पुस्तकाची माहिती - Body in the Freezer

Submitted by सुमुक्ता on 10 March, 2017 - 10:29

गोपिकाच्या खुनाची सात वर्षे शिक्षा भोगल्यानंतरही विष्णु आपल्या भूतकाळाशी लढतोच आहे. त्या काळरात्रीची त्याची असलेली आठवण खरी आहे की खोटी ह्याबद्दल त्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे. डॉ सुजाता त्याच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि आयुष्याबरोबर समझोता करण्यासाठी त्याला मदत करायची तयारी दाखवते. पण सत्य काय आहे? त्यांना ते कधी कळेल का? आणि कळले तर विष्णूची त्या सत्याला सामोरे जायची तयारी आहे का????

माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने एक इंग्रजी फिक्शन लिहिले आहे. ह्या पुस्तकाची पेपरबॅक आणि किंडल कॉपी अ‍ॅमॅझॉनवर उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाचा उपोद्घात मी मराठीमध्ये भाषांतरित केला आहे.

===================================================================================

उपोद्घात
ही जागा फारच आकर्षक आहे; चैतन्याने, तारुण्याने आणि प्रणयाने सळसळणारी आहे. "द रोमँटीक कॉर्नर" मध्ये विविध खाद्यपदार्थ, चॉकलेट्स आणि फुले मिळतात. आणि हो एक कॉफी मशीनसुद्धा आहे. ह्या दुकानात एक कोपरा आहे; टेबलखुर्च्यांपाशी बसलेल्या ग्राहकांपासून लपलेला. काऊंटरवरून अगदी वाकून बघितले की एक छोटेखानी छान सजवलेले एक कार्यालय दिसते. अजिबात पसारा नसलेले, दोन मोठे टेबल, एक कॉम्प्युटरचा मॉनिटर, एक प्रिंटर, फाईल्स लावायला एक-दोन कपाटे आणि थोड्या झुलत्या खुर्च्या. पण विष्णूला मात्र कायमच मोठ्या आईस्क्रीम फ्रीझरचे आकर्षण वाटत आलेले आहे. तिथे त्याच्या अत्यंत आवडत्या आईसकँडीज ठेवलेल्या असतात. विष्णूसारख्या पस्तिशीच्या माणसाची आईसकँडीज ही एकमेव पोरकट आवड आहे.

दुकानातील समोरच्या बाजूला नीट लावलेल्या टेबलखुर्च्यांमधून मार्ग काढत विष्णू तीरासारखा आईस्क्रीम फ्रीझरकडे धाव घेतो. आपल्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे कार्यालयात वाकून पाहतो आणि आपली आईस कँडी घेण्यासाठी फ्रीझर उघडतो. पण नेहमीप्रमाणे आज त्याला गोपिकाचा खोडकरपणे आठ्या पडलेला चेहेरा दिसत नाहीत. गोपिका कार्यालयात नाही हे त्याला जाणवते आणि त्याचा चेहेरा दु:खाने पिळवटून निघतो. आपल्या हातातील आईसकँडीकडे तो एक दृष्टीक्षेप टाकतो आणि भीतीने तेथेच थिजतो. त्याच्या हातात आईसकँडीऐवजी माणसाचा गोठलेला हात असतो आणि फ्रीझरमधून दोन निस्तेज डोळे त्याच्याकडे पाहत असतात.

भीतीने थरकाप उडून तो जागा होतो तो एका अंधाऱ्या, पसारा पडलेल्या, औषधांचा वास येणाऱ्या खोलीत. त्याला जाणवते की ही त्याच्या घरातील त्याची स्वत:ची खोली आहे; जेलमधील ते खुराडे नाही जेथे त्यानी सात वर्षे काढली. घामाने थबथबलेला विष्णू डोळे फाडून इकडे तिकडे बघतो. सुदैवाने त्याचे दु:स्वप्न संपलेले असते. नकळतच त्याचा हात औषधांच्या गोळ्यांकडे जातो. ह्याच गोळ्यांनी त्याला आत्तापर्यंत जगण्याचे बळ दिले आहे. पण आज त्याचे हात लटपटतात. कदाचित त्याचा निश्चय त्याच्या कामी येतो. विष्णूला हे जाणवते की डिप्रेशनच्या गोळ्या त्याची दु:स्वप्ने फार काळ लांब ठेवू शकणार नाहीत. गेला महिनाभर डिप्रेशनच्या गोळ्यांवर आलेले अवलंबित्व दूर करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. आणि आज आत्ता ह्या कसोटीच्या क्षणांमध्येसुद्धा त्याला त्याचा निश्चय मोडावा वाटत नाही. डॉ. प्रकाशने त्याला ह्या व्यसनातून सोडविण्यासाठी मदत केली आहे (ह्या गोळ्यांना आता अवलंबित्व म्हणायच्या ऐवजी व्यसनच म्हटले पाहिजे हे विष्णूला पूर्णपणे पटले आहे) . पण विष्णूची ही दु:स्वप्ने थांबविणे हे मात्र डॉ. प्रकाशच्या हातात नाही. डॉ. प्रकाश ह्या विषयातील तज्ज्ञ नाही. तरीही एक वैयक्तिक मदत म्हणून (हल्लीचे डॉक्टरसुद्धा कोठे वैयक्तिक मदत करतात!!) डॉ. प्रकाशने ह्याबाबतीत विष्णूला डॉ. सुजाताची मदत घ्यायला सांगितले आहे. विष्णूची आज तिच्याबरोबर पहिली भेट ठरली आहे. खरेतर मघाशी डॉ. सुजाताकडे कसे जायचे ह्याचाच विचार करत विष्णू बसला होता. पण बाहेर पडायचे आहे ह्या विचाराने त्याचे मन त्या फ्रीझरकडे. . . आणि गोठलेल्या हाताकडे भरकटत गेले. उरलेली थोडीथोडकी ग्लानी झटकून विष्णू पटकन आपल्या कपड्यांच्या कपाटाकडे जातो.

माणसाशी संवाद साधायची वेळ आली आहे . . .

डोअरबेलचा मधुर आवाज किणकिणतो आणि थोड्याच वेळात एका नीटनेटकी मध्यमवयीन स्त्री दार उघडते. विष्णूचे नाव विचारल्यानंतर ती स्त्री विष्णूस आत येण्याची खूण करते. एका प्रशस्त, नीटनेटक्या आणि अतिशय रसिकतेने सजविलेल्या दिवाणखान्यात विष्णू प्रवेश करतो. अतिशय हवेशीर अशा त्या खोलीत छतापासून जमिनीपर्यंत असलेल्या मोठाल्या खिडक्यांमधून भरपूर प्रकाश येतअसतो. तो दिवाणखाना एखाद्या मोठ्या शहरातील मानसोपचार तज्ज्ञाचा दवाखाना अजिबात वाटत नाही.
विष्णूची गोंधळलेली स्थिती पाहून ती स्त्री प्रश्न करते.

"जागा सहज सापडली ना ?" विष्णू त्याच गोंधळलेल्या अवस्थेत मान डोलावून होकार देतो.

"तहान लागली असेल!! पाणी पिणार का?" विष्णूने पुन्हा मान डोलावून होकार देतो. पण त्या स्त्री कडून कोणतीच हालचाल दिसत नाही. कदाचित विष्णूचा होकार तिला स्पष्टपणे कळला नसावा. पण विष्णू दुर्लक्ष करतो. खरेतर त्याचा फारच भ्रमनिरास झालेला आहे. त्याला वाटते कदाचित तो चुकीच्या ठिकाणी आला असावा. विष्णू त्या स्त्रीला उद्देशून म्हणतो "मला डॉ सुजातांशी बोलायचे आहे"

"तुम्ही त्यांच्याशीच बोलता आहात" ती स्त्री उत्तरते.

"डॉ सुजाता, मानसोपचार तज्ज्ञ?" विष्णू विचारतो.

"हो हो. मीच ती" सुजाता उत्तरते. "मी क्लिनिकल सायकियाट्रीमध्ये डॉक्टरेट केली आहे. पण मी औपचारिक रित्या मानसोपचार तज्ज्ञाचे काम करत नाही. मी फक्त वैयक्तिक शिफारस असेल तरच लोकांना भेटते, त्यांच्याशी बोलते."

"मला वाईट स्वप्ने पडतात आणि डॉ प्रकाश ह्यांनी मला सांगितले की मी तुम्हाला येऊन भेटावे. तुम्ही मला मदत कराल." विष्णू जराशा अविश्वासानेच बोलतो. म्हणजे जेवढी आशा एखाद्या लॉटरीचे तिकीट घेण्याऱ्या माणसाला पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसाची असते तेवढीच आशा विष्णूला डॉ सुजाताबद्दल वाटत असते.

"मी आधीच सांगितलं मी फक्त लोकांशी बोलते. आणि ते माझ्याशी बोलतात. पुढे त्यांचा मार्ग त्यांना मोकळा होतो आणि मी पुन्हा त्यांना भेटत नाही." ह्या उत्तराने विष्णूचा अविश्वास आणखीच दृढ होतो. त्याला उठून सरळ ह्या घराबाहेर चालू पडावे असे वाटायला लागते. पण तो दिवाणखाना, तो प्रकाश, ती मोकळी प्रशस्त जागा आणि ह्या सगळ्यातून आलेली एक उबदार, संरक्षित तरीही मोकळेपणाची जाणीव विष्णूला हवीहवीशी वाटत असते.

"तुम्हाला माझ्याशी बोलून मोकळे व्हायचे आहे का? तुम्ही तुमच्या घरापासून माझ्या घरापर्यंत फार कठीण प्रवास करून आला आहात. तुम्ही बोलला नाहीत तर तुमचे कष्ट वाया जातील. नाही?"

विष्णूला अचानक बसलेला धक्का डॉ सुजाताने विष्णूच्या चेहेऱ्यावर अचूक टिपलेला असतो. लोक एखाद्या स्वप्नवत दुनियेत जगत असतात आणि एकाद्या प्रसंगामुळे अचानक त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होते. अशावेळेस ज्या प्रकारचे अविर्भाव चेहेऱ्यावर उमटतील अगदी तसेच भाव विष्णूच्या चेहेऱ्यावर असतात. डॉ प्रकाशनी तिला आधीच विष्णूबद्दल सांगून ठेवलेले असल्याने विष्णूच्या केसमध्ये तिला प्रचंड रस वाटत आहे. खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या एखाद्या खाजगी गुप्तहेराशी बोलायची ही आयती संधी वाया जाऊ नये म्हणून ती विचारते "त्या रात्री काय घडले?"

"मी गोपिकाचा खून केला नाही !"

===================================================================================

जमल्यास हे पुस्तक वाचून मला अभिप्राय कळवा. अ‍ॅमॅझॉनच्या लिंक्स खाली देते आहे.

भारत - https://www.amazon.in/Body-Freezer-Naks-ebook/dp/B01MUXQSU5/ref=sr_1_2?i...

यु. के. - https://www.amazon.co.uk/Body-Freezer-Naks-ebook/dp/B01MUXQSU5/ref=sr_1_...

अमेरिका - https://www.amazon.com/Body-Freezer-Naks-ebook/dp/B01MUXQSU5/ref=sr_1_2?...

Group content visibility: 
Use group defaults

इस्टर ब्रेक साठी प्रमोशनल ऑफर आहे. किंडल कॉपी ५ एप्रिल ते ९ एप्रिल फुकट आहे!!

https://www.amazon.com/dp/B01MUXQSU5 -- US site
https://www.amazon.co.uk/Body-Freezer-Naks-ebook/dp/B01MUXQSU5 --UK site
http://www.amazon.in/Body-Freezer-Naks-Cos/dp/194686921X -- India site