बालपणीचा काळ...सुखाचा!

Submitted by अदित्य श्रीपद on 22 April, 2017 - 03:44

२-३ वर्षापूर्वी धाकटा मामेभाऊ योगेश त्याच्या २-३ वर्षाच्या मुलीला-निधीला घेऊन घरी आला होता. काही तरी खाल्ल्यावर त्याच्या मुलीने पाणी मागितले आणि मी तिला पाणी देऊ लागलो तर म्हणाला नको तिचं पाणी आम्ही घरून घेऊन आलो आहोत. मी म्हटलं अरे आमच्याकडे हि WATER PURIFIER चंच पाणी आहे काळजी करू नको तर म्हणाला नाही पण आम्ही तिला WATER PURIFIERचं पाणी सुद्धा उकळूनच देतो. मला हसायला आलं आणि आमचं लहान पण आठवल. हा योगेश आणि मी विशेष वात्रट होतो. म्हणजे सगळेचजण लहानपणी खोडकर असतात पण योगेश आणि मी एकत्र आलो कि जरा जास्तच करायचो. मोठा मामेभाऊ महेश मात्र शांत होता किंवा तो वयाने मोठा असल्याने शांत रहायची जबाबदारी तो पार पाडत असावा. आम्ही दोघेही धाकटे असल्याने असलं काही बंधन पाळत नसू. मामाकडे जाऊन आलं कि घरी आईचा मार हा खावाच लागायचा, तिकडे मामाकडे हे काम मामा स्वतः करायचा. पण आमच्या खोड्या असायाच्या हि तशाच.
लहानपणी आम्हाला थम्सअप, गोल्ड स्पोट, लिम्का असले प्यायची फार इच्छा असे पण ते देत नसत. मग रसनाच्या काला खट्टा किंवा संत्रा, लेमन सरबतामध्ये eno घातले कि तसेच चरचरणारे पेय तयार होते हा शोध मला लागला. आणि ते straw वापरून प्यायचे म्हणजे मग अगदी थम्स अप, गोल्ड स्पोट लिम्का प्यायल्या सारखे वाटे.इथ पर्यंत ठीक होते पण मग काही तरी प्रयोग करायला हवा म्हणून तीच straw एका नाकपुडीत घालून अन दुसरी नाकपुडी बंद करून ते आत ओढायचे हा प्रयोग केला. 'प्रयोग हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.’असे वाक्य पु.लं. नी सखाराम गटणेच्या तोंडी घातलं आहे पण त्या दिवशी आमचे प्राण नाकपुडीत आले होते.
मी साधारण दुसरीत असेन तेव्हा नेल्सन मंडेला प्रकरण गाजत होतं आणि सगळी कडे नेल्सन मंडेला चे गजाआडचे फोटो दिसायचे. आम्ही असेच मामाच्या घराच्या शेजारच्या गल्लीत खेळत होतो. आता त्या वयात खेळ कमी आणि दंगा जास्त, आजोबांना त्याचा फार त्रास व्हायचा म्हणून ते त्या गल्लीवर उघडणाऱ्या खिडकीतून आमच्यावर खेकासायाचे. ते त्या दिवशी तसेच ओरडत असताना मला का कोणजाणे हा नेल्सन मंडेला आठवला आणि मी आजोबांकडे बोट दाखवून सरळ “अरे तो बघा नेल्सन मंडेला आला नेल्सन मंडेला आला.” असं ओरडू लागलो थोड्याच वेळात सगळी पोर आजोबांकडे बोट दाखवून “नेल्सन मंडेला- नेल्सन मंडेला” म्हणून गिल्ला करायला लागली त्यादिवशी मात्र मी तिघांचा मार खाल्ला आजोबा , मामा आणि आई. आता नेल्सन मंडेला हा काय वाईट माणूस होता का? मारायला काय झालं? ते पण ३-३ वेळा .
माझी मावस बहिण मौसमी (या नावावरून “मौसमी वारे आले-मौसमी वारे सरले” असेचिडवून तिचा मार हि खाल्ला आहेच मी, पण ते एक असो ...) लहानपणी नाटकात कामं करायची (आता मोठी झाल्यावर नवरयासमोर नाटकं करते का? माहित नाही पण मौसमी नावाचे लोक काम कमी आणि नाटक जास्त करतात असा आपला माझा लहानपणाचा अनुभव आहे तुम्ही आठवून पहा ती मौसमी चटर्जी नावाची नायिका... असो) तिने नुकतच “निघाले पंडीत अक्कल सांडीत” या त्याकाळच्या प्रसिद्ध बालनाट्यात काम केलेलं होत.त्याच यथासांग कौतुक (आणि मग चेष्टा)करून झालं आणि तेव्हा प्रथम मला यमक हा काय प्रकार असतो ते समजलं. या महेशचा एक मित्र अमोल पंडित म्हणून होता त्याचं आणि आमचं काही बर नव्हतं. का? ते आता आठवत नाही पण असेल काही तरी. एकदा असच काही तरी भांडण झालं असावं. आता तो ४-५ वर्षांनी मोठा, आम्ही दोघे काय करणार? म्हणून मग तो नसताना त्याच्या घरासमोरच्या भिंतीवर “अमोल पंडित, हागले चड्डीत “असं छान यमक जुळवून लिहून ठेवलं ... यावेळी मात्र त्याचा मार खाल्ला पण मामा किंवा आईला काही कळालं नाही. त्यालाच सांगायला लाज वाटली असावी पण नंतर त्याचे मित्रच त्याला “अमोल पंडित हागले चड्डीत” असं बरेच दिवस चिडवायचे असं कळलं, भली खोड मोडली त्याची.
लहानपणी काहीतरी नवा शब्द ऐकला कि तो वापरायचा मोह होतोच, मी असाच एकदा काकाकुव्वा हा शब्द ऐकला.हा म्हणे एक पक्षी असतो. मामाकडे, आम्ही, मावशी , मावस बहिणी सगळे जमले असताना मी हि माहिती योगेशला सांगतच होतो कि तेव्हढ्यात मौसामिचे बाबा बाहेरून आत आले ( बहुधा नाक्यावर सिगारेट ओढायला गेले असावेत) तर उगाच “आले आले काका कुव्वा आले” असं योगेश ओरडला. आता मला सांगा यात मार खायच्यासारख काय आहे काका कुव्वा हा दिसायला बराच सुंदर आणि राजबिंडा पक्षी आहे. हो ना?
मी आणि योगेश भांडायचो ही खूप. अगदी मारामारी सुद्धा करायचो. माझी मामी अतिशय शांत. तिला चिडलेलं मी फारसं पहिलं नाही, पण तिला सुद्धा आम्ही चिडायला लावायचो. मामाचा वाडा हा दुमजली होता आणि माजघरातल्या जाड भिंतीतून वर जाण्याचा एक अरुंद अंधारा जिना होता. मला आठवत कि माझं आणि योगेशचं कडाक्याच भांडण चाललेलं होत आणि तो कलकलाट सहन न होऊन मामीने मला वरच्या मजल्यावर जायला सांगितलं आणि योगेशला खालीच थांबायला सांगितलं. वर जिन्यात मी, मध्ये मामी आणि खाली शेवटच्या पायरीवर योगेश असे आम्ही होतो. जिन्यात वर जाताना मागे वळून मी योगेशला काहीतरी बोललो असेन त्याने खाली कोपऱ्यात ठेवलेला झाडू उचलून नेम धरून भाल्यासारखा मला फेकून मारला मी हि तो चुकवला पण तो मामीच्या अगदी कानाजवळून गेला. त्यादिवशी मामीला मी भयंकर चिडलेलं पाहिलं. तिने मारलं वगैरे नाही पण तिचा आवाज आणि संतापलेला चेहरा पाहून मी घाबरलो होतो. योगेश हि घाबरला म्हणजे हे नेहमीच नसावं.
आताशा योगेश खूप शांत झाला आहे. मुलांनी दिवाळीत फटके वाजवताना तो फार म्हणजे फारच काळजी घेतो.खेळताना, खाताना मुलीने hand sanitizer आणि काय वापरायवं याचा अतिरेक करतो. मी त्यामानाने खूप नॉर्मल आहे.(असे बायको ही म्हणते म्हणजे ते खरे आहे) तो असा का झाला असावा? बहुधा आमच्या बालपणीच्या करामती विसरला असावा. त्याला मुलीची अशी जरा जास्तच काळजी घेताना पाहून मला आमच लहानपण प्रकर्षाने आठवते.आमच्या या लहानपणीच्या मस्तीमुळे माझं आठवणीचं जग फार समृद्ध आहे. माझ्या मुलीच किंवा निधीचं बालपण हि असच happening आणि मजेदार असावं असं मला तरी फार वाटतं. त्याची मुलगी निधी आमच्या मानाने खूप शांत आणि सज्जन आहे.मुली अशाच असतात असं काही कुणी म्हणू नये, आमच जे पात्र आहे- मिहिका कमीत कमी याबाबतीत तरी बापसे बेटी सवाई असच आहे बापाने बनियन घातलेले आवडत नाहीत.(शी! किती घाण दिसतोस तु ते घातल्यावर आणि त्याला गन्जीफ्रोक काय म्हणतो ! गांवंढळ! असे सरळ बापाला तोंडावर सांगते हो. ) म्हणून त्याला पेन्सिलीने भोक पडून मग त्यात बोट घालून त्याचे खिंडार करणारी हि कार्टी आहे. पण तिचे लीळाचरित्र हा सविस्तर लिहीण्याचा विषय आहे.
... आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर आहे... कदाचित आपण समवयस्क असु त्यामुळे वाक्यावाक्याला अगदि अगदि झाले...
मी पण लेकीची अती काळजी करत नाही.. तरी माझे बालपण जास्त खुशाल आणी मजेचे होते..

असली फ्याडं माझ्याही लहानपणी नव्हती...

ही नावाची गंमत मी मोठेपणी पण करत असे. माझी एक सहकारी होती, जाई खोपकर.. तिला आम्ही
सगळेच खाई झोपकर म्हणायचो.

छान लिहिलंय..
हल्ली खरेच लहान पोरांना जपण्याचे फार फॅड आलेय. कदाचित तशी गरजही असेल स्वानुभव नसल्याने कल्पना नाही. पण मला वाटते निदान त्याने त्यांच्या मस्तीवर तरी फरक पडू देऊ नये. एटीकेट्स अ‍ॅण्ड मॅनर्स ज्यांचेही हल्ली फार स्तोम माजवले जाते ते मुलांवर लादू नये. स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घ्यावी पण त्याने त्यांची प्रतिकारशक्ती आणि इम्युनिटी तर गंडत नाही ना हे बघावे. मला वाटते मातीत खेळणेही यासाठी चांगलेच असते.
बाकी तुमचा लेख वाचून मलाही लहानपणीच्या खोड्या गमतीजमती लिहाव्याश्या वाटत आहेत. खास करून एखाद्याला चिडवणे, खेचणे, नावे ठेवने याबाबत तर माझी प्रतिभा फार धावायची. अगदी कॉलेज आणि आता ऑफिसमध्येही मी एकेकाला दिलेली नावे फेमस होतात. आता ईथे ती अशी सांगणे योग्य का नाही हे समजत नसल्याने उदाहरणे देत नाही...