रुईयात रंगलेले जांभूळ आख्यान

Submitted by अतुल ठाकुर on 5 March, 2017 - 19:52

DownloadFile.jpg

रुईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महाभारत महोत्सवाची सांगता लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जांभूळ आख्यानाने होऊन दोन दिवस चाललेल्या या उत्सवाने कळस गाठला. महाभारतातील कथांशी, त्यांच्यातील पात्रांशी निगडीत असलेल्या अनेक कथा जनमानसात प्रचलित आहेत ज्या कदाचित महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीने प्रक्षिप्त ठरवल्या असतील. मात्र या लोककथांचे आपले महत्त्व आहे. समाजमन महाभारताचा विचार कशा तर्‍हेने करते याचे चित्र या कथांमध्ये दिसते. महाभारतातील कर्ण ही एक गुंतागुंतीची व्यक्तीरेखा. महाभारतातील खलनायक येथपासून ते महाभारतातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती येथपर्यंत करणचे जीवन असंख्य कलाकारांनी चितारले असेल. अशा या देखण्या कर्णावर भाळलेली द्रौपदी हा जांभूळ आख्यानाचा विषय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गोंधळाचे स्थान महत्त्वाचे आहे. आणि त्यात अनेक आख्याने सांगितली जातात. जांभूळ आख्यान हे त्यापैकिच एक. लोकशाहिर विठ्ठल उमप यांचा प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. मात्र नंदेश उमप यांनी सादर केलेला प्रयोग अतिशय देखणा आणि विलक्षण परिणामकारक होता.

मूळात लोककला म्हणजे अतिशय आकर्षक, रंगीबेरंगी वेशभूषा, अस्सल मातीतली भाषा, रांगडे कलावंत, थोडासा वाह्यातपणा, प्रसन्न विनोद, राजकारणातील चालु घडामोडींवर मार्मिक टिप्पणी, हजरजबाबीपणा, कसबी गाणारे आणि बजावणारे अशा सर्व भरजरी गोष्टींना एकत्र आणणारी सांस्कृतिक जत्राच. जांभूळ आख्यानही याला अपवाद नव्हतेच. सुरुवातीला चौरंग, तांदूळ, सुपार्‍या, पानाचा विडा, चौरंगाला बांधलेला उस, फुले, समई वगैरेंनी थेट गोंधळाचे वातावरण स्टेजवर उभे केले. सर्व प्रेक्षक जणुकाही गोंधळालाच येऊन बसल्यासारखं वातावरण निर्माण झालं. पुजा सुरु झाली. वाद्यांचा कडाका सुरु झाला. देवीला साद घातली गेली. नंदेश उमप चौरंगासमोर तो मोठा झगा घालून बसले होते. प्रथेप्रमाणे एकमेकांना नमस्कार करणे झाले. नंदेशजींनी झोकात दोनतीन गिरक्या स्टेजवर घेतल्या, आणि संपूर्ण स्टेजवर तो झगा फरारला. पुढे काहीतरी जबरदस्त पाहायला मिळणार आहे याची ती नांदीच होती. वादकांची वेशभूषा एकसारखी होती. पण विलक्षण आकर्षक. बाकि पांडव, श्रीकृष्ण, कर्ण यांच्या वेषाने तर इंद्रधनुष्यच स्टेजवर अवतरले होते. त्यातून प्रकाशाची विलक्षण योजना या सार्‍यांना एक चमकदार झळाळी देऊन वातावरण भारून टाकत होती. नंदेश उमपांनी "रे देवा गजानना" अशी साद सर्वप्रथम घातली, ती त्या प्रेक्षागृहात अशा काही विलक्षण ताकदीने घुमली कि प्रेक्षक एकदम सावरून बसले.

एखाद्या आवाजात किती ताकद असु शकते याचा तो साक्षात्कार होता आणि पुढे जे सादर झालं ते सारंच अवर्णनीय होतं. जांभूळ आख्यानाची कथा अनेकांना माहित असेल तरीहि मला ती येथे देणं इष्ट वाटत नाही. ती उत्सुकता ठेऊनच आपण ते आख्यान पाहायला हवे. पाच पांडवांबरोबर सुखाने नांदणार्‍या द्रौपदीचे मन कर्णावर जडते. परंपरा द्रौपदी आणि कर्ण दोघेही रुपाने अतिसुंदर असल्याचे सांगते. पाण्डवांमध्ये सौंदर्यासाठी फक्त नकुलाचे नाव घेतले जाते. अशावेळी जातीच्या सुंदराचे मन दुसर्‍या देखणेपणावर भाळते. अंतर्यामी श्रीकृष्णापासून ही बाब लपून राहात नाही. तो तत्काळ पांडवांकडे सहज आल्यासारखा येतो. द्रौपदीसकट सर्वांना वनभोजनाला घेऊन जातो. सर्वांना फलाहार करण्याची इच्छा होते. मात्र कृष्णाने तेथिल झाडांवरील सर्व फळे आपल्या मायेने दिसेनाशी केलेली असतात. फक्त एका जांभळाच्या झाडाच्या टोकावर एकमेव फळ असते. तेच फळ भीम तोडून आणतो. आता एक वेगळाच पेच सर्वांसमोर उभा राहतो. त्या वृक्षाखाली एक ऋषी अनेक वर्षे तप करीत असतो आणि एकाच जांभळावर आपला निर्वाह चालवित असतो. नेमके तेच जांभूळ तोडून आणल्याने ऋषीच्या क्रोधाला आणि शापाला पांडव नक्की बळी पडणार अशी परिस्थिती निर्माण होते. आता प्रत्येकाने आपले स्वत्व पणाला लावून ते जांभूळ फांदीला पुन्हा चिकटवावं असा सल्ला श्रीकृष्ण देतो. पांडवांतील प्रत्येक जण आपण सत्याने वागलो आहोत अशी ग्वाही देऊन ते फळ वर उडवतो मात्र कुणाच्याही वेळी ते फळ फांदीला चिकटत नाही. आणि कर्णावर मन जडलेल्या द्रौपदीच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण येतो...
यापुढील सर्व काही प्रत्यक्ष पाहण्याजोगे.

अतिशय नेटकेपणाने केलेल्या या प्रयोगात नेपथ्य असे फारसे नव्हतेच. मात्र अंगावर पांघरलेल्या वस्त्रांच्या साहाय्याने या मंडळींनी जो "फ्लॅशबॅक" सादर केला त्याला तोडच नव्हती. आपापसात हळूवारपणे गिरक्या घेत राजवाड्यातून वनात, वनातून राजवाड्यात, वर्तमानकाळातून भूतकाळात आणि पुन्हा वर्तमानात ही मंडळी सहजपणे प्रवेश करीत होती. राजवाडा दाखवताना भिंत म्हणून पांडव उभे राहात होते. दरवाजा दाखवताना दोघंजण अंतर ठेवुन कमान म्हणून एकमेकांचे हात वर धरीत होते. सारे काही आवश्यकता असेल तसे क्षणात उभे राहात होते आणि गरज संपल्यावर हळूवारपणे नाहीसेही होत होते. स्थावर अशा काही वस्तुंची गरज भासतच नव्हती. हे सारे सादर करीत असतानाच परंपरेचे भानही होतेच. देखणा कर्ण आणि नकुल, उंच, बलदंड खण्यापिण्याचा भोक्ता, पराक्रमी पण भाबडा असा भीम, आपली वेळ आल्यावर जांभूळ उडवतानादेखील धनुष्यबाणाचे सहाय्य घेणारा अर्जून, आणि या सर्वांहून वेगळी वेशभूषा केलेला श्रीकृष्ण. हे कथानक सुरु झाल्यावर पार्श्वभूमीला कृष्ण प्रेक्षकांकडे तोंड करून स्टेजवरील प्रसंग पाहात शांतपणे उभा असतो. तो सर्वसाक्षी असल्याचे दाखवायला परंपरा विसरत नाही.

बाकी लोककलांमध्ये स्निग्धता किती असते याचादेखील पुरेपूर प्रत्यय येथे आला. कुठेही कसला टोकदारपणा नव्हता. सारेकाही आपल्या रोजच्या जगण्याशी जुळवून घेतलेली होते आणि म्हणूनच ते फार फार भावणारे वाटले. द्रौपदीला "दुरपदा" म्हणणारा श्रीकृष्ण होता. कृष्ण आल्यावर आनंदीत झालेली आणि त्याच्या पाहुणचारासाठी "भाकरी आणि ठेचा" करणारी द्रौपदी होती. कर्णाला घरी आल्यावर आतिथ्य करताना द्रौपदीने कलिंगडे खायला घालण्याचा प्रसंग होता. घरी आलेल्या पाहुण्याला पाटलिण बाईने पाटिल रानात गेले आहेत असे सांगावे त्या थाटात पांडव जरा बाहेर गेले आहेत असे द्रौपदी कर्णाला सांगते. कलाकार तर सर्वच जबरदस्त ताकदीचे वाटले. एक गिरकी घेऊन नंदेश उमपांनी झग्याचे एक टोक वर उचलून, त्यावर रंगीत वस्त्र पांघरून बालकृष्णाला जोजवणारी यशोदा क्षणात अशी काही उभी केली कि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. श्रीकृष्णाचे काम करणार्‍या कलावंताचे डोळे तर अतिशय भेदक होते. लोककलेचा एकंदरीत बाज विनोदी असल्याने "टायमिंग" महत्त्वाचे होते आणि "टायमिंग"च्या बाबतीत सर्वच कलाकार कसलेले वाटले. जांभूळ एकेका पांडवांना उडवण्यासाठी देताना कृष्ण ते आपल्या झग्याने पुसून देत होता. द्रौपदीचे मन कर्णावर जडणे हा या आख्यानाचा गाभाच. त्यामुळे गाण्यामध्ये "अन करणाला पाहूनी द्रौपदीचं मन पाकुळलं" अशी ओळ वारंवार येत होती. ही ओळ वेगवेगळ्या भावनेने आणि वेगवेगळ्या स्वरात गायिली जाऊन खुबीने वातावरण निर्मिती केली जात होती. लहानात लहान प्रसंग पुरेपुर ताकदीने वठवला गेला होता.

जांभुळ आख्यान पाहील्यावर काव्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून एक विचार मनात आला. आमच्याकडे अलंकरशास्त्रात भट्टनायक नावाच्या काव्यशास्त्र्याचे "साधारणीकरणा"चे तत्त्व प्रसिद्ध आहे. भरताच्या नाट्यशास्त्रामधील रसनिष्पतीबद्दल आपली संकल्पना मांडताना भट्टनायक म्हणतो नाटक सुरु झाल्यावर भूमिका ताकदीने वठवल्या गेल्या तर स्टेजवरील राम आणि सीता हे अलौकिक "राम आणि सीता" न राहता त्यांचे साधारणीकरण होते. ती लौकिकातली साधारण माणसे होऊन जातात. त्यांची सुखदु:खे ही त्यांची अशी वेगळी न राहता सर्वसामान्यांची होऊन जातात. अशावेळी सहृदयप्रेक्षक आणि नट यांच्यात संबंध प्रस्थापित होऊन रसनिष्पत्ती होते. जांभुळ आख्यान पाहताना हे जाणवले कि त्यातील परिवेश, भाषा, प्रसंग, कलाकार हे सर्वच इतके काही आपल्या मातीतले होते आणि इतक्या सामर्थ्याने त्या भूमिका वठवल्या गेल्या होत्या कि साधारणीकरण घडण्यास फारसा वेळच लागत नसावा आणि म्हणूनच हे इतके जबरदस्त परिणामकारत होत असावे. जांभूळ आख्यानाची मोहिनी अशी होती कि अथपासून इतिपर्यंत प्रेक्षक भारल्यासारखे बसले होते.

समाजशास्त्राच्या दृष्टीने हे आख्यान विचार करायला लावणारे होते. द्रौपदी पाचांची पत्नी तर खरी. पण हे पाच जणाचं पत्नीपण म्हणजे संस्कृतीने दिलेला व्याभिचाराचा परवाना नव्हे हे स्पष्टपणे अधोरेखित करणारं हे आख्यान होतं. द्रौपदी पाचांची पत्नी झाली त्याला काही कारणे महाभारताने सांगितली आहेत. मात्र तो विषय तेथे संपला. यानंतर तिने पाचजणांबरोबर प्रामाणिकपणे, पावित्र्याने आणि आपले सतीत्व टिकवून राहणे हे परंपरेला अपेक्षित आहे. त्याचवेळी माणसातल्या स्खलनशीलतेचेही पुरेपूर भान परंपरेला आहे. सुंदर पुरुषावर मन येऊ शकते. मात्र त्याचबरोबर सामाजिक नीतिनियम आणि बंधने ही त्याहिपेक्षा महत्त्वाची आहेत. श्रीकृष्णाला समोर आणून माणसाची विवेकबुद्धी अशा प्रसंगी साद देत असते हे आख्यानात दाखवून दिले आहे मात्र तिचा आवाज ऐकणे महत्त्वाचे असते. श्रीकृष्ण द्रौपदीचे स्खलन तिच्याकडून कबुल करवून घेतो. हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. समाजव्यवस्था सुरळित चालण्यासाठी काही नीतिनियम ठरलेले आहेत. ते योग्य कि अयोग्य यावर चर्चा घडू शकते मात्र लोककलांमध्ये हे नीतिनियम पाळण्याचाच संदेश दिला जातो हे जांभूळ आख्यानाने दाखवून दिले. जांभूळ आख्यान हे समाजात वावरताना माणसाने संयम पाळायला हवा हे सांगणारे आख्यान होते.

या आख्यानाने रुईयाच्या महाभारत महोत्सवाची सांगता झाली. अनेक दिग्गजांची व्याख्याने ऐकली. महाभारत हा नेहेमीचा आवडता आणि अभ्यासाचा विषय. त्यासाठी भरपूर खाद्य या महोत्सवाने पुरवले. यासाठी रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मंजूषा गोखले यांचे खुप खुप आभार मानावेसे वाटतात. एखादा बंदिसत आणि देखणा प्रयोग असावा असा हा महोत्सव झाला. दोन व्याख्यानांमधले छोटेछोटे कार्यक्रमदेखील तितकेच सुरेख. आणि दुसर्‍या दिवशीचे जांभूळ आख्यान म्हणजे कळस गाठणारा कार्यक्रम. अनेक गोष्टी लक्षात राहिल्या. डॉ.सरोज देशपांडे यांचे गहन विचार करायला लावणारे व्याख्यान, डॉ. गौरी माहूलिकरांचे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीतल्या सहाव्या अध्यायाचे थोडक्यात केलेले तौलनिक विचेचन, डॉ. परिणिता देशपांडे यांचे भारताबाहेरील महाभारत हे महत्त्वाची माहिती देणारे व्याख्यान, डॉ. अरुणा ढेरे यांचे लोकमहाभारत या विषयावरील मार्मिक विवेचन आणि जांभूळ आख्यानात नंदेश उमप यांनी घातलेली विलक्षण ताकदीची साद..रे देवा गजानना...

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलं आहे. जांभूळाख्यान बघायचा बेत कितीतरी वर्षं आहे पण कुठल्यानाकुठल्या कारणाने राहून गेलं आहे. त्याची परत एकदा आठवण झाली. Happy

सर्व बाजूंची फारच सुंदर ओळख. धन्यवाद. लहानपणापासून एक देवीचाच गोंधळ पाहिला आहे. त्याव्यतिरिक्त इतके प्रकार, उपप्रकार असतात याची किमान माहिती तरी झाली.

महाभारतातील कथांशी, त्यांच्यातील पात्रांशी निगडीत असलेल्या अनेक कथा जनमानसात प्रचलित आहेत ज्या कदाचित महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीने प्रक्षिप्त ठरवल्या असतील.
>>
या वाक्याचा अर्थ कोणी अधिक सोप्या शब्दात सांगू शकेल काय?

छान लिहिले आहे..

मी शाहिर उमप यांचा मूळ प्रयोग पाहिला आहे. जबरदस्त कलाकार. त्यावेळी देखील ते तसे वयस्कर होते पण त्यांचा उत्साह इतर तरुण कलाकारांएवढाच किंवा कांकणभर सरसच होता. त्यांच्या अभिनयामूळे त्यांनी साकारलेली राधा आणि द्रौपदी ही सोंगं न वाटता, एखादी स्त्री वाटत असे.

पण तूम्ही म्हणता आहात, त्याप्रमाणे प्रयोगात आणि कपडेपटात बद्ल झाले आहेत असे वाटते.

( या मूळे प्रयोगाची सिडी मात्र अत्यंत ढिसाळ आहे, अजिबात पाहू नका )

जांभुळाअख्यानाचे नावच ऐकले होते फक्त. इतर काही माहिती नव्हती. तुम्ही विस्तृत लिहिल्यामुळे फार छान झाले.
आता पहायची उत्सुकता वाटते आहे.

महाभारतातील कथांशी, त्यांच्यातील पात्रांशी निगडीत असलेल्या अनेक कथा जनमानसात प्रचलित आहेत ज्या कदाचित महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीने प्रक्षिप्त ठरवल्या असतील.
>>
या वाक्याचा अर्थ कोणी अधिक सोप्या शब्दात सांगू शकेल काय?

>>> टण्या, महाभारताची चिकित्सक आवृत्ती म्हणजे "मूळ" महाभारतात जे पद्य होते, ते शोधणारी आवृत्ती. कालांतरात महाभारतात अनेक लोककथा बाह्यमार्गाने घुसल्या, त्या कथांबद्दल ते बहुधा म्हणतायत, की त्या मूळ महाभारतातील नाहीत असे जरी संशोधकांनी ठरवलेले असले, तरी त्यांचे आपले असे महत्व आहे.

मस्त लिहिलंय. जांभुळाख्यानाबद्दल काहीच माहिती नव्हती पण आता उत्सुकता वाटतेय बघायची.

Jaambhul akhyan vachalel durga tai bhagwatanchya pustakat...
Mast lihilay tumhee.. baghayala ch have ASE vatale.

काल पाहिलं यु टयूब वर खरंच खूप छान आहे ! जांभूळ आख्यान
शाहीर विठ्ठल उमप आणि संचाने किती सुंदर काम केलं आहे