असंही जोडलेलं एक नातं...

Submitted by विद्या भुतकर on 23 May, 2016 - 00:17

चार वर्षाची मुलगी आणि वर्षाचं बाळ मागे सोडून ती भरल्या संसारातून निघून गेली. गेली म्हणजे खरंच गेली, देवाघरी. घरावर दु:खाचं सावट पसरलं. पसरलं म्हणजे काय? कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे, मुलांचं काय हे यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माहीत. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही. पण काय करणार? त्याच्यावर ती वेळ आली होती. घर लोकांनी भरलं होतं. जो तो जमेल तशी मदत करत होता. नातेवाईक जमले होते. मुलं समोर आली की याच्या अश्रूंचा बांध फुटायचा. ती तरी काय करणार बिचारी. कुणीतरी मोठ्या मुलीला बघत होतं कुणी बाळाला. दु:खं दु:खं म्हणतात ते हेच, दुसरं काय?

त्याने सर्व विधी पार पाडले. कुठेतरी त्यालाही कळत होतंच, जे झालंय ते स्वीकारावं तर लागणार आहेच. कालासमोर कुणाचं चाललंय? प्रत्येकजण त्याला हेच तर समजावून सांगत होता. दोन मुलांसाठी तुला धीट व्हावेच लागेल. असं रडून चालणार नाहीये, इ. इ. १५ दिवसांनी त्याने थोडं स्वत:च्या पलीकडे जाऊन पाहिलं. घराची दुरवस्था होती एकदम. त्याला वाटलं,'ती असती तर अजिबात चालला नसता हा पसारा'. त्याने घर आवरायला सुरुवात केली. पण जिथे तिथे तीच ती होती प्रत्येक गोष्टीत, घराच्या कणाकणात. तो थकला, बसून राहिला शून्यात बघत. पुन्हा त्याला ते लोकांचे 'धीर धरायला' लावणारे शब्द कानावर होतेच. त्याला एकदम आठवले,'मुलं कुठे आहेत?' . त्यांना किती दिवस पाहिलेच नव्हते त्याने. तो किचनमध्ये आला. त्याला तिथे चार बायका जेवण बनवताना दिसल्या. त्याने विचारलं,'मुलं कुठे आहेत?'. त्याची आई म्हणाली, 'त्यांना परवापासून डे-केअरला पाठवायला सुरु केलंय परत. इथे घरात ठेवून काय करणार दिवसभर?' .

तो बाहेर आला तेव्हा त्याला तिची आई एका कोपऱ्यात बसलेली दिसली. त्यांच्याकडे पाहून त्याला एकदम जाणवलं की आपण आपल्याच दु:खात इतके बुडालो आहोत की त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी गमावलीय याचा आपण विचारच केला नाहीये. गेल्या तीन चार वर्षापासून तिची आई यांच्या घरी राहायला आली. एकटीच होती, बाबा गेल्यावर आई किती दिवस एकटी राहणार म्हणून तिने हट्ट केला होता पण जावयाच्या घरी कसं राहायचं म्हणून आई येतंच नव्हती. पण नात झाल्यावर तिचं करायला लागतं असं निमित्त करून तिला घरी आणलं होतं. सुरुवातीला त्याच्या घरच्यांच्या विरोध खटकायचा तिला पण ती हळूहळू दुर्लक्ष करू लागली. असेही सासू सासरे परगावी राहायचे. मग ,'त्यांना काय त्रास होतोय ती इथे असली तर?' हा प्रश्न तिने अनेकदा महेशला विचारला होता. तो तिला समजवायचा. त्याचं काही खूप जवळचं नातं नव्हतं त्यांच्याशी पण समजून घ्यायचा, मोजकंच बोलायचा. मुलांना आजीचा लळा होताच. आज महेशला भानावर आल्यावर कळले की नवरा नवरा नाही आणि आता एकुलती एक मुलगीही अशी सोडून गेली याचं किती दु:खं असेल या बाईला? आणि तरीही गेल्या पंधरा दिवसात त्याच मुलांचं बघत होत्या.

आताही महेश त्यांच्याकडे आला तशा त्या पटकन उठल्या म्हणाल्या,'काही हवंय का? पाणी आणू? जेवण होतंच आहे इतक्यात. आज मुलं पाळणाघरात आहेत. मी येईन घेऊन." त्यांची ती तत्परता आणि त्याला सांभाळण्याचा आवेश पाहून त्याला कसंनुसं झालं.
तो म्हणाला,"काही नाही मी ठीक आहे. मी येतो घेऊन मुलांना पाहिजे तर."
त्या," नाही, नको तुम्ही थोडे दिवस तरी गाडी नका चालवू. मी जाऊन येईन रिक्षाने."

त्याने मान हलवली आणि बाहेर जाऊन बसला. आता त्याच्या डोक्यात सासुबाईंचे विचार सुरु झाले होते. तो हळूहळू त्यांना सहारा देऊ लागला होता. त्यांचं हवं नको पाहू लागला होता. दिवस काय संपत जातात, कुणी नसलं तरी चक्र चालूच राहतं. दोनेक महिने होऊन गेले होते. घरातील वर्दळ आता बंद झाली होती आणि रोजचं आयुष्य तिच्याशिवाय कसं जगायचं हे तो शिकत होता. रोज एका नव्या आठवणीला मागे टाकत होता, कधी स्वत:शी झगडत होता. आई बाबा आणि सासू इतकेच लोक होते घरात. एक रविवारी दुपारी सासुबाईनी आपली bag भरलेली त्याला दिसली.

त्या त्याच्याशेजारी येऊन बसल्या, म्हणाल्या,"महेश खूप विचार केला काय करायचं, कुठे जायचं? अनेक प्रश्नही पडले, माझ्या या छोट्या नातवाचं काय? तुमचं कसं होईल? इतके दिवस थांबून राहिले, जमेल तितकं काम केलं. पण मला आता बाहेर पडलंच पाहिजे."

त्यांचं हे वाक्य ऐकून तो जरा बिथरला."अहो काय बोलताय काकू तुम्ही? कुठे जाणार आहे? ".

त्या बोलल्या, "कुठे म्हणजे? जाईन ना माझ्या घरी. इतके दिवस लेकीचं घर म्हणून राहिले. आता तीच नाही तर मी तुमच्या घरात कशी राहणार?".

इतक्यात त्याची आई बाहेर आली, म्हणाली," अरे मी बोलले त्यांना थांबा अजून थोडे दिवस. जरा तुझे बाबाही गावाकडची कामं करून येतील. मग जा. पण ऐकत नाहीयेत या."

त्याला आता आईचा राग येऊ लागला. "थोडे दिवस म्हणजे काय? त्यानंतर कुठे जाणार? ".

त्याची आई थोडी गांगरली,"अरे, असं काय करतोस? त्या काय करणार इथे राहून?"

"काय म्हणजे? काकू काही नाही तुम्ही कुठेही जायचं नाहीये. इथेच राहायचं आहे. आपल्या नातवांना असं वाऱ्यावर सोडून जाणार का? ".

त्यावर त्या बोलल्या," अरे आहेत ना तुमचे आई-बाबा ही इथेच येत आहेत. मी काय करणार इथे राहून? मी येत जाईन अधे मध्ये. "

त्याला काही सुचेना, त्याने त्यांचे सामान घरात नेऊन ठेवले. त्याच्या सध्याच्या मनस्थितीमध्ये त्याला कुणी काहीही त्रास देऊ इच्छित नव्हतं. त्या गप्प बसल्या. जाऊ थोड्या दिवसांनी त्यांनी विचार केला. रात्री घरातलं सर्व आवरून, मुलांना झोपवून त्या बाहेर आल्या तर महेश एकटाच कट्टयावर बसला होता. त्या त्याच्या शेजारी जाऊन बसल्या.

हळू आवाजात बोलू लागल्या,"हे गेले तेंव्हा लेकीकडे बघून जगत राहिले. तुमच्याकडे आले तेव्हा कुठे जरा मन रमलं. नातवांना बघून सुखावले. आता ती इथे नाही. तुम्हीच सांगा लेकीचं म्हणून तरी हे घर माझं राहिलंय का?"

त्यांचे अश्रू वाहतच होते. अशा वेळी कुणी कुणाला समजवावं हे कळत नाही.

तो धीराने बोलला, "काकू तुम्ही इथे आलात तेव्हा तिची आई म्हणून मीही स्वीकारलं. माझे आई बाबा या घरात राहू शकतात तर तुम्ही का नाही? त्यामुळे त्यात चुकीचं काही वाटलं नाही. तिच्याजागी मी गेलो असतो तर माझ्या आई-बाबांसोबत नसती का राहिली ती? मग तुम्ही का असं बोलता? आणि हो, खरं सांगू का? या घरात कितीही लोक असले ना तरी, तुम्ही आजूबाजूला असता तेव्हा एक दिलासा असतो. बाकी सर्व लोकांना मी माझ्या दुखातून बाहेर कसा पडू यावर बोलायचं असतं. पण तुम्ही काहीच बोलत नाही. फक्त माझ्या सोबत असता. माझं दु:खं तुमच्यापेक्षा कुणाला जास्त कळणार? आपण दोघांनी ती एक व्यक्ती गमावली आहे. ते कुणालाच ना सांगू शकतो ना समजावू शकतो. "

ती जिवंत असताना कदाचित नसेल त्याचं नातं इतकं पक्कं. पण तिच्या जाण्याच्या दु:खाने त्यांना अजून जवळ आणलं होतं. तो नकळत त्यांच्या मांडीवर डोके ठेवून पहुडला होता आणि त्याही डोळे झिरपत त्याला शांत करत होत्या.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणीतरी मोठ्या मुलाला बघत होतं कुणी हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळाला >>> ४ वर्षाची मोठी मुलगी आहे ना ? एक वर्षाचं बाळ हॉस्पिटलमध्ये का? आणि मग लगेच दोन आठवड्यात पाळणाघरात ?

खुप छान

माधवः गोष्ट लिहिताना मलाच रडू येत होते. त्यामुळे पुन्हा वाचयची हिम्मत झाली नाही. अशीच कुणितरी गेलेली आठवली. Sad चु.भू. द्या.घ्या.

नवरा नस्तानाही सासू- सासरे याना सामभाळणार्या सुना असतात. पण उलट कधी होते का? आणि अशा स्थितीत होऊ शकते का? असो. ही लिहून माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला असे वाटले. कुणावरही अशी वेळ येऊ नये हेच खरे.

विद्या.

ओळखीत घडलेली दु:खद घटना आठवली. फरक एकच की मुलीची आई काही महिन्यांच्या नातीचे आणि चार वर्षांच्या नातवाचे करायला त्याच इमारतीत रहाते.

chhan lihilay vidya tumhi. khup vaiet vat te ase lekh vachun. mazi aai baba suddha mazya kade rahtat mazya mulila sambhalayla.

reality मधे असे होणे शक्यच नाही>> +१११
खरं आहे. माझ्या घरात मी सध्या अनुभवत असलेली परिस्थिती आहे ही. ३६ चा आकडा कायम असतो घरात.
जावई वयः७० आणि सासू वय:८८. असं असल्यामुळे काही बोलु शकत नाही. ३ वर्षाच्या बाळाला घेउन दुसर्‍या खोलीत निघुन जाणे हा एकच ऊपाय... Sad

हे अस घड्त?
जर घड्त असेल ना तर अश्या जावयान्ना special seat मिळायला हव नन्तर स्वर्गात...
मी वाचताना मनाला सारख सान्ग्त होते, हि कथा आहे.... हि कथा आहे... हि कथा आहे...

नवरा नस्तानाही सासू- सासरे याना सामभाळणार्या सुना असतात. पण उलट कधी होते का? आणि अशा स्थितीत होऊ शकते का? असो. ही लिहून माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला असे वाटले. कुणावरही अशी वेळ येऊ नये हेच खरे.

खर आहे....

विद्या, तू फार सहज सोपं, सुरेख लिहितेस.

अगदीच राहावलं नाही म्हणून सांगते आहे. अशी माणसं फार थोडी असतील हे खरंच, पण नाहीतच असं नाही.
माझ्या सासूबाई त्यांच्या आईची एकुलती एक मुलगी. सासूबाईंचे वडील गेल्यावर आजेसासूबाईंना त्या काळात आमच्या घरी कायमचं आणलं होतं. दुर्दैवाने माझ्या सासूबाईही गेल्या. तेव्हा माझा नवरा दहावीत होता. मोठे दीर, नणंदा त्याच्याहून मोठे होते. एकुलती एक मुलगी गेल्याच्या दु:खाने आजेसासूबाई पारच खचल्या. त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. माझे सासरे- म्हणजे त्यांच्या जावयानं नि नातवंडांनी त्यांचं सगळं केलं. त्यानंतर त्या सहा महिनेच जगल्या. पण जावयाकडेच होत्या. घरात त्यांना सगळ्यात मोठ्या व्यक्तीचाच मान मिळत असे.

अर्थात याउलट वागणारी घरं आहेतच. अशीही घरं बघितली आहेत. अगदी जवळच्या नात्यात की जिथे आईला सुनेनं काही दिवस बोलवायचं तरी तिला सासरच्यांची परवानगी घ्यावी लागते. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती.