होऊन आज सूर्य

Submitted by शार्दुल हातोळकर on 16 March, 2017 - 05:03

होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी

माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी

केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी

युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी

बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी

पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी

जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?

- शार्दुल हातोळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कावेरी आणि मीनल ! __/\__

शेवटच्या ओळीचा अर्थ असा आहे की, आयुष्याची नौका आता किनाऱ्यापासुन दूर अखेरच्या प्रवासाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत, पण आयुष्यभरात मी नक्की काय कमावुन घेऊन चाललो आहे ते कळत नाही....

शार्दूलजी,
मार्गदर्शन करावे इतकी माझी योग्यता नाही,पण केवळ मित्रत्वाच्या हवाल्याने,किंवा एक सहपाठी म्हणून प्रतिसाद देतो आहे म्हणा!
मी मायबोलीवर नवीनच लिहायला लागलो तेंव्हा माझ्या एका गझलेवर आ.बेफीजींनी प्रतिसाद दिला होता,त्यात एक ओळ होती...
'अधिक साफसुथरी शब्दरचना शक्य होती की कसे ह्याचा विचार व्हावा.'
आपली रचना वाचली नि मला बेफिजींचा हा सल्ला पुन्हा आठवला,तो तसाच तुम्हाला कळवीत आहे!तसेच 'गझलेची बाराखडी' वाचल्यास गझलेचे तंत्र आणि मंत्र सुस्पष्ट होतील!बेफिजींचे यासंबंधीत लेखही उत्तम मार्गदर्शक आहेत!(कृ.गै.न.)

अनेक लेखनशुभेच्छांसह...
—सत्यजित

Thanx for the explanation shardulji....n @ satyajitji...ही गझलेची बाराखडी काय आहे ???

आ.सुरेश भट साहेबांनी,नवीन गझल-लेखन करु इच्छिणाऱ्या कवींना गझलेचे नियम-तंत्र तसेच मंत्र कळावेत यासाठी लिहिलेली एक छोटेखाणी माहितीपुस्तिकाच छापून घेतली होती...ती 'गझलेची बाराखडी'!(just google it!)
अनेक कवी आपल्या रचना त्यांना पाठवत,पण सर्वांना प्रतिसाद देणे शक्य होत नसल्याने,बऱ्याच वेळा ते ही पुस्तिकाच त्या कवींना पाठवून देत,असे वाचले आहे!

सत्यजीत तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण माफ करा तुमचा प्रतिसाद काहीसा अगम्य वाटला.

कृपया वरील गझलमधे गझलचे नक्की कोणते नियम पाळले गेले नाहीत ते जरा विस्तृत सांगाल तर बरे होईल. तसेच "साफसुथरी रचना" म्हणजे नक्की काय ते कळाले तर माझ्या ज्ञानात भरच पडेल. बाकी गझलची बाराखडी मी फार पुर्वीच वाचली आहे आणि माझ्याकडे कवीवर्य सुरेश भटांची अनेक पुस्तकेही आहेत.

मराठी गझलने आता पूर्णपणे कात टाकली आहे आणि मराठी गझल आता अधिकच परिपक्व आणि कक्षा रुंदावणारी झाली आहे. तथापी मराठी गझलबाबतचे वादविवाद आणि गैरसमज काही शमले आहेत असे दिसत नाही.

अवांतर - कृपया याला माझा अहंकार किंवा अभिमान समजु नये, पण मायबोलीवर जरी मी काही महिन्यांपुर्वीच सभासद झालो असलो तरी मागील 14 वर्षांपासुन मी गेय स्वरुपातील कविता लिहितो आहे आणि 10 वर्षांपासुन मराठी गझल लिहितो आहे.

तुमच्या उत्तराची वाट पाहतो आहे.

शार्दूलजी,
प्रतिसाद अगम्य वाटूनही आपण दखल घेतलीत,त्याबद्दल आभार!

वाचताना मिटर अडखळंत होतं जरा,म्हणून मी मात्रा मोजून पाहिल्या,माझ्या हिशोबाप्रमाणे(आपण लिहिले आहे त्यावरुन) कमी-अधीक भरल्या! सहजिकच वृत्ताचा हिशोबही ढळला!
(सुटी अपेक्षित असतील तरीही लिखाणात त्या आलेल्या नाहीत!)भरीचे हा,तो,ती,ते ई. शब्द सारखे आल्याने रसभंग करतात!
>>>मराठी गझलने आता पूर्णपणे कात टाकली आहे आणि मराठी गझल आता अधिकच परिपक्व आणि कक्षा रुंदावणारी झाली आहे.>>>सहमत!
>>>मराठी गझलबाबतचे वादविवाद आणि गैरसमज काही शमले आहेत असे दिसत नाही.>>>मला साधी साधक चर्चा अपेक्षित होती!प्रतिसादाच्या सुरुवातीलाच मी तसे नमूद केले आहे!वाद-विवाद आणि गैरसमजाचा तर प्रश्नच उद्भवत नाही!

अापल्या काही कविता वाचनात आल्या आहेत...अजून वाचायलाही आवडतील! आपला लेखनप्रवास मोठा आहेच,तो नवकवींना मार्गदर्शक ठरावा अशी अपेक्षा!

मला यातले फारसे कळत नाही त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेत असेन तर क्षमा मागतो, पण खालील ओळीत कुठे तरी मात्रा चुकत आहेत असे मला ही वाटले.
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी ( एक मात्रा जास्त वाटते आहे)

जातो आहे किनारा तो गूढ लांब आता ( एक मात्रा जास्त वाटते आहे. जातो असा किनारा किंवा जातो इथे किनारा जास्त चपखल बसेल का?)
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी? ( एक मात्रा कमी वाटते आहे)

सत्यजीत आणि संतोष आपल्या दोघांच्याही मताशी सहमत. मात्रांच्या हिशेबाबद्दल आपण मांडलेल्या मुद्द्यातील तथ्य नाकारता येणार नाही.

पण मी मात्रांचा हिशेब हा गझलेला लावलेली चाल आणि गझल गाणे या संदर्भातुन घातलेला आहे. मी स्वतः गायक असल्यामुळे मी गझल लिहित असतानाच ती गाऊन पाहातो.

बाकी रसिक वाचकांशी अशी स्पष्ट आणि सडेतोड चर्चा मला मनापासुन आवडते. __/\__

शार्दुलजी,
तुम्ही किती भाग्यवान आहात ! देवाने कवित्व आणि गायन या दोन्हीतही तुम्हाला प्राविण्य दिलें आहे (किंवा तुम्ही स्वतः मिळवले आहे) तसे असताना एकाने दुसर्‍याला अगदी थोड्यासाठी कशाला संभाळून घ्यावे? समजा हे उलटे झाले. कविता अगदी काटेकोर वृत्तात बसली पण गाताना एखादाच सूर बेसूर लागला तर तुमच्यातल्या कविने म्हणणे योग्य होईल का की गायनाकडे लक्ष देऊ नका. मी कवीपण आहे वृत्तात योग्य ते बसवून घेतो आणि एकदा ठेका नीट लागला की ते व्यवस्थीत वाटेल.
उलट तुमच्यातल्या कविने इतकी उत्तम कविता लिहावी आणि गायकाने इतकी सुंदर म्हणावी की आमच्यासारख्या सामान्य रसिकांना तुमच्या काव्यांचं कौतुक करावे का गायनाचे कौतुक करावे असे वाटले पाहिजे.
काहि अधिक उणे लिहून गेलो असेन तर माफ करा.

संतोषजी, प्रांजळपणे मत मांडल्याबद्दल तसेच मला भाग्यवान म्हटल्याबद्दल धन्यवाद !! Happy

कवीने जे लिहिले आहे ते गायकाने त्याच्या पद्धतीने अधिकाधिक चांगले गाणे, हे जेव्हा कवी आणि गायक या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात तेव्हा जास्त सोपे आहे.

पण जेव्हा एकच व्यक्ती या दोन्ही भूमिका निभावत असते, तेव्हा कुठेतरी किंचित सुट ही घ्यावीच लागते, कारण मुळात विचार करणारी व्यक्ती ही एकच असते.

शिवाय मला असे वाटते की वृत्त, मात्रा, व्याकरण, तांत्रिक बाबी, इत्यादीमधे अद्यापही मराठी गझल ही खुपच जास्त अडकुन पडली आहे आणि त्यामुळेच ती कवितेएवढी सहजगत्या सर्वसामान्य रसिक/वाचकांच्या दारात पोचत नाहीये. आपण त्याबद्दल थोड्याफार सुधारणा नको का करायला? तसेच गझलेचा विषय किती ताकदीने मांडला आहे हे महत्त्वाचे की एखाददुसऱ्या मात्रेचा किंवा अक्षराचा हिशेब जास्त महत्त्वाचा?

शिवाय मला असेही वाटते की प्रत्येक मराठी गझल ही केवळ वाचण्यासाठी लिहिण्यापेक्षा गायनासाठी लिहिणे जास्त महत्त्वाचे असते. गायलेली गझल ही अधिक स्पष्ट होते.

मी साधारणपणे केवळ तांत्रिक गोष्टींमधेच न अडकुन पडता माझी गझल सर्वसामान्य रसिकांना सहज समजु शकेल अशा पद्धतीने लिहिण्याचा आणि गाण्याचा प्रयत्न करतो.

बाकी कृपया गैरसमज नसावा. __/\__