जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग २०): मुंबईतले जंगी स्वागत

Submitted by आशुचँप on 7 March, 2017 - 04:16

http://www.maayboli.com/node/61889 - (भाग १९): वसई - उन्हाच्या तलखीत महाराष्ट्रात प्रवेश
===============================================================================================

काल स्वीट डिश खायच्या नादात विनय आणि नितिनने आणलेले रसगुल्ले खायचेच राहून गेले. आणि ते घेऊन जाणेही शक्य नव्हते, उन्हात खराब झाले असते. त्यामुळे पट्टीचे खवय्ये असणाऱ्या ओबी आणि वेदांगच्या रुममध्ये पुडा घेऊन गेलो. त्यांना काय मज्जाच.

दरम्यान, हेम काहीतरी विचारायला म्हणून रुममध्ये आला आणि थक्क झाला. तो कट्टरपणे साखर, बेकरी प्रोडक्ट वगैरे न खाणारा. कितीही काहीही झाले तरी चुकुनही हात लावणार नाही. इतक्या दिवसात त्याने साखर कशी हानिकारक यावर अनेकदा बौद्धिके घेतली होती, आणि त्याला प्रत्यक्ष ते पाळताना बघून कुणाला तरी गुण नाही पण वाण लागला असेल असे त्याला वाटले. पण पहाटे पाच वाजता आम्ही गपागप रसगुल्ले हाणतोय हे बघून त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या. आता आमचाही नाईलाज होता, इतक्या प्रेमाने आणलेली गोष्ट, ती पण रसगुल्ले वाया कसे घालवणार.

आज १०० च किमी जायचे असल्यामुळे अगदी अंधाऱ्या पहाटे जाण्याची गरज नव्हती आणि आज असेही ठाण्यात आम्हाला चक्रम हायकर्सचे सदस्य भेटणार होते. त्यांनी आदले दिवशीच फोनाफोनी करून नाष्ट्याचे आमंत्रण दिले होते. त्यातून माझे अनेक नातेवाईकपण ठाण्यात.

माझे सख्खे आज्जी आजोबा, मामा-मामी, आत्या, आत्तेभावडं हे सगळेच ठाण्याचे. इतकेच काय माझा सख्खा धाकटा भाऊ पण शिकायला आयआयटी पवई मध्ये. आणि त्या सगळ्यांना मला भेटल्याशिवाय पुढे जाणेच शक्य नव्हते. आणि रात्री उशीरा पर्यंत आमची फोनवरून चर्चा चाललेली की कुठे भेटायचे. सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो असतो तर फार वेळ गेला असता त्यामुळे एकच जागा ठरवून सगळ्यांना तिकडे यायला सांगितले.

बाकी मुंबईकर माबोकरांना पण भेटण्याची इच्छा होती पण नेमका ऑड वार बुधवार असल्याने ऑफीस सोडून कुणाला येणे शक्य नव्हते. पण माबोकर स्वच्छंदी उर्फ मनोज भावे येतो म्हणाला.

बाहेर पडताना वेदांग आणि ओबीने थोडी घासाघीस करून किंमत कमी करण्याच्या प्रयत्न केला. त्या दोघांनी विशेषता ओबीने अनेक ठिकाणी त्याच्या या निगोशिएशच्या स्कील्सच्या जोरावर आमची राईड बरीच इकॉनॉमिकल केली होती.

बाहेर मस्त दोन भूभूची इवली पिल्ले खेळत होती. त्यांच्याशी खेळत बसायचा मोह झालेला पण एकतर उशीर झाला असता आणि दुसरे म्हणजे त्यांची आई जवळच होती. तिने जर हरकत घेतली असती तर महागात पडले असते. तरी पण निघेनिघेस्तोवर मला उशीर झाला आणि हॉटेलबाहेर पडलो तेव्हा बाकी सगळे हायवेला लागलेले.

हायवेला एक जबरदस्त सरप्राईज होते. कुणी सांगितले असते की जम्मु, पठाणकोट इतके धुके तुम्हाला मुंबईत बघायला मिळेल तर आयुष्यात कधी विश्वास ठेवला नसता. पण त्या दिवशी सॉलीड धुके होते, थोडे लवकर निघालो असतो तर अजून छान धुक्याचा पडदा बघायला मिळाला असता पण जे मिळाले तेही भन्नाट होते. कदाचित ते तुंगारेश्वरच्या सानिध्यामुळे असेल पण त्या अशा किंचित गार हवेत दमटपणा होताच पण असे एकदम प्रफुल्लीत करणारे वातावरण होते. पुलं म्हणतात तसे, हवा इतकी ताजी होती की जगाच्या अंतापर्यंत धावत सुटावे.

...

उल्हास नदीच्या ब्रिजवर तर अजून भारी वातावरण होते. महाराज नुकतेच ढगांची दुलई बाजूला करून उठत होते, त्या सोनेरी किरणांची जादू अशी झाली होती की नदीचे पाणी आणि काठदेखील सोनेरी झाले होते. त्यावर पांढरेशुभ्र गल्स पक्षी शिकार मटकावण्यासाठी संधी शोधत घिरट्या मारत होते, आणि एकांडा नाविक आपली छोटीशी नाव घेऊन भल्या सकाळीच कामाला लागला होता. ब्रीजवरून कामासाठी आकांताने धावत असलेली गाड्यांची रांग आणि खाली पोटापाण्यासाठी निवांत चाललेला मच्छिमार हे इतके कॉन्ट्रास्ट चित्रही दिसले. एकंदरीत काय दिल खुष झाला.

...

तिथेच एक मुंबईकर सायकलीस्ट भेटला. अभिषेक नावाचा, त्याने सगळी चौकशी केली, गप्पा टप्पा झाल्या आणि मी पुढे निघालो तो एका व्यक्तिमत्वाची ओळख झाली. - राजेश गाडगीळ. हे नांव आज भारतातील प्रस्तरारोहकांत अग्रक्रमाने घेतलं जातं. प्रसिद्ध जाई काजळ कंपनीचा मालक. हिमालयन क्लब कमिटी मेंबर, चक्रम हायकर्सचा खंदा सदस्य, गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सह्याद्री व हिमालयात अखंड प्रस्तरारोहण मोहिमा करणारा अनुभवी व उच्च दर्जाचा प्रस्तरारोहक. ते आमची वाटच पाहत थांबले होते अर्धा तास. मोहीम सुरु झाल्यापासून ते आम्हाला रेग्युलरली फॉलो करत होते आणि रोजच्या रोज थोडे तरी खरडून अपडेट टाकत जा अशी ताकीदच त्यांनी हेमला दिलेली होती.
तिथेच हेमचा एक पुतण्याही आला होता.

...

हेमच्या प्रेमाचा राजेश गाडगीळ यांच्या बुलेटशी वार्तालाप.

त्यांच्याशी थोडे बोलून पुढे निघालो तर ते आम्हाला एस्कॉर्ट करत पुढे. घोडबंदर रोडने भाईंदर पाड्याला लागलो तेव्हा माझे सगळे लक्ष स्पीडोमीटरवर होते. आज बरोबर १९ किमी नंतर आम्ही २००० चा टप्पा पार करणार होतो. तसे मी सगळ्यांना सांगितले होते. पण त्या टप्प्यात लागला तीव्र उतार आणि त्यामुळे कुणीच थांबले नाहीत. माझ्यासोबत काका आणि हेम होते (नेहमीप्रमाणेच), त्यांना थांबवले आणि मग एक फोटोसेशन झाले.

कन्याकुमारी मोहीमेत आम्ही १००० किमी टप्पा पार केला होता, पण इथे त्याच्या बरोबर दुप्पट. असले भारी वाटत होते. पण तो क्षण साजरा करायला बाकीचे मेंबर नव्हते याचे थोडे वैषम्य वाटले. इतक्या स्पेशल क्षणासाठी तरी त्यांनी थांबायला हवे होते असे मनापासून वाटून गेले त्यावेळी. असो.

या दोघांचा या क्षणात खूप मोठा वाटा आहे. हे नसते तर मला ही मोहीम पूर्ण करणे शक्य नव्हते.

पुढे माजिवड्यापाशी चक्रम हायकर्सचे बाकीचे लोक आमची वाट बघत असल्याचा निरोप मिळाला आणि मग फार न रेंगाळता पुढे निघालो. गर्दीतून वाट काढत तिथल्या उडपी हॉटेलपाशी पोचलो तेव्हा चक्रम हायकर्स कार्यकारिणी सदस्यांनी गुलाब व कॅडबरी देऊन प्रत्येकाचं जोरदार स्वागत केलं. बऱ्याच कालावधीनंतर उडपी मिळाल्यामुळे डोसा, इडली, वड्यावर जोरदार ताव मारला आणि त्यावर वाफाळती कॉफी. अक्षरश तुडुंब खादाडी झाली. आणि मग एक फोटोसेशन.

मुलुंडस्थित चक्रम हायकर्स गेली ३३ वर्षे गिर्यारोहण क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे. अध्यक्ष किरण देशमुख, माधव फडके, पराग ओक, अनिकेत रहाळकर ही सगळी सह्यांकनसारख्या अनेक दमदार गिर्यारोहण मोहीमा आयोजनातली प्रचंड अनुभवी मंडळी. किरण, माधव, पराग ही गेली तीस वर्षे व अनिकेत १५ वर्षांपासून या क्षेत्रात. उद्धव ठाकरेंनी आकाशातून किल्ल्यांचं जे छायाचित्रण केलंय, त्यावेळी त्या किल्ल्यांच्या ओळखपरेडसाठी माधव फडके त्यांच्यासोबत होते as a navigator. किरण व पराग दोघेही उद्योजक व कितीही बिकट परिस्थितीत थंड डोक्याने परिस्थिती हाताळणारे. आणि त्यांनी ज्या अगत्याने स्वागत केले ते कायम लक्षात राहण्यासारखेच.

पुढे निघालो तर सकाळच्या प्राईमटाईम गर्दीत वाट काढत जावे लागले, वरचेवर सिग्नलला थांबावे लागत होते. पण वेळ मजेमजेत गेला कारण ठाण्यातली पब्लिक मस्त चिअरअप करत होती. आणि एक भारी गंमत म्हणजे, सिग्नलला थांबलो असताना दुचाकीवरून आपल्या मुलासोबत चाललेल्या एकींनी मला तुम्ही मायबोलीकर का म्हणून विचारले.

मी त्या धक्क्याने अक्षरश पडलोच.

म्हणलं, हो तुम्हाला कसं कळलं

म्हणे, मी वाचलेलं तुमच्या जम्मु पुणे राईडबद्दल

खरं, सांगतो त्यावेळी आपल्या मायबोली कुटुंबाचा इतका अभिमान वाटलेला. बाकीच्यांना म्हणलं, बघा आमची मायबोली. कुठेही कसलाही ओळख नसताना असे बंध तयार होतात.

पुढे इथे लेख लिहाताना कळलं, त्या मायबोलीकरीण आऊ होत्या.

तुम्ही ठाण्यात आला होता तेव्हा माजिवडा जंकशन वर बघितलं मी तुम्हाला, कोण होते ते माहित नाही पण मी मायबोलीकर का म्हणून विचारल तर तुम्ही पण मायबोलीकर का अस विचारल. मी त्याच दिवशी रजिस्टर केला सभासद व्हायला. हि एक कायम स्मरणात राहील अशी आठवण आहे माझ्यासाठी

मी जेव्हा त्यांना म्हणलं, मीच होतो तो तेव्हा

मस्त वाटलं... तुमचे चेहर्यावरचे भाव पण भार्रीईईई होते. मी तुमचा पहिला भाग आला तेव्हा मुलाला दाखवलं आपण बघितलेले सायकल स्वर बघ, तो पण जाम खुश होता तुम्हाला बघून.

हा त्यांचा प्रतिसाद कायम लक्षात राहणारा आहे.

आणि मुंबईकरांचा (ठाणेकरांचा) उदंड प्रतिसाद पण...

या सगळ्या धांदलीत मला भावाचा फोनावर फोन येत होता. पुढे गेलेल्यांना नजरेच्या टप्प्यातून सुटू न देणं, आणि फोनवर बोलणं या दोन्ही कसरती मला जमेनाच. म्हणून त्याला म्हणलं, जरा दम काढ येतोच आहे.

थोडं पुढेच कळवा नाक्यापाशी सगळे आमची वाट पाहत होते. भाऊ, आत्तेभावंडं, मामा आणि विशेष म्हणजे माझे ९० च्या घरातले नाना. खरंतर जेव्हा मी मामाला फोन केला होता आदले दिवशी तेव्हाच त्याला म्हणलं होतं आम्ही फार वेळ थांबू शकणार नाही त्यामुळे आज्जी - नानांना येऊ देऊ नको, त्यांना कारण नसता उन्हाची दगदग होईल. पण ते ऐकतील तर नाना कसले. मामा म्हणाला, मी निघालो तर माझ्या आधी ते रिक्षात.

आणि त्या सगळ्यांनी आम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नसेल या हिशेबाने भरपूर खायला आणले होते. बहिणीने फ्रुटीचे पॅक्स, भावाने माझ्या वहिनीने आदले दिवशी जागून केललं एक उत्कृष्ट कस्टर्ड, फ्रुट केक्स आणि बरंच काय काय. त्यांना म्हणलं, आम्ही जम्मूपासून उपाशी आहोत अशा हिशेबात आणलयं का का. आणि आम्ही नुकतेच आकंठ हादडून आलेलो. त्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी थोडेथोडे खाल्ले आणि बाकीचे पॅनिअर्सवर लोड करून घेतले, वाटेत खायला म्हणून. इतक्या दिवसांची सवय दुसरे काय.

पण आपल्या नातेवाईकांना भेटून जो काही आनंद झाला त्याला तोड नाही. त्यांना म्हणजे माझे कसे कौतुक करावे असे झालेलं आणि मला म्हणजे त्यांच्या नुसत्या तिथे असण्यानेच प्रचंड बरं वाटत होतं. माझ्या भावाची हौस तर इतकी दांडगी की त्याला आम्ही गेल्यावर राहवेनाच, तो त्याच दिवशी पुण्याला गेला आणि दुसरे दिवशी आमच्या स्वागताला तिथे हजर. म्हणलं, भारी आहेस तू.

दरम्यान मनोज भावे पण येऊन ठेपला. त्याच्याशी गळाभेट झाली.

आणि या सगळ्यात नाही म्हणलं तरी बराच वेळ गेला आणि तिकडे वेदांग, लान्सची चुळबुळ सुरु झालेली जाणवत होती. सकाळी हॉटेलवरून निघाल्यानंतर वाटेत कुठेही फारसा वेळ न घालवता मुक्कामाच्या हॉटेलवर पोहचण्याचा त्यांचा खाक्या त्यांना इथेही राबवायचा होत आणि मला म्हणजे आपल्या माणसांतून पाय निघत नव्हता. आणि त्यांची घाई नाही म्हणलं तरी मनाला लागली. इतक्या सुंदर अनुभवात लागलेली एक बारीकशी टाचणी इतपतच त्याचे महत्व पण टोचली खरी.

आता उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आणि घसा वरचेवर कोरडा पडत चाललेला. पण एक सुख होतं ते म्हणजे वाटेत भरपूर नीरा विक्रीची दुकाने होती. सायकलींग करताना नीरा पिण्यासारखे सुख नाही दुसरे. त्यामुळे मस्त वाटेत ग्लासामागून ग्लास रिचवत राहीलो.

पुढे ऐरोली ब्रीजपाशी अजून एकजण गाडीवरून आला आणि चौकशी करायला लागला, तोपर्यंत मला तेच ते बोलून इतका कंटाळा आलेला की मी बहुदा शिरिष का कोणाकडे तरी बोट दाखवून ते लीडर आहेत ते सांगतील असे म्हणालो.

शिरीष त्यावेळी छान डुलकी घेण्याच्या मूड मध्ये होता

पुढे मग रबाळे, घणसोली, तुर्भे, सानपाडा, डीवायपाटील या आत्तापर्यंत अगणितवेळा गेलल्या रस्त्याने मार्गक्रमण करू लागलो. फरक इतकाच होता आत्तापर्यंत गाडी, बसने गेलेलो आणि आज पहिल्यांदाच सायकलवरून चाललेलो. त्यामुळे रस्ता इतका खाबडखुबड आहे याची जास्तच जाणीव झाली. पुढे सायन पनवेल हायवेचा गुळगुळीत रस्ता लागला पण नंतर एक्सप्रेसवे च्या तोंडावर उजवीकडे वळून पनवेलकडे सरकलो.

याचसाठी केला होता अट्टाहास, वडापावचा घास मुखी जावा..... Happy

आता उन्ह म्हणजे मी म्हणत होतं आणि नको नको ते सायकलिंग असे होत होतं, पण त्यात एका पाटीने सुखद शिडकावा केला. पुणे फक्त १०० किमी. अहाहा काय बरे वाटले ते वाचून. बस आता उद्या दुपारी, जास्तीत जास्त संध्याकाळी मी घरी असेन आणि उद्या रात्री माझ्या बेडवर.

शिरिषने घेतलेला माझा एक अप्रतिम फोटो. माझ्या अत्यंत आवडत्या फोटोपैंकी एक

पुढे चौकपाशी एक कलिंगडवाला पाहून सगळे थांबले. इथेही वेदांग आणि लान्स थांबलेले नव्हते. आणि परत त्यांना गाठायची कुणाची इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही तिथेच मस्त सावलीत बसून कलिंगडांचा फडशा पाडला. तेव्हा आमच्या कन्याकुमारी मोहीमेच्या आठवणी निघाल्या. मी, सुह्द आणि काकांनी मिळून आख्खे कलिंगड बसल्या बसल्या संपवले होते आणि त्यावर सुह्द उसाचा रस पण प्याला होता.

पुढे थोड्याच अंतरावर रावणांची जोडी दिसली, मग एकत्रितपणे मार्गक्रमण करत राहीलो. शेवटचे दहा एक किमी राहीलेले पण ते अंतर संपता संपत नव्हते. माझ्या तर सहनशक्तीचा मीटर चौकलाच संपलेला, नंतरचे अंतर केवळ ओढत ओढत आलो. सगळ्यांनी तिथल्याच एका सोडावाल्याकडे घसे ओले करून घेतले पण मला आता हॉटेलचे वेध लागलेले त्यामुळे थोडक्या अंतरासाठी मला घसा दुखवून घ्यायचा नव्हता.

हॉटेल होते एकदम राजेशाही. भव्य आणि मुबलक पार्किंग स्पेस आणि स्वागताला खुद्द मामा. या माणसाची खरेच कमाल होती, पुणे - अहमदाबाद - पुणे हे ड्रायव्हींग कमी वाटले काय म्हणून ते आम्हाला भेटायला परत ड्राईव्ह करत खोपोलीला आलेले. सोबत इती आणि सुह्द. मग काय धमालच.

अर्थात मामांच्या येण्यामागचे कारण एक असेही होते की पुण्याला गेल्यावर सगळे आपापल्या घरच्यांच्या नादात व्यग्र होतील, तेव्हा त्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा आत्ताच आढावा बैठक घ्यावी. काय चुकले, काय करता आले असते इ. इ. विषयावर चर्चा करून पुढच्या मोहीमेची मोर्चेबांधणी करायला ते उपयुक्त झाले असते. अर्थात, मिटींग म्हणजे काय अगदी फॉर्मल नव्हती, अनौपचारिक गप्पाच त्या, पण परत गरमा गरमी होण्याची शक्यता होती त्यामुळे मला तो निर्णय फारसा पसंत पडला नाही.

कारण लगेच काय कुठे मोहीम ठरणार नव्हती, त्यामुळे सगळे स्थीरस्थावर होऊन आठवडे भराने जरी मिटींग झाली असती तरी चालणार होते. पण असो आता ठरवलीच आहे तर बोलावे म्हणून जाऊन बसलो.

पहिले घाटपांडे काकांनी त्यांचे ऑब्जरवेशन सांगितले, सुरुवातीच्या दिवसात आम्ही कसे अतिशय सावकाश जात होतो, मग उशीर झाल्यामुळे कसे थोडे कठोर व्हावे लागले, मग तीन तासात ४० बद्दल सांगितले. तो एक बेस्ट उपाय त्यांना सापडला होता त्यावर दुमत नव्हतेच. आणि एकूण त्यांनी मोहीम अत्यंत यशस्वीरित्या सांभाळून आणली होती. किरकोळ कुरबुरी होणं स्वाभाविक होतं, पण टीम मेंबर्सना सांभाळून घेणं, सगळ्यात शेवटी राहून मागे पडलेल्यांना एकटं न पडू देता, त्यांना मोटीव्हेट करणं, पंक्चर्स आणि इतर टेक्निकल अडचणीत सगळ्यात पहिले मदत करायला पुढे सरसावणं आणि कुठेही शिस्तीचा, करडेपणाचा, मी म्हणतोय तीच पूर्व दिशा असे न करता देखील.

त्याबद्दल काकांना खरेच हॅट्स ऑफ.

मग वेदांग, लान्सने त्यांची तक्रार केली की कितीही हळू जाऊन पण त्यांना वरचेवर थांबावे लागत होते आणि वर त्याबद्दल आमची कुरबुर ऐकून घ्यावी लागत होती.

मग माझ्यावर आले, आणि मी मागच्या आढावा बैठकीतून एक मोलाचा धडा घेतला होता की कुणावरही आरोप करून किंवा आपले म्हणणे ठासून सांगण्यातून मने दुखवण्यापलिकडे फार काही साध्य होत नाही. आणि मोहीम अंतिम टप्प्यात असताना मला हे मुळीच करायचे नव्हते, त्यामुळे सगळी कटूता बाजूला टाकली आणि फक्त माझ्याबद्दल बोललो.

म्हणलं, कन्याकुमारी मोहीमेच्या वेळी देखील मला त्रास झालेला, आणि आत्ताही. तेव्हाच्या अनुभवातून शिकून मी जास्त सराव करायला हवा होता, पण मला माझा अती-आत्मविश्वास आणि आळशीपणा नडला. जेवढा झालाय तितका पुरेसा आहे असे मला वाटले आणि ती माझी सर्वात मोठी चूक होती. आणि त्याची पुरेशी शिक्षा मला झाली.

त्यानंतर रुट प्लॅन करतानाच्या चुकीबद्दलही बोललो, की फ्लॅट रस्ता आहे असे नकाशात बघून जास्त अंतर एका दिवशी पार करण्याचा निर्णय ही घातकी होता. उन्ह, हेडविंड्स हे फॅक्टर फारसे विचारात धरले गेले नाहीत.

आणि वेगाच्या फरकाबद्दल बोललो की हे टाळण्यासाठी एकत्र मोहीम करू नये हेच श्रेयस्कर. म्हणजे सुसाट गँगला सारखे थांबावे लागण्याची शिक्षा नको आणि स्लो गँगला फरफट करून घेण्याची शिक्षा नको. ज्यांना वेग थोड्याफार फरकाने सारखा आहे अशाच लोकांनी एकत्रित मोठी मोहीम करावी म्हणजे क्लॅशेस कमीत कमी होतील. कारण अशा मोहीमांमध्ये कॉम्पिटॅबिलीटीचा मुद्दा खूप महत्वाचा असतो, आणि तो नसेल तर सगळ्यांनाच त्रासदायक ठरते, जसे की आत्ताच्या मोहीमेत झाले. त्यामुळे कदाचित माझी ही शेवटची राईड असेल तुमच्यासोबत.

हे थोडे धक्कादायकच स्टेटमेंट होते कारण मग मामा, काका, आपटेकाका सगळ्यांनीच मिळून माझे थोडे बौद्धिक घेतले. दरम्यान, तणाव हलका करण्याच्या उद्दीष्टाने शिरिषने हेमला त्याच्या बिनसाखरेच्या आहारशैलीबद्दल विचारले. असेही हेमला सकाळपासून ते बोलायचे असावेच. सकाळचे रसगुल्ले त्याच्या लक्षात असणार. कारण त्याने अतिशय तपशीलवार साखर, बेकरी प्रोडक्ट, चहा-कॉफी सारखी पेये, लोणची आणि तेलकट पदार्थ कसे तुमच्या शरीराचा ऱ्हास करतात यावर सखोल विवेचन केले.

त्याच्या या नोटवरच मिटिंगची सांगता झाली आणि सगळे जण आपापल्या गारेगार खोल्यात झोपायला गेलो.

मी मध्ये कुठेतरी स्ट्राव्हा सुरु करायलाच विसरलो, त्यामुळे लान्सचा डेटा देत आहे

============================================================
http://www.maayboli.com/node/61957 - (भाग २१): मुक्काम पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप... छान लिहीता हो तुम्ही!
तुमची मोहीम आहे पण कुठलाही भाग वाचला तरी तो पुर्ण आहे. खरखुर मनातल प्रांजळ लेखन आहे.

ऑन लाइटर नोट... तुम्ही दिल दोस्ती दोबारा ही झी मराठी वरील मालिका बघता का? बघाच Happy
त्यातील पक्या उर्फ़ पुश्कराज चिरपुटकर सारखे दिसता तुम्ही. बरच साम्य आहे चेहर्‍यात. Happy
हा बघा पक्या Happy
Pakya.png

दैवशील - मस्त वाटले तुमचा प्रतिसाद वाचून. तुमची सायकल झकास आहे आणि हॅन्डलबार बॅग पण, वेगळी बनवून घेतलीये का? आवडली मला खूप

पीजी शास्त्री यांच्या बद्दल माहिती नव्हते, धन्यवाद त्या बद्दल, आता माहिती मिळवून वाचतो

नीरा - होय आधीच्या मालिकेत तर त्याचे नाव आशु च होते तेव्हाही लोक म्हणायचे की माझ्या सारखा किंवा मी त्याच्या सारखा दिसतो म्हणून. पण मला तो कधीच आवडला नाही

बापू - आज दुपारी
झालाय लिहून एकदा शेवटचा हात फिरवतो आणि टाकतो

लवकर टाका शेवटचा भाग.
कालपासुन जेव्हा जेव्हा माबो उघडतेय तेव्हा तेव्हा फक्त तुमचा लेख आला का बघतेय.

पाचवा फोटो भ यं क र सुंदर आलाय. नदी, धुकं, पक्षी, सकाळच्या सूर्याचं प्रतिबिंब. तो माहोल परफेक्ट फोटोत चित्रबद्ध झालाय. (पहिल्यांदा वाचलं तेव्हा फक्त वडापाव दिसला होता :P)

आशुचॅम्प मला पण केवढा आनंद झाला त्या दिवशी जरा घाई होती आणि तुम्ही थांबलं कि नाही असा वाटून थांबवलं नाही पण नंतर खूप लागला मनाला एवढ्या लांबून तुम्ही सगळे आलात आणि फार बोलता नाही आलं. पण तुम्ही पुन्हा कधी ठाण्यात याला तेव्हा नक्की भेटायला आवडेल.
माझा उल्लेख केलात या भागात खूप छान वाटतंय.

 *तुमची सायकल झकास आहे आणि हॅन्डलबार बॅग पण, वेगळी बनवून घेतलीये का? आवडली मला खूप*

-- धन्यवाद सर.
ती बॅग प्रत्यक्षात मोटारसायकलची साईड बॅग आहे. मी ती हँडलबार बॅग म्हणून वापरली.

आज १३ च्या पासुन पुढचे सगळॅ भाग वाचून काढले, वाचतानाच तुमच्या सोबत राईड करतो आहे असे वाटत रहाते इतके जबरदस्त लिहिले
_/\_

Pages