जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १९): वसई - उन्हाच्या तलखीत महाराष्ट्रात प्रवेश

Submitted by आशुचँप on 5 March, 2017 - 04:02

http://www.maayboli.com/node/61878 - (भाग १८): वलसाड- गुजरातमधली खादाडी
=======================================================================================

एक किंचित आळसावलेली सकाळ. सगळी अन्हिके आटपून खाली आलो तरी किंचित झोप पूर्ण न झाल्याचाच फिलिंग येत होतं. पण एक गोष्ट मोटीव्हेट करत होती ती म्हणजे, गुजरातेतील हा शेवटचा दिवस. आज दुपारनंतर आम्ही महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करत होतो. एकदम होमली फिलींग वाटत होते त्यामुळे.

मग त्याच उत्साहात आवरून निघालो. आजचा पल्ला मोठा होता जवळपास दीडशे किमी. उद्या १०० किमीवर खोपोली आणि परवा ९० किमी वर पुणे. आपण पुण्याला पोचणार हा विचारच खूप मस्त वाटत होता जरी अद्याप घर ३००-४०० किमी वर असले तरी.

इतक्या सकाळी पण बऱ्यापैकी असे चिकचिकत होते. किंचीत गारवा होता पण त्याला असा खारेपणाचा फ्लेवर होता. आम्ही अगदी आता किनारपट्टीला खेटून जात असल्याचा परिणाम. तरी काळोख्या पहाटे निघालो तर ही अवस्था, अन्यथा काय अवस्था झाली असती याची कल्पनाच करवत नाही. आजच्या दिवशी उकाड्याने आमची सगळ्यात जास्त परिक्षा पाहिली.

साधारण सहा सात किमीनंतर एक खाडीवरचा मोठा ब्रिज लागला. त्याच मोक्यावर महाराजांची एन्ट्री झाली. काल माझा सूर्योदयाचे फोटो काढण्यात फार वेळ गेला होता, त्यामुळे आज भास्कररावांना एक रामराम घातला आणि पटदिशी पुढे सरकलो.

इथल्या हायवेला इतक्या पहाटे देखील बरेच ट्रॅफिक होते आणि मला एकदम मागे राहून कारण नसताना जीव धोक्यात घालायची इच्छा नव्हती. त्यामुळे रेटत राहीलो.

...

तत्पूर्वी माझ्याकडचा एनर्जी बारचा स्टॉक चेक केला. परफेक्ट दोन बार्स शिल्लक राहीले होते. झाले आता उद्या एक आणि परवा बोर घाट चढायला एक. एकदा लोणावळा गाठले की हाहा म्हणता पुणे. त्यामुळे असे छान वगैरे वाटले की किती आपण भारी प्लॅनिंग करतो. असो

पुढे मग काका भेटले आणि आम्ही जोडीने मार्गक्रमण करू लागलो. सकाळची आल्हाददायक वेळ असल्याने स्पीड चांगला पडत होता, त्यामुळे वाटेत चहा बिस्किटे हाणल्यानंतर वापी पार करून पुढे निघालो देखील. पण वापीच्या रस्त्यात मी गंडलो कुठेतरी आणि फ्लायओव्हर चुकवण्याच्या नादात डेडएन्डला पोचलो. परत उलटा येऊन बराच मागे जाऊन पुन्हा योग्य रस्त्यावर येण्यात नाही म्हणले तरी बराच वेळ गेला. आणि पुढे गेलेल्यांना गाठण्याच्या नादात माझी छानपैकी चुकामुक झाली.

भिलाडजवळ ते नाष्ट्याला थांबले होते पण रस्त्याच्या बाजून एक प्रचंड मोठी ट्रकची लाईन होती. त्यात मला ते दिसलेच नाहीत आणि मी त्यांना गाठण्याच्या इतक्या तंद्रीत होतो की त्यांना लांबून मला केलेले हातवारे कळलेच नाहीत. त्यात एका ट्रकच्या मागून दोन भटकी कुत्री भुंकत अंगावर आली. त्यांना चुकवायला म्हणून जोरजोरात पॅडल मारत राहीलो. बराच पुढे गेलो तरी सापडेना म्हणल्यावर काहीतरी गडबड असल्याचे जाणवले, म्हणून फोन काढला तर काकांचे पाच मिस्ड कॉल. त्यांना फोन लावला तर म्हणे, कुठल्या तंद्रीत होता, इतका तुला आवाज देत होतो. म्हणलं, आता मागे येऊ का. तर म्हणे, आमचा नाष्टा होत आलाय, तु पुढे कुठे मिळेल तिथे खाऊन घे, आम्ही गाठतो.

पडत्या फळाची आज्ञा घेत खायला हॉटेल शोधू लागलो, पण मनात विचार आला असेही अनायसे लीडला आहोत तर मारूया अजून पाच दहा किमी. पण त्यातही धोका होता म्हणजे तलासरीच्या अलीकडे कुठेतरी महाराष्ट्राची सरहद्द लागत होती. तिथे ग्रुप फोटो काढणे मस्ट होते. त्यामुळे मग एका छोटेखानी हॉटेलात घुसलो. मेनूकार्डवर आम्लेट पाव दिसला आणि तीच ऑर्डर गेली. असेही या शाकाहारी लोकांसोबत राहून राहून मी पण सक्तीचा श्रावण पाळत होतो. त्यामुळे संधी मिळताच समिष भोजनाची इच्छा आम्लेटावर भागवली. कडकडीत भाजलेले पाव, दोन अंड्याचे आम्लेट आणि त्यावर कडक स्ट्रॉंग कॉफी असा लईच फर्मास नाष्टा होईपर्यंत गँग येऊन ठेपलीच.

मग सगळे मिळूनच निघालो आणि शोध सुरु झाला वेलकम टू महाराष्ट्राच्या बोर्डाचा. आम्ही कन्याकुमारीला जाताना आणि आत्ताही इतकी राज्ये पालथी घातली होती आणि जवळपास प्रत्येक राज्याने चांगला ठसठशीत बोर्ड लाऊन आमचे स्वागत केले होते. पण सांगायला वाईट वाटते की महाराष्ट्र राज्याला काय तशी बुद्धी झाली नाही. सरहद्द पार करून आत आलो तरी कुठेही महाराष्ट्रात तुमचे स्वागत आहे असा बोर्ड काय मिळेना.

महाराष्ट्राची एन्ट्री शोधणारे सायकलपटू

कहर म्हणजे पुढे टोलनाका होता त्याचे डझनावारी बोर्ड. च्यायला म्हणले यांच्यातर ना. एक बोर्ड लावायला यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे बाकी सगळ्यांच्या राज्यांच्या पाटीसोबत आमचे फोटो आहेत फक्त महाराष्ट्राच्या नाही.

त्यानंतर पुन्हा चालू झाला रणणत्या उन्हाच्या साक्षाने एक अग्निदिव्य. असे वाटले होते महाराष्ट्रात तरी उन्हाची तलखी कमी झाली असेल पण छे. उलट आजूबाजूला बोडके डोंगर आणि त्यातून बाणासारखा जाणारा नॅशनल हायवे यांनी मिळून एक प्रचंड छळ मांडला होता.

त्यातून फ्लायओव्हरच्या बांधकामात बरीच लेव्हल झाली असावी अशी शंका येण्या इतपत मुबलक फ्लायओव्हर. आधीच्या अनुभवातून शहाणे होऊन मी काही फ्लायओव्हर केले पार. पण त्या डोंगरावर सायकल चढवणे हे एक इतके दिव्य होते की पुन्हा मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने जाणे सुरु केले. माझे बघून हेमही मला जॉईन झाला. मग आम्ही इतक्या दिवसांप्रमाणे जोडी जोडीने गप्पा मारत जायला सुरुवात केली. पण आज उन्हाचा तडाखा असह्य होता होता. फ्लायओव्हरची किंचित सावली पण ओअॅसिस वाटत होती. वरचे वर पाणी ढोसत होते, थोडे अंगावरही शिंपडून घेत होतो पण काय नाहीच.

एके ठिकाणी माझा अगदीच अंत झाला आणि फ्लायओव्हरच्या बाजूला सायकल थांबवली आणि म्हणलं, थोडा वेळ बसू राव सावलीत, आता सायकल ओढणे अशक्य झालयं. हेमही बराच एक्झॉस्ट झाला होता. त्यानेही मूक अनूमोदन दिले. आणि मग तिथेच बरी जागा बघून हेल्मेट ठेवले आणि त्यावर डोके ठेऊन पाठ टेकवली. इतके दमलो होतो की मला तर पाचव्या मिनिटाला गाढ झोप लागली. आत्ता नक्की आठवत नाहीये पण असे रंगबिरंगी काहीतरी स्वप्न पडले होते. इंद्रधनुष्यी ढग, डोंगरावरून उडी घेत जाणारा धबधबा, त्याखाली भिजतोय वगैरे वगैरे. कितीवेळ झोपलो होतो कळलेच नाही आणि धसदिशी डोळे उघडले तेव्हा स्थळ, काळ, वेळाचा काय अंदाजच येईना. आपण कुठे आहोत, काय करतोय हे जरा थोड्या उशीराने मेंदूत घुसले तेव्हा हेमकडे पाहिले तो छानपैकी घोरत होता.

त्याचा एक फोटो काढला आणि गदागदा हलवून उठवले, म्हणले लेका दोघेही आपण बिनघोर झोपलोय, नेल्या असत्या सायकली तर कळले पण नसते. तोही निम्म्या झोपेतच होता, म्हणे, जाऊ दे कपडेच आहेत त्यात. म्हणलं, अरे चालत जावं लागलं असतं त्याचं काय. तोंडावर एक सपकारा मारला पाण्याचा आणि निघालो, वाटेत मागे वळून पाहिले, एरवी कुठल्याही परिस्थितीत मी असा रस्त्याच्या बाजूला झोपलो नसतो पण या उन्हाने तेही करायला लावले.

तोपर्यंत पुढे गेलेल्यांचा फोन आला, ते फार काय लांब नव्हते त्यामुळे त्यांना गाठले पण तेही आता नको वाटत होते. जाऊन पाहिले तर बाकीच्यांची अवस्थाही फार काय चांगली नव्हती. सगळेच जण उन्हाच्या माऱ्याने तिरमिरल्यासारखे झाले होते.

...

...

इतक्या उन्हात खायची इच्छासुद्धा मेली होती. नुसते गार काहीतरी प्यावे वाटत होते. तिथे छान मसाला सोडा होता. पण त्याने परत तहान तहान होणार हे माहीती असून देखील प्यालो. गार इतके हवेहवेसे वाटत होते की आईस्क्रीमचे चित्र गार करून आणून दिले असते तर तेपण चाटले असते. तिथेच नळ होता त्यावर अंग भिजवून घेतले, रुमाल ओला केला आणि डोक्यावर ठेऊन पुढे चालवायला सुरुवात केली.

पुढे वसई नाशिकचा फाटा दिसला, हेमला म्हणलं बघ इथूनच सटकतोय का, पुण्याला जाऊन पुन्हा नाशिक गाठायचा त्रास वाचेल. पण त्याने काय दाद दिली नाही. त्याचे लक्ष होते महालक्ष्मी सुळक्याकडे. जम्मुमधल्या आणि अरवलीच्या पर्वतरांगा पार करून आल्यानंतर सह्याद्रीचे पहिले भेदक दर्शन फार भारी वाटत होते. आणि त्यामुळे खास थांबून फोटो काढला.

तिथेच पुढे एक छानसे हॉटेल दिसले. हॉटेल कसले धाबाच होता पण मराठमोळा. आत सावलीत मस्त बाजली वगैरे टाकलेली. खाण्यापेक्षा मला त्या बाजल्यांचे आकर्षण जास्त वाटले. आत गेलो तर गरमागरम थाळी समोर आली. वांग्याची भाजी, भाकरी, कांदा, ताक असा फर्मास मेन्यू. अहाहा ते बघूनच डोळ्याला संतोष वाटला.

मग ते उन्ह बिन्ह सगळे विसरून त्यावर ताव मारला आणि त्या बाजल्यांवरच जरा वेळ लोळत पडलो. अर्थात सगळेजण दाटीवाटीने त्यावर मावणे शक्यच नव्हते त्यामुळे इथे झोपण्यापेक्षा रुम गाठावी आणि झोपावे या विचाराने निघालो.

उन्हाचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी अंग नखशिखांत झाकून घेतलेले या अवस्थेत मी कसा दिसत असेन याचा अंदाज घ्यायला काढलेला हा फोटो. किच्च भिजवलेला रुमाल डोक्यावर ठेवल्यानंतर थोड्याच वेळात तो कोरडा व्हायचा आणि परत घामाने किच्च भिजायचा. छळ होता नुसता..

मनोरजवळ वैतरणा नदी पार केली. त्या पाण्याच्या दर्शनानेही बरे वाटले, त्या मुलांसारखे मलाही जाऊन डुंबावे वाटत होते पण तेवढा वेळही नव्हता आणि जायला रस्ताही नव्हता. तसेच मग फरफट करत जात राहीलो.

वाटेत चहाला थांबलो असतानाचा एक क्लिक. या प्राण्यापासून आपल्याला काही धोका नाही असे दोघांनाही वाटत असणार Happy

थोडे पुढे गेलो तर अतुल, आपटेकाका, शिरिष चिंताक्रांत अवस्थेत उभे होते. म्हणलं काय झालं, तर अतुलच्या घरून फोन होता, त्याच्या सासऱ्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यांना अॅडमिट केले होते. आणि त्याला तातडीने पुण्याला बोलवले होते. त्याला आता मोहीम पॅक करावी लागणार होतीच पण या ठिकाणहून तो जाईल कसा असा विचार करतानाच टेंपो जाताना दिसला. आम्ही हात दाखवून टेंपो थांबवला आणि त्यातून अतूलला सायकलसकट हॉटेलला सोडायची विनंती केली.

तोपर्यंत मागून युडी आले, आणि त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन अतुलसोबत जायचे ठरवले, आणि त्याप्रमाणे ते दोघे गेलेही. ते गेल्यावर मला लक्षात आले अरे आपणही जाऊ शकलो असतो की टेंपोतून. पण म्हणलं आपल्या नशिबात पॅडल मारतच पुणे गाठणे लिहिले असेल तर थोडक्यासाठी कशाला बट्टा.

पुढे गेलेल्या लान्स, वेदांग आणि ओबीला टेंपोतून यूडी जाताना दिसले. त्यांना वाटले यांच्यासोबत निदान आपले पॅनिअर पुढे पाठवता येतील म्हणून त्यांनी हात करायला सुरुवात केली, पण युडींना वाटले ते नुसतेच हात करतायत, तर त्यांनीही नुसता हात हलवला आणि पुढे गेले. ओबी आणि वेदांगचे चेहरे पाहण्याासारखे झालेले.

दरमजल करत वसईपर्यंत गेलो. त्यांनी मात्र आमचे छानसे स्वागत केले पण त्याहीपेक्षा या बोर्डने फार समाधान दिसले. पुण्याचा पहिला बोर्ड. याचा फोटो काढणे तर मस्ट होते.

वसईचे हॉटेल होते मात्र एकदम पॉश. आम्हाला वसईत फार आत जायचे नव्हते आणि हायवेनजीक फार चांगली हॉटेलपण नव्हती, त्यामुळे त्या खर्चिक हॉटेलमध्येच उतरावे लागले.

आजचे सरप्राईज होते ते मायबोलीकरांचे. खास आम्हाला भेटायला कट्ट्याचे मालक विनय भिडे आणि नितीन साकरे हॉटेलला आलेले. येताना छानपैकी सायकलचे चित्र असलेले बफ् आणि रसगुल्ले घेऊन आलेले. त्यांना भेटून इतके किती छान वाटले हे सांगूच शकत नाही. दिवसभराच्या रगाड्यानंतर त्यांची भेट म्हणजे एक सुखद शिडकावा होता.

शिडकाव्यावरून आठवले, त्यांनी आणलेली रसगुल्याची पिशवी हिंदकळल्यामुळे त्यातला रस गळायल लागलेला आणि त्या पॉश हॉटेलच्या लॉबीत असा प्रकार झाल्याने तिथली देखणी मॅनेजर जाम कावलेली. पण तिने सोफॅस्टिकेडेली दुसरी पिशवी आणून द्यायला लावून लगेच साफसफाई करून घेतली.

जेवायला दुसरीकडे कुठे नसल्याने त्याच हॉटेलच्या डायनिंग रुममध्ये डिनर घेतले. हो त्याला रात्रीचे जेवण म्हणणे त्याचा अपमान झाला असता. खिसा बऱ्यापैकी हलका करणारे ते डिनर होते मात्र लाजवाब. वर अमर्यादित स्वीट डिश. किती खाता अशी कॉम्पिटीशन झाल्यावर थोडा वेळ बसल्या जागचे उठताही येईना.

हॉटेलच्य बाहेरच पानाचा ठेला होता तिथपर्यंत कसेतरी चालत गेलो आणि ब्रम्हानंदी टाळी लाऊन झोपायला गेलो. बस, आता उद्याचा एक दिवस कि परवा घरी. मधला एक दिवस स्कीप करून डायरेक्ट घरी जाता आले असते तर आवडले असते कारण पोराचा फोन - बाबा तु कधी येणारे

म्हणलं परवा, तर उद्या का नाही,

म्हणलं अरे मी लांब आहे खूप यायला वेळ लागेल

तर म्हणे गाडीत बस आणि ये

म्हणलं, आवडलं असतं पण इथे गाड्याच नाहीयेत, त्यामुळे मला सायकलनीच यावे लागेल

त्यावर बरं म्हणून ठेवला पण मलाच जाम हुरहुर व्हायला लागली त्याला भेटायची आणि मधला दिवस पण नकोसा वाटायला लागला.

...

=======================================================
http://www.maayboli.com/node/61917 - (भाग २०): मुंबईतले जंगी स्वागत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे जवळपासच आलात की! उन्हाने ज्यामच हालत झालेली दिसतेय . डिहायड्रेशनच संकट अश्यावेळी उभं ठाकत मग. मॅनेज केलंत हे सुदैव .

आता पुढचा मुक्काम ठाणे का ?

पोचलातच की !
२-३ दिवसांपूर्वी पटापट पुढचे भाग यावे असं वाटतं होतं. आता शेवटचा भाग जवळ आल्यावर उत्कंठा टिकून राहण्याकरता जरा हळू लिहा असं म्हणावंसं वाटतंय. Happy

अरे वा .. खरं तर या रस्त्यांवरुन सुसाट गाड्यातून अनेक वेळा गेलो असेन, तेव्हा हे असले काही जाणवतही नाही. हे अनुभव मात्र खासच आहेत.

वसईला हायवेलगत एक मोठी डेअरी आहे, तिथे दूध, दही एवढेच नव्हे तर खरवसही खुपदा मिळतो. ( पुढच्या वेळी लक्षात ठेवा Happy )

एकदम मराठमोळ्या म्हणी आठवू लागल्या राव.

एक नंबर , आले आले आमचे चित्ते परत आले हो, आरा जम्मूचेही तखत राखतो महाराष्ट्र माझा,

जब्बरदस्त भाऊ,एक नंबर ट्रिप होती ही.

आता पुढचा मुक्काम ठाणे का ?
>>>>

नाही ठाणे नाही...ठाणे पार करून खोपोली

डिहायड्रेशनच संकट अश्यावेळी उभं ठाकत मग.
>>>>>
त्यासाठीच वरचेवर पाणी, ताक, सरबत जे मिळेल ते ढोसत होतो, त्यामुळे सुदैवाने कुणालाच त्रास झाला नाही डीहायड्रेशनचा.

आता शेवटचा भाग जवळ आल्यावर उत्कंठा टिकून राहण्याकरता जरा हळू लिहा असं म्हणावंसं वाटतंय >>>>>
हा हा..काय करू मग गॅप घेऊ का..तुम्ही म्हणाल तसं

वसईला हायवेलगत एक मोठी डेअरी आहे >>>>
हो आम्ही पाहीला त्याचा बोर्ड पण आत काय गेलो नाही.

एक नंबर ट्रिप होती ही. >>>>
धन्यवाद

काय करू मग गॅप घेऊ का..तुम्ही म्हणाल तसं>>>> ओ ! असलं काही करू नकात . आता पूर्ण करूनच सोडा ही मालिका . दोन स्टेशनसाठी कशाला तो गॅप . तुम्ही लिहा आम्ही वाचू Happy

तुमची ट्रीप संपत आलीय अन आम्हांलाच हूरहूर लागलीये...:)

कथालेखन करतांना पण असाच अनुभव येतो...कथेचा शेवट जवळ आला असे वाटले की एक अनामिक हूरहूर जाणवतेच.

हा हा..काय करू मग गॅप घेऊ का..तुम्ही म्हणाल तसं >>>

आशू गंमत केली जरा
सुसाट पुण्याला पोचूनच दम घे आता

"आता शेवटचा भाग जवळ आल्यावर उत्कंठा टिकून राहण्याकरता जरा हळू लिहा असं म्हणावंसं वाटतंय +१"
अगदी हेच म्हणायचय.........
आत्तापर्यन्त तुम्ही सगळे सायकलीवरून प्रवास करत होतात आणि आम्ही धाग्यावरील माहीती वाचुन तुमच्या प्रवासात सोबत होतो. आता ती सोबत संपणार....

मधूनच ही मालिका समोर आल्याने तिथून वाचायला सुरूवात केली. पण आता पहिल्या पासून वाचायला हवे होते असे वाटू लागले आहे इतका उत्कंठावर्धक अनुभव आहे हे...
कारण पोराचा फोन - बाबा तु कधी येणारे >>> टडोपा आले.

आशुचँप जमलं तर एक काम करा please,
शेवटच्या भागात तुमच्या टीम मधील प्रत्येक सदस्याचे या राइडबद्दलचे मनोगत त्यांच्याशी बोलून, तुम्ही फक्त लेखनिक बनुन आमच्या पर्यंत पोहचवा की.

ओह नो!! आशुचँप तुमची सफर संपत आली!! शेवटचा भाग लौकर नका टाकू प्लीज...

<<आत्तापर्यन्त तुम्ही सगळे सायकलीवरून प्रवास करत होतात आणि आम्ही धाग्यावरील माहीती वाचुन तुमच्या प्रवासात सोबत होतो. आता ती सोबत संपणार.... >> +१

अरे भारीच !!

आशू एकदम जोरात मोमेंटम पकडलास की.... आता डायरेक्ट मुक्कामाला पोचूनच विश्रांती घे. >> +१

"काय करू मग गॅप घेऊ का..तुम्ही म्हणाल तसं" - वेगे वेगे धावू आणी डोंगरावर जाऊ करत ही सफर संपवा आणी नवीन लेखमालिका सुरू करा.