भुतांसाठी नवीन नियमावली

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 19 March, 2017 - 09:26

आधुनिक युगात सगळ्याच गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत. जुनाट कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. काळाबरोबर आपल्याला टिकून रहायचं असेल, प्रगती करायची असेल तर बदल आवश्यक आहे. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मंडळाने नवीन नियमावली तयार केली आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी.

१. सबंध भारतात झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यातल्या त्यात आपल्या बांधवांना प्रिय वड, पिंपळ, चिंच अशी झाडे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. त्यामुळे निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेतील ब्लडी मेरी नावाच्या भगिनींनी शेकडो वर्षांपूर्वी झाडांवर राहण्याचा विचार केला होता पण नंतर तो विचार त्यागून त्यांनी आरशात रहायला सुरुवात केली. आज तिकडे त्या खुप प्रसिद्ध झाल्या आहेत. कुणीही बाथरूममधल्या आरशात पाहून तिनवेळा ब्लडी मेरी म्हटल्यास त्या अवतिर्ण होतात आणि त्यानंतर आपलं कर्तव्य बजावतात. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी मंडळाने चार हडळींना अमेरिकेत पाठवलं होतं. त्या सगळं तंत्र शिकून परत आल्या आहेत आणि इतरांना हे प्रशिक्षण देणार आहेत. येत्या अमावस्येपर्यंत सर्व हडळ भगिनींनी जवळच्या स्मशानकार्यालयात नोंदणी करावी. त्यांना आरशात निवास करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल.

पण आपल्याकडे अजूनही बऱ्याच लोकांकडे बाथरूम नसतात, असले तरी त्यात आरसे नसतात. म्हणून हडळी कुठल्याही आरशात राहू शकतील अशी मुभा देण्यात आली आहे. त्यांची मुलं वाहनांच्या साइडग्लासमध्ये राहतील/दिसतील.

हडळी राहत असलेली झाडं बेघर वेताळ आणि मुंजा यांना दिली जातील.

२. दोन महिन्यांपूर्वी भु. आशा पुराणिक यांचं आपल्या संघटनेत आगमन झालं. आल्याआल्या त्यांनी स्त्रीभूतांचे काही प्रश्न मांडले. ते असे – प्रादेशिक आणि हिंदीभाषिक वाहिन्यांवरील भुतांच्या मालिका, भयचित्रपट यांच्यामधे दाखवण्यात आलेली ८० टक्के भुते स्त्रिया असतात. यामुळे मेल्यानंतर फक्त स्त्रियांचेच भुतं बनतात, त्याच सर्वाधिक त्रासदायक असतात असा मर्त्यमानवांमध्ये गैरसमज पसरत आहे. शिवाय त्यांचा पोशाखही पांढरी साडी, लांब केस, विदाऊट सॅंडल उलटे पाय अशा जुनाट प्रकारचा असतो. ह्या गंभीर बाबींवर मंडळाच्या वार्षिक मिटींगमध्ये चर्चा करण्यात आली. असे गैरसमज पसरवणाऱ्या दिग्दर्शकांना झपाटण्याचे आदेश झोटिंगांना देण्यात येत आहेत.

३. आजपर्यंत आपण कुठल्याही मनुष्यावर हमला करून भक्ष मिळवत असू. पण असं करणं धोक्याचं आहे हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. व्यसनाधीन, चुकीच्या आहाराला बळी पडलेले, व्याधीग्रस्त भक्षचं मास किंवा रक्त ग्रहण केल्यामुळे आपली ताकद कमी होत चालली आहे. त्यामुळे भक्ष मिळवण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावेत –

बिअरबार, डान्सबार, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे टाळावेत. नशेची आवड असणाऱ्यांची पावले तिकडे खेचली जाऊ शकतात पण त्यांनी संयम बाळगावा. फास्ट फूड सेंटरला नियमित भेट देणाऱ्यांच्या नांदी लागू नये.
व्यायामशाळा, फिटनेस सेंटर, योगा आणि नॅचरोपॅथी केंद्र यांच्यावर नजर ठेवावी. बाजारात कारले खरेदी करणारेसुद्धा निरोगी असण्याची शक्यता आहे. फिल्मसिटी आणि मॉडेलींग कार्यक्रमांच्या आसपास सर्वोत्तम दर्जाचं भक्ष मिळू शकेल.

४. सर्वांनी हमला करतांना किंवा फक्त भीती दाखवायला गेले असतांना उत्तम पोशाख करून, निटनेटक्या पद्धतीने जावं. मागे एका वर्तमानपत्रात ‘घाणेरड्या सुळ्यांच्या भुतांनी केला हमला’ अशी बातमी छापून आली होती. अशा गोष्टींमुळे आपलं नाव खराब होतं, नाहीनाही ते गैरसमज पसरतात. इथून पुढे कुणीही गबाळ्या वेषात शिकारीला बाहेर पडणार नाही. तसं आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
आंतरजालाचा आधार घ्या, फॅशनला वाहिलेल्या घोस्ट वेबसाईट्सवरून काही टिप्स घ्या.
( माहिती: सुळे शुभ्र करणारं कवटीमंजन स्मशानबाजारात आलं आहे. )

५. वंपायर लोकांना सूर्यकिरणांपासून वाचवणाऱ्या आदित्यरक्षक अंगठ्या आयात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख कब्रस्थानात त्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वंपायरने दहा आत्मे डिपॉझीट ठेवून त्या घेऊन जाव्यात. येत्या माघी अमावस्येनंतर ज्यांच्याकडे अंगठ्या असणार नाहीत त्यांचं वंपायरत्व काढून घेण्यात येईल.

६. मोठाले गुन्हेगार पकडण्यातलं पोलीस आणि तपासयंत्रणेचं अपयश लक्षात घेता प्लँचेटला सुगीचे दिवस येतील असा अंदाज आहे. प्लँचेटद्वारे बोलावलेल्या आत्म्यांना नियोजित ठिकाणी लवकर पोहोचता यावं यासाठी जलद वाहतूकव्यवस्था उभारण्यात येत आहे, शिवाय प्लँचेट जागरूकता मोहिमही सुरू करण्यात येणार आहे. याकामी ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे त्यांनी नजीकच्या ब्रह्मराक्षसाशी संपर्क साधावा.

७. देणगी संदर्भात नियम बदलण्यात आले आहेत. यानंतर स्वहस्ते किंवा मध्यस्थामार्फत दिलेल्या देणग्या स्वीकारल्या जाणार नाहीत. झपाटलेल्या कुरियरमार्फतच त्या पाठवाव्यात. आपली मदत योग्य हातांत पडावी यासाठी केलेली ही तजवीज आहे. मध्यस्थ तुम्हाला फसवू शकतात आणि तुमचं रूप घेऊन देवदूत आम्हाला.

बेवारस प्रेतात्म्यांसाठी उघडण्यात आलेलं अनाथालय, शिकार करायला नकार देणाऱ्या बालात्म्यांसाठीचं बालसुधारगृह, तेरवीनंतर पुढे काय? या प्रश्नाने चाचपडणाऱ्यांसाठीचं मार्गदर्शन केंद्र इत्यादी समाजोपयोगी कार्यांकरिता तुमची देणगी वापरण्यात येईल.

८. प्रत्येक विभागातील ३० टक्के भुतांनी शहरात स्थलांतरीत होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. शहरात अंधाऱ्या जागा कमी असल्या तरी झपाटण्यासाठी अंधारी मनं भरपूर सापडतील.

९. विर आणि निमा हे क्षत्रिय समाजातील भुतांचे प्रकार होते. पण आजकाल शुद्ध क्षत्रिय वंश उरला नसल्याने ह्या दोन्ही भुतजातींचा दर्जा काढून घेण्यात येत आहे. सध्याच्या विर आणि निमा यांना त्यांच्या आवडीच्या कुठल्याही भुतजातीत मोफत प्रवेश मिळेल. इतर जातीच्या भुतांचा दर्जा खालीलप्रमाणे अबाधित ठेवण्यात आला आहे –

ब्रह्मराक्षस व मुंजा : ब्राह्मणांची भुतं
देवचार आणि चेटकीण/डाव : मागासवर्गीयांची भुतं
खविस : मुसलमानांचं भुत
झोटींग : खारवी किंवा कोळी समाजातील भुत
खुन्या : हरिजन समाजातील भुत

मनुष्यजातीच्या मराठा आरक्षणाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता मराठा समाजातील भुतांनीसुद्धा वेगळ्या भुतप्रकाराची मागणी केली आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.

१०. लग्न न होता मेलेल्यांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त अजून काही शंका किंवा अडचणी असतील तर या धाग्यावर चर्चा करावी.

######################################
द्वारा
स्मशानवासी विनय खंडागळे
वय: ७७८ वर्षे (मृत्यूपश्चात)
विदर्भ प्रांत भुतसंघटक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.आजकाल www.bhootboli.com खूप स्लो अपलोड होतं तर या साईटला काही मानवबाधा झालीय का ते तपासण्यात यावं आणि योग्य ती कारवाई करावी.
२. भूतमतच्या विदर्भ आवृत्तीत हल्ली भूतवार्ता कमी आणि इतर जाहिरातीच जास्त दिसतात, ही नोंद घ्यावी.

@ भु.सातीजी

तुमच्या दोन्ही समस्या नोंदवण्यात आल्या आहेत.

१.bhootboli.com वरील कवट्या आणि प्रेतांची थीम जुनी झाल्यामुळे बदलण्याचं काम सुरू आहे.त्यामुळे अजून काही दिवस स्लो राहील. तसदीबद्दल क्षमस्व

२. भूतमतच्या मागील संपादकांनी घोटाळा केल्यामुळे पेपर तोट्यात चालला आहे. त्यामुळे जाहिराती वाढवाव्या लागल्या. लवकरच भूतमतची add free ई आवृत्ती सुरू होत आहे.

धन्यवाद!
किती तत्परतेने उत्तर दिलंत श्रीभू विनय.
हल्ली इतकी भूताटकी असलेली भूते फार कमी पहायला मिळतात.

कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल. न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल.

फ्रॉम -
होईन भुत मी त्या घरची

तत्पर सेवा @ भूतजिओ . 5G सर्विस
२०१७ च्या सर्व भूताना रोमिंग फ्री ssss त्वरा करा लवकर मरा Lol

@ सपनाजी

अहो इथे भुतजातीच्या भवितव्याबाबत एवढी गंभीर चर्चा सुरू आहे, विनोदी कसं वाटणार.
तुम्ही नक्कीच मनुष्य असल्या पाहिजे Proud

( आतली बात : प्रतिसादांमधून विनोदी होत जाणारं हे ललित आहे म्हणून विनोदीमध्ये टाकलं )

किती तत्परतेने उत्तर दिलंत श्रीभू विनय.
हल्ली इतकी भूताटकी असलेली भूते फार कमी पहायला मिळतात.

>> Biggrin

तत्पर सेवा @ भूतजिओ . 5G सर्विस
२०१७ च्या सर्व भूताना रोमिंग फ्री ssss त्वरा करा लवकर मरा

>> भूतवार्तातील जाहिरात इकडे आलेली दिसते.

त्वरा करा लवकर मरा Lol

भूतांच्या साहित्यसंम्मेलनाच्या अनुल्लेखामुळे तीव्र निषेध!!
माझा 'भूतायन' नावाचा कलाप्रयोग मी कसे सादर करणार? तसेच माझा 'न भूतो न भविष्यती' हा काव्यसंग्रह प्रकाशीत करायची संधी कशी मिळणार?
मुंबै - पुण्याच्या भूतांन्ना नेहमी पुढे पुढे मिरवयची सवय अस्ते त्यामुळे वैदर्भिय भुतांवर नेहमिच अन्याय होतो. त्यामुळे अखील वैदर्भिय भूत-साहित्य संम्मेलन हे चंद्रपूरच्या जंगलात आयोजीत करण्यात यावे.
-भूतेश ब्रम्हसंमंधे

आदरणीय मृतकवी ब्रम्हसमंधे,

साहित्यसंमेलनाबद्दल मंडळ लवकरच निर्णय घेणार आहे. वैदर्भीय भुत साहित्य संमेलन चंदरपुरच्या जंगलातच घेण्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. परंतु उद्घाटनाला वेताळडान्स ठेवल्यामुळे तुम्हाला भुतायन चकवाळलेला या कार्यक्रमाअंतर्गत सादर करता येईल.
अधिक माहिती तुम्हाला लवकरच कळवली जाईल. रक्तमेल पत्ता द्यावा.

(एक विनंती: तुमचं भूतेश नाव बदलावे कारण त्यात इश, म्हणजे देवाचा उल्लेख आहे. सवलती मिळायला अडचण येऊ शकते)

@ विनय, छान!! आवडलं!! आपल्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्तिचं कौतुक वाटतेय.

हल्ली इतकी भूताटकी असलेली भूते फार कमी पहायला मिळतात.>>> @ साती, माणूस=माणुसकी, भूत=भूताटकी हे बाकी मस्त जमलंय.

थँक्स Happy

आमच्यात 'भूतेश' चालतं...कारण आमचे गटनेते मा. आ. रूद्र (भूतनाथ उर्फ महेश उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ नीलकंठ उ....असो!) ह्यावरून आम्ही ही नावे घेतो.
तुम्ही जे 'चंदरपुरच्या' असे लिहिले आहे ते 'चंद्रपूरच्या' असे लिहाल का? (आपण पेठेतील / चाळितील भूत आहात कां? कारण कि त्यांना त्यापलिकडील भूत-ला ची ज्यास्त माहिती नसते असा अनुभव आहे. मागे माझ्या एका पुणेरी हडळ मैत्रिणिने अगदी बाळबोध अविर्भावत विचारले होते की अरे भूतेश चंद्रपूरकडे सगळे आदिवासी भूते असतात कां? आणी विशेष म्हणजे पुण्यात सुमारे १००८ वर्षे नागनाथ पाराजवळील पडक्या इमारतीत जिन्याखालील वास्तव्यास असलेल्या ह्या 'हडळीने' आयुष्यात एकदाही सिंह (कि सिंव्ह?) गड पाहीला नव्हता. माझ्या ५ वर्षातील वास्तव्यात मी सुमारे तीस-एक वेळा गेलो असेन.)

(क्षमस्व.कविता अप्रकाशित करण्यात येत आहे-भूतेश)

छान आहे भुताटकी Lol
>>>>>> शहरात अंधाऱ्या जागा कमी असल्या तरी झपाटण्यासाठी अंधारी मनं भरपूर सापडतील.
गुड one

भन्नाट...

प्रतिसाद अन त्यांना उत्तर पण मस्तच Happy चालुद्या

chan

chan

Pages