ऍनिव्हिओला ..

Submitted by डॉ अशोक on 30 April, 2017 - 03:04

ऍनिव्हिओला .......
ऍनिव्हिओला... हा शब्द जीए कुलकर्णींचा. त्यांच्या "इस्किलार" या दीर्घ कथेत या शब्दाची ओळख झाली. ही जीएंची खासियत. स्वत:च एखादा शब्द तयार करायाचा आणि त्याला अर्थ द्यायचा. या कथेत असेच सेरीपी, इस्किलार असे शब्द त्यांनी निर्माण केले आणि त्यांना अर्थ दिले. ऍनिव्हिओला म्हणजे द्राक्षाचा रस ज्या क्षणी मद्य होतो तो जादूई क्षण. आपल्या आयुष्यात असे जादूई क्षण येतात. तो / किंवा ती... बरेच दिवस एकमेकांना पहात असतात. भेटत असतात. पण एक क्षण येतो, जेंव्हा दोघांनांही वाटतं आपण एकमेकासाठीच जन्मलोत. तो क्षण म्हणजे ऍनोव्हिओला ! आपण वर्गात बसलेलो असतो. रसायशास्त्राचं लेक्चर चालू असतं. व्याख्याता अगम्य भाषेत दोन रसायनांच मिश्रण केल्यावर तिसरंच रसायन कसं निर्माण होईल ते सांगत आसतो आणि वीजेचा लोळ अंगावर पडावा, तशी आपल्याला कविता सूचते. वहीतलं पान फाडून आपण एकटाकी ती कविता पूर्ण करतो. तो क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! वर्तमानपत्रात शब्दकोडं आलेलं असतं. सगळं सोडवून झालेलं असतं, फक्त ते ६ आडवं आणि ५ उभं नं पंचाईत केलेली असते. बाजूला बायको टीव्ही पहात असते. त्या सिरीअल मधली आजीबाई म्हणते: "तुझं हे असं. काखेत कळसा अन गावाला वळसा". क्षणभर तुमचा विश्वास बसत नाही, ६ आडवंच उत्तरमिळालेलं असतं, ५ उभं आपोआप पूर्ण होतं. हा क्षण म्हणहे ऍनिव्हिओला ! खिन्न अवस्थेत तुम्ही गच्चीवर विचार करत बसलेले असता. सहज तुमचं लक्ष समोर जातं. आकाशात इंद्रधनुष्य उगवलेलं असतं, तो क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! अस्वस्थ अवस्थेत तुम्हाला रात्री जाग येते. एकटेच असता तुम्ही घरी. आता झोप गेली म्हणून तुम्ही येरझाऱ्या घालायला लागता. सहज म्हणून, जपून ठेवलेल्या रेडीओचे कान पिळता आणि त्यातून लताच्या स्वरातलं तुमचं गाणं आवडतं लागतं... हा क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! तशी ती तुमच्या मित्राची कविता... तुम्ही अनेकदा वाचलेली. पण त्या दिवशी तुम्ही हार्मोनिअम घेऊन बसलेले असता... उगाच आपलं गंमत म्हणून... बाजूलाच ठेवलेल्या डायरीतलं त्या कवितेचं पान वाऱ्यानं फडफडून तुमच्या समोर येतं.... तुम्ही हार्मोनिअमच्या पट्ट्या फिरवायला लागता आणि नकळत ती कविता तुमच्या गळ्यातून गाणं बनून बाहेर पडते... हा क्षण म्हणजे ऍनिव्हिओला.
.... असतातच असे क्षण.. येतातच आपल्या आयुष्यात.... फक्त ते लक्षात येतातच असं नाही ! ते असं लक्षात येणं म्हणजे सुद्धा ऍनिव्हिओला !!
-अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तुम्ही लिहिलेले आहे का? काही दिवसांपूर्वी मला हा मजकूर व्हॉट्सअप वर आला होता. अर्थात कोणत्याही नावाशिवाय!

मला हा सन्देश व्हाट्स अप वर आला होता.
शब्द टाकुन गूगल केल, पण काही माहिति मिळाली नाही. कदचित स्पेलिन्ग वेगळे असावे.

ऍनिव्हिओला ....... शब्द मस्त आहे. नक्की कुठल्या भाषेतला समजायचा ?
असे बरेच क्षण अनुभवले आहेत खरे.

@दीपा जोशी, माधव, अमीदीप, श्री, नाना कळा, आबासाहेब आणि श्री
हा मी लिहिलेला लेख आहे. आता व्हाटस अप किंवा फेस बुक वर कोणी तो स्व्तःच्या नावे खपवत असेल तर माझा
नाईलाज आहे
@कुमार १: लेखाच्या सुरुवातीस म्हटल्या प्रमाणे सेरीपी, इस्किलार या शब्दांप्रमाणे एनिव्हीओला हा शब्द ही जी एंची निर्मिती आहे. त्यांच्या "इस्किलार" या दीर्घ कथेत हा शब्द प्रथम आला आहे. औरंगाबदच्या आमच्या नाट्यरंग ह्या संस्थेने त्यावर त्याच नावाने एक नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केल होतं. तीन वर्षांपूर्वी पुण्याला जी एंच्या स्मृती दिनी, त्यांच्या भगिनी सौ. नंदा पैठणकर ह्यांच्या निमंत्रणावर आणि श्रीराम लागूंच्या उपस्थितीत आम्ही त्या नाटकाचं वाचन केलं होतं. मी प्रयोगात आणि नाट्य वाचनात भाग घेतला आहे. ह्या नाटकाचे लेखक कुमार देशमुख. नाटकाच्या प्र्स्तावनेत मी प्रयोगाच्या काही आठवणी लिहिल्या आहेत

डॉ. अशोक, तुमची हरकत नसेल तर तुमचे पूर्ण नाव व लोकेशन द्या, जिथे कुठे हा मेसेज इतर कोणाच्या नावाने आला तिथे तुमचे नाव देऊन स्पष्ट करत जाइन.... सुंदर लिहिले आहे त्याचे त्याला श्रेय मिळालेच पाहिजे

@ नाना कळा
धन्यवाद !! माझं नाव डा अशोक कुलकर्णी. मी औरंगाबादचा
बाय द वे: नाट्यवाचनाची हकिकत मी माय्बोलीवर दिली आहेच!

Kumaar1
Yes . Correct definition!