ब्लू वॉटर पिझ्झा - खाऊगिरीचे अनुभव २

Submitted by सुमुक्ता on 29 March, 2017 - 05:40

मागील भाग येथे पहा - निक्स, डार्लिंग हार्बर - खाऊगिरीचे अनुभव १

ऑस्ट्रेलियातील न्यूकासल तसे फारच बोअर गाव होते असे मी मागच्या लेखात सांगितले होते. तसे असले तरी तेथे काही काही फार छान रेस्टॉरंट्स होती त्यातीलच एक ब्लू वॉटर पिझ्झा होते. अगदी समुद्रकिनाऱ्याजवळ होते तिथून खूप छान देखावा दिसायचा. उन्हात चकाकणारे निळे हिरवे पाणी बघत जेवताना फार छान वाटायचे.

ऑस्ट्रेलियातील ५-६ महिन्यांच्या वास्तव्यानंतर मला न्यूकासल विद्यापीठात नोकरी मिळाली. त्यानिमित्त आम्ही ब्लू वॉटर पिझ्झाला जेवायला गेलो होतो. तेथे सीफूड पिझ्झा मिळायचा. मला सीफूड प्रचंड आवडीचे होते (अजूनही आहे) पण मी ब्लू वॉटर पिझ्झाला पहिल्यांदाच जात होते आणि निक्सचा अनुभव बऱ्यापैकी ताजा होता!! मनात जरा शंका होती की काय खावे लागेल. तसेही रेस्टॉरंटमध्ये जाऊन पिझ्झा खाणेसुद्धा माझ्यासाठी फारच नवीन होते. भारतात असताना एकदाच पिझ्झा हटमध्ये गेले होते आणि पिझ्झा हट हे काही रेस्टॉरंट नव्हे असाही एक समज होता.

न्यूकासलला येऊन समुद्रकिनारी आम्ही एकदाही जेवण केले नव्हते म्हणून मी हा अनुभव घेण्यासाठी सज्ज झाले. मला वाटले सीफूड आणि पिझ्झा साठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सीफूड पिझ्झाच घ्यायला हवा. म्हणून आम्ही मिक्स्ड सीफूड पिझ्झा मागविला. अर्थातच मेन्यू कार्डमधील वर्णन मी वेंधळेपणा करून वाचले नव्हते. त्यामुळे मला वाटले की टॉपिंग म्हणून थोडेफार मासे आणि प्रॉन्स वगैरे असतील. प्रॉन्स सुरुवातीपासूनच माझ्या विशेष आवडीचे आहेत त्यामुळे वाटत होते की मस्त असेल हा पिझ्झा.

आमचे जेवण आले पण तेव्हा फोटो काढून लगेच सोशल मीडियावर टाकायची पद्धत नव्हती त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीत. खालील फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत. हा आपल्या नेहेमीच्या पिझ्झा सारखा पिझ्झा होता पण टोमॅटो सॉस नव्हता आणि सीफूड टॉपिंग म्हणून प्रॉन्स, स्क्विडचे (माखुल) तुकडे, छोटे बेबी ऑक्टोपस, आणि मसल्स/ऑयस्टर्स (कालव) टाकले होते. मला फक्त प्रॉन्स ओळखू आले. पहिल्या फोटोमध्ये केशरी रंगाचे ऑयस्टर्स, आणि करड्या पांढर्‍या रंगाचे ऑक्टोपस दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ज्या गोल रिंग्स आहेत ते स्क्वीड्स आहेत. साधारणपणे ह्या दोन्ही फोटोंचा संयोग असा तो पिझ्झा होता!

seafood pizza 1.jpgseafood pizza 2.jpg

त्यात सर्वात भयाण ऑक्टोपस दिसत होते. अगदी किड्यासारखे. आधी मला कळेचना की हे काय आहे. मी नवऱ्याला विचारले "हे कसले किडे आहेत??". तर तो म्हणे "अगं!!!!! किडे नाहीत ऑक्टोपस आहेत. छान लागतात. खाऊन बघ." मला काही खायचा धीर होईना. आधी मी एक स्क्विड खाऊन पहिला तो पांढरा होता आणि चांगला दिसत होता!! मग मी एक ऑयस्टर उचलला (तो पण थोडा बरा दिसत होता) आणि खाल्ला. खरेतर माझे मलाच फार आश्चर्य वाटले. मला चक्क हे दोन्ही आवडले!!! मग थोडा थोडा पिझ्झा पण खायला सुरुवात केली. पण अजूनही ऑक्टोपस खायचा धीर होत नव्हता (रूपरंगच असे होते!!). पण मग थोड्या वेळाने वाटले की खाऊन पाहावे फार फार तर काय होईल आवडणार नाही. नाही आवडला तर नाही खायचा. मी फार धीर करून एक ऑक्टोपस उचलून तोंडात टाकला.

मला स्क्विड, ऑयस्टर किंवा ऑक्टोपसच्या चवीचे वर्णन करता येणार नाही पण कोणताही तीव्र वास किंवा तीव्र चव नव्हती आणि चावताना किंचित रबरासारखी कन्सिस्टन्सी वाटली. ऑयस्टर सगळ्यात मऊ वाटला त्यानंतर स्क्विड. पण ऑक्टोपस जरा कडक वाटला. तीव्र चव किंवा वास नसल्याने मला एकदम वाटले की "अरे हे छान आहे की. मी उगीचच एव्हढे आढेवेढे घेत होते!!" त्यानंतर मी तो पिझ्झा आवडीने संपविला हे सांगायला नकोच!! सीफूड आवडण्याच्या एका नवीन पर्वाला येथेच सुरुवात झाली.

ह्या अनुभवानंतर मला एक गोष्ट कळली. मोकळ्या मनाने पदार्थाची चव घेतली तर पदार्थ आवडणे अजिबात कठीण नसते. आपल्या कोशातून बाहेर येऊन इतर लोक काय खातात हे अनुभवणे पण खूप मजेदार असते. एखादा पदार्थ आवडेल आणि एखादा आवडणार नाही. पण खाल्लेच नाही असे असण्यापेक्षा खाऊन पहिले पण आवडले नाही असे असेल तर आपले अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाईल.

माझ्या जिभेला तीव्र चवीचे, मसालेदार पदार्थ खायची खूप सवय होती तेव्हा बरेच पदार्थ सुरुवातीला मला अळणी वाटायचे. पण पदार्थाची मूळ चव कळणे हे ही तितकेच महत्वाचे आहे हे हळूहळू कळायला लागले. त्याचबरोबर खाद्यपदार्थ हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असतो. आपण ज्या प्रांतात रहातो (किंवा पर्यटन करतो) तेथील स्थानिक खाद्यपदार्थ खाल्ले तर तेथील संस्कृतीशी हळूहळू आपली ओळख होत जाते हे जाणवत गेले. मुळात शिकण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची तयारी मला ठेवायला हवी होती.

ह्यानंतर मात्र मी एक गोष्ट मनाशी ठरविली की खाण्याच्या बाबतीत तरी कोणत्याही अनुभवाला नाही म्हणायचे नाही.

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच...
ऑक्टोपस बघुन माझ्यावर वेळ आली तर मी खाईल कि नाही याबद्दल जर्राश्शी शंकाच वाटते...एकंदर अनुभव छान होता तर..
बिझारे फुड मधे ते जिवंत ऑक्टोपस खाताना मी पाहिलय. देवा धन्य ते पराक्रमी वीर..

"खाण्याच्या बाबतीत तरी कोणत्याही अनुभवाला नाही म्हणायचे नाही.' - 'एनीथिंग दॅट फ्लाईज, क्रॉल्स, स्विम्स ऑर वॉक्स' ही माझी अन्नब्रह्माविषयीची भक्ती असल्यामुळे, तुमच्या ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन!

"पदार्थाची मूळ चव कळणे हे ही तितकेच महत्वाचे आहे " - +१

खरे आहे. या लोकांचे बिनमसाल्याचे सीफुड आधी नको वाटते (आपल्या भारतीय सीफुड प्रिपरेशनची सवय असल्याने). ऑक्टोपस, स्क्विड्स, ऑयस्टर्स माझ्या घशाखाली अजुनही उतरत नाहीत. आलं लसुण नाही, रस्सा खदखदुन उकळवणे नाही, असे सीफुड खाउन पोट बिघडेल असे वाटते. श्रिंप त्यातल्या त्यात बिनमसाल्याचे बरे लागते.

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद Happy

एनीथिंग दॅट फ्लाईज, क्रॉल्स, स्विम्स ऑर वॉक्स' ही माझी अन्नब्रह्माविषयीची भक्ती >>> फेरफटका हे प्रचंड आवडले आहे!!!

मीसुद्धा खाण्याच्या बाबतीत रिजिड होते. मला खूप आवडी-निवडी होत्या. थोड्याफार प्रमाणात अजूनही आहेत. पण परदेशी वास्तव्यास गेल्यानंतर माझ्या लक्षात आहे. बाहेरचे खाणेपिणे आवडले नाही तर बाहेर जाण्याची कोणतीही मजा येणार नाही. त्यामुळे हळुहळु एक्सप्लोर करत गेले आणि मग ह्या अन्नप्रवासाची मजा वाटायला लागली Happy

असे सीफुड खाउन पोट बिघडेल असे वाटते >>> होउ शकते असे. जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करत असता तेव्हा काही प्रयोग फसण्याची शक्यता असतेच.

खुपच मस्त अनुभव .... आणि लिहीण्याची शैली पण सुंदर

ह्या अनुभवानंतर मला एक गोष्ट कळली. मोकळ्या मनाने पदार्थाची चव घेतली तर पदार्थ आवडणे अजिबात कठीण नसते. आपल्या कोशातून बाहेर येऊन इतर लोक काय खातात हे अनुभवणे पण खूप मजेदार असते. एखादा पदार्थ आवडेल आणि एखादा आवडणार नाही. पण खाल्लेच नाही असे असण्यापेक्षा खाऊन पहिले पण आवडले नाही असे असेल तर आपले अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाईल..>>>>>>> हे विचार सर्वात जास्त आवडले. keep writing.