मैं अकेला ही चला था....

Submitted by विद्या भुतकर on 16 April, 2017 - 23:04

शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. Happy इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही. शिवाय यावेळी ती सकाळी ९.३० वाजता होती त्यामुळे पोहोचायचं टेन्शन नव्हतं. त्यामुळे तसं निवांतच म्हणायचं.

पण यावेळी भाग घेताना एक वेगळी मजा होती बाकी लोकांच्या सोबतीची. मागच्या वर्षी मी आणि संदीपच होतो फक्त. शहरात नवीन होतो, अजूनही नवीन ओळखी होत होत्या. यावेळी रजिस्ट्रेशन सुरु झालं तेंव्हाच मी ऑफिसमध्ये काही लोकांना आठवण करून दिली तर संदीपने त्याच्या ऑफिसमधील काही मित्रांना. त्यातील ५ जणांना तर रजिस्टर केलेही त्याच दिवशी. बाकीही अजून ४-५ मित्र-मैत्रिणींना आठवणीने विचारले आणि त्यांनीही रजिस्टर केले होते. बरं त्यातील एकीने तर पुढे जाऊन अजून तिच्या ४-५ मैत्रिणींना रजिस्टर करायला सांगितले. असे करत करत आमच्यासोबत अजून १२-१५ लोक तरी येणार होते.

जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान एक तर बाहेर थंडी आणि बर्फ त्यामुळे बरेच जणांनी सराव केला नाही किंवा ज्यांनी थोडाफार केला त्यांचे पाय दुखायला लागले. काहींनी सराव करताना पाय का दुखत आहे, काय केले पाहिजे वगैरे विचारले. पण एकूण रेसच्या दिवसापर्यंत काही लोक तर नक्कीच गळून पडले. एक दोघांना आदल्या दिवशी बोलून 'चलाच' म्हणून आग्रहही केला. आता हे असे आग्रह करण्यात जरा टेन्शन असतं कारण उगाच कुठे काही दुखापत झाली तर? असा विचार असतो. पण हेही माहित असतं की एकदा तिथे पोहोचलं की सर्व ठीक होईल. फक्त ट्रॅकपर्यंत पोहोचायचा प्रश्न असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आग्रह कसा करायचा हे अवघडच गणित असतं. अर्थात ते आपल्या जवळच्या मित्रांनाच हे करू शकतो.

तर हे सर्व झाल्यावर आम्ही एकूण रेसच्या दिवशी १२ जण होतो. त्यातील ३ लोकांनी फक्त याआधी ५किमी रस मध्ये भाग घेतला होता. बाकी सर्वांना हा अनुभव नवीनच होता. त्यामुळे ट्रेनमध्ये जाताना किंवा कारमधून एकत्र जाण्यात अगदी ट्रीपला जाण्यात असतो तशी मजा वाटली. रेसच्या पार्कमध्ये गेल्यावरही बरेच जण नवीन असल्याने बॅग कुठे चेकइन करायची, कुठे उभे राहायचे, काय करायचे अशा साध्या गोष्टी होत्या पण त्या नव्या लोकांना सांगताना मजा येत होती आणि त्यांनाही अगदी कुणीतरी अनुभवी लोक सोबत असल्याचं समाधान. Happy सर्वांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रेसच्या आधी फोटो काढणे, अपलोड करणे, टॅग करणे वगैरे सर्व झालेच. रेस सुरु झाली आणि संपलीही. सर्वानीच त्यांच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या स्पीडने पूर्ण केली.

रेस संपल्यावर तर मग काय, मेडल घेऊन, टीशर्ट घालून एकेकाचे 'सोलो' मग ग्रुपचे असे अनेक फोटोसेशन झाले. ज्यांची ती पहिली रेस होती ते तर अजून खूष होते, ज्यांना जायचे की नाही अशी शंका वाटत होती तेही आलो या आनंदात होते. सर्व उरकून घरी निघालो. जातानाही जे लोक कारने सोबत आलो होतो ते सर्व सोबत होतो. नेहमीप्रमाणे मित्रांच्या घरी मुले होती. तिथे मैत्रिणीच्या आईनी छान स्वयंपाक केलेला होता. जेवण करून घरी येऊन गाढ झोप काढली. दिवसभर मनात एक वेगळंच समाधान होतं. मी आणि संदीपने दोघांनी या वर्षीच्या रेसला सुरुवात झाली याचं आणि आपल्यासोबत बाकी लोकांनाही या अनुभवाचा आनंद घेता आला याचं.

मी पुण्यात असताना किंवा इथे आल्यावर, जमेल तेंव्हा अनेक मित्र मैत्रिणींना व्यायामाचा किंवा पळण्याचा आग्रह करते. पुण्यात असताना केलेल्या एका रेसबद्दल पोस्टही लिहिली होती. कधी कधी वाटतं, 'जाऊ दे ना कशाला पाहिजे? आपण करतोय ते बास आहे. कशाला लोकांना आग्रह करायचा?'. पण प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी माझ्या मित्र मैत्रिणींनी अशा रेस मध्ये भाग घेतला त्यांनी नंतर मला आवर्जून सांगितले की 'बरं झालं गेले/गेलो ते'. या अशा अनेक अनुभवानंतर वाटतं,'जे केलं योग्यच केलं. मी आणि संदीप आता नियमित पळतो. त्यामुळे त्या दिवशीचं ते वातावरण, रेसच्या नंतर मिळणारं समाधान, त्यासाठी ठरवून केलेला सराव हे तसं ओळखीचं झालं आहे. तोच आनंद बाकी लोकांनाही मिळावा आणि तो वाटता यावा हे तर अजूनच खास. खरंच ते स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही हे नक्की. म्हणूनच हा सर्व खटाटोप.

कधी कधी वाटतं याबद्दल लिहायचं की नाही? उगाच 'आपणच किती ग्रेट' टाईप्स लिहिल्यासारखं वाटतं. पण यातूनही कुणाला तरी पुन्हा व्यायामाची, पळायची इच्छा झाली तर तेही चांगलेच आहे. म्हणून प्रत्येक रेसनंतर आवर्जून पोस्ट लिहिते. प्रत्येकवेळी काहीतरी खास त्यात असतंच. यावेळचीही खास झाली ती आमच्या बॉस्टनमधल्या मित्र-मैत्रिणींमुळे. Happy बॉस्टनमध्ये राहून जमा होत असलेल्या गोतावळ्याचं ते प्रतीक होतं. पुढच्या वर्षी अजून लोक सोबत असतील अशी अपेक्षा आहे. Happy त्यादिवशी ग्रुप फोटो काढताना राहून राहून तो शेर आठवत होता,
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गये और कारवां बनता गया"
- मजरूह सुलतानपुरी

खरेच,"कारवां बनता गया".

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त विद्या..
शेवटच्या शेराने लेखाला चार चाँद लागलेत.

thank you all so much. अशा विशयावर लिहिताना लिहावे की नाहि असे वाटते. Happy

अशा विशयावर लिहिताना लिहावे की नाहि असे वाटते. काहीही हा वि

उलट धावण्यावर लिहीशील तितके कमीच. तुला लिहिण्याची कलाही छान अवगत आहे, सहज सोपं लिहिता येतं तर भरपूर लिहित जा.
मला किती दिवस झाले माझे धावणाख्यान अजून पुढे लिहायचंय जमतच नाहीये. मला लिहिण्यापेक्षा धावणे सोपे वाटते Proud