत्तीखालून बोट जायचा आणि पूर्ण बोटं खूप आवडला. म्हाताऱ्या भल्लाल देव पेक्षा तरुण मस्त होता. Pure look साठी भल्लालदेव सही. बाहुबली दोन्ही पार्टमध्ये taken होता Happy

करण जोहारने है ये दिल ए मुश्कीलच्या वेळी पाच करोड दिले होते हे मात्र खरे आहे... असावे? Happy

हा हा, मरता क्या करता.... Wink >>>> Rofl Rofl

मी फर्स्ट पार्ट मधलं धबधबा, निसर्ग सौंदर्य आणि हिरोईन च्या साडी वरची फुलपाखरं खूप miss केली. >>>> राजसी अगदी अगदी... याच कारणांमुळे मलाही पहिला जास्त आवडला असे मी लिहीले आहे. पण दुसरा सुद्धा छानच आहे.

मी शनिवारी परत एकदा बघणार आहे पण या वेळेला फक्त प्रभाससाठी आत्तापर्यंत मला आवडलेला एकमेव हिरो आहे तो (पहिल्या भागातही ईतका आवडला नव्हता).... या मुवीनंतर सुद्धा तो मला आवडेल की नाही माहित नाही पण यावेळी तर मी अगदी प्रेमात पडली आहे त्याच्या

{{{ करण जोहारने है ये दिल ए मुश्कीलच्या वेळी पाच करोड दिले होते हे मात्र खरे आहे... असावे? Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2017 - 01:22 }}}

त्याचं आडनाव जोहार असं नसून जोहर असं आहे. एखाद वेळी अशी चूक घडू शकते पण ऋन्मेष या आयडीकडून आतापर्यंत शेकडो वेळा या आडनावाचा असाच उल्लेख केला जाणे ही चुकून घडलेली चूक वाटत नाही. करण जोहर खात्रीने मायबोली वाचत नसणार म्हणजे त्याला उचकवायला हे केले जाण्याची शक्यता शून्य आहे आणि त्याच्याकरिता दुसरा कुणी उचकवला जाईल असा त्याचा फॅन मायबोलीवर असणे तर त्याहून अशक्य आहे.

मग हे असे मुद्दाम करण्याचे प्रयोजन काय असावे?

प्रभास चे दाक्षिणात्य भाषांतील ( काही हिंदीत डब झालेले ) काही चित्रपट मी यू ट्यूबवर बघितले.
त्यात तो रजनीकांत टाईपच वावरलाय. पण बाहुबली साठी मात्र त्याने ५ वर्ष दिली.
त्यासाठी खरेच कौतूक.

काही वर्षांपुर्वी आलेला राजामौली चा मख्खी ( एग्गा ) पण, त्यातल्या स्पेशल इफेक्ट्स साठी
आवडला मला. ( तो पण आहे यू ट्यूबवर )

काल पाहीला मी... लै भारी .... प्रभास आनि अनुष्का सही दिसतात...

फक्त काही ठिकाणी ते ग्राफिक्स आहेत ते स्पष्ट कळतं . >>>>> +१

अजुन १दा पाहीनच पाहीन...

काही वर्षांपुर्वी आलेला राजामौली चा मख्खी >>>>
हो त्यात स्पेशल ईफेकट काही छान आहेत. त्या नादात मी तो मधूनच बघितलेला. पण शेवटी का बघितला असा बाळबोध चित्रपट असे झालेले. चुकीच्या ठिकाणी तांत्रिक ज्ञानाचा वापर केला जातोय.

मकखी कॉमेडी चेतरपात आहे.. व्हिलन मक्की ला रिव्हॉल्वर ने गोळ्या मारून संपवायला बघतो... लोल
अरे बाकी उपाय नाहीयत का..लोल

काही वर्षांपुर्वी आलेला राजामौली चा मख्खी ( एग्गा ) पण, त्यातल्या स्पेशल इफेक्ट्स साठी
आवडला मला. >>> कोणी राजामौलीचा मगधीरा पाहीला का?

Pages