बक्लावा - खाऊगिरीचे अनुभव ३

Submitted by सुमुक्ता on 4 April, 2017 - 09:51

न्यूकासलला जेसमंड मॉलमध्ये मिशेल्स नावाचं एक केक्स आणि पेस्ट्रीजचं दुकान होतं. मला तेव्हा केक्स आणि पेस्ट्रीजचं फारसं आकर्षण नव्हते. भारतीय गोड पदार्थ जास्त आवडत होते. परदेशी गोड पदार्थ फारच अगोड वाटायचे. एक दिवस नवरा म्हटला की "चल तुला मिशेल्समध्ये बक्लावा खाऊ घालतो". तेव्हा बक्लावा हे काय प्रकरण आहे ते मला अजिबातच माहित नव्हतं. मी त्याला विचारलं "हे काय असतं?" तर तो म्हटला "एक टर्कीश गोड पदार्थ असतो. आवडेल तुला" म्हटलं बघुयात तरी काय आहे हे. आम्ही एकेक बक्लावा घेऊन तिथे खायला बसलो. तेव्हा सुद्धा फोटो काढलेले नाहीत. खालचे फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.

baklava 1.jpgbaklava 2.jpg

तर बक्लावा म्हणजे चिरोट्यासारखे पापुद्रे असलेले स्तर मध्येच अक्रोडची पूड सँडविच सारखी भरलेली. आणि हे सगळे एकत्र राहावे म्हणून प्रचंड प्रमाणात वापरलेला मध. सुरुवातीला एक घास खाल्ला आणि गोडमिट्ट चवीने अगदी तोंड फिरायची वेळ आली होती. पण तेव्हाच कळले होते की मी ह्या बक्लाव्याची लाईफटाईम फॅन असणार आहे. त्यानंतर मिशेल्समध्ये बक्लावा खाणे हा आमच्याकडे नियमित समारंभ होता. पण बक्लावा मी खरा खाल्ला ते स्कॉटलंडमध्ये येऊन. येथे आल्यानंतर एका महिन्यात लगेचच येथील स्थानिक इंटरनॅशनल मार्केटला भेट देणे झाले. तेथे टर्किश स्टॉलमध्ये विविध प्रकारचे बक्लावे खायला मिळाले. विविध आकाराचे, कधी शेवया, वापरून केलेले, कधी नुसतेच चिरोट्यासारखे स्तर असलेले, कधी अक्रोड, कधी बदाम तर कधी पिस्ता वापरून केलेले.

त्यानंतर बक्लावाबद्दल थोडेसे वाचन करता कळले की हा पदार्थ केवळ टर्कीश नसून मेडिटरेनियन देश, इराण, इराक, इत्यादी ठिकाणीसुद्धा खाल्ला जातो. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली म्हणजे बक्लावा कसाही केलेला असला तरी त्याच्या चवीमध्ये फारसे वेगळेपण येत नाही. कारण त्यातील घटक फारसे बदलत नाहीत. पण हा माझा मोठ्ठा गैरसमज होता. आणि तो दूर केला ते माझ्या नवऱ्याच्या इराणी आणि इराकी विद्यार्थ्यांनी. हे लोक घरी गेले की प्रेमानी त्यांचे स्थानिक बक्लावे आमच्यासाठी आणत होते. तेव्हा कोठे मला कळले की इतके दिवस मी अस्सल साजूक तुपातील बक्लावे कधी खाल्लेच नव्हते.

अस्सल (ऑथेंटिक) खाण्याचे महत्व काय असते ते तेव्हा मला कळले. पदार्थाची चव अस्सल आहे की नाही हे कळण्यासाठी एखाद्या स्थानिक माणसाची मदत आवश्यक असते. अनेक वर्षे आपण अस्सल चवीचा आहे असे समजून एखादा पदार्थ खात असतो पण असे काही अनुभव आले की कळते की पदार्थाच्या अस्सलपणास एखाद्या स्थानिक माणसाने दुजोरा देणे आवश्यक असते. हल्ली नवीन प्रयोग करताना आवर्जून आम्ही असा दुजोरा घेत असतो.

भारतासारख्या देशात मात्र पदार्थाच्या "अस्सलपणाला" अनेक कंगोरे आहेत. जसे वैविध्यपूर्ण हवामान आहे तसे जातीनुरूप आणि प्रदेशानुरूप वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. एकाच पदार्थाची चवसुद्धा जातीनुरूप आणि प्रदेशानुरूप बदलते. मी महाराष्ट्रात वाढलेली आहे त्यामुळे हे फरक थोड्याफार प्रमाणात मला समजतात. इतर प्रांतातील (अगदी भारतातीलसुद्धा) पदार्थांचे असे सूक्ष्म फरक कळायला कदाचित उभे आयुष्य जावे लागेल.

पदार्थाच्या अस्सलपणावरून मला एक गमतीशीर किस्सा आठवला. येथे तो अवांतर आहे तरीही लिहिते. न्यूकासलमध्ये माझ्या नवऱ्याचा एक ऑस्ट्रेलियन मित्र त्याला म्हणायचा "तुझ्या डब्यात जशी पोळीभाजी असते तशी कोणत्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये मिळते ते सांग. मला तुझ्या डब्यातील पोळीभाजी जास्त आवडते." तेव्हा आम्ही त्याला सांगितले की "जे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये मिळतात ते आम्ही घरी खूप कमी वेळा बनवितो. किंवा अजिबात बनवीत नाही असे म्हटलेस तरीही चालेल. आणि अशी पोळीभाजी तुला केवळ लोकांच्या घरांमध्येच बनविलेल्या जेवणातच खायला मिळेल". ह्या प्रसंगावरून पदार्थाच्या अस्सलपणाबद्दल जो घ्यायचा तो धडा आम्ही घेतला होता.

पदार्थाच्या अस्सलपणावरचा एवढा धडा मिळाला असला तरीही येथे मिळणारा बक्लावा माझ्या आवडीच्या गोड पदार्थांच्या यादीत पहिल्या पाचात आहे. आजही इंटरनॅशनल मार्केट लागले की आम्ही बक्लावाच्या स्टॉलला भेट दिली नाही असे होत नाही. अर्थात अस्सल बक्लाव्याला झुकते माप आहेच. पण अस्सल असो वा नसो जे आपल्याला आवडते ते खावे हेही तितकेच खरे!!!

Group content visibility: 
Use group defaults

"भारतासारख्या देशात मात्र पदार्थाच्या "अस्सलपणाला" अनेक कंगोरे आहेत." - सहमत. हे भारताबाहेरच्या माणसाला समजावून सांगताना नाकी नऊ येतात. आम्ही घरी रोज 'नान ब्रेड' किंवा 'करी' खात नाही हे सांगावं लागतं.

भारताबाहेर तर जाऊ द्या, पण एखाद्या साऊथ ईंडियन मित्राकडे पार्टीला गेलो आणी 'ईंडियन फूड' चा बेत असला तर त्यांना सुद्धा कधी कधी सांगावसं वाटतं की 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे जरी खरं असलं तरी 'भात हे पूर्ण-अन्न' हे तितकसं खरं नाहीये.

बाक्लावा हा पदार्थ एकदाच एका ईराणी माणसाने बनवलेला, अस्सल तूपातला खाल्ला होता. त्याची चव खूप वेगळी लागते. एकदाच मी एका कानडी घरात ताजा बनवलेला म्हैसूर-पाक खाल्ला होता, त्याची आठवण झाली होती.

मस्त चाललीये सिरीज.

मस्त.
पूर्वी ऑथेंटिक म्हणजे भारी वाटायचं. आता मला जे आवडतं तेच भारी, ऑथेंटिक असो की नसो यावर येऊन ठेपालोय. त्यामुळे शेवटचं वाक्य जास्त आवडलं. >> पण अस्सल असो वा नसो जे आपल्याला आवडते ते खावे हेही तितकेच खरे! >> +१

मस्त चाललीये सिरीज +१

बहारेन ड्युटी फ्री मध्ये याचे छान वेगवेगळे बॉक्स मिळतात. एकदा सहज म्हणून आणले . घरच्यांना भयानक आवडले होते. तेव्हा पासून प्रत्येक ट्रिपला २ ते ३ तरी बॉक्स घरी यायचे. इतके दिवस तीच टेस्ट मस्त वाटत होती.

पण तुमचा लेख वाचून आता एखादा इराणी/ इराकी मित्र शोधून एकदा घरी बनविलेले खाऊन पाहायला हवेत असं वाटतंय Happy

मी बहुधा अजुनही अस्सल बकलावा खाल्ला नाहिये मग अजुन, ३-४ वेळेस खाल्ला पण काहितरी महाचिकट तोन्डात घोळतय अस वाटत राहिल..

तुकडा किती लहान मोठा ह्यावर एक दोन डिपेंड करतं. गोड आणि एक तुपकट चव असतेच असते.
आणखी एक शेवयांचं घरटं असल्यासारखा तितकाच गोडमिट्ट प्रकारही खाल्लाय. नाव लक्षात नाही त्याचं.

शेवयांचं घरटं- सुतरफेणी. चांगल्या क्वालिटीची असेल तर जिभेवर ठेव़ल्यावर विरघळते कॉटनकँडीसारखी.

मस्त जमलाय लेख...
मला मात्र बक्लावा त्या गोड मिट्ट चवीमूळे अजिबात आवडला नव्हता.. अर्थात परत कधी चाखला नाही म्हणा.
मी खाल्ला तो ग्रीक माणसाच्या हातचा. तो ओमानमधे पॅटेसरी नावाचे दुकान चालवायचा. आणि मी तिथे ऑडीटला
जात असे.

मस्त , हा पण लेख आवडला.
बकलावा समोर आल्यावर त्याला बुकलावा लागु नये येवढा कंट्रोल ठेवावा लागतो पण तरीही खाल्ला जातोच.

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!! मला स्वतःला गोड खायला खूप आवडते त्यामुळेच बक्लावा आवडला. गोड फारसे आवडत नसेल तर गोडमिट्ट बक्लावा आवडणे कठीण आहे.

हे भारताबाहेरच्या माणसाला समजावून सांगताना नाकी नऊ येतात. आम्ही घरी रोज 'नान ब्रेड' किंवा 'करी' खात नाही हे सांगावं लागतं. >> अगदी अगदी.

पण तुमचा लेख वाचून आता एखादा इराणी/ इराकी मित्र शोधून एकदा घरी बनविलेले खाऊन पाहायला हवेत असं वाटतंय >>> अतरंगी जमत असेल तर नक्कीच प्रयत्न करा

.हा पदार्थ कधी खाल्ला नाही .
टर्किश एअरपोर्ट वरून वेगळ्या प्रकारची मिठाई आणली होती मागे , ती आवडली होती सगळ्याना .
मला फार गोड आवडत नाही.कधी मिळाला तर घरातल्या गोडखाउ लोकांसाठी चविला तरी आणेन .

मस्त चविष्ट लेख Happy
बकलावा समोर आल्यावर त्याला बुकलावा लागु नये येवढा कंट्रोल ठेवावा लागतो पण तरीही खाल्ला जातोच.>> +१
मी पुण्यातच खूपदा खाल्लाय, abc फार्म्स मधल्या शीशा कॅफेमध्ये खूप टेस्टी बकलावा मिळतो.

छानच लिहिलंय. केवळ वर्णन न रहाता त्यामागचा दृष्टिकोन लिखाणातून अलगदपणे डोकावत रहातो ते खूप छान वाटतं.

मस्त लिहिलयसं..
मला नार्निया चित्रपटात तो व्हाईट क्विनला टर्किश डिलाईट मागतो ते चाखायची खुप इच्छा होती...
बक्लावा टर्किश डिलाईट मधेच येतो ना? खुप गोड खाणारी नाही मी पण चान्स मिळाला तर टेस्ट जरुर करणार..

मी पुण्यातच खूपदा खाल्लाय, abc फार्म्स मधल्या शीशा कॅफेमध्ये खूप टेस्टी बकलावा मिळतो.>> आयला...लक्षात ठेवावा लागेल.. मॅगे कस्काय वर नक्की पत्ता दे ना मला..

मी पुण्यातच खूपदा खाल्लाय, abc फार्म्स मधल्या शीशा कॅफेमध्ये खूप टेस्टी बकलावा मिळतो.>> आयला...लक्षात ठेवावा लागेल.. मॅगे कस्काय वर नक्की पत्ता दे ना मल>>>>>> ओ इथेच डिटेलवार पत्त द्या.