गोबी की कढी

Submitted by अल्पना on 25 September, 2009 - 05:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक फ्लॉवरचे छोटे फुल, २ बटाटे, जीरे, धणे,मेथ्या,हळद, एक आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, २ चमचा धण्याची पुड, १ चमचा गरम मसाला, फोडणीसाठी सरसोचे तेल, चवीप्रमाणे मीठ
कढीसाठी - २ वाट्या दही, ४ मोठे चमचे बेसन

क्रमवार पाककृती: 

पंजाबी भाज्यांमध्ये असतात त्याप्रमाणे फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे चिरुन उकळत्या पाण्यातून काढावेत. बटाट्याच्या उभ्या काचर्‍या (लांब फोडी) कराव्यात. अद्रक व मिरची बारिक चिरून घ्यावी.
कढईमध्ये थोडंसं सरसोचं तेल घ्यावं. तेल भरपूर तापले की (तेल नीट तापले की त्याचा वास निघून जातो.) त्यात हातवर चोळलेले किंवा अर्धवट भरडलेले धणे, जीरे व मेथ्या घालाव्या. जीरे वैगरे तडतडले की बारीक चिरलेले अद्रक व हिरवी मिरची घालावी व परतून घ्यावे. आता त्यात १ चमचा हळद घालावी व फ्लॉवर अन बटाट्याचे तुकडे घालावेत. गरम मसाला, धण्याची पुड व चवीप्रमाणे मीठ घालुन भाजी झाकण ठेवुन शिजवून घ्यावी. खाली लागु नये म्हणून मधून मधून हलवावी लागेल.
भाजी शिजेपर्यंत २ वाटी दह्यात बेसन व गऱजेप्रमाणे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे.
भाजी नीट शिजली की त्यात बेसन घातलेले ताक / दही घालावे व एक उकळी आणावी. कढी फुटु नये म्हणून उकळी येईपर्यंत कढीला मधून मधून हलवावे लागते.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

माझा नवरा आलु-गोबीच्या भाजीत कधीच कांदा व लसुण घालत नाही म्हणून मी पण घालत नाही.
आवडत असल्यास भाजी करताना त्यात उभा चिरलेला कांदा घालता येईल. काहीजण लसूण पण घालतात.
अशीच कढी आलु व बडीया (मुगाच्या किंवा मिश्र डाळींच्या वड्या ज्या दुकानात मिळतात. बहुतेक सांडग्यांसारखा प्रकार असतो.), फक्त प्याज्-आलु, काले चने, रौंगी म्हणजेच चवळी वैगरे पदार्थांची पण करतात.

माहितीचा स्रोत: 
नवरा. आत्तापर्यंत घरी कढी नवराच करत आलाय. त्याने मला कधी रेसेपी सांगितली नाही. गेल्या आठवड्यात तो कढी करत असताना अट्टहासाने सरसोच्या तेलाचा वास सहन करत मी स्वैपाकघरात उभी राहिले व त्याची कढी बनवायची पद्धत पाहिली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुप नको मग सरळ साध गोडतेल वापर. घरात सरसोचं तेल नसेल तर आम्ही पण गोडतेल वापरतो.
अन ह्यातली आलु-गोबीची भाजी तशीच नुसती पण कढीशिवाय मस्त लागते हं स्मि. बिना कांदा-लसणाची.

ह्म्म्म गोडतेलात करुन बघेन अल्पना, आम्ही अशी फणसाच्या गर्याची पण करतो गरे कढीत घालुन Happy
फक्त तुपात कर्तो तेला ऐवजी, पण हा पण प्रकार भारी आहे एकदम

आमच्या घरी गोबीमध्ये लसुण घालत नाहीत. तसही माझ्या सासुबाई लसुण खात नाहीत त्यामुळे मी सगळे पंजाबी पदार्थ बिना लसणाचेच खाल्लेत पहिल्यांदा.

मस्त होते ही कढी. मी बर्‍याच वेळा केली आहे अल्पनाच्या रेसेपी प्रमाणे. पार्टीमधे पण एकदम हिट प्रकार आहे. पार्टीत करणार असाल तर ऐन वेळेस दही घालून उकळी आणा. आधी करून ठेवली तर थोडी आंबट होते.